न्हाळी किंवा वार्षिक पिके धरतीवर तरारून आली की शेतकरी वर्ग खूश होऊन जातो. पिवळ्या धम्म मोतीदार दाण्यांनी गच्च भरलेली कणसे पिकाला पेलवेनाशी होतात. धान्यांच्या दाण्याबरोबरच पानेही पिवळी पडायला लागतात. ती पाने सुकत आली की मग ते पिक काढणीला येते. शेतक-यांचा आनंद द्विगुणीत होतो तो पिकाची कापणी झाल्यावर धान्यांची विक्री केल्यानंतर. खिश्यात चार पैसे खुळखुळायला लागले की सुरू होतो आनंदोत्सव. जगाच्या पाठीवर कुठलाही शेतकरी असला तरी अन्नाच्या मुबलक उपलब्धतेमुळे खाद्यपदार्थांची रेलचेल अधिक वाढवणारा हा आनंदोत्सव ठरलेला. मग तो चीन मधला मून फेस्टिव्हल असो की भारतातला ओणम.
भारतातील मकर संक्रांत, पोंगल, होळी इत्यादी कापणी नंतरच्या सणांसारखाच अमेरिकेतही हारवेस्ट फेस्टिव्हल आजच्या काळातही लोकप्रिय आहे. अवाढव्य अमेरिकेत हवामानाच्या भिन्नतेमुळे शेतीच्या प्रकारात तसेच पिकांतही फरक आढळतो. त्यांची कापणीही समान वेळी होत नाही. हारवेस्ट फेस्टिव्हल साजरा करण्याची वेळ जागेनुसार काहीशी पुढे मागे होत असली तरीही गरमी संपल्यानंतर हिवाळा सुरू व्हायच्या आधी ऑटम किंवा फॉल सिझनमधे पानगळीच्या वेळी वर्षातून एकदा हा सण साजरा केला जातो.
गरमीच्या दाहाने तापून आणि तापवून उन्हाळा संपत आल्यावर चोर पावलाने हळ्ळू हळ्ळू कुणाच्या नकळत यायच्या प्रयत्नात असलेला फॉल किंवा ऑटम दूर्लक्षित थोडाच राहतोय? पानाची गडद हिरवी पाने लाल भडक व्हायला लागतात. त्याचा रंग केशरी होऊन पिवळा पडतो. संपूर्ण निसर्गाचे रूप विलोभनिय रंगतदार होऊन जाते. ही सुरेख रंगरंगोटी म्हणजे येणा-या थंडीचे स्वागतच होय. मात्र काही काळातच झाडांची ही रंगाकृती गळून धारातिर्थी पडते.सध्या अमेरिकेत काही ठिकाणी विशेषत: उत्तरेकडे काही झाडे पर्णहिन होऊन फांद्यांच्या सांगाड्यात दिसू लागली आहेत. तिथे थंडी आपला गारवा वाढवत आहे. परंतु दक्षिणेकडे आत्ताशी झाडा-पानांना हिवाळ्याची चाहूल लागलेली आहे. निसर्गाची रंगछटा नुकतीच बदलू पाहते आहे. अश्याच नैसर्गिक बदलासाठी आणि एकेक पावले उचलत समिप येणा-या हिवाळ्यासाठी सज्ज होते आहे.
अमेरिकेतले आग्नेय भागाकडले राष्ट्र- जॉर्जिया.उत्तरेकडल्या थंडीच्या तुलनेत इथे थंडी तशी उशीराच सुरू होते आणि कमी ही असते.सध्या फॉल सुरू झाला असला तरी हवामान प्रचंड बदलते आहे. कधी फार गरम होते तर कधी थंड वा-यामुळे गारवा जाणवतो. या चक्रावणा-या हवामानात झाडे-पाने सुध्दा गोंधळलेली असावित. काही नखरेबाज पाने अधिरतेने रंगीढंगी साजशृंगार लेवून सजली आहेत तर काही अनुभवी मोठे वृक्ष थंडीच्या स्वागतासाठी शांतपणे तयारीला लागली आहेत.
निसर्गाच्या ह्या बदलाच्या निमित्ताने जॉर्जियातील अॅटलांटातही हारवेस्ट फेस्टिव्हल साजरा केला जात आहे. शहराच्या मुख्य इमारती (सिटी हॉल)बाहेर, रेस्टोरंट्सच्या बाहेर, रस्त्यांच्या चौकाचौकामधे सोनेरी पिवळ्या कणसांसहित पिकांचे, सुकलेल्या गवताच्या पेंड्यांचे, तसेच भोपळ्यांचे तसेच बूजगावण्यांचे सुशोभिकरण केले आहे. येथिल निसर्गातील बदल अश्या प्रकारे अधोरेखित करण्याच्या प्रथेचे कौतुक वाटते.तसेच येथे बुजगावण्यांची ( scarecrow contest) स्पर्धा ही आयोजित केली गेली होती.येथिल प्राथमिक शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार केलेली बिजवागणी मुख्य रहदारीच्या रस्त्यावर आयोजकांनी नेमून दिलेल्या दिव्याच्या खांबाला लागून गवतावरच्या पेंडीवर उभारली गेली. त्यावर त्या बुजगवण्याचे नाव, त्याची थोडक्यात माहिती, शाळेचे नाव, वर्ग आणि शिक्षकाचे नाव इत्यादी माहिती लिहिली गेली.अमेरिकेतले आग्नेय भागाकडले राष्ट्र- जॉर्जिया.उत्तरेकडल्या थंडीच्या तुलनेत इथे थंडी तशी उशीराच सुरू होते आणि कमी ही असते.सध्या फॉल सुरू झाला असला तरी हवामान प्रचंड बदलते आहे. कधी फार गरम होते तर कधी थंड वा-यामुळे गारवा जाणवतो. या चक्रावणा-या हवामानात झाडे-पाने सुध्दा गोंधळलेली असावित. काही नखरेबाज पाने अधिरतेने रंगीढंगी साजशृंगार लेवून सजली आहेत तर काही अनुभवी मोठे वृक्ष थंडीच्या स्वागतासाठी शांतपणे तयारीला लागली आहेत.
स्पर्धेच्या निकालाच्या दिवशी आयोजक, निवड समिती, अनेक मूलाबाळांसहित पालक आणि अर्थातच स्पर्धेत भाग घेतलेल्या शाळेचे शिक्षक या रहदारीच्या रस्त्याच्या बाजूच्या पदपथावर हजर झाली होती. जुन्या काळातील अमेरिकन कंट्री म्युझिक जागोजागी वाजत होते. मूलांसाठी खाण्यापिण्याची सोय ही करण्यात आली होती. सर्वजण त्या स्पर्धक बुजगावण्यांची निरखून पाहणी करत होते. निदान आजच्या दिवशी तरी सेलिब्रिटीसारख्या आकर्षक असणा-या त्या `ध्यानांचे‘ अगणित फोटो काढले जात होते. पाहणी नंतर निवड होऊन `विजेते बुजगावणे` घोशित केले गेले आणि बक्षिस समारंभ झाला. पूढील दोन/तीन आठवडे ही बुजगावणी त्या दिव्याच्या खांबाशी उभे राहून तो रस्ता माहितीपूर्ण करून रस्त्यावरच्या रहदारीला आकर्षित करत राहतील.
या हारवेस्ट फेस्टिव्हलच्या हातात हात घालूनच आला आहे तो हॅलोविन. ठिकठिकाणी लहान-मोठ्या, रंगित-केशरी, उभट-बसक्या, तुळतुळीत-खडबडीत भोपळ्यांच्या राशी पडलेल्या दिसत आहेत.
मोठमोठाले भोपळे विकत घेणा-या ग्राहकांची गर्दी दिसत आहे. त्याच बरोबरीने दुकानातून भोपळे कोरण्यासाठी धारदार चाकू, पातीदार सु-या, कोरणी ही दर्शनिय जागेत विक्री करता मांडलेली आहेत. मासिके, वृत्तपत्रे भोपळ्याच्या नवनविन पाककृतींची ओळख करून देत आहेत. मोठाली मॉल्स आणि लहान सहान दुकानांमधूनही भोपळ्याचे केक, बिस्किटे, ब्रेड, पाय (pie) यांसारखे पदार्थ विक्रीसाठी तयार केले गेलेले दिसत आहेत.
हा आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा सण. यावेळी मृत व्यक्तिंच्या दफनाच्या जागी जाऊन त्यांना आवडते पदार्थ, फुले, वस्तू अर्पण केली जातात. परंतू इतर वाईट आत्मे, शक्तींना घराबाहेर थोपवून ठेवण्यासाठी घराच्या मुख्य दारापाशी केशरी गोलाकार भोपळ्यांची, त्यात दिवा असलेल्या कंदिलांची मांडणी केली गेली आहे. याच बरोबरीने घराबाहेर हडळी, चेटकीणी, खोट्या कवट्या, कृत्रिम हाडांचे सापळे, भूताच्या काळ्या/ सफेद प्रतिकृतींची सजावट(?) लक्ष वेधू लागली आहे.
घराबाहेरील भयानक मांडणी पाहण्याच्या निमित्ताने मित्रमंडळींना आमंत्रित केले जाते. घराच्या आतही अशीच भयावह मांडणी करून पार्टी आयोजित केली जाते. रक्ताळलेले डोळे, मानवी तुटके अवयव, हाडे सदृश्य पदार्थ तयार केले जातात. या हॅलोविन पार्टींचे बाल, तरूणांना अधिक आकर्षण असलेले दिसते. त्यांची दूकानादूकानातून पार्टीसाठी खेळ, भयावह पोषाख, चित्रविचित्र वस्तू, घाबरवून सोडणा-या सिनेमा/संगिताच्या सीडीज् खरेदी करण्यासाठी गर्दी दिसत आहे. अशी दुकाने जागोजागी आपल्या जाहिराती झळकवत आहेत.
या भितीदायक ऑक्टोबरच्या हॅलोविन नंतर सण येइल तो आभार प्रदर्शनाचा. या थॅक्स गिव्हंगच्या सणाला खरेदी, पार्टी यांना उधाणच येइल. हरेक विक्रेते जाहिरातींवर जाहिराती घराघरापर्यंत पोचवण्याचा प्रयत्नात राह्तील आणि ग्राहक ही स्वस्त दरात कोणती वस्तू कुठे मिळेल याच्या अभ्यासात गढून जातील. त्या सणापर्यंत थंडी चांगलीच गारठायला लागली असेल. त्यानंतर मात्र जगातील इतर देशांप्रमाणे अमेरिकाही ख्रिसमसच्या मेरी टाइमच्या आगमनासाठी आतूर झालेली असेल.
(हा लेख लोकसत्ता मधे प्रकाशित झाला आहे.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा