उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१२ ऑक्टोबर, २०१०

उर्मी

मी जेव्हा कुठल्याही समुद्राकिनारी जाते तेव्हा असं वाटतं की हा समुद्र किती माझ्या मनासारखा आहे.
खोल अथांग... 
ज्याला त्याच्या स्वतःच्याच लांबी रूंदीची कल्पना नाही.
दृष्टी पोचते आहे तिथवर भासणारा; पण त्या पलिकडेही खूप दूरपर्यंत पसरलेला...
हुबेहुब माझ्या मनासारखा... 
कधी माझ्या मनासारखा अक्राळ विक्राळ, रौद्ररूपी. कधी आतून तर कधी वरूनही भडकलेला...
कधी अगदी अस्वस्थ...
तर कधी साधूसारखा शांत. माझ्या तपस्वी मनासमान;अबोल...
कधी स्वतःतच भोवरा निर्माण करून त्यात गंटागळ्या खाणारा...
समुद्रावरचा आसमंत झाकोळणारा सुर्योदय तर अगदी माझ्या मनासारखा...
आतील विचारांचे झोत बाहेर टाकणारा...
सूर्यास्तही माझ्या मनाप्रमाणे...
अग्नी ज्वाळा स्वतःत सामावून घेणारा...
माझ्या मनातून जसे मोत्याचे शब्द बाहेर येतात तसे मोती समुद्रातूनही येतात. 
ही माझी नक्कल तर नसेल ना?
हा समुद्र काहीसा माझ्या मनासारखा...लहरी!
कधी उत्साही;कधी मरगळलेला..
कधी खोडकर, बालिश...
तर कधी तरूण;या विषयावरून त्या विषयावर उडणा-या माझ्या मनासारखा चंचल...
तर कधी चक्क वृध्द;प्रसंगांशी सामना देऊन थकलेल्या माझ्या मनासारखा...
कधी स्वत:तच मग्न;ध्यानी योग्यासारखा...
तर कधी स्वत्व विसरून दुस-यात रममाण होणा-या माझ्या मनागत...
जमीनीवर असूनही उंच आभाळाशी नातं जोडणारा...उत्तुंग स्वप्न पाहणा-या माझ्या मनासारखा...
माझ्या मनाचं जर मंथन केलं तर काही सद्विचार येतील तर काही कुविचार.
आज समुद्राचं कुणी जर मंथन केलं तर त्यातूनही अमृत आणि त्या बरोबर विष बाहेर येईल हे नक्की.
माझ्या मनातल्या विचारांच्या उर्मी जश्या शब्दरूप घेऊन या ब्लॉगवर विसावतात;
 तश्या या जललहरी किना-यावर येऊन विसावतात.
काही खळबळणा-या; फेसाळलेल्या...
तर काही हलके हलके किना-यावर जेमतेम पोचणा-या...
काही माझ्या मनातील विचारांसारख्या पारदर्शी...पार तळ दाखवणा-या...
तर कधी गढूळ;खाली बसलेला गाळ ढवळून त्याचाच रंग घेणा-या...
किना-यावरील नक्षी पूसणा-या;त्यावर स्वतःची नक्षी रेखाटणा-या...
वाचकांच्या मनात माझ्या भावना उमटवणा-या माझ्या शद्बांसारख्या...

कुणीतरी विचारलं ... "उर्मी नाव का ठेवलंस?" 
त्या प्रश्नाचं हे उत्तर. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा