उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१० मे, २००९

ग्रॅज्युएशन भाग-५

अमेरिकेत हायस्कूल ग्रॅज्युएशनचे महत्त्वाचे भाग म्हणजे तरूणाईचा प्रॉम आणि सेरिमनी आणि पार्टी.
COMMENCEMENT CEREMONYनंतर आम्ही ही पार्टी आयोजित केली. आमच्या जवळचच इंडिअन रेस्टोरंट आधीच बूक करून ठेवले. आमच्या आणि नचिकेतच्या मित्र- मैत्रीणींना आमंत्रण दिले.पार्टीचा मूळ हेतू त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशिर्वाद याबद्दल त्यांचे आभार मानणे हा होता.
मग जेवणाचा मेनु ही निश्चित केला. केकचीही ऑर्डर दिली.
तरीही अजून बरीच तयारी बाकी होती. म्हणून हळू हळू सुरवात केली.
नचिकेत पोटात असताना माझ्या गरोदरपणी काढलेल्या फोटो पासून सुरवात करून त्याच्या १८व्या वाढदिवसापर्यंतचे काही ठराविक फोटो चार्ट पेपरवर लावून आठवणींना उजाळा द्यायचा प्रयत्न केला. त्यात त्याला मिळालेली बक्षीसे घेतानाचे फोटो, फॅन्सी ड्रेस मधले फोटो,विविध देशांच्या भेटीला गेल्याचे फोटो असे अनेकविध फोटो लावले. पार्टीला येणा-या पाहुण्यांना त्याबद्दल माहिती मिळेल आणि नचिकेतला ही आधीच्या सर्व घटना आठवतील हा हेतू.
त्याच्या मित्र- मैत्रीणींना देण्यासाठी रिटर्न गिफ्टस आणून ठेवली. आमच्या मित्र मैत्रीणींच्या लहान मुलांसाठी त्याच्या वयाला साजेसे रिटर्न गिफ्टस आणली.
थँक्यू कार्डस विकत घेऊन त्याच्या आत आभाराचा मजकूर चिकटवला. ते कार्ड ठेवलेल्या पाकिटाला बाहेरूनही सुशिभित करण्यासाठी मी विशेष प्रयत्न केले. छोटा आयताकार कागद कापून त्याच्या गुंडाळी केली. त्याला बारीक दोरा बांधून त्याला सर्टीफिकेट्चे  रूपडे दिले. ते त्या पाकिटावर एका बाजूल चिकटवले. काळ्या जाड्सर कागदावर ग्रॅज्युशन गाऊनचा आकार कापून तो त्या पाकिटाला चिकटवला त्याच्या वरच्या बाजूला त्याच कागदाचीच काळी ग्रॅज्युशन कॅप लावली. त्याला रेशमीं गोंडाही लावला. आता कसं ते पाकिट हायस्कूल ग्रॅज्युएशन इव्हेंटसाठी अगदी ऍप्रोप्रिएट झाल्यासारख वाटले.


ते थँक्यू कार्ड असलेले पाकिट आणि रिटर्न गिफ्ट एका लहानश्या कागदी पिशवीत ठेऊन त्यावर प्रत्येक पाहुण्यांचे नाव लिहून त्या प्रत्येकासाठी गूडी बॅग्ज तयार केल्या.
पार्टीच्या दिवशी दुपारी मैत्रीणीबरोबर रेस्टॉरंटमधे जाऊन सर्व फोटो लावलेले चार्ट पेपर भिंतीवरच्या हूक्समधे अडकवले. त्यामुळे संध्याकाळी पार्टीच्या रेस्टॉरंटमधे पोचल्यावर तशी काही डेकोरेशन वगैरे तयारी शिल्लक नव्हती. सर्वजण मस्त तयार होऊन रेस्टॉरन्ट मधे पोचलो. पार्टीचा हिरो ट्क्सिडो घालून अगदी स्टारसारखा चमकत होता. आम्ही ही छानसे कपडे घालून त्याच्या आजूबाजूला लूकलूकत होतो. पार्टी असलेल्या रेस्टॉरट मधे पोचल्यावर आपले फोटो पाहून नचिकेत आश्वर्य चकितच झाला. त्याच्या लहानपणीचे जुने फोटो भारतातून मागवून आणि आताचे डिजिटल कॅमेरातले ठराविक निवडून ते प्रिंट करून चार्ट पेपरवर डिस्क्रीपशनसहित लावलेल्या फोटोंचे माझे उपद्व्याप नचिकेतला माहितीच नव्हता. कारण तो शाळेत असताना मी ते सर्व काम केले होते. त्याला जरा सुध्दा कल्पना नव्हती. पार्टीला अनुरूप असे डेकोरेशन पाहून स्वारी एकदम खूश झाली.


हळू हळू आमचे पाहुणे जमायला लागले. त्यानाही फोटोची पहाताना मजा आली. त्या मजेत रूचकर ऍपिटायझ्रर्स आणि कोल्ड ड्रिक्स भर घालत होते. जोडीला गप्पा गोष्टी होत्याच. सर्व जण जमल्यावर ग्रॅज्युएशन पार्टीला अनुरूप असे डेकोरेशन असलेला चेरी फिलींगचा चॉकलेट ग्रेज्युएशनचा केक कापला.


आमची छोटी भाषणे झाली. माझ्या सासुबाईंच्या हस्ते इतर १२ वी पास झालेल्या मुलांना विशेष गिफ्ट देऊन त्यांचे ही कौतुक केले. नचिकेतला ही सर्वांनी भरभरून आशिर्वाद, शुभेच्छा आणि गिफ्टस दिल्या. जेवण खाण सुरू असताना आम्ही सर्वांना रिटर्न गिफ्ट्स दिल्या. खूपसे फोटो काढले,हा स्यविनोद झाले. मजेत वेळ घालवून सर्व जण घरी परतले.
आम्ही ही घरी परत असताना ते फोटोचे चार्ट पेपर घरी आणले. रात्र बरीच झाली होती. सर्व जण झोपायला गेले. मी मात्र ते चार्ट पेपर पहात बराच वेळ लिव्हिंग रूम मधे बसेल होते.
खूप आठवणी जाग्या झाल्या…
नचिकेत लहान होता तेव्हा मी दरवाज्याच्या पाठी मागे लपून रहायची आणि "नचिकेत कू कू क" म्हणायची. त्याने एकले तर तो शोधत यायचा आणि नाही ऐकले तर इकडे तिकडे फिरत असायचा. काही वेळाने त्याच्या लक्षात यायचे आपली आई दिसत नाही आहे. घाबरा घुबरा होऊन तो शोधत यायचा " आई, तू तुते?" असं काप-या आवाजात म्हणत रडकूंडीला यायचा. तेव्हा मजा वाटायची की `तो आपल्याला मिस करतो आहे`. पण आता तीच वेळ माझ्यावर येणार होती. तो डॉर्म मधे गेल्यावर मला दिसणार नाही. मी हाक मारल्यावर "ओ" मिळणार नाही. तेव्हा कदाचित तो व्हायचा त्यापेक्षा जास्त मी रडकूंडीला येईन आणि मी त्याला मिस करेन.
तो लहान असताना मी त्याला झोपवायला एक गाणं म्हणायची ..
नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे
शांत हे आभाळ सारे
शांत तारे, शांत वारे
या झ-याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे.
आता वाटतंय आता आमच घरही असंच शांत शांत असणार आहे. तारे, वारे, आभाळ सारे खरंच शांत होईल.
त्या गाण्यातल्या सारखा रातराणीच्या फुलांचा गंध येईल, चांदण्याला नीज येईल पण मी मात्र ट्क्क जागी असेन तूझ्या एका फोनची वाट पहात.
लहानपणापासून तूझ्या घागऱ्यांच्या छंदतालाला आवर, तूझा दंगा मस्ती थांबव असं सारखं कानी कपाळी ओरडणारी मी तूझ्या छोट्यात छोट्या अश्या किणकिणीला आसूसली होईन.
आता अजून एक आठवतंय….
तो लहान होता तेव्हा मी कामावर जायची. तो विचारायचा " तू कचाला जातेश? "
"पैसे आणायला"माझं उत्तर.
" पैचा कचाला?"
" खाऊ आणायला, टॉय आणायला."
मग तो मला मजेत बाय बाय, टाटा करायचा. दुस-या दिवशी पुन्हा तोच प्रश्न "तू कचाला जातेश? "
"पैसे आणायला" माझं पुन्हा तेच उत्तर.
आता मात्र तो म्हणायचा "काल आणले ना? मग आज कचाला पलत जातेश?"
तेव्हा तो ज्या इनोसंटली असं म्हणायचा त्या इनोसंटली मी आज त्याला विचारू शकत नाही की "तू कशाला जातोस? आता पर्यंत शिकलास ना?" मी नाही विचारू शकत. कारण त्याला मीच ध्येय्य दिली आहेत. खूप खूप स्वप्न दिली आहेत.
मीच त्याला ठिकठिकाणी हिंडवून जग दाखवलंय. त्यावर झेपावणारे  आकाश दाखवलंय. त्याच आकाशात उंच आकाशात भरारी मारायची उद्दीष्ट्ये दिली आहेत.
तेच आकाश आता त्याला खुणावतंय आणि तो ही त्या अवाढव्य मैदानात खेळायला उतरायची वाट पाहतो आहे. खूप उत्सुक आहे तो उडायला.
पण माझ्या मनातल सांगू का तूम्हाला????
मला आता त्याच आकाशाच मला भय वाटतंय. त्या आकाशाच्या विस्तॄतपणाची भिती दाटली आहेत मनात. काळजीने मन बावरतंय. चलबिचल होतंय.
वाटतंय तो त्या आकाशात भरारी मारताना संभाव्य धोक्याचा इशारा द्यायला मी तिथे नसेन. तो अडखळेल, धडपडेल. " आई ग" म्हणेल. पण तेव्हा ही कदाचित मी त्याच्याबरोबर असणार नाही. आपलं साध्य गाठण्यासाठी त्याला आपापले बळ एकवटून  पुन्हा उभं रहाव लागेल. आणि पुन्हा त्याच आकाशात झेप घ्यावी लागेल. त्यावेळी माझे आशिर्वाद असतिलच त्याच्या सोबतीला. पण मी मात्र एकटेपणाला सामोरी जात असेन. माझ्या यजमानांची साथ असेलच तेव्हा. पण या घडीला मात्र घरात लवकरच येणा-या मुलाच्या अनुस्थितीने एकटेपण सतावायला लागलं आहे. मुलाच्या जन्माच्या वेळी कापलेल्या नाळेचा त्रास खरं तर आताच होतोय. भरलेले डोळे शून्यात हरवले आहेत…
आता ग्रॅज्युएशन फक्त माझ्या मुलाचंच नाही तर माझं ही झालं आहे.
ग्रॅज्युएशन.... जे ग्रॅज्युअली होतं ते.... अल्लडते पासून प्रौढत्वाकडे .... दुकटेपणापासून एकटेपणाकडे.... भरीवपणापासून रितेपणाकडे...
आणि त्याचीच COMMENCEMENT आहे ही.
Commencement Means Beginning. सुरवात.....नवीन प्रकारच्या आयुष्याची..... जिवनातल्या संक्रमणाची, स्थित्यंतराची...
म्हणूनच या अंतिम भागाच्या शेवटी मी ` समाप्त` न लिहिता लिहिणार आहे ....
सुरवात..........

२ टिप्पण्या: