उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२६ ऑक्टोबर, २०१०

अशी ही दिवाळी!!

खण्ण!!!!
बाहेर आवाज आल्यावर मालकीणबाईंनी वाकून पाहिले. त्यांचे पती आणि गृहयोग बिल्डिंग कंस्ट्रक्शन कंपनीचे मालक श्री. देशमुख कामावरून आलेले दिसले. बंगल्याच्या राखणदाराने भले मोठ्ठे लोखंडी फाटक उघडले. एक आधुनिक कार आत शिरली. बंगल्याच्या मुख्य दारापाशी कार थांबली. कारचा ड्राइव्हर उतरला आणि त्याने धावत येऊन कारचे मागचे दार उघडले. मालक खाली उतरले. ड्राइव्हरने बंगल्याच्या बाजूला असलेल्या गॅरेजमधे कार नेऊन उभी केली आणि कारची किल्ली देशमुख साहेबांच्या हातात सूपूर्त करून तो निघून गेला. धंद्याच्या प्रतिष्ठेची शान राखणा-या बंगल्याला मालकांनी चारी बाजूने चक्कर मारली.
 नुकतीच रंगरंगोटी पूरी झालेला तीन मजली बंगला अगदी नवीन दिसत होता. त्या संध्याकाळी संपूर्ण बंगला विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. नाच-या रंगित माळा दिव्यांची उघड झाप करत होत्या. मऊ हिरवळीच्या मधोमध असलेल्या छोट्या कारंज्यावर पडणा-या रंगित दिव्यांच्या प्रकाशात पाण्याचे थेंब थुई थुई नाचत होते. तेथिल तुळशीवॄंदावनाच्या चौथ-यावर तेलाच्या पणत्या एका रेषेत तेवत होत्या. बंगल्याच्या फाटकापासून पुढे मुख्य दरवाजापर्यंत लांबलेली दिपांची आवली येणा-या दिवाळी सणाच्या स्वागतासाठी सज्ज होती. मुख्य दरवाजाच्यावर काचेच्या दिव्यांचे तोरण लखलखत होते. वरती मोठ्ठासा आकाशकंदिल वा-याच्या मंद झुळुकीसोबत डोलत होता. त्या खाली जमिनीवरच्या सुबकश्या रांगोळीतील गडद रंग लक्ष वेधून घेत होते. संपूर्ण गावातला सर्वोत्कृष्ठ बंगला आपलाच आहे ही खात्री झाल्यावर नक्षिदार कोरिवकाम केलेला लाकडी दरवाजा ढकलून मालक आत शिरले.
तितक्यात ठेवणीतली साडी नेसून अंगावर थोडेफार दागिने घातलेल्या मालकीणबाई लगबगीने तिथे पोचल्या. कमालीचा आनंद चेह-यावरून ओसंडत त्या म्हणाल्या “कसा दिसतोय बंगला आता? मागच्या बाजूला काम आहे बाकी. पण होईल उद्या पर्यंत पूर्ण. अजून आहेत दोन दिवस नरकचतुर्दशीला.”
मालकांनी काहीच प्रतिक्रिया दाखवली नाही. ते लाकडी जिन्यावरून वरच्या खोलीत गेले आणि कपडे बदलून खाली आले. प्रशस्त हॉलमधील मऊ आलिशान सोफ्यावर बसून त्यांनी रिमोट्ने टि.व्ही. सुरू केला. त्यांच्या दोन मुलांनी आपला खेळ अर्धवट सोडला आणि “पप्पा, पप्पा” करत त्यांना दाखवण्यासाठी आपल्या नवीन कपड्यांच्या आणि खेळण्यांच्या पिशव्या उसकटल्या आणि तिथे पसारा मांडला.
मालकीणबाईंनी काचेच्या प्लेटमधे चकली, दोन लाडू, थोडासा चिवडा आणि सोबत चहाचा कप आणून टिपॉयवर ठेवला. पुन्हा आत जाऊन त्यांनीही ब-याच पिशव्या बाहेर आणल्या.
“अहो, ह्या बघा. मोठ्या आणि धाकट्या वन्सबाईंना आणलेल्या साड्या. त्यांच्या मुलांसाठी खेळणीही आणली आहेत. हे सर्व भाऊबिजेला घेऊन जाल तेव्हा मिठाई आणि फराळाचे ही देईन बांधून.”
मालकांनी तिथे बघितले ही नाही. मुलांना बाजूला सारून ते सोफ्यावरून उठले. एक सिगरेट पेटवली आणि झुरका घेउन मालकीणबाईंना सांगितले “उद्या ड्राइव्हर बरोबर पाठवून दे त्या दोघींकडे दिवाळीची भेट आणि मिठाई.”
“म्हणजे काय? तूम्ही जाणार नाही का?”
“त्याच दिवशी आमच्या क्लबमधे पार्टी आहे. तिथे जायला हवे. धंद्याच्या खूप गोष्टी होतील तिथे.”
“अहो, पण ते सर्व होतच राहतं नेहमी. आणि त्या क्लबातल्या लोकांचं माहित आहे मला. त्यांना सण, वार काहीही नसतो कधी! नुसतं धंदा एके धंदा. आणि त्या संगतीला ते पिणं. सगळे नुसते दारूबाज आहेत!” मालकीणबाई तणतणल्या.
“अगं ए, मला शिकवू नकोस. धंद्याच्या गोष्टी अश्याच वेळी होत असतात.” असं म्हणत मालक हॉलमधल्या कोप-यातील लाकडी दारूच्या बारकडे गेले. त्यांनी त्यातून काचेचा ग्लास काढला.
समजावण्याच्या सुरात मालकीणबाई म्हणाल्या, “पण तूमच्या
दोन्ही बहिणी वाट पाहतील भाऊबिजेला. वर्षातून एकदातरी आपल्या घरी यावं आपल्या भावाने, असं वाटणार नाही का त्यांना?”
“बस्स झाली तूझी बडबड. जा. आतून बर्फ घेउन ये”. “आणि ही फराळाची प्लेट आणि चहाच कप उचल इथून. काहीतरी चवाणू आण जा कुरकुरीत.”
“अहो, दिवाळीसाठी आता ताजे केले आहे घरी. ते कुरकुरीत नाहीत होय?” मालकीणबाईंचा प्रश्न ऐकून मालक संतापले. त्यांनी ती फराळाची प्लेट उडवून लावली आणि दाण दाण स्वयंपाक घरात जाऊन फ्रिज मधला बर्फाचा ट्रे आणि आपल्या आवडीच्या बीअरचा टिन बाहेर आणला. ग्लासात बीअर ओतून घेऊन मऊ सोफ्यावर बसून निर्विकारपणे घुटके घेत टि.व्ही. पाहू लागले.
मालकीणबाईंच्या डोळ्यात पाणी ठरेना.
“ए, जाते का आता? हा ड्रामा आत जाउन कर जा.” मालक कारणाविना उखडले होते.
मालकीणबाई मुलांना घेऊन वरच्या खोलीत निघून गेल्या. त्यांची दोन्ही मुलेही झोप येईपर्यंत त्यांच्या खोलीतच काही बाही करत चिडीचूप होती.
ब-याच वेळाने साहेबांनी टि.व्ही. समोर जेऊन घेतले आणि लगेचच झोपी गेले. मालकीणबाईंना जेवायची इच्छाच नव्हती. त्या नेहमीप्रमाणेच आतल्या दु:खाला वाट करून देत जाग्या होत्या.
त्या वाट पहात होत्या... त्या दिवाळीची...
समृध्दी होतीच .....
पण वाट पहात होत्या सुखाच्या आणि आनंदाच्या दिवाळीची.
---------------------------------------------------------------------------------
खण्ण!!!!
बाहेर आवाज आल्यावर कारभारणीने वाकून पाहिले. धनी कामावरून आलेले दिसले.
केशवने सायकलचा स्टॅंड खाली केला. सायकल त्यावर चढवली. सायकलला मागे अडकवलेली पिशवी काढून घेतली. झेलपटत झेलपटत खाली बसून सायकलच्या चाकात कुलूप अडकवले. किल्ली पॅंटीच्या खिश्यात टाकत भेलकांडत तो झोपडीत शिरला.
म्युन्सिपालटीच्या शाळेशेजारीहून जुनी रेल्वेलाईन जात होती. नवा रेल्वे मार्ग झाल्यानंतर आता जुनी बंद पडली होती आणि तिथे दहा बारा झोपड्यांनी आपले तंबू ठोकले होते. त्या बस्तीतलेच हे झोपडे.
मागे जुने रेल्वे रूळ असलेल्या त्या झोपड्याच्या पुढची जागा मोकळीच होती. झोपड्याच्या चारी बाजूला नारळाच्या झाडाच्या झावळ्यापासून उभारलेल्या भिंती होत्या. त्याला बांबूंचा आधार दिलेला होता. वरती आडवे बांबू टाकून त्यावर झावळ्यांचेच छप्पर केले होते. उरल्या सुरल्या लाकडाच्या फळ्यांवर पत्रा बसवून बनवलेल्या दाराबाहेर काही बाही सामानाशेजारी एक पाण्याचे प्लास्टिकचे पिंप सिमेंटने जमीनीत घट्ट बसवून टाकले होते. तिथेच अजूनही एकावर एक ठेवलेली दोन कळश्यांसारखी पाण्याची मोठी भांडी होती. त्यासमोर मातीच्या कुंडीत छोटीशी तुळस होती. कुंडीभोवताली पांढ-या रांगोळीची साधीशी नक्षी होती. बाजूला एक पणती तेवत होती. पलिकडे आजूबाजूच्या नवीन इमारतींच्या बांधकामातला मिस्त्री केशव, त्याची कारभारीण आणि दोन मुलगे या झोपडीत राहत होते.
“आज बी आला का तू दारू पिऊन?” त्या संध्याकाळी कामावरून परतणा-या केशववर कारभारीणीचा संताप गरजला.
तिच्या लहान मूलांना काय करावे कळाने. ती कावरी बावरी होऊन पहात राहिली.
केशवने चूपचाप डागाळलेल्या पॅंटीच्या खिश्यातली फुलपुडी काढून घेतली. अंगावरचे कळकट कपडे उतरवून दोरीवर टाकले. कमरेला मळकी लुंगी बांधून त्याने बाहेर जाऊन प्लास्टिकच्या पिंपातल्या पाण्याने तोंड, हात - पाय धुतले. पुन्हा आत जाऊन झावळ्यांच्या भिंतावर लटकवलेल्या महादेवाच्या तसबिरीसमोर उभा राहिला. देवाला हार घातला आणि नमस्कार केला.
“आसं झिंगून आलायसा. त्यो देव पावनार हाय काय रं तूला?” मानेला झट्का देत कारभारीण तणतणत होती. “दिपावली सन हाय माहित हाय नवं? सनासुदीला तरी नाय पियायची.”
“अगं, काश्यापाई डोकीत राग घाल्तीस इतका? अजून हाय की दोन दिवस सनाला.” केशवने सहाभूतीच्या आशेने पुढे म्हटले “अंग मोप दुखतंया दिसभर राबून. एक दोन गिलास पिली की समद दुखनं दूर पळतया बघ.”
केशव पिवळकंच तूटके दात दाखून केविलवाणे हसला. त्याच्या मूलांना त्याच्या हसण्याचे कारण कळलेच नाही.
कारभारीणीच्या कपाळावरील आठ्या विरळ झाल्या. तिने टोपातली कोरडी भाजी आणि भाकरी हलक्याश्या ताटलीत टाकली आणि ताटली जमिनीवर आदळली. “ह्ये गिळ आता गुमान.”
केशवने दोरीवरच्या पॅंटीच्या खिश्यातून काहीसे काढून घेतले आणि तो जमिनीवरच्या चटईवर बसून म्हणाला “अगं ए, बस इकडे माझ्या संग! तूला काय सांगतोया त्ये ऐक जरा.”
“आता काय सांगतयसा? सुध हाय काय बोलायस्नी?” कारभारीण तावातावाने बोलतच चटईवर टेकली.
“ह्ये घे पैशे. धा रूपै कमी हाएत चारशेला. आज दिवालीचं ज्यादा पैसं भेटलं शेठकडनं. धा रूपैची ताडी पिली. आनी बाकी समदे पैशे तूला आनले.” आपल्या धन्याला शुध्दीवर म्हणावे की बेशुध्द ? तेच कारभारणीला कळेना.
“ह्याची पोरास्नी नवी कापडं घे. त्यास्नी नमकिन अन मिठाई आन. दिपावली सन रोज रोज येतोया काय?” ते ऐकून त्यांची दोन्ही मुलं चिवचिवत “बा, बा” करत बाजूला जमा झाली.
कारभारीण आता बरीचशी निवळली होती. “म्या कंदीची आनली हाएत त्यास्नी नवी कापडं. पैसं ठेऊन दिल्ले व्हतं म्या बाजूस्नी.”
“अगं, मग लुगडं घे तूला. लई दिसात न्हाय आनली तूला बी कापडं.”
धन्याच्या डोळ्यात पहात गालात लाजून कारभारीण मान डोलावत म्हणाली “आसं म्हनताय सा? तर घेती म्या दोनसे रूपै. आनी बाकी पैसं ठेवा तूमच्याकडं. अन भाऊबिजेला तूमच्या दोघी भैनीस्नी द्या. त्या बी वाट बघत आसतील न्हाय का तूमची?”
कारभारीण उठली. तिने ते पैसे कुठल्याश्या डब्यात ठेवून दिले.
जेवण झाल्यावर केशवनेही पैसे दोरीवरच्या पॅंटीच्या खिश्यात सारले आणि तो बाहेर खाट टाकून त्यावर आडवा झाला.
बाहेरून काळी पडलेली टोपं, ताटल्या, गिलासं अशी सर्व भांडी प्लास्टिकच्या पिंपातल्या पाण्याने घासून कारभारीण परतत होती तेव्हा केशवला झोप लागलेली तिने पाहिले. त्याने घोरायलाही सुरवात केली होती. कारभारीण लगबगीने आत गेली. आजच दारावर विक्रीसाठी आलेल्या चादरवाल्याकडून झोपडी बाहेर उघड्यावर झोपणा-या तिच्या धन्यासाठी तिने साठवलेल्या पैशातून जाजमासारखी जाड चादर विकत घेतली होती. कागदामधे गुंडाळलेली ती जाड चादर तिने बाहेर काढली आणि उलगडून धन्याच्या अंगावर टाकली.
झोपडीबाहेर तुळशीशेजारची पणती कधीच विजली होती. आतमधे चटईवर कारभारीण मूलांना कुशीत घेऊन आडवी झाली.
त्या चंद्रमौळी झोपडीत आकाशातल्या लुकलुकत्या चांदण्या सुखाची आणि आनंदाची दिवाळी झिरपत होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा