उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

५ नोव्हेंबर, २०१०

अंकुरणारं नातं

    “माई आज्जी, माई आज्जी, ती रडतेय. उठ. चल ना लवकर.” नारायण ओरडतच घरात आला. नारायण म्हणजे माई आजीचा दहा -बारा वर्षांचा नातू. मुंडण केलेल्या डोक्यावरून कपाळ झाकून भुवयांपर्यंत ओढून कानामागे सारलेल्या पांढ-या साडीचा पदर पुढे पोटाकडे कमरेला खोचत माई आजीने विचारलं. “रडतेय? का? काय झालं?” तिला ओढतच नारायणाने अंगणात नेलं. तिथे तुळशी वृंदावनाशेजारी लक्ष्मी खाली बसून मुळूमुळू रडत होती. माई आजीने तिला हात देऊन उभं केलं. तिच्या गो-यापान चेह-यावरील घा-या डोळ्यातून आलेलं पाणी पुसले आणि म्हणाली, “उगी उगी. रडू नकोस हं. काय झालं?”
काठपदराच्या नऊवारी साडीने फुगलेल्या गो-यापान ठेगण्या ठुसक्या सात-आठ वर्षाच्या लक्ष्मीने विस्कटलेली रांगोळी दाखवली. जरासे हुंदके वाढवत नारायणाकडे बोट दाखवत “ह्यांनी केलं” म्हणून सांगितलं.
“नाही गं माई आज्जी. मी तिथून जात होतो ना? तेव्हा चुकून पाय पडला तिच्या रांगोळीवर.” हे नारायणाचं बोलणं ऐकून माई आजीने त्याचा हात धरला आणि त्याचा कान ओढून ”अस्सा कस्सा पाय पडला तूझा? चलं आधी. नीट करून दे ती रांगोळी.” असं रागे भरत सांगितलं. शेबडं नाक हाताने पुसत घारे डोळे रोखून लक्ष्मीने नारायणाकडे पाहिलं. तिच्या बोटांना लागलेल्या रांगोळीच्या रंगाने लक्ष्मीचं नाक अजूनच लालबुंद झालं. गालाला हिरवा रंग लागला. ते पाहून “माई आज्जी ही विदूषक झालिय बघं.” म्हणतं तोंडावर हात ठेवून नारायण खी खी हसू लागला. लक्ष्मी अजून रडवेली झाली. ते पाहून माई आजीने स्वत:च्या पदराने लक्ष्मीचा चेहरा पुसून दिला. आणि तिथेच उभं राहून नारायणकडून रांगोळी नीट करून घेतली.
कशी बशी रेषेले रेषा जोडून “आता रांगोळी बरी वाटतेयं का गं लक्ष्मी ?” असं नारायणाने विचारलं. माई आजीने लक्ष्मीला उत्तर द्यायची संधीच दिली आणि म्हणाली, “नारायणा, अरे ती तूमची पत्नी म्हणजे अर्धांगिनी आहे. त्यांना आदराने अहो जाहो करायचं बरं का?”
    दोन्ही कान खांद्याला लागतील इतक्या जोरात नारायणाने मान हलवल्यावर लक्ष्मी ओठ विलग करत हसली. तिच्या तोडातल्या बारीकश्या दंतपंक्तीत दोन-तीन रिकाम्या जागा होत्या. ते पाहून नारायणही ह्सू लागला. त्याच्या हसण्याचं करण न कळतच लक्ष्मी आपली निरागसपणे अजूनच हसली.
    लक्ष्मीचं नारायणशी लग्न झालं होतं आठ दहा महिनांपूर्वीच. या जोडप्याची ही पहिलीच दिवाळी होती. तसा खरा दिवाळसण होता लक्ष्मीच्या माहेरी. पण इंग्रज सरकारच्या दप्तरात नोकरी करीत असलेल्या लक्ष्मीच्या वडिलांना दुस-या गावी जबाबदारीचे कागदपत्र घेऊन धाडण्यात आले होते. तिथे जात जाता लक्ष्मीला तिच्या सासरी म्हणजे आठवल्यांच्या घरी सोडायला सांगून बारा पंधरा दिवसांसाठी ठेवून घेतले होते. त्यानंतर पाडव्याला ते सर्वजण लक्ष्मीच्या माहेरी दिवाळसणाला जाणारच होते. पण इथे आठवल्यांच्या घरी आत्ता तरी माई आजी या दोघांना आनंदाने संभाळायची. दोघेही लहानच! लक्ष ठेवायला लागायचं सारखं. नारायण महा खोडसाळ. तर लक्ष्मी अतिशय बालिश, अल्लड. उग्गाच तिची नाराजी नको. आणि नारायणाचेच नाही तर सर्व आठवले कुटूंबाचे गा-हाणे तिने माहेर जाऊन सांगितले तर हो? म्हणून माई आजी आपली त्यांच्या मागे मागे असायची. नारायणाला आवरायला आणि लक्ष्मीची काळजी घ्यायला. ती दोन मुलं पण खुश असायची माई आज्जी सोबत.
    एका दुपारी नारायण शाळेतल्या इंग्रजी भाषेच्या सराव वर्गाला जाऊन आल्यावर माई आजीने त्या दोघांना गेल्या वर्षीचा बांबूच्या काड्यांचा आकाशकंदिलाचा सांगाडा दिला. त्याबरोबर कात्री, काही रंगित कागद आणि ते चिटकवायला चमचाभर भात दिला. लक्ष्मीने चौकोनी, त्रिकोणी कागद कापून नारायणाला द्यायचे आणि त्याने ते चिटकवायचे. असं करत काम संपतच आलं होतं. इतक्यात नारायणाच्या आईने दिवाळी निमित्त नुकताच केलेला चिवडा आणि एकेक लाडू पितळी वाट्यात दिला. नारायणाने लक्ष्मीचे लक्ष दुसरीकडे वळवून तिच्या वाटीतला लाडू चोरला आणि तोंडात कोंबून आत पळाला. लक्ष्मीच्या लक्षात आल्यावर ती “माझा लाडू घेतला. माझा लाडू घेतला” म्हणत रडत त्याच्या मागून पळाली. तिच्या हुप्प गालातला राग नकट्या नाकावर येऊन साठला होता. तिचे मांजरीसारखे घारे डोळे नारायणाकडे रोखून पहात होते. माई आजीने नारायणाला पकडून जवाब विचारल्यावर त्याने मान खाली घातली.
    त्याचे ते गरीबासारखे ध्यान पाहून लक्ष्मी म्हणाली, “माई आज्जी, मीच दिला माझा लाडू ह्यांना.” माई आजी हसतच म्हणाली ”अगं लबाडे, मग तूच तर खरी कांगावखोर. ठोक तूलाच द्यायला हवा. नै का?“
“तिला नको गं माई आज्जी.” असं म्हणतच नारायण लक्ष्मीचा हात धरून बाहेर पळाला. माई आजीला कोण खरे आणि कोण खोटे हे चांगले कळले होते. आणि या जोडेगोळीचे जुळणारे धागे ही तिच्या नजरेआड झाले नाहीत.
    एक दोन दिवसांनी दोघांनी मिळून अंगणात किल्ला करायचे ठरले. लक्ष्मीने लाल माती चाळणीने चाळून दिली आणि नारायणने ती पाण्यात कालवून त्याचा लहानसा किल्ला केला. त्यावर शिवाजी महाराज, मावळे, घोडे वगैरे चित्र ठेवली. माई आजी या जोडप्याच्या बदलत्या नात्यावर लक्ष ठेवून असायची. त्या सोज्ज्वळ नात्यात निखळ मैत्री होती, बालसुलभ निष्पापणा होता. तोच माई आजीला फार आवडायचा. ती दिवसातला बराच वेळ या दोघांसोबतच असायची. आणि रोज रात्री जाडसर सतरंजीवर आडवी पडून एका बाजूला लक्ष्मी आणि दूस-या बाजूला नारायणाला घेऊन गंमतीशीर गोष्टी सांगून झोपी जायची.
    त्या दिवाळीतील नरक चतुर्दशीच्या भल्या पहाटे माई आजीने सर्वांबरोबर लक्ष्मी नारायणाला ही उठवलं. लक्ष्मीने उटणं वगैरे लावून अभ्यंग स्नान उरकले. माई आजीने लगबगीने तिला तयार केले. मधेमधे भांग काढून चापून चोपून मागे घट्ट खोप्यात बांधलेले केस, त्यावर सोनेरी चक्रासारखे फुल, कपाळावर बारीकशी लाल चंद्रकोर, नाकात नथ, कानात मोत्याच्या कुड्या, गळ्यात काळ्या मण्याचं गंठण, सोन्याची माळ, हातात काहिश्या मोठ्या पाटल्या, बांगड्या, हिरवा काचेचा चुडा, पायात घुंगरांचे पैंजण तर पायाच्या बोटात जोडवी. जरीकाठी रेशमी पदराचं हिरवे नऊ वारी लुगडं आणि त्याला साजेशी दंडाला काठ असलेली चोळी घातलेली छोटुशी लक्ष्मी खुलून दिसत होती. आता खरं तर वेळ होती ती तिने नारायणाच्या अंगाला लावायची. पण त्याआधी त्यांच्यात काही खिट पिट झाली की काय कोण जाणे? नारायण लक्ष्मीकडून अंगाला तेल न लावून घेताच आंघोळीला पळाला. काही वेळातच डोक्यावर काळी टोपी, काळ्या कोटाखालून डोकावणारा लांब पांढरा बुश शर्ट, आणि साहेबी लांब विजार घालून तयार झाला. नटली थटली लक्ष्मी आपल्या किणकिणणा-या बांगड्यांच्या तर रूणझुणणा-या पैजणांच्याच नादात गौराईसारखी एकाजागी बसून होती. नारायण चेह-यावर अगदी गंभिर भाव आणून तिच्या जवळ गेला आणि त्याने कुणाच्या नकळत लक्ष्मीला काहीसे लिहिलेला एक कागदाचा चिठोरा देऊन पसार झाला. त्यात काहीतरी गुपित आहे तेवढे लक्ष्मीला कळलं. ती लपून छपून एकटीच दुस-या खोलीत खिडकीपाशी गेली. चिठोरा उघडला. आताश्या कुठे तिला मूळाक्षरांचा, काना, मात्रा, वेलांटीचा सराव होत होता. तिने ती अक्षरे एकमेकांसोबत लावायला घेतली. कागदावर सुरवातीलाच असलेले तिचे स्वत:चे लक्ष्मी नाव तर तिला येतच होते. तिने नजर पुढे केली.
“न ला काना ना. र ला काना रा. य रे यज्ञातला. ण रे बाणातला. नारायण”.
तिची नजर उत्सुकतेने पुढे सरकली. “अ ला काना आ. ठ रे ठश्यातला. व रे वजनातला. ल ला एक मात्रा ले. आठवले. लक्ष्मी नारायण आठवले.”
    ती घारे डोळे मिचकावत लाजून स्वत:शीच खुदकन हसली आणि तिने तो कागदाचा चिठोरा तिच्या रेशमी लुगड्याच्या ओच्यात लपवून ठेवला, कुण्णा कुण्णालाही दिसणार नाही अस्सा!
    दिवाळीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या लक्ष्मी नारायणामधलं असं हे अंकुरणारं गुलाबी नातं आता ठाऊक होतं फक्त त्या जोडगोळीलाच.

(ही कथा मोगरा फुलला 2010 दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे.)


  ही कथा ऐका बरं का.---

४ टिप्पण्या:

  1. अंकुरणारं नातं.... आवडलं
    अभिवाचन तर अप्रतिम.

    ब्लॉग माझा स्पर्धेतील यशाबद्दल अभिनंदन.....!!!

    उत्तर द्याहटवा
  2. लिखाण, संवाद, वाचन, आवाजातील बदल सगळेच फारच छान. स्पर्धेतील यशाचे अभिनंदन!

    पण वाचनाचा वेग थोडा जास्त वाटला. मनावर घेउ नये, काजळाची गालावर लावलेली टिचकी आहे.

    उत्तर द्याहटवा