उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१९ ऑक्टोबर, २०२०

श्री गजानन महाराज हे श्री शिवाचे अंश की श्री रामाचे अंश?

 

केवळ हे जगच नाही तर संपूर्ण ब्रम्हांड जे चालते, त्या व्यवस्थे मागे जी शक्ती आहे त्याला आपण परमेश्वर divine power किंवा ultimate energy म्हणतो. ही एक शक्ती आहे. परमेश्वराचं मूळ रूप हे निर्गुण, निरंजन, निराकार असतं असं सर्व शास्त्रकार आणि संत सांगतात. कुणी त्याला ज्योती ही स्वरूप ही मानतात.
सर्व ब्रम्हांडाचा पसारा हा ३ तत्वांवर चालतो. उत्पत्ती, स्थिती, लय. Creation, Preservation, Destruction. त्याला आपण देव स्वरूप मानून द्वैत किंवा सगूण रूप दिले, ते म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश आहेत. निर्मिती अथवा स्थापना कार्य ब्रम्हा द्वारे होते. पालनपोषण विष्णू द्वारे होते आणि शंकरा द्वारे होतो तो विनाश. म्हणून ब्रम्हा, विष्णू,आणि महेश यांना जन्मदाता, पालनकर्ता आणि मोक्षदाता मानले जाते.
ह्या पालनकर्ता श्रीविष्णूंनी विविध युगात अनेक अवतार घेतले. कृत किंवा सत्य युगात मच्छ, कूर्म,वराह, नृसिंह. त्रेतायुगात वामन ,परशुराम आणि श्रीराम. द्वापार युगात श्री कृष्ण आणि बुद्ध बोधराज स्वामी आणि शेवटचा कलियुगातील कलंकी आहेत . भगवान विष्णूचा सातवा अवतार म्हणजे प्रभू रामचंद्र. शेगाव येथे समाधी मंदिरात श्री गजानन महाजांची समाधी जमिनीखाली भुयारात आहे. मात्र जमिनीलगत श्री राम, सीता माई आणि श्री लक्ष्मणाच्या मूर्ती विराजित आहे. तिथे इतर देवाची मूर्ती / मूर्त्या का नसाव्यात? श्री रामाचे आणि आपल्या महाराजांचे काय ऋणानुबंध असतील असा प्रश्न पडतो नाही का ?
श्री रामाचा पुढचा अवतार श्री कृष्ण हा पारंपरिक हिंदू धर्म कल्पनां नुसार विष्णूचा आठवा अवतार मानला जातो . एकदा रूक्मिणीने काही रागास्तव द्वारका सोडली व दिंडीरवनात अज्ञातवासात आली. नंतर भगवान श्री कृष्ण तिच्या शोधार्थ निघाले. ब-याच ठिकाणी शोध घेतल्यानंतर त्यांना दिंडीरवन जंगलात रूक्मिणी सापडली. तिचा राग शांत केला. नंतर रूक्मिणीसह तेथेच असलेल्या पुंडलिकाच्या आश्रमात आले. तेव्हा पुंडलिक आपल्या आई- वडिलांची सेवा करीत होता. जरी त्याला माहित झाले, की भगवान श्री विष्णु स्वतः भेटायला आलेआहेत, तरी आई- वडिलांच्या सेवेसमोर त्याने तात्काळ भेटण्याचे नाकारून एक वीट त्यांच्याजवळ उभे राहण्यासाठी फेकली. पुंडलिकाची आपल्या आई-वडिलांविषयीची श्रद्धा पाहून भगवान श्री कृष्ण रूपातील श्री विष्णुने विलंबाची पर्वा केली नाही. विटेवर उभे राहून पुंडलिकाची वाट पाहिली. नंतर पुंडलिकाने देवाची क्षमा मागून अशी विनंती केली की, त्यांनी भक्तांसाठी तेथेच असावे. आणि भगवान श्री विष्णुने तसे वरदान दिले. तेव्हापासून भगवान श्री कृष्ण `विठ्ठल` अवतारात आहेत. 
 अर्थात श्री विठ्ठल म्हणजे श्री कृष्णाचे, तसेच श्री रामाचे अवतार. त्याच श्री विठठलाच्या रूपात आपल्या गजानन माउलीने बापुना काळे या भक्ताला दर्शन दिले होते. म्हणजे श्री राम आणि श्री विठ्ठल आणि श्री गजानन महाराज एकच नाही का? दुस-या शब्दात सांगायचे तर श्री गजानन महाराज हे श्री राम अवतारच होय.
असो .
सुरवातीला आपण पाहिले की उत्पत्ती, स्थिती, लय- Creation; Preservation, Destruction या तीन तत्त्वांवर, रज, सत्व, तम, त्रिगुण असलेल्या त्या परमेश्वराची किमया म्हणजे ही जग राहाटी. सृष्टीचा पसारा. नव्हे नव्हे ब्रह्मांडाचा डोलारा. जे जन्माला आले ते लय पावणाराच.
या विनाशाचे कार्य होते श्री शंभो शंकराकडून. या श्री शंकराने जेव्हा समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या विषयाचे प्राशन केले तेव्हा त्यांचा कंठ निळा झाला, सर्वांगाची लाही लाही होऊन आग होऊ लागली. त्यावेळी तो दाह शांत करण्यासाठी खुद्द श्री शंकराने श्री राम नाम जप केला होता अशी आख्यायिका आहे. या श्री शंकराचे अवतार पवनपुत्र श्री हनुमान.
 शिव पुराणानुसार हनुमानाला महादेवाचा दहावा अवतार मानले जाते. श्री मारुती म्हणजेच हनुमान हे श्री महादेवाचा अंश,रुद्रावतार! पण ते आहेत राम भक्त. The God of Destruction worships the God of Preservation. इथे वर वर विसंगत वाटत असले तरी काही गूढ अर्थ आहे. Preservation, Destruction go hand in hand. They cooperate and not compete each other.
ते प्रतिस्पर्धी नसून एकमेकांचे सहाय्यक आहेत. जे जन्माला आले ते लय पावणारच, तेही पुन्हा जन्म घेण्यासाठी. म्हणूनच श्री हनुमान हे श्री राम भक्त. श्री रामाचा महान भक्त, दास, दूत, अनन्य मित्र, सहायक मानला जातो. जिथे राम तिथे हनुमान आणि जिथे हनुमान तिथे राम. म्हणूनच भक्ती , शक्ती ,बुद्धी दायक हनुमान स्तोत्र किंवा चालीसा दररोज म्हटल्यामुळे रामकृपा होतेच. मानवाचे सर्व भय, चिंता दूर होतात.
समर्थ रामदास स्वामी(नारायण) यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. असे असले तरी त्यांना हनुमानाचा अवतार समजले जाते. त्यांना प्रत्यक्ष प्रभु रामरायांनी दर्शन दिले. त्यांनी समर्थांना मंत्रोपदेश देऊन १३ अक्षरी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करण्यास सांगितले. समर्थ रामदास हे हनुमानाचे अवतार असले तरी साक्षात प्रभु श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू होते. श्री गजानन विजय ग्रंथातील नवव्या अध्यायात आपण हे वाचतोच की श्री गजानन महाराज हे श्री रामदास स्वामींचा अवतार होते. आपल्याला हे ही माहीतच आहे की महाराज मारुती मंदिरात सतत वास्तव्य करून असायचे. अध्याय ६व्यात आपण हे ही वाचतो की पिंपळगावच्या जंगलात एका शिवाच्या मंदिरातील गाभा- यात ध्यानस्त अवस्थेत बसले होते. म्हणजेच आपली माउली श्री गजानन महाराज श्री शिवाचा, श्री हनुमंताचा, श्री रामदास स्वामींचा अवतार. आता हे सर्व राम भक्त . असे असेल तर ते श्री गजानन महाराज हे श्री शिवाचे अवतार असून हे ही राम भक्त असायलाच हवे.
आता श्री गजानन महाराजांना रामभक्त म्हणा की खुद्द श्री रामाचा अवतार म्हणा. श्री शिवाचा अंश म्हणा की श्री शिवाचा अवतार म्हणा. त्यांच्यात विष्णू,आणि महेश यांची पालनकर्ता आणि मोक्ष दाता अशी दोन्ही तत्वे सामावलेली आहेत.अनंत कोटि ब्रम्हांडाचे नायक असलेले आपले सदगुरु श्री गजानन महाराज साक्षात परब्रह्म आहेत.
जसे आपल्या आईला मॉं म्हणा की मॉम म्हणा. ती आपली माउली असते. तसेच श्री गजानन महाराजांना संत म्हणा, देव म्हणा. अंश म्हणा किंवा अवतार म्हणा. रामाचा म्हणा की शिवाचा! आपल्या साठी आपले महाराजच परब्रम्ह आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा