उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२६ मार्च, २०१०

चीनी महिला

आमच्या चीनमधील वास्तव्यातला फोटो अल्बम चाळताना मी तेथील आठवणींच्या भोव-यात अडकले. विविध प्रसंगांनी माझ्या भोवती फेर धरला. प्रत्येक गिरकीतून माझ्या संपर्कात आलेल्यांपैकी एकेक व्यक्ती माझ्या समोर यायला लागली. त्याच्याशी निगडीत असलेल्या घटना नजरेसमोर दिसू लागल्या. फोटोंमधून निघालेल्या त्या व्यक्ती माझ्या आठवणींचा पडदा दूर सारत शब्दात उतरल्या.

बस चालिका
चीनमधल्या बिजिंग राजधानी शहरात पब्लिक ट्रानसपोर्ट उत्तम आहे. बसेसचे जाळे चांगलेच पसरेलेले आहे. त्यामुळे कुठूनही कुठेही स्वस्तात फिरता येत. पण भारताप्रमाणे बसेस नेहमीच खच्चून भरलेल्या असतात. विषेशत: ऑफिसच्या वेळात बसमधे शिरायला वाव नसतो. बसच्या पायरीवर माणसांना लटकता येत नाही कारण बसचे दरवाजे बंद होतात.
बिजिंग मधे आम्ही रहात होतो तेव्हा ३ दर्जांच्या बसेस होत्या.
एक एकदम निमदर्जा. मोठा टेंम्पो असतो तश्या बसेस. त्या प्राइव्हेट कंपनीच्या असत. साध्या वेषातला ड्राईव्हर रस्त्यावर बस बिनधास्त हाकायचा. ही बस तशी सोयीस्कर म्हणायची. `हात दाखवा, बस थांबवा` प्रकारची. त्यामुळे त्या बसच्या ठराविक मार्गावर कुठेही बस थांबवून यात चढता यायचे. प्रवासाचे भाडे घेणारा बसचे दार  हाताने उघडून प्रवाश्याला चढू द्यायचा आणि पुन्हा दार लावून घ्यायचा. भाड्याचे पैसे दिले तरी तिकिट मिळायचे नाही. या कंडक्टरला माहित असायचे की कोण कुठे उतरणार आहे. कमी प्रवासी मावणा-या या लहान बसमधे ते सहजी शक्य व्हायचे. आमच्या घराकडे जाणारी सोयीची बस होती liù lù chē. हे या बसचे नाव होते. liù म्हणजे ६, lù म्हणजे रस्ता/ प्रवास. chē म्हणजे वाहन.(प्रवासासाठी असलेले नंबर ६ चे वाहन.)
दुसरी बस होती ती सरकारी निम दर्जाची. दोन डब्बे एकमेकांना पुढे मागे जोडलेली ही बस. यातील खूर्च्या लाकडी असायच्या. शिवाय ही बस वातानुकुलित नव्हती. थंडी, गरमीत हवामानाशी तडजोड करत प्रवासी वाहणा-या बसचे भाडे ही कमी होते. यात पुढल्या दरवाज्याने चढायचे आणि तिथल्या मशिनमधे भाड्याचे पैसे टाकायचे. तिकिट देणारा/ देणारी कंडक्टर अश्या बसमधे बहुतेक वेळा नसायचा/ची. बसची चालिका/ चालकच सर्व प्रवाश्यांना कंडक करायची/चा.
अजून एक बस प्रकार म्हणजे सरकारी परंतु उच्च दर्जाची बस. प्रवाश्यांना थंडीत गरमी आणि गरमीत थंडी देणारी वातानुकिलित बस. महाग भाड्याची. गरीबांना न पडवणारी. अश्या बसची ही सरकारी गणवेशातली चालिका.
एकदा आम्हाला एके ठिकाणी जायचे होते. आम्ही या बस चढलो. चांगलीशी जागा पकडून बसलो. तिकिट देणा-या कंडक्टरला पैसे देऊन आमच्या अंतिम ठिकाणाचे नाव सांगितले.. पण ही बस तिथे जात नव्हती. आम्हाला मधेच उतरवून घालण्यापेक्षा बसची चालिका आणि तिकिट देणारी कंडक्टर या दोघींमधे काहीतरी संगनमत झाले. आमचे पैसे न घेता दोन चार स्टॉप नंतरच्या एका स्टॉपवर आम्हाला उतरायला सांगितले आणि अमूक अमूक नंबरची बस पकडण्याचा सल्ला दिला. ती बस आम्हाला हव्या त्या ठिकाणापर्यंत अचूक घेऊन जाईल की नाही? याबद्दल आम्हाला जराही साशंकता वाटली नाही. बस मधून उतरताना तिचे आभार मानले. तिने तिचे गडग रंगवलेले ओठ किंचितसे रूंदावले. तिची आठवण म्हणून तिचा फोटो आमच्या कॅमेरात टिपून घेतला.


नाजूक फुलराणी
चीनकडे इतिहास, कला, मनुष्यबळ आहे. विविध वस्तूंची निर्मिती करून त्या ग्राहकांच्या माथी मारायचे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. धंदेवाईक आहेत ते पक्के! त्यामुळे विविध प्रकारचा माल आणि तशीच विविध बाजारे ही तिथे आहेत. आमच्या घराच्या जवळच एक मार्केट होते. तिथे खूप सुंदर वस्तू मिळायच्या. या वस्तूंची मांडणी ही आकर्षकरित्या केलेली असायची. कुणालाही मोहात पाडतील अश्या वस्तूंच्या किंमती मात्र खूपच जास्त असायच्या. केवळ चिनी भाषेत बोलूनच किंमतीची घासाघिस यशस्वी व्हायची. या मार्केटमधे तळघरात चिनीमातीच्या आणि लाकडी नाविन्यपूर्ण वस्तू विकायला ठेवलेल्या असायच्या. त्यात शोभेच्या रंगित वस्तू, लाहन -मोठे पुतळे, नक्षिदार कुंड्या अश्या ब-याच वस्तू मनाला भूरळ पाडायच्या. याच मार्केट मधे एका विभाग होता फुलांचा. ख-या आणि कृत्रिम फुलांचा. खरी फुले कुठली आणि खोटी कुठली असा संभ्रम पडायचा ब-याचदा. मोठमोठ्या उभंट्या द्रोणासारख्या/कोनाकृती बादल्यात पाणी भरून त्यात खरी फुले ठेवलेली असायची. रंगिबेरंगी, विविधतेने नटलेली. डोळ्याच्या माध्यमातून हृदयाला भूरळ पाडणा-या या मनोहारी फुलांच्या विक्रेत्या बहुधा तरूण  स्त्रिया असायच्या.

ही फुलराणी त्यातलीच एक. विक्रीसाठी ठेवलेल्या त्या दिलखेचक फुलांच्या इतकीच मोहक. गोड बोलून ग्राहकांना सुंदर फुलांचा सुवास देऊन त्यांचे मन मोहवणारी. सतत सुमनांच्या सानिध्यात राहून सुमधुर हसून फुलांच्याच कोमलतेने पैशाचा कोरडा व्यवहार करणारी ही नाजूका.
एकदा मी तिच्याकडे गेले असताना नाजूकाने "हॅलो. लूSक लूSक" हे तिला माहित असणारे एक दोन इंग्रजी शब्द आत्मविश्वासाने माझ्यासमोर फेकले. मी " ही फुलं कितीला? ती कितीला?" असे इंग्रजीत विचारल्यावर ती हरखली. ‘चांगलाच बकरा मिळाला. चला! जास्त भाव लावून लूटून घ्या या परदेशी ग्राहकाला‘ असे ती मनातल्या मनात नक्की म्हणाली असेल. तिने उभट द्रोणाच्या बादलीतल्या पाण्यातून एखाद-दोन फुले आणि बारीक फुलांच्या जुडी माझ्या समोर आणल्या. त्याचे चीनी नावे मला सांगितली आणि कॅलक्युलेटरवर प्रचंड आकडे घालून मला दाखवली. मी माझे चीनी भाषेतील थोडक्या शब्दसंपदेचे अस्त्र बाहेर काढले. आश्चर्यचकित होऊन ती खजिल झाली. "तूला आमची भाषा येते होय? मग मला एवढेच पैसे दे" असे म्हणून एकदम स्वस्त भावात मला आवडली फुले देऊ केली. मी ही खुष झाले. तरत-हेची खूप सारी फुले घेऊन मी तिथून बाहेर पडताना तिची छबी कॅमेरात मी घ्यायला विसरले नाही. ती फुले काही काळतच कोमेजली. पण ती नाजूका मात्र अजूनही माझ्या मनात ताजीतवानी आहे.

पेट स्टोअर किपर 
एका स्थानिक बाजारातला हा छोटासा स्टॉल. हे पेट स्टोअर पाळिव प्राण्यांना लागणा-या सर्व सामानाने खचाखच भरलेले होते. घरात ठेवायच्या छोट्या काचेच्या मस्त्यालयातील कृत्रिम झुडपे, फुले, प्राण्यांचे अन्न, औषधे, कुत्रा/मांजरीचे गळ्याला बांधायचे पट्टे, थंडीत पाळलेल्या प्राण्यांना घालायचे कपडे असे बरेच काही विक्रीसाठी ठेवलेले असायचे. मांजरांची पिल्लं, तळहातावर मावतील अशी छोटी कासवं, ईटूकले हॅमस्टर्स, चिवचिवणारे पक्षी, बेडूकाची पिल्लं, रंगीत मासे असे अनेक प्राणी ह्या चिनी तरूणीच्या स्टॉलमधे पहायला मिळायचे.

ती दिसायला, बोलायला आधुनिक होती. तिला खूप आवड होती प्राण्यांची. पण घरात पाळण्यापेक्षा त्या छंदातून अर्थाजना करण्याच्या हेतूने तिच्या नव-याने हे स्टॉल उघडून दिले होते. आपल्या आवडीप्रमाणे करायला मिळालेल्या या व्यवसायात ही खूश दिसायची. तिथल्या प्राण्यांची नीट काळजीही घ्यायची. सकाळी कामाच्या ठिकाणी आल्यावर त्या स्टॉलमधले ते औट घटकेचे पाहुणे तिला पाहून आनंदित व्हायचे. पाण्यातल्या माश्यांना आणि कासवांना काय कळायचे ते माहिते नाही? पण लगेच त्यांच्या हालचालींना वेग यायचा. मांजरीची गोजिरवाणी पिल्लं तपकिरी डोळे तिच्यावर रोखून म्यांव म्यांव करू लागत. त्यांच्या जवळपास जाताच पिंज-याच्या तारांच्या फटीतून पाय बाहेर काढून तिला बोलावत असत. मग ही चीनी त्यांना पिंज-यातून बाहेर काढून गोंजारायची. चिनी भाषेत काही बाही बोलायची. त्यांचे पापे घ्यायची. त्यांना कुरवाळायची. त्यांना आणि इतर प्राण्यांना खाऊ घालून संपूर्ण स्टॉलची स्वच्छता करायची आणि ग्राहकांची वाट पहात बसायची. प्राण्यांवरची चीनी भाषेतील पुस्तके वाचताना मी तिला पाहिले होते. माझ्यासारखे प्राणीप्रेमी तिथे गेले की "हे बघ, ते बघ" म्हणून आपले प्राणी हौसेने दाखवायची. "विकत घेणार का? मजा येईल तूला." असे म्हणून खरेदीसाठी आग्रह करायची. प्राण्यांना खेळवण्याची बहुढंगी खेळणी मला हातात द्यायची आणि प्राण्यांशी खेळताना मला हसू आलेले पाहिले की स्वत: ही खुदू खुदू हसायची. हिला थोडेसे इंग्रजीचे ज्ञान होते. तिच्याशी संवाद साधणे मला सोपे जात असे.
एकदा ती खूप उदास दिसली. "आर यू ओके?" असे विचारल्यावर हाताने गेल्याची खूण करत उत्तरली "माय पप्पी, सेल टूडे." नुकतेच विकल्या गेलेल्या कुत्र्याच्या पिल्लाच्या विरहाने ती हळवी झाली होती. खरंतर तिला ती विक्री करायचीच होती. नाही का? तरीही ती दु:खी झाली होती. तिचे दु:ख कमी करायला माझ्याकडे शब्दच नव्हते.

न्हावीण
मी ज्या शाळेत कामाला जात असे त्या वाटेवरच्या फूट्पाथ वर टिपलेला हा फोटो.

मी भारतात केस कापणा-या महिला पाहिल्या आहेत परंतु लेडिज ब्युटी पार्लर मधे, बंद दरवाजाआड. असे रस्त्यावर खूर्ची टाकून त्यावर बसलेल्या एका पुरूषाचे केस कापणा-या या महिलेला पाहून मला तिचा फोटो काढल्याशिवाय रहावले नाही. तिची परवानगी घेऊनच मी हा फोटो काढला असला तरीही फोटोसाठी ती कुठलीही खास पोझ ती देत नाही आहे. तिची स्वतःची हेअर स्टाईल बघा. आहे अगदी साधीशीच! पण तिचे ते व्यवस्थित कपडे, मॅचिंग बूट तरी पहा. काय बाई थाट! जशी काय कुणा ऑफिसमधेच कामाला आहे. तिच्या चेह-यावर स्वत:च्या व्यवसायाबद्दल किती आत्मविश्वास दिसतो आहे. एका बारीकश्या कात्रीने आणि एका कंगव्याने सुध्दा काम नक्की फत्ते होईल अशी तिला आणि तिच्या कस्टमरला नक्कीच खात्री असावी. अंगावर केस पडू नये म्हणून अंथरण्यासाठी कपडा, एक पत्र्याची खूर्ची एवढेच काय ते तिच्या जवळचे सामान. झपाट्याने बदलणारी आपली छबी निरखायला समोर आरसा ही नाही तिथे. अश्या परस्थितीत हा माणूस हिच्याकडून केस कापून घ्यायला बसूच कसा काय शकतो?  TONI & GUY सारख्या नामावंत हेअर सलून मधे जाताना अनुभवी आणि रेकमेंडेड हेअर स्टायलिस्टचाच अट्टहास धरणा-या मला या रोड साईड सलूनमधल्या कस्ट्मरच्या धाडसाचे आश्चर्य वाटले. त्याचे होणारे ते केशकर्तन मी बराच वेळ पाहिले. जेव्हा संपले तेव्हा खूर्चीतून तो उठला. अंगावरचे फडके गुंडाळून न्हाविणीच्या हातात दिले. खिशातल्या काहीश्या नोटात तिचा हातावर टेकवल्या व चालता झाला. मी पुन्हा मागे वळून पाहिले तेव्हा न्हाविणीसमोर नविन कस्ट्मर तेच ते फडके अंगावर घेऊन खूर्चीत बसला होता आणि त्याच्या केसांची ही छाटणी सुरू झाली होती.

खाटिक महिला
एका स्थानिक बाजारातली ही खाटिक. मी शाकाहारी असल्याने त्या विभागात जाणे कधीच व्ह्यायचे नाही. पण झालं काय की बाहेर पडायच्या जागेत एक छोटी ढकल गाडी आली होती आणि त्यावरचे सामान उतरवण्याचे काम चालू होते.  जरा वळसा घालून मृत प्राणी विभागातून बाहेर पडण्याशिवाय मला पर्याय नव्हता. शिष्टाचाराचा अवलंब करून मी नाकाला रूमाल न लावता शक्य तेवढा श्वास रोखून पटापट पावले उचलत तिथून निसटायच्या बेतात होते. पाहिले तर तिथे ही छोटी ढकल गाडी आली होती. गर्दीतून वाट काढताना माझा वेग मंदावला आणि मी या स्टॉलपाशी येऊन ठेपले. तिथून माझे लक्ष हटेना. मांस विकायचे अनेक परवाने मागच्या भिंतीवर लटकत होते. चीनी भाषेतल्या स्टॉलच्या नावाशेजारी चीनी देवतेचा फोटो चिकटवलेला होता. मागेच हिटर, छोटा फ्रिज, त्या बाजूला लहानसे टेबल आणि त्यावर गरम पाण्याचा थर्मास आणि बारीक सारीक सामान अस्ताव्यस्त पडलेले होते.

त्यासमोर एक स्त्री भले मोठे मांस कापत होती. खाटिक स्त्रीने काळा-लाल स्वेटर आणि त्यावर लाल एप्रन घातला होता. त्यावर रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते. एक जीव निर्माण करून त्याला जन्म देणारी स्त्री अश्या प्रकारे एखाद्याचा जीव घेऊ शकते यावर माझा विश्वास बसेना. मला कस्ससच झाले. मी निरखून पाहिले. टेबलवर असलेल्या लाल बुंद मांसाला ती बारीकश्या सुरीने सरासर कापत होती. आकारमानावरून ते डुक्कर/ गाय/ बैल अश्या मोठ्या प्राण्याचे मांस असावे. चेह-यावर कुठेही दु:ख, पश्चाताप नव्हता. उलट मला तर एक प्रकारचं हास्यचं जाणवलं तिच्या चेह-यावर. ते मी तिचा फोटो काढला म्हणूनही असेल कदाचित. कच्च्या मांसाचा तो उग्र वास सहन करत मी पहात राहिले. तिच्या कापणीत एक प्रकारची चपळता होती. सफाई होती. एकाच सुरीने ती त्या मांसाचे मोठे, लहान तुकडे करत होती. त्याच सुरीने मग नूडल्स सारख्या बारीक लांबट सळ्या, तर कधी चौकोनी तुकडे, तर कधी बारीक बारीक खिमा करत होती. मागेच ठेवलेल्या वजनकाट्यावर पारदर्शक प्लास्टिकमधे मांस गुंडाळून ते तोलत होती. त्या खाटिकीने मांस गुंडाळलेले एक पॅकेट उचलले आणि पुढे करत " हे हवंय?" असं न बोलताच विचारले. मी ही न बोलताच मानेने नकार दिला आणि तिथून काढता पाय घेतला.

ड्रमर 
एकदा जानेवारी महिन्यात आम्ही कुटूंबीय पायी फिरायला बाहेर पडलो होतो. मुख्य रस्ता सोडून शॉर्ट कट घेण्यासाठी लहान रस्त्याला लागलो. तिथून फार मोठे आवाज होते. जरा पुढे गेल्यावर कळलं की पंधरा वीस महिला लाल लाल कपडे घालून ड्रम बडवत आहेत. फेब्रुवारीमधे अथवा, मार्चच्या सुरवातीला येणा-या चीनी नववर्षाच्या सणाची ही तयारी होती. कुठल्याश्या शोची रंगित तालिम असावी. सर्वांनी एकसमान कपडे घातले होतच. बुट ही एकसारखे लाल होते. शिवाय केशरचनाही समान होती. खरोखरीचे बॅंडवाल्या दिसत होत्या त्या. केवळ एकाच प्रकारच्या वाद्याचा बॅंड.
त्यांचे ड्रम्स ही सुंदर होते. सोनेरी पिवळ्या ड्रमवर चीनी नक्षी रंगवलेली होती. काही आडवे ड्रम लाकडी स्टॅंडवर ठेवले होते तर काही उभे ड्रम पाटासारख्या लाकडी स्टॅंडवर होते. ड्रमला लावलेले चामडे लाकडावर खिळ्यांनी बसवलेले होत. ते ही पॉलिश्ड किंवा नवे खिळे होते.
भल्या मोठ्या उत्साहात, सुहास्य वदनाने बॅंडवाल्या छानसा ठेका तयार करत होत्या. सर्व शक्ती एकवटून लाकडी स्टीक्स ड्रमवर आपटून आवाज काढताना या स्त्रिया थोड्याश्या पुरषी दिसत होत्या. ही समोरची त्यांच्या बॅंडची प्रमुख असावी.

नादमयी एक तुकडा वाजवून झाल्यानंतर ही मधेच थांबून  चीनी भाषेत काही सूचना देत होती. इतर सा-या वादिका शांतपणे ऐकून घेत होत्या. आश्चर्य आहे नाही का? इतक्या महिला एकत्र असूनही वचवच नाही की गप्पांचा कलकलाट नाही की गगनभेदी हास्यविनोदाचे फव्वारे नाहीत. सर्व कसे अगदी शिस्तबद्ध.!जीव ओतून ड्रम वाजवताना त्या हिवाळी थंडीतही घामाघूम होऊन तो वाद्यवृंद निथळत होत्या. तरी ही त्यांच्या चेह-यावरून समर्पणाची भावना ओसंडत होती. त्यांची ती रंगित तालिम त्यांचा परफॉर्ममन्स/वाद्यवादनाचा खेळ यशस्वी होईलच याची खात्री देत होती.
पारंपारिक गणवेषातील त्या स्त्रिया देखण्या दिसत तर होत्याच शिवाय पण तेथिल संगित जरासे मोठ्या आवाजातले असले तरी कर्कश्य नव्हते. उत्साहाने भरून वाहणारे ते संगित वातावरणात अफाट चैतन्य आणणारे होते. असे ते ड्रम्स आमच्या कानात कितीतरी वेळ घुमत राहिले.


भाजीवाली
चीन मधल्या स्थानिक भाजी मंडईत परदेशी क्वचितच दिसायचे. मी मात्र आठवड्यातून एकतरी चक्कर टाकायची तिथे. तिथलीच ही भाजीवाली.

तिचं नाव ‘युई‘ का असेच काही तरी सांगितल्याचे आठवते. प्लास्टिकच्या पिशव्यातून ताज्या भाजीचा खजिना खच्चून भरलेला असायचा तिच्याकडे. मी सांगेन ती आणि तेवढी भाजी प्लास्टिकच्या पिशवीत भरून चीनी वजन काट्यावर वजन करून ती भाजीवाली तोंडी हिशोब पटापट करायची. माझ्या हातात कॅलक्युल्टर द्यायची आणि मला चीनी भाषेत आकडे सांगायची. मी मात्र त्या सर्व भाज्यांच्या किंमतीची बेरीज कॅलक्युल्टवरच करत असे. मला तिचा विश्वास असे की ती जास्त पैसे लावणार नाही आणि तिला माझा की मी कमी पैसे कॅलक्युल्टरमधे टाकणार नाही. भाज्यांची किंमतीची बेरीज झाली की मी तिला तो आकडा चीनी भाषेत सांगून मग कॅलक्युलेटर दाखवायची. ती हसून पैसे कमी करून `एवढेच दे `असं सांगायची. तर कधी जरा जास्त भाजी देत असे. कधी कोथिंबीरीची एखादी जुडी तर कधी थोड्या मिरच्या. तर कधी मी न चाखलेला चीनी पाला. त्याबरोबर त्याची रेसिपी ही सांगत असे. "करून बघच एकदा. खूप रूचकर लागते." असे ही सांगून युई पिवळे दात दाखवत हसायची.
खरेदी केलेल्या भाजीच्या पिशव्या तिच्याकडेच ठेऊन मी इतर सामानाची खरेदी करायला जात असे. त्या भाजी मंडईत फळे, धान्ये, मसाले, मांस, मासे, भांडी इतकेच काय वरच्या मजल्यावर   इलेक्ट्रिकचे सामान, शोभेच्या वस्तू, फोनकार्ड्स्, कपडे, पिशव्या वगैरे सामानही मिळत असे. कमी दर्जांच्या या वस्तू स्वस्त ही असत. अर्थात थोडीतरी घासाघीस करावी लागे.
मी काही ही खरेदी करून आले की युई मला विचारायची," काय काय विकत घेतलंस?" माझ्या खरेदीचं तिला खूप कुतुहल असायचे. शिवाय मी किती किंमतीला घेतले याची ही चौकशी असायची. "स्वस्त भावात मिळालं" असा तिचा शेरा ऐकल्यावर मला कसं हायसं वाटायचं.
तिची सून , शाळेत जाणा-या दोन मुली मला ओळखत होत्या. त्या कधी तरी विक्री करायला बसलेल्या असल्या की मला कमी भावात भाजी द्यायच्या. आणि "मां आज इथे आली नाही" असे सांगून न येण्याची कारणं चीनी भाषेत सांगायच्या. मी ही खूप काही समजल्याचा आव आणून मान डोलवायची. भाजी सामानाची ने-आण करणारा तिचा हमाल नवरा ही मला नीट ओळखत असे. मी खरेदी केलेल्या भाजीच्या जड पिशव्या तो ट्क्सीत चढवून द्यायचा. थंडीच्या काळात मला भाजी मंडईत जायचा कंटाळा यायचा. मी भाजीवाली युईच्या मोबाईलवर फोन करून माझ्या तुफानी उच्चारांत चीनी भाषेत भाज्यांची नावे सांगायची आणि युईला समजतील / न समजतील त्या सर्व भाज्या नव-यामार्फत घरपोच पोहोचत्या व्हायच्या. चीन सोडताना तिला मी भारतीय बांगड्या भेट म्हणून दिल्या. या अनपेक्षित भेटीमुळे आणि माझ्या पुन्हा न भेटण्याच्या बातमीमुळे तिचे डोळे पाणावले होते. त्यादिवशी मी तिथून काहीच खरेदी केली नाही. तरीही युई आणि तेव्हा तिच्या सोबत असलेली तिची मुलगी, नवरा, सून असे सर्वच कुटूंब आपले दुकान सोडून मंडई बाहेर रस्त्यापर्यंत आले. हात हलवून टाटा करतानची `ती` दिसेनाशी होईपर्यंत मी माझ्या भरल्या डोळ्याने पहात होते.

३ टिप्पण्या:

  1. उर्मी आवडली. चीनी महिला कुठलंही काम हौशीनं करतात. आपल्या कडे भारतात ही आता महिला ट्रेक्टर चालवतात, मैकेनिक चं ही काम करतात . नवीन पिढी पुष्कळच ओपन आहे या बाबतीत . मी तुला कविता ंची नावं पाठवते.

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान झालीये पोस्ट!!
    तुझा ब्लॉग आवडला मीनलताई..
    Meenal Rocks!! :)

    उत्तर द्याहटवा
  3. चीनी स्त्रियांबद्दलचे साक्षिभावाने केलेले हे सर्वेक्षण मला बेहद्द आवडले. चीनसारख्या देशात जाऊन, त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयास करून, त्यांच्याशी स्नेहबंध स्थापन करण्याच्या तुझ्या हुरूपाचे मला कौतुक वाटते. तुझी वर्णनशैली चित्रदर्शी आहे. वास्तववादी आहे. म्हणूनच परक्या देशाच्या चक्षुर्वैसत्यं माहितीचा ती अनोखा स्त्रोत वाटते. असेच नवनवे अनुभव घेत राहा. अशीच लिहीत राहा. म्हणजे आम्हालाही जगाचे सम्यक दर्शन होईल.

    उत्तर द्याहटवा