उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१७ फेब्रुवारी २०१३

पहाट



चंदाच्या साथीला, चांदणी प्रितीला,
काळोख निघाला, ओलांडूनी.

तांबडे फुटले, नभ  झळाळले,
क्षितीजी टेकले, पहाटेला.

हरखली सृष्टी, रवीवरी दृष्टी,
प्रकाशाची वृष्टी, चहूकडे.

थेंब होई मोती, चमकूनी जाती,
हळू विसावती, तृणावरी.

लपूनी पानात, डोलते झोकात,
उमले लाजतकळी कळी.

वारा वाहे धुंद,  घेऊनिया गंध,
आसमंती मंद, दरवळे.

पंख झटकूनी, घरटे सोडूनी,
जाती ते उडूनी, पक्षी सारे.

रांगोळी रंगित, सजली दारात,
उत्साह भरात, मोहरला.

यमुनेच्या तीरी,  मंजूळ बासुरी,
वाजवी मुरारी,  राधा सखा.

पहाट नटली, सूरात भिजली,
भक्तित भिजली, कृष्णासवे.

१० नोव्हेंबर २०१२

“विठू माऊलीचा गजर ...” चक्क येशू ख्रिस्ताच्या दरबारात!

सध्याच्या २०१२ ह्या वर्षी ही अटलांटा महाराष्ट्र मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव सालाबादाप्रमाणे दणक्यात पार पडला. श्री गणेश पूजा, महाआरती, महाप्रसाद, बालकलाकरांनी सादर केलेला मराठी  संगिताचा कार्यक्रम त्यानंतर श्री गणेशाची उत्तर पूजा, मिरवणूक आणि मूर्ती विसर्जन उत्साहात पार पडले.  बहु संख्येने श्री भक्त या उत्सवात सामिल झाले होते. गणपती बाप्पाला पुढल्या वर्षी लवकर येण्याची  विनंती पुन्हा पुन्हा करीत श्री गणेशमूर्ती विसर्जनापूर्वीच्या  मिरवणूकीने मराठी परंपरा साता समुद्रापार अमेरिकेतही  नेमाने सुरू ठेवली.  त्यात लहान मुलांनी सादर केलेले पारंपारिक लेझिम अत्यंत वाखाणण्याजोगे होते.
श्री गणेश पिता श्री महेश हे त्रिमूर्तींपैका एक. श्री विष्णू ही त्यातीलच. या विष्णूचे एक अवतार म्हणजे श्री विठ्ठल. म्हणूनच या वर्षी मिरवणूकीत भगवे झेंडे, टाळ, लेझिम या आमच्या एकत्रित पथकाने विठू माऊलीचा गजर, हरी नामाचा झेंडा रोविला... या गाण्यावर  नृत्य सादर केले. सामुहिक जल्लोशपूर्ण नृत्य आणि गाण्याची निवड यामुळे या मिरवणूकीत  अनुरूप अशी वातावरण निर्मिती झाली. पारंपारिक वेशभूषा, गडद रंगसंगती, झेंडा, लेझिम, टाळ यांचे एकत्र सादरीकरण यावर उपस्थित सुभक्तांकडून पसंतीच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. अभिप्रायांमधे एक होती जवळच्या एका चर्चमधे या श्री सेवेच्या सादरीकरणाचे आमंत्रण.
अटलांटा मधील सेंट पॅट्रिक चर्चमधे शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२ रोजी आंतरराष्ट्रिय महोत्सव  आयोजित करण्यात आला होता आणि त्यात  भारतीय देवाला आळवणा-या ह्या गाण्यावर केलेले महाराष्ट्रिय पारंपारिक नृत्य सादर करण्यासाठी बोलावण्यात आले होते. चक्क येशू ख्रिस्त धर्म मंदिरात आपल्या हिंदू धर्मातील देवाचा गजर करण्याची संधी आम्ही खरे मराठी नक्कीच सोडणार नव्हतो. आम्ही ते आमंत्रण आनंदाने स्विकारले.
 आम्हाला देण्यात आलेली त्या दिवशीची संध्याकाळ आमच्या  पथकातील काहींना  इतर महत्त्वाच्या कामामुळे सोयिस्कर नव्हती. त्यांच्या अनुपस्थितीमुळे आमच्या नृत्यातील जोड्या बदलाव्या लागणार होत्या. काहीसे बदलही आवश्यक होते. त्यामुळे पुन्हा एक दोन वेळा एकत्र जमून  सराव झाला आणि हे  पथक पुन्हा एकदा सामुहिक पारंपारिक नृत्याला तयार झाले.
 त्या दिवशी ठरलेल्या वेळे आधी आम्ही सर्व जण  सर्व तयारीनिशी सेंट पॅट्रिक चर्चमधे पोहोचलो. तेथील आयोजकांची आणि आमची गाठ भेट झाली. थोडक्यात ओळख झाल्यानंतर अमेरिकी पध्दतीने हाय, हॅलो म्हणून आमचे स्वागत झाले. त्यांच्या आमंत्रणाला मान देउन चर्चमधे आम्ही  नृत्य सादर करण्यासाठी आल्याबद्दल आम्हा सर्वांचे आभार मानण्यात आले आणि आम्हाला तेथील सभागृहात नेण्यात आले.
सुशोभित सभागृहात विविध प्रकाराचे संगीत कानावर येत होते.  त्यातच जमावांतील लोकांच्या गप्पा गोष्टींचा गोंगाट भर घालित होता. अनेक जण आपापल्या  मूळ देशातील पारंपारिक वेषात आलेले दिसले. विविध देशातील  कलाकार  आपापल्या देशातील  कला सादर करण्यासाठी उत्सुक होते.  जमलेले प्रेक्षक कुतुहलाने आणि कौतुकाने  त्यांचे निरिक्षण करत होते.  सर्वच जणांना ‘इथे पाहू की  तिथे?‘ असे होऊन गेले होते.
 तिथे अनेक देशातील खाद्यपदार्थांची रेलचेल होती. आमचे डोळे आणि नाक त्या खाद्यपदार्थांच्या खमंग, स्वादिष्ट, कुरकुरीत, झणझणीतपणाची खात्री देत होते. त्या  ननाविध चवी चाखायला काहींना धीर धरवत नव्हता. काहींचे चेहरे त्या पदार्थांवर ताव मारून तृप्त दिसत होते.  काहींनी अर्धवट पोटोबा करून  थोडीशी विश्रांती घेतली होती.
या सर्व गोंधळातही काहीशी शिस्त होती, सुसुत्रता होती. काही अवधीतच कार्यक्रम सुरू होण्याची घोषणा झाली.
वेगवेगळ्या देशातील वाद्यवृंदाचे वादन, गायकांचे गायन अश्या दोन चार  कला सादर झाल्यानंतर आमच्या नृत्याची घोषणा झाली. भारतीय परंपरेची थोडक्यात ओळख करून देण्यात आली.
त्याबरोबर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून आमचे स्वागत केले. आम्ही झेंडा, टाळ, लेझिम सहित आमच्या  नृत्यातील ठरलेल्या जागी येऊन उभे राहिलो.  घोळक्यातील प्रेक्षक पुढे सरसावले. आमची गडद रंगसंगती अमेरिकेतील चर्चमधे नक्कीच विशेष ठरत होती. भारतातील मराठी पारंपारिक वेषभूषाही  ब-याच जणांना अपरिचित असावी. पुरूषांचे लाल कुडते, कपाळावरील  गंध, गळ्यात तुळशी माळा, स्त्रियांनी अंगभर लपेटलेली महाराष्ट्रिय नऊवारी काठापदराची साडी,  डोक्यावर केसांच्या अंबाड्यावरील  फुलांचे गजरे, नाकात हिरा-मोत्याच्या नथी  आणि इतर विविध अलंकार यांचे  अमेरिकेतील प्रेक्षकांना वाटत असलेले आकर्षण त्यांच्या नजरेतून स्पष्ट दिसत होते. अनेकांचे कॅमेरे आमच्यावर स्थिरावले. अतिशय सावकाश आणि हळूवारपणे माऊली, माऊली म्हणत  पुढे जलद होणारे विठूचा गजर... हे गाणे सुरू झाले. आमच्या पथकाने  या संपूर्ण गाण्यावर पुन्हा एकदा नृत्य सादर केले.  नृत्याच्या दरम्यान उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध आणि संमोहित झाल्यासारखे अत्यंत शांत आणि स्तब्ध होते. आमचे संपूर्ण पथकच काय तर सर्व उपस्थित जन जणू पांडुरंगी रंगात रंगले होते.
गाणे आणि त्यावरचे नृत्य थांबल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तो बराच वेळ तो सुरू राहिला.  त्यानंतर आम्ही सभागृहातून बाहेर आल्यावरही आमच्या पथकाचे नृत्य आवडल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या. आमच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
त्यावेळी आमच्या पथकाला झालेला आनंद  एकत्रितपणे सादर केलेल्या नृत्यकलेचा तर होताच पण  त्या पेक्षाही  आपल्या हिंदू आणि विशेषत: मराठी अध्यात्मिक परंपरेची ओळख सातासमुद्रापल्याड  रहाणा-यांना करून देण्याचा होता.  चक्क येशूच्या समोर आपल्या विठूरायाला आळवण्यात आले होते.  ख्रिस्तांच्या  धर्ममंदिरात असा विठूमाउलीचा गजर या भूतलावर पहिल्यांदा झाला असावा. हरीनामाचा झेंडा भिन्न धर्ममंदिरात अश्या प्रकारे रोवण्याचा तो अनुभव आम्हाला वर्णन करण्याजोगा  वाटला. दूस-या धर्माच्या अध्यात्मिक श्र्ध्दा/विचारांचा मोकळेपणाने आणि सन्मानाने स्विकार तसेच त्यांच्या परंपरेचे आणि कलेचे कौतुक करणा-या त्या आयोजक, प्रेक्षक तसेच समस्त जनांना धन्यवाद देऊन त्यांच्या समोर मनापासून नतमस्तक व्हावेसे वाटले.
शेवटी तात्पर्यादाखल सांगायचेच तर असे की ख्रिस्तांचा देव येशू काय आणि हिंदूंचा देव विठू  काय? दोन्ही  ईश शक्ति एकच! या पृथ्वीतलावरील मनुष्य निर्मित धर्मांच्या संकुचित मर्यादा त्या  अनंत ब्रम्हांडाच्या पालक आणि चालक असलेल्या विस्तृत शक्तिला कश्या बरे असणार?

३१ ऑक्टोबर २०१२

हॅपी हॅलोविन

अमेरिकेभर गेल्या महिनाभर फॉल फोस्टिव्हल सुरू  होता.  दुकानात भोपळ्याचा राशीच्या राशी विक्रीसाठी मांडण्यात आल्या होत्या.  त्याबरोबर त्याला सुशोभित करण्यासाठी लागणा-या वस्तू, कोरण्यासाठी लागणारे चाकू, सु-या ह्या उपलबध होत्या. घराच्या दाराजवळ ही कोरलेले, रंगवलेले, सजवलेले भोपळे  दिसत होते. आज भोपळ्याच्या सणाचा शेवटचा दिवस म्हणजे हॅलोविन. मी विविध भाज्या वापरून  सजवलेला हा भोपळा --


या साठी  वापरलेल्या भाज्या --
केस- चायनीज गवत
डोळे - सफेद कांदा
पापण्या- कांद्याचा बाहेरील पापुद्रा
भुवया - मटारच्या शेंगा
बुबुळ - काळा  बटाटा
नाक - क्लेयोट
ओठ - लाल मिरची
कान- पिवळी  मिरची
कानातले - चेरी टोमॅटो  

१६ सप्टेंबर २०१२

श्री गणेश २०१२

श्री गणेश मूर्तीच्या मागची आरास:- जास्वंदाच्या कळ्यांचे चक्र
श्री गणेशाला  लाल फुल प्रिय असते. विशेषत: जास्वंदाचे  फुल! आमच्या इथे अनेकांच्या घराबाहेरच्या बागेत जास्वंदाच्या फुलांची झाडे लावली आहेत. जांभळा, पिवळा, आबोली, गुलाबी, पांढरा अश्या अनेक प्रकारची जास्वंदाची फुले  तिथे आलेली दिसतात. काही दाट पाकळ्यांची असतात तर काही फुले विरळ  पाच पाकळ्यांची. तसेच त्यांच्या आकारात लहान मोठेपणा आढळतो. परंतु भारतात पाच लाल पाकळ्यांची, मधुनच उगवलेल्या पिवळ्या तु-यांच्या फुलांनी जशी जास्वंदाची झाडे डवरलेली  दिसतात तशी इथे कुठेच दिसली नाहीत.   झाडावर दिसलीच तर एकट दुकट फुले!  बाजारात विकायला तर अजिबातच नाहीत.  आमच्या बागेत  ही  जास्वंद नाही .  म्हणून हया वर्षी  कागदाची जास्वंदाची फुले करून त्याचे चक्र श्री गणेशाच्या मागे लावून आरास कारायचे ठरवले.
प्रथम लाल क्रेप कागदाच्या २ इंच रुंद पट्यांचे ४ इंच लांबीचे ५ तुकडे कापून घेऊन त्याला वरून जरासा गोलाकार आकार दिला. ते तुकडे एकमेकात काहीसे अंतर ठेवून खालील प्रमाणे एकमेकांवर ठेवले. 
केवळ खालच्या बाजूने चण्याच्या पुडीसारखी गुंडाळी केली असता त्याला कळीचा आकार आला. त्या गुंडाळलेल्या भागाला ४ इंच लांबीचा हिरवा क्रेप कागद गुंडाळला. त्यामु्ळे देठ तयार झाला.  त्यावर कळी लगतचा हिरवा भागही (sepal) करून चिकटवून टाकला.
फुलाचा मधला स्त्री केसर (pistil ) तयार करण्यासाठी अजून एक ६ इंच लांबीचा लाल क्रेप कागदाचा तुकडा गुंडाळून  समईच्या वातीसारखा वळवून घेतला. त्याच्या एका टोकाला पिवळी मूगाची बारीक डाळ चिकटवून  परागकण तयार केले आणि ती लाल वात कळीच्या आत सरकवून चिकटवून टाकली.  आणि अश्याप्रकारे कागदाची जास्वंदाची एक कळी तयार झाली. ती कळी उलगडून फुल तयार  केले. परंतु ते कळी इतके सुरेख दिसले नाही. खरे तर  फुल काय आणि  कळी काय? दोन्ही कागदाचीच! म्हणजे कृत्रिमच!  तरी त्यातल्या त्यात कळीच जरा कमी कृत्रिम दिसत होती. म्हणून तश्याच अधिक कळ्या तयार करून घेतल्या.
  त्यानंतर  जाडसर पुठ्ठ्यावर ८ इंच व्यासाचा  गोल  काढून कापून घेतला. त्यापेक्षा  अर्धा सें.मी. जास्त व्यासाचा अजून एक गोल  सोनेरी कागदावर काढून कापला आणि तो पुठ्ठ्यावर चिकटवून टाकला.   त्या सोनेरी गोलावर  कागदी जास्वंदाच्या कळ्या गोलाकार चिकटवल्या. उरलेला मधोमधचा रिकामा भाग समोर श्रींची मूर्ती आल्यावर दिसणारच नव्हता. तरीही  तिथे उणीव दिसू नये म्हणून   एक कळी उमलवून त्याचे मोठे फूल  तयार केले आणि ते  त्या  गोलाच्या रिकाम्या मध्यावर चिकटवून टाकले.
अश्या  प्रकारे  आमच्या घरच्या श्री गणेश मूर्तीच्या मागे लावायला जास्वंदाच्या कळ्यांचे चक्र तयार केले आहे. 

त्याची कृती  इथे पहा ---

video





ते चक्र दिसते आहे छानच. पण ,
रंग ले आएँगे,
 रूप ले आएँगे
काग़ज़ के फूल, 
ख़ुशबू कहाँ से लाएँगे?
पण हे जास्वंदाचे फुल असल्यामुळे ख़ुशबू म्हणाल तर  तसेही नाहीच. पण रंग, रूप  मात्र या कागदाला ही आहे.


त्या कलेच्या देवतेला ही आरास पसंतीस उतरेल अशी आशा  आम्हाला वाटते. अर्थात ही कल्पना सुचवणारा, आणि त्यानुसार करून घेणारा तोच. आमचे असे काय?
बाकी तुमचे  कसे काय? तूम्हाला  श्रींनी काही कल्पना सुचवली का?  त्यानुसार तूम्ही  काय काय केलेत?

१५ ऑगस्ट २०१२

लक्षार्चना

 श्री नारदमुनींनी बाल ध्रुवला  त्याच्या दु:ख मुक्तिसाठी व अलौकिक सुख प्राप्तिसाठी  ` नमो भगवते वासुदेवाय'  हा द्वादशाक्षरी विष्णु मंत्र  दिला होता. बाल ध्रुवने यमुना नदीच्या काठावर या महामंत्राचा जप करून कठोर तपस्या केली. अल्पकाळातच  भगवान नारायण प्रसन्न होऊन त्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिले आणि  तूझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशिर्वाद दिला.
तेव्हापासूनच  '  नमो भगवते वासुदेवाय '  ह्या महामंत्राची महती  सर्व जगाला माहित झाली.
 असे म्हणतात की,
 II ॐ नमो भगवते वासुदेवाय II
हा मंत्र जपताचि दुरित तिमिर भंगते.
जेथ ना हिनता, मलिनता ना जिथे,
दिव्य लोकी अशा अढळपद लाभते.

 म्हणूनच आमच्या घरी ह्या महामंत्राचा  सामुहिकरित्या एक लाख वेळा जप करून श्री विष्णुनारायणाचे अवतार श्री कृष्ण  यांना  अर्पण करायचे आम्ही योजिले. अमेरिकेतील भारतीयांमधे अश्या अनेक अध्यात्मिक सेवा सतत  आयोजित केल्या जातात.  मूळचे भारतीय किंवा भारतीय संस्कारित अनेक जण त्यात श्रध्देने सामिल  होतात.  आमच्या घरी त्या तमाम जनतेला बोलावणे शक्य नव्हते. म्हणूनच आमच्या मित्र परिवारातील भक्तांना इ-मेल करून सहभागी व्हायची विनंती केली. आमचा मित्र परिवार ही अध्यात्मिक सेवेची आवड असल्याने त्यांनी लागलीच तयारी दाखवली. एका भेटीत सर्वांचा विचार विनिमय झाला. एक लाख वेळा जप सामुहिकरित्या करायला लागणारे दिवस, प्रत्येक दिवसाच्या जपाची संख्या, त्यासाठीचा वेळ वगैरेचा हिशोब मांडणे गरजेचे होते. दोन तासात एकत्रितपणे किती माळा होतील, पुढे किती जण अश्या सलग जपासाठी उपस्थित राहू शकतील असे प्रश्न समोर आले. त्याची निश्चित अशी  उत्तरे  कुणाकडेच नव्हती. म्हणूनच एक लाख संख्येच्या जपासाठी अधिक कालावधी ठेवावा असे सर्वानुमते ठरले. आणि हा मंत्र ज दि.२४ जून,२०१२ ला सुरू करून ही सेवा पुढील दर शनिवार आणि रविवारी आमच्या घरी सुरू ठेवावी आणि गोकुळाष्टमीच्या  नंतर लगेचच येणा-या शनिवारी श्री कृष्णाची पूजा करून लक्षार्चनाची सांगता करावी असे निश्चित झाले.
 आमच्या घरी या श्री सेवेच्या तयारीला उधाणच आले. संपूर्ण घराची साफ सफाई न कंटाळता पूर्ण झाली.  घराच्या  मोठ्या  खोलीतील खूर्च्या, टेबल, सोफा, कपाट बगैरेची निराळी मांडणी करून अधिक लोकांना खाली बसायला जागा मोकळी केली.  माझ्या मैत्रिणीकडून धातूची ओठावर बासरी असलेली श्री मुकुंदाची साजरी मूर्ती आणली. ती मध्यम उंचीच्या टेबलावरील कापडी आसनावर ठेवून त्या मागे  गोलाकार मोरपिसे लावून छानशी आरास केली.  त्या मागे फिकट पिवळसर पडदे सोडले. निर्गुण निराकार अश्या त्या सर्वोच्च शक्तीच्या समोर बसून त्यांच्याच मंत्राची सेवा अर्पण करताना ती शक्ती अशी समूर्त समोर पाहताना आम्हाला निश्चितच नेत्र सुख  देणार होती.  तो आनंद उपभोगायला आम्ही घरातील सर्व जण आतूर झाले होतो.

 सलग दोन तास एकच जप आमच्यापैकी पूर्वी कुणीच केला नव्हता. तरीही ते करायचे म्हणजे ना कठिण आव्हान वाटले, ना शंका! शिवाय तेवढा वेळ  एकत्र बसायचेच असे निश्चित झाले होते.  तरीही पहिल्या दिवशीच्या अनुभवावरून  पुढील सर्व जपाची निश्चिती होणार होती. ठरल्या नुसार  रविवार दि.२४ जून,२०१२ रोजी सकाळी १० वाजता  आम्ही  सर्व जण आमच्या घरी जपासाठी जमले.  सकाळी लवकरच घरातील देवांची पूजा झाली होती. त्या मुरलीधराच्या धातूच्या उंच मूर्तीसमोर घरातील देव्हा-यातील  बाळकृष्णाची  छोटी मूर्ती  पूजा करून रंगीत कापडी आसनावर ठेवली होती.  त्यावरील सुवासिक फुले,  समोर सुगंधी अगरबत्ती, दोन्ही बाजूला समईतील शुभ्र वातींमधून उजळलेल्या प्रकाशमान ज्योती या मुळे घरचे वातावरण मंगलमयी झाले होते. 

प्रथमत: सर्व कार्य  निर्विघ्नपणे  सिध्दीस नेणा-या श्री गणेशाची  प्रार्थना केली आणि जरासा ही अवधी न दवडता जपासाठी सुरवात झाली. एका भक्ताने पुढाकार घेऊन '  नमो भगवते वासुदेवाय '  हा मंत्र म्हणून त्या मागोमाग सर्वांनी जप पुन्हा म्हटला. वेगवेगळ्यांच्या पुढाकाराने जप सुरवात करून इतरांनी एकत्रित पुन्हा म्हणत सलग दोन तास एकूण आठ माळा झाल्या. त्यानंतर आरती, नैवेद्य करून आम्ही प्रसादाचा लाभ घेतला.
त्या नंतरच्या प्रत्येक  शनिवारी आणि रविवारी आम्ही भेटलो.  ज्यांना जेव्हा शक्य होते तेव्हा तेव्हा भक्त मंडळी हजर होती. जपाची पध्दत आता अंगवळणी पडली आणि सहज घडू लागली. पुढाकार घेतलेल्या भक्ताच्या जपात विविधता होती.  कुणी हळूवार तर कुणी मोठ्याने जप म्हणत होते. कुणी जलद तर कुणी सावकाश म्हणत होते.  कधी कुणाच्या  जपाच्या माळेचे मणी कमी मोजले जात होते तर कुणी न थांबता बंद डोळ्याने पुढे ही म्हणत राहिले. जपाच्या शब्दोच्चारात ही  विविधता होती. कुणाचा ‘ॐ‘ दिर्घ तर कुणाचा वासुदेवाय शब्दातला दुसरा ‘वा‘ दीर्घ तर कुणाचा ‘य‘ दिर्घ असायचा. सलगपणे एकच मंत्र म्हणताना मनाची एकाग्रता ही जरूरी होती.  ब-याचदा कुणी जप करताना त्यांचा नित्याच्या जपाचा मंत्र  सुरू करायचे तर  कधी मधेच तो मंत्र नकळत म्हटला जायचा. मागून पुन्हा म्हणणा-यांना मात्र बिचकळ्यात पडल्यासारखे व्हायचे.   असे विनोद किंवा चूका  वगळता सर्व जप  व्यवस्थित होत होता. ही सर्व सेवा आमच्याकडून घडवून णणारा तो श्री हरीच!
 दर दिवशी झालेल्या  जपाची मोजणी आणि हिशोब होत होता. जपानंतरच्या साध्याश्या जेवणाची मजा काही औरच होती. प्रत्येक दिवशी कुणी एक जण भाजी आणि दोन चार  जणी  पोळ्या आणत होते.   ह्या बरोबरच गोडाधोडाचा नैवेद्य गोविंदार्पण करून त्याची अंगत पंगत व्हायची. त्या  रूचकर प्रसादला चेष्टा मस्करी, गप्पा- टप्पा यांचा स्वादही रंगत आणायचा. पुढल्या दिवशी कुणी काय पदार्थ आणायचा याची ही  ठरवा ठरवी आणि उजळणी  व्यायची.  आमच्या घरी होणा-या या अध्यात्मिक सेवेबरोबरच या सर्व भक्तांचा सहवास आम्हाला खूप सुखावत होता.  ते दिवस कसे  गेले ते कळलेच नाही. प्रत्येक  दिवशी जप झाला की  पुढील दिवसाच्या जपाची ओढ लागत होती. संपूर्ण गोकुळावर मोहिनी घालणा-या त्या कुंजबिहारीच्या लीलांची  पुन:प्रचिती आम्हाला अमेरिकेत ही येत होती. श्यामसुंदर मनमोहनाचा नाद  आम्हाला लागला सता तरच नवल होते.
साधारण अर्ध्यापेक्षा अधिक  मंत्रजप झाल्यावर आम्ही आठवड्यातून एकदा शनिवारी भेटायचे ठरवले आणि जप अखंड सुरू ठेवला. ठरवल्याप्रमाणे गोकुळाष्टमीच्या आधीच्या शनिवारी आमचा एक लाख वेळा मंत्रजप पूर्ण झाला.  जन्माष्टमीनंतर लगेचच येणा-या शनिवारी जापाची  सांगता करायची होती. त्या दिवशी श्री कृष्ण पूजा, दहिहंडी, रासलिला, गोडाधोडाचा महानैवेद्य असा अध्यात्मिक तरीही मनोरंजक असा कार्यक्रम ठरवला होता.  त्यामुळे आता सर्वांना  त्या दिवशीची ओढ लागली.  त्या दिवशी  किती वाजता जमायचे, कुणी कुठला पदार्थ आणायचा,  जपाची अध्यात्मिक प्रकारे सांगता कशी करायची  तिथंपासून ते  त्या दिवशी कुठला पोषाख  घालायचा, रासलिलेला कुठली गाणी लावायची, टिपरीच्या तालावर फेर धरून  किती वेळ नाचायचे  याचा विचार झाला.
ठरल्यानुसार श्री कृष्ण जन्माष्टमी नंतरच्या  शनिवारी दि. ११ ऑगस्ट, २०१२ रोजी सर्वजण  सकाळी १० वाजता आम्ही आमच्या घरी भेटलो. आमच्या  अमेरिकेतल्या घरी जणु गोकुळ अवतरले होते.   काही स्त्रिया गोपिके सारख्या  चनिया चोली वेषात, अथवा भरजरी साडी नेसून नटून आल्या होत्या. पुरूषही पारंपारिक झब्बा, लेंगा अथवा चुडिदार मधे चमकत होते. बच्चे कंपनी  राधा कृष्ण वेषात सुंदर दिसत होते
आमची नविनच ओळख झालेले एक भक्त त्यादिवशी  आले. त्यांनी पारंपारिक भटजीच्या वेषात येऊन आम्हाला चकितच केले. त्यांना पौरहित्य येत होते हे आम्हाला तेव्हाच समजले. खुद्द श्री कृष्णाने स्वत:ची पूजा व्यवस्थितपणे  करवून घेण्यासाठीच आमचा नविन परिचय करून दिला आणि त्यांना आमच्या घरी धाडले आहे अशी  आमची खात्री झाली. त्यांनी  पूजाविधी उत्तम प्रकारे सांगून श्री कृष्णाची षडोपचारे पूजा  करवून घेतली. पूजेनंतर पुन्हा एकदा १०८ वेळा  मंत्रजप  झाल्यावर श्री विष्णु सहस्त्रानामाचा एक पाठ  आरती केली त्या नंतर महानैवेद्य अर्पण करून आणि प्रत्येकाने श्री कृष्णावर तूशीपत्र वाहून आपला मंत्र जप  समर्पित केला.
 त्यानंतर आमच्या घराच्या मागच्या अंगणात जाऊन दांडिया हातात घेऊन तसेच  टाळ्यांच्या तालात  श्री कृष्णाच्या वेषेतील लहान मुलाच्या भोवताली फेर धरून  सर्वांनी गोविंदाच्या  संगितावर गोपगोपिका प्रिय रासलिला केली. त्यानंतर  काही पुरूष मंडळींनी एकत्रितपणे त्या बाल कृष्णाला खांद्यावर घेऊन उंच उचलले. त्याचा दहिहंडीला हात जेमतेम पोचतच होतो तर त्याच्यावर सूचनांचा भडिमार होऊ लागला. एकच गोंधळ उडाला. काहीशी गडबड होऊन त्याच्या हातातून दहिहंडी निसटली आणि दोरीवरच गोलाकार हेलकावे घेऊ लागली. हास्याचे फवारे उडाले आणि खेळ अधिक रंगात आला. काही प्रयत्नानंतर आमच्या बालकृष्णाने हंडीवरचा नारळ काढला आणि ती दही हंडी  फोडली. फुटलेल्या हंडीतून गळलेल्या दही दूधाने माखलेल्या त्या बालकृष्णाचे सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.  अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढत असलेल्या त्या छोट्याने  हा दहिहंडी प्रकार कधीच पाहिला नव्हता. त्याच्या आईने सांगितलेल्या गोष्टींतून त्या्ने केवळ ऐकले होते. तरीही हा काहिसा ‘रिस्की‘  वाटणारा ‘गेम’ तो कृष्णाच्या वेषात  खेळला होता आणि त्यामुळेच आमच्या दहिहंडीला शोभा आली होती. त्या बालकृष्णाला शाबासकी बरोबरच छानशी भेटही मिळाली.  
रासलिला, दहिहंडी झाल्यानंतर सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला.  सर्व उत्सव निर्विघ्न पणे आनंदात पार पडला. आमच्या घरी अशी प्रदीर्घ आणि सामुहिक प्रकारची सेवा आयोजित करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचे भाग्यच होते. हे सेवा कार्य सिध्दीस नेण्यास श्री हरी समर्थ होतेच. तरी ही आमच्या मित्र मैत्रिणींशिवाय ते  पूर्ण होणे काय तर एक दिवशी ही घडून येणे केवळ अशक्य होते.  काहींनी तर ही आपलीच जबाबदारी आहे असे समजून आपली महत्त्वाची कामे पुढे ढकलली आणि जपासाठी नियमित हजेरी लावली. त्यांना धन्यवाद देण्यात आम्ही मागे राहिलो नाही.
सर्वांनाच एकत्रित सेवाच्या परिपूर्तीचा आनंद मिळाला. ही लक्षार्चना पूर्ण झाली असली तरी इथे आमच्या ईश्वरी सेवेला पूर्ण विराम कुणालाच नको होता. लगेचच अश्याच प्रकारची अधिक सेवा करण्याच्या नविन कल्पना समोर आल्या. काहींनी आपले बेत ही ऐकवले. सध्या स्वल्प विरामाच्या काळात असलेली सेवा लवकरच पुढे सुरू राहिल याची खात्री आहे.

५ जुलै २०१२

अंगणी माझ्या घराच्या-4]Brown Thrasher


हा अमेरिकेतील जॉर्जिया राज्याचा पक्षी आहे.
त्याच्या  ब्राऊन पंखावर काळ्या पांढ-या ठिपक्यांच्या रेषा असतात.  मण्यांसारखे डोळे  पिवळे असतात. पोटाकडील भाग पिवळसर पांढरा असतो. लांब शेपटी असून मध्यम आकाराचा हा पक्षी झाडांच्या उंच शेंड्यांवर, झुडपांवर रहात असला तरी हा मिश्रहारी पक्षी बहुतांश  वेळ जमिनिवरील छोटी फळे,बीया,  तसेच लहान मोठे किडे, इतर अन्न शोधताना दिसतो. अंडी उबवण्याच्या काळात  ब्राउन थ्रॅशर गवतातले किडे, तसेच फळे, बीया, दाणे खातात. उन्हाळा जवळ आला की  फळे ,बीया, दाणे, धान्य यावरच गुजराण होते. हिवाळ्यात मात्र फळे, विशेषत: एकॉर्न खातात. त्यांच्या लांब बारीक चोचीने एकॉर्नची कडक टरफले सहज फोडू शकतात. त्याच चोचीने ते जमिन, झुडपे चाचपून पाहतात. तेथिल जागा साफ करून त्यात अन्न शोधायचा प्रयत्न करतात. त्यावेळी होणा-या आवाजावरून तसेच  त्याच्या मोठ्या भक्श्याला  खाण्यासाठी मारताना ते  चोचीने प्रहार कारतात तेव्हा जो आवाज होते त्यावरून थ्रॅशर हे नाव पडले असावे.
नर आणि मादी पक्षी एकत्रपणे काड्या गोळा करून झुडपांमधे घरटी बांधतात आणि वर्षातून एकदाच अंडी देतात. ते रहात असलेल्या ठिकाणानुसार अंडी देण्याचा काळ ठरतो.

२७ जून २०१२

अंगणी माझ्या घराच्या-3] Yellow Bellied Flycatcher


हा पिवळा गोंडस पक्षी  किडा खाण्यात पटाईत असतो. हवेत उडणारे किडे ही  पटकवण्यात तरबेज.  हा किड्यांबरोबर लहान फळे, दाणे ही आवडीने खातो. याचा पोटाकडचा भाग पिवळा तर पंख आणि शेपटी  काळ्या पांढ-या रेषांची. चोच छोटीशी;  लहानश्या शरीराला साजेशी अन पोटाच्या रंगाशी मिळती जुळती केशरी असते.

video

२६ जून २०१२

अंगणी माझ्या घराच्या-2] Blue Jay


हा ब्लु जे. ह्याच्या शरीरावरच्या बाजूला निळी पिसे आणि पोटाकडचा भाग मात्र पांढरा असतो. पंखावर आणि शेपटीवर  काळे निळे रेषेतले ठिपके असतात. यावर गळ्याभोवतीची  गडद काळी कॉलर  एखाद्या नेकलेस सारखी शोभून दिसते. ही कॉलर वर डोळ्याबाजूला डोक्यापर्यंत वाढलेली असते. चोच,पाय आणि डोळेही काळे असतात. याच्या डोक्यावर कधी कधी उभारलेला  निळा तुरा दिसतो. ब्ल्य जे सुरक्षित असल्यास हा तुरा दिसत नाही. ह्याच्या पिसांतील प्रकाशात बदलणा-या रसायनामुळे याचा निळा रंग विविध छटांत दिसतो. ब्लु जे पक्ष्याच्या नर आणि मादी मधे  फरक सहज दिसून येत नाही. दोघेही  समानच दिसतात.
मोकळ्या आकाशात उडताना ब्लु जे आपली शेपटी शरीराच्या रेषेत ठेवून शांतपणे पंख फडकावतो. हा मंद गतीने उडणारा पक्षी असल्यामुळे  उडताना सहजपणे मोठ्या पक्ष्यांचा भक्ष ठरतो.
हे  पक्षी घरटे बांधण्याच्या जागेबद्दल फारसे चोखंदळ नसतात. अगदी घनदाट जंगलातील झाडापासून ते  मोठ्याश्या न वापरातल्या पत्रपेटीपर्यंत कुठेही ते अंडी घालून राहिलेले आढळतात. इतकेच काय? इतर पक्षी मोठी घरटी सोडून गेले असले  तर तेही ब्ल्यु जे पक्ष्यांना चालते.
 हे पक्षी एक पती/ पत्नी  व्रत पाळणारे असतात. एकदा जोडीदार निवडला की जन्मभर त्याच्या साथीने जगतात. नर आणि मादी  दोघे ही आपले घरटे  बांधतात. नर ब्लु जे घरट्यासाठी लागणारी सामग्री जसे की दो-या, पाने, गोळा करून मादी कडे आणतो आणि मादी ब्लु जे घरटे बांधण्याची तालिम करते. अश्या तालमितील घरटे अर्धवट सोडून  पिलांसाठी योग्य असे घरटे बांधण्यासाठी ही जोडी सुरवात करते. साधारण आठवड्याभरात कच्चे घरटे उभे होते. घरट्याच्या शेवटच्या टप्प्यात मादी स्वत: शोधून हव्या त्या वस्तू गोळा करते. आणि तयार झालेले घरटे मातीने घट्ट केले जाते. ब-याचदा दुस-या पक्ष्यांचे घरटे ही डागडूजी करून हवे तसे बनवून घऊन ही जोडी आपला संसार उभारते.
  मध्य मार्च पासून मादी अंडी  घालू लागते. तेव्हा तिला अन्न भरवायची जबाबदारी नर घेतो आणि  त्यानंतर अंड्यांची आणि पिलांची देखभाल  दोघे ही जोडीने करतात. १५ ते २० दिवसांनी पिले अंड्यातून बाहेर येतात. आणि अजून  १७ ते २० दिवसात उडण्यासाठी तयार होतात.  त्यानंतर हे संपूर्ण कुटुंब पानगळ  किंवा ऑक्टोबरपर्यंत एकत्रच  प्रवास करतात. नंतर  हिवाळ्यतील  अन्नासाठी होणारी संभाव्य  स्पर्धा टाळण्यासाठी तरूण ब्लु जे कुटुंबापासून वेगळे होतात. त्यानंतर जोडीदार शोधून त्यांचे आपापले आयुष्य सुरू होते.
 ब्लु जे कुटुंबवत्सल पक्षी आहे. यात नर मादी जोडी आणि त्यांची तीन ते पाच बछडी असतात. हे कुटुंब ग्रिष्म ऋतु पासून ते  शिशिर ऋतुपर्यंत साधारण पणे एकत्रित  असतात. जिथे  अन्नाचा तुटवडा आणि परिणामी स्पर्धा नसून प्रचंड प्रमाणात अन्न  सहज उपलब्ध असते तिथे दोन चार लहान कुटुंब मिळून मोठ्या गटा्ने /समुहात  राहिल्याचे ही  आढळते.  ही गटजुळणी फेब्रुवारी पासूनच सुरू होते. या गटात एखाद्या मादीच्या वगणूकीचा आदर्श  सर्वांसमोर असतो. ही मादी झाडावर बसली की सर्व समुह  आसपास बसतो किंवा ती उडाली की सर्व समुह  उडतो. जेव्हा हा  समुह एकत्रित उडतो तेव्हा प्रत्येक जण विचित्र आवाज करतो.  जेव्हा झाडावर किंवा जमिनीवर बसतो तेव्हा हा कलकलाट अचानक शांत होतो. मात्र नंतर ब्ल्य जे नर पिसे फुगवून, डोके वर खाली करून बळजोरीचा आवाज करून ही शांतता  मोडून टाकतो. हे प्रकार त्या मुख्य मादीला प्रभावित करण्यासाठीच असावेत. जसजसा हिवाळा  जवळ येतो तसतसा हा समुह फुटून  लहान लहान होत जातो आणि एका नर आणि ती मादी अश्या जोडीपर्यंत  शिल्लक राहतो  आणि मग त्यांचा  स्वत:चा संसार सुरु होतो.

video

२४ जून २०१२

अंगणी माझ्या घराच्या-1]Cowbird


ह्या पक्ष्याच्या दुर्गुणांची तर मोठी यादीच करता येईल. काऊबर्ड मादी दुस-या विशेषत: छोट्या पक्ष्यांवर  आणि त्यांच्या घरट्यांवर  बारिक लक्ष ठेवून असते. ते छोटे पक्षी अन्न/ पाण्यासाठी घरट्याबाहेर पडले की ही मादी त्यांच्या घरट्यात  घुसते. तिथे आपली अंडी घालते. म्हणूनच हे पक्षी brood parasite म्हणून कुप्रसिध्द आहेत.  ही मादी  इतकी लबाड आणि स्वार्थी की  ती तिथली आधिची अंडी बाहेर  ढकलून देते. यात दोन हेतू असावेत. एक म्हणजे केवळ तिच्या अंड्यांना  संपूर्णपणे पूरेपूर उष्ण्ता किंवा उब मिळावी आणि  दुसरे म्हणजे त्या घरट्याच्या मालक पक्ष्यांना अधिक झालेल्या अंड्यांची संख्या किंवा त्यांचा फरक समजून येऊ नये. आपली अंडी दुस-यांना उबवण्यासाठी सोडून देउन त्या पालकांकडे काऊबर्ड पुन्हा ढुंकूनही पाहत नाही. आपली अंडी किंवा पिल्लं कोण मोठी करत आहेत याची तिला जरा ही फिकिर नसते.  हा एक बेजबाबदार पालकच म्हणायला हवा.
 इतर काही पक्षी ही नवी अंडी दत्तक घेतात. त्यांना ती अंडी स्वत:ची नसल्याचे लक्षात येत नसावे किंवा ती घरट्यातून काढून टाकताना त्यांच्या स्वत:च्या अंड्यांना असलेली धोका पत्करायला ते तयार नसावेत. ती दूस-याची अंडी  काढून टाकण्यापेक्षा ती उबवणे अधिक सुरक्षित वाटत असावे.
या पक्ष्यांचे मूळ नाव “buffalo birds” असे होते.घनदाट जंगलात रहाण्यापेक्षा मोकळ्या पठारावरच्या कमी उंचीचे गवत खाणा-या गुरांच्या अंगावरचे, गवतातले किडे खाणारे हे  पक्षी. भट्क्या गुरांच्या मागाहून सतत स्थलांतरीत  होणारे हे पक्षी एकाजागी घरटे करून  स्थिर राहू शकत नाही. ते घरटी बांधण्यात वेळ आणि श्रम दवडत नाहीत. ते दुस-यांच्या घरट्यात  आपली पिले सोडून त्या घरट्यांच्या मालकावर आपली पिले वाढवण्यास सोपवून देतात.  आपल्या पिलांची जबाबदारी दुस-यावर टाकून स्वत: मोकळे राहणारे हे  पालक  पंखाना भिंगरी लागल्यासारखे भटके  तर त्यांची पिले ही जन्मत: तेवढीच पक्के आणि पटाईत! एकतर त्यांच्या उबण्याला कालावधी फारच कमी म्हणजे १० ते १२ दिवस असतो. इतर अंड्यांना त्यापेक्षा अधिक दिवस लागतात. त्यामुळे  त्या अंड्यातून जेव्हा ती पिले बाहेर पडतात तेव्हा काऊबर्ड पिले  मोठी असतात.  अर्थात त्यांची दादागिरी अधिक चालते. पालक पक्ष्यांकडून अन्न मिळवण्यासाठी ते अग्रेसर असतात आणि ब-याचदा या बळजोरीत इतर लहान पक्ष्यांचा नाहक बळी जातो.  स्वत:चे जन्मदाते  टाकून सोडून गेल्यामुळे अनाथ नसली तरी  जबरदस्तीने दत्तक दिलेली ही पिले स्वत:चा बचाव  आणि वाढ करण्यासाठी स्वत:च कार्यक्षम असावेत.  जगण्यासाठी काय करायला हवे ते त्या जन्मजात जिवाला अधिपासूनच  ठाऊक असते.
 त्या जगनिर्मात्याची कमाल आहे नाही का?
काऊ बर्डचा आकार चिमणी पेक्षा मोठी पण कावळ्यापेक्षा लहान असतो.
आमच्या अंगणात ब-याचदा Brown-headed  प्रकारचे Cowbird येतात.  हा नर  हा  रंगाने काळा आणि मानेपासून चोची पर्यंत तपकीरी असा दिसतो.


आणि मादी मात्र संपूर्णत: तपकीरी.


     

१४ फेब्रुवारी २०१२

प्रिय अदिती



    तू आता  आमच्यात नाहिस त्यावर केवळ दु:ख करणे  एवढेच आमच्या हाती आहे.  तूझे नृत्य नैपूण्य, हस्तकला,चित्रकला यांची आवड, नटण्या थटण्याची हौस आम्हाला  कायमची लक्षात राहिल.   तूझी  दूस-यांना मदत करायची परोपकारी वृत्ती, किशोर आणि तरूणांनाही लाजवेल अशी कार्यशिलता  आणि कमालिचा उत्साह  प्रत्येक सणा-समारंभात आम्हाला  तूझी आठवण करून देईल.
    तू माझ्या लेखनाची एक प्रामाणिक वाचक होतीस. केवळ वाचकच नाही तरी माझ्या सामान्य  अश्या लेखनाचे ही कौतुक करणारी आणि उत्तेजन देणारी  होतीस. तू माझे सर्व लेख वाचायचीस. ते प्रिंट करून जवळ ठेवायचीस. पुन्हा पुन्हा वाचायचीस आणि कुणी आले गेले तर त्यांना ही  आठवणीने देऊन आग्रहाने वाचायला लावायचीस. ह्या पेक्षा माझ्या सारख्या फुटकळ लेखिकेला काय हवे?
    माझ्या ह्या उर्मी ब्लॉगवर  तू कायमची राहशील आणि तूझ्या स्मृती नेहमीच जागृत राहतील.  हीच माझी तुला श्रद्धांजली.
    मी त्या ईश्वर चरणी प्रार्थना करते की तूझ्या आत्म्याला  शांती मिळो तूझा मृत्योपश्चात प्रवास सुखकारी  होवो

२७ डिसेंबर २०११

कॅरोलिना अनोल

करेबिअन  बेट तसेच अमेरिकेच्या आग्नेय भागात Carolina anole (Anolis carolinensis) नावाच्या सरड्यांसारख्या पाली पहायला मिळतात. यातील काहींना Green anole, American anole and Red-throated anole असेही म्हणतात.  यांच्या रंग बदलणा-या गुणांमुळे यांना ब-याचदा अमेरिकन सरडे म्हणत असले तरीही या पालीच.
आंतर जालावर याविषयी अधिक माहिती मिळाली -
Kingdom: Animalia
Phylum: Chordata
Class: Reptilia
Order: Squamata
Family: Polychrotidae
Genus: Anolis
    साप जसा कात टाकतो त्या प्रमाणे या पाली आपल्या कातडीवरचा पापुद्रा  दोन चार महिन्यांनी काढून टाकतात.  इतर पालींप्रमाणे  संकट समयी अथवा भक्ष्य ठरल्यास स्वरक्षणार्थ आपली शेपटीचा  टोकाचा भाग सोडून टाकतात व तिथे नविन शेपटी येते. पाल मादींना आकर्षित करण्यासाठी नर पाल आपल्या गळ्याखालील भाग(dewlap) पंख्यासारखा फुलवतो. Brown Anoleची टिपलेली ही  छायाचित्रे-


२५ डिसेंबर २०११

मेरी ख्रिसमस

(Puerto Rico) पर्टो रिको एक बेट.  उत्तरेला अटलांटिक ओशन आणि दक्षिणेला करेबिअन सी. Christopher Columbus  या बेटावर १४९३ मधे आल्याचे वाचण्यात येते. त्याने या बेटाला Saint John the Baptist यांना आदर देण्याच्या उद्देशाने  San Juan Bautista हे नाव दिले. पुढे Ponce de Leon  यां स्पॅनिश शोधकाने   शोध लावल्यानंतर  हे बेट चार शतकापेक्शाही अधिक काळ स्पॅनिश राजवटीखाली होते. परंतु स्पेन आणि अमेरिकेतील युध्दाच्या नंतर हे बेट अमेरिकेच्या राजवटीखाली आले. तेव्हापासून हे व आजूबाजूची Vieques, Culebra, Culebrita, Palomino, Mona, Monito अशी बारीक सारीक बेटेहे अमेरिकेचाच भाग गणला जातो. येथिल रहिवाशी अमेरिकन नागरिकच आहेत.
२०११च्या शेवटी येथे जाण्याची संधी मिळाली.  तिथे केवळ ख्रिस्ती  धर्माच्या लोकांच्या वसाहती आहेत. त्यामुळे नाताळ हा अर्थातच महत्त्वाचा सण. घराघरातून तसेच  दुकानात, शाळेत, चर्च मधे तसेच चौकाचौकात नाताळ निमित्त सुशिभिकरण केले होते.  मनाला आनंद देणा-या त्या  देखाव्याची काही छायाचित्रे -