उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

५ डिसेंबर, २००९

“ रिश्ते में हम तुम्हारे…..”


श्री आर बालकृष्णन बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला `पा` हा चित्रपट नुकताच प्रकाशित झाला आहे. या चित्रपटाची कथा इंटरनेटवर तसेच टीव्ही वरच्या जहिरातीतूनही सांगितली गेली आहे.
कथा तशी वेगळी असली तरी दुर्बळ आहे. त्यामुळे उत्कंठा वाढवणारा हा चित्रपट नाही आणि कथेत खूप बदल घडवणारे प्रसंगही नाहीत. मध्यंतराआधीच चित्रपटाचा शेवट काय असेल ह्याचा अंदाज बांधता येतो. कॉमेडी, सस्पेन्स, थ्रीलर, ऍक्शन वगैरे प्रकारांच्या जवळूनही जाणारा ही सिनेमा नाही. यात साहस, भय, गुन्हा सुध्दा नाही आहे. म्हणावी तशी प्रेम कथा ही नाही. मनोरंजनात्मक, टाईमपास, मौज मस्ती, मसाला टाईप तर हा सिनेमा नाहीच नाही.
पात्र परिचय करून देण्यासाठी सुरवतीला जया बच्चनला आणि चित्रपटात (अभिषेक बच्चन)अमोलच्या वडिलांच्या भूमिकेत परेश रावलला उगाचच घुसडला आहे. बाकी सर्व कलाकारांचा अभिनय चांगलाच आहे. आजीच्या भूमिकेला अरूंधती नाग यांनी उठाव आणला आहे. अभिषेक बच्चनपेक्षा विद्या बालनचा अभिनय सरस आहे हे वेगळे सांगायलाच नको. पण एकूण पाहताच यांना या चित्रपटात अभिनयाला खूपसा वाव नव्हता.
मुख्य आकर्षण तर वृध्द शरीर दिसणा-या लहान वयाच्या ऑरोचा अभिनय करणारा अमिताभ बच्चनच आहे. जाडसर मेकअपमुळे अमिताभच्या चेह-याचे हावभाव तसे कमीच आहेत. परंतु केवळ नजरेतून कुतूहूल, राग, आश्चर्य, दु:ख, वेदना या भावना व्यक्त करणे जमू शकते ते अभिनयच्या या शहेनशाहलाच. संथ हालचालीतूनही लहान वयात अधिक आणि जलद शारिरीक वाढ करणा-या प्रोजेरिया रोगाचा परिणाम दिसून आला आहे. सध्याचे अमिताभ बच्चन वय लक्षात घेता त्या वयातील हालचाली नैसर्गिक वाटल्या. इथे फेशिअल एक्सप्रेशनस कमी, आणि इतर अभिनय `केलेला` नसून (स्वाभाविक) `झालेला` वाटला. वास्तवात ६५ वर्षाच्या वर वय असतानाही १२/१३ वर्षाच्या शाळकरी मुलाची भूमिका वठवणे अमिताभ सारख्या सशक्त महानटाला आव्हान नसावे. अचूक एक्सप्रेशनसाठी नाटक किंवा खास प्रयत्न ही कदाचित करावे लागले नसतील. अमिताभनी बारीक, वेगळा आवाज काढून लहान वय यशस्वीपणे साकारले आहे. शिवाय थोडेसे ओठ मुडपून केलेले बालिश संवाद, रूसवा-फुगवी, हट्ट, खोड्या, थट्टामस्करी, त्यावरचे चेष्टेखोर वयानुरूप हास्य तसेच शाळा, खेळ, मित्र अश्या आजूबाजूच्या वातवरणातूनही ऑरोच लहान वय अधोरेखित केलेले जाणवते. तरीही हा जिंदादिल ऑरो एक मॅच्युअर्ड चाईल्ड म्हणूनच इमेज मागे सोडून जातो.
प्रेक्षकांच्या डोळ्यांना या ऑरो चाईल्डचे वृध्द वय दिसते ते मेकअप मुळे. मुख्य श्रेय जात ते मेकअपमनला. वयस्कर व्यक्तीचा मेकअप उत्तम आहे. केस नसलेल्या डोक्यावरच्या शिरा, ओठ, डोळ्या भोवतालच्या आणि चेह-यावरच्या सुरकुत्या यांनी म्हातारपण उभे केले आहे. कॅमेरामनचा ही यात सहभाग आहे. इतर कलाकार विशेषतः शाळेतील बरोबरीची मुले आणि लंबूटांग याच्या ऊंचीतील फरक झाकण्याचा प्रयत्न चित्रिकरणात यशस्वी  झालेला आहे.
चित्रपटातील मोठा राजकिय नेता बनण्याच्या स्वप्नाने पछाडलेला अमोल, लग्नाशिवायही मूल जन्माला घालण्याचा विद्याचा आग्रह यातून निर्माण झालेल्या कथेचे केवळ `हायलायटिंग प्रोजेरिया` हेच उदिष्ट्य  नाही असे अजिबात म्हणता येणार नाही.जन्मातः नैसर्गिक दाखवलेले मूल दोन टप्प्यात म्हातारे झालेले दाखवण्यापेक्षा तो बदल अधिक टप्प्यात दाखवला गेला असता जन्मातः नैसर्गिक दाखवलेले मूल दोन टप्प्यात म्हातारे झालेले दाखवण्यापेक्षा तो बदल अधिक टप्प्यात दाखवला गेला असता तर चित्रपट उगाचच वाढवल्यासारखा वाटला नसता.
 बदल टप्याटप्यात दाखवला गेला असता तर  हा रोग अधिक ठळकपणे दर्शवला गेला असता हे खरे. पण तरीही चित्रपट जास्त खिळवणारा किंवा थोडी तरी उत्कंठा वाढवणारा झाला असता. त्यातील दृश्ये कथेला अनुरूप आणि सहाय्यकारी झाले असती. मेकपमनची कला अधिक चांगल्या प्रकारे दिसली असतीच. शिवाय अविवाहित मुलीला अश्या असाध्य आणि क्वचित रोग असलेले मूल होऊन काय काय प्रसंगातून जावे लागले, अश्या मूलाला, आईला, आजीला काय अडचणी आल्या यावर प्रकाश टाकला गेला असता. ती आई( विद्या बालन) शेवटी का चिडलेली आहे, मूलाच्या बापाला (अभिषेक बच्चन) ला का टाळते आहे ते अधिक पटण्याजोगे झाले असते. चित्रपटात प्रोजेरिया ह्या रोगाचे कारण आणि त्याची थोडीफार माहिती दिली आहे. पण त्याचे परिणाम व्यवस्थित रितीने दाखवायची उत्तम संधी या चित्रपटाने गमावली आहे असे निश्चितच वाटते. त्या रोगावर उपचार नाहीत हे सुरवातीलाच सांगून त्या चित्रपटात निराशा आणि औदास्य मिसळले आहे. `उपलब्ध असलेले थोडेफार उपाय करून पाहू` असे सांगून एक प्रकारची आशा आणि उत्कंठा प्रेक्षकांच्या मनात उभी करणे अशक्य नव्हते. कथा जराशी सबळ झाली असती.
विद्याच्या डॉक्टरी पेशातील जसे २-४ दृश्ये चित्रपटात आहेत तशी किंवा त्या पेक्षा थोडीशी जास्त दृश्ये अमोलचे राजकिय नेता बनण्याचे स्वप्न साकारताना दाखवले असते तरी चालले असते. राजकिय चढाओढ, झोपडपट्टी निर्मूलन हे मूळ कथेला पूरक नसले तरी अभिषेक बच्चनने साकारलेल्या एम. पी. च्या पात्रासाठी सहाय्यकारी वाटले. पण आवश्यक असे नव्हते. टीव्ही वरचे भाषण त्यातच मिडियाची निंदा वगैरे अनाठायी आहे. जरूरी नसताना आणलेल्या छोट्या राजकिय कथांमुळे मध्यंतरानंतरचा चित्रपट अतिशय मंद गतीने पुढे सरकतो. शाळेतील प्रसंग, गोष्टी मात्र अनुरूप वाटल्या कारण ते मूळ पात्र `ऑरो` च्या जिवनाशी निगडित आहेत.
चित्रपटातील काही दृश्ये, संवाद हसू आणणारे आहेत. पण कुठलेच खूप रडवणारे नाहीत. भावनिक संघर्ष असूनही इमोशनल मेलोड्रामा न वाटता चित्रपट सुख दु:ख मिश्रणामुळे न्युट्रल बनला आहे. गूगल सर्च , टी व्ही गेम , राजकिय निती यातून चित्रपट आताच्या जमान्याशी संयोग साधतो. त्यामुळे फँटसी न वाटता वास्तव वाटतो. निरनिराळे प्रसंग, वातावरण, पार्श्वभूमीतील चित्रीकरण यामुळे विविध स्तरातील लहान मुलांपासून वृध्दांपर्यंतच्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट बनवला आहे असे म्हणणे गैर ठरणार नाही. पण भारतीय लहान मुलांच्या तोंडी काही शिव्या, उद्गार अनुचित निश्चितच वाटले.
चित्रपटाचे चित्रिकरण निळ्या समुद्र किनारी / बर्फाच्छादित डोंगरावर/ हिरव्या गर्द वनराईत किंवा खूपसे दृष्टीसुख देणा-या जागी केलेले नाही. बागेत झाडामागून धावपळ करताना चित्रीत केलेली प्रेमी युगूलांची गाणी नाहीत. आहेत त्या सर्व गाण्यांचे शब्द ,चाली अत्यंत अनुरूप अश्याच आहेत. यात उत्तान कपडे घालून केलेले नृत्य नाहीत किंवा ढिश्यांव ढिश्यांव मारामारी ही नाही. प्रेम दृश्य जरूर आहेत पण आवश्यक वाटतील तेवढी अणि ते ही मर्यादित प्रमाणात.
शिकायच्या तरूण वयात मूल नको असलेला बाप आणि आपला बाप हाच आहे हे माहित असलेला मूलगा यांच्यातील जुळत जाणारे संबंध हा चित्रपटाचा प्रमुख धागा. हा भावनिक संघर्ष असलेला पहिला सिनेमा नाही. तसेच अमिताभ- अभिषेकचा एकत्रित असा ही पहिला सिनेमा नाही.
वडीलांच्या भूमिकेत मुलगा- अभिषेक आणि मूलाच्या भूमिकेत "रिश्ते में  हम तुम्हारे बाप लगते हैं" असे कुणालाही ठणकावून सांगणारे वडील - अमिताभ ही या `पा` चित्रपटाची खासियत. कथेचे नविन्य, अभिनयाचा वरचा दर्जा, चांगले दिग्दर्शन, उत्तम मेकअप, अनुरूप चित्रिकरण यांचा यशस्वी मिलाफ `पा`त जरूर पहावा असे मला वाटते.


(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)

२ टिप्पण्या:

  1. उर्मी..अग आत्ताच जाऊन ’पा ’ आणलाय. आणि तुझा इतका व्यवस्थित घेतलेला परामर्ष वाचला. ह्म्म्म... आता विचार करतेय लागलीच पाहू की नको.:)
    नीटस लिहीलेस गं.

    उत्तर द्याहटवा
  2. माझी तर इच्छाच मेली आहे हा सिनेमा पहायची.. !!

    उत्तर द्याहटवा