उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

८ जुलै, २०११

अमेरिकेचा स्वातंत्रदिन-४ जुलै

१७७६ मधे ब्रिटीशांपासून तेरा कॉलनीज  स्वतंत्र झाल्यानंतर अमेरिकेतील राष्ट्रिय सुट्टीचा ४ जुलै हा स्वातंत्र दिन देशप्रेमाच्या देखाव्याचा असतो असे म्हटले तरी चालेल.
स्वातंत्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती  दूरदर्शनवर, मासिकातून, वृत्तपत्रातून, पत्रिकांतून दहा पंधरा दिवस आधीपासूनच दिली जात होती. त्यासाठी केलेल्या व्यवस्थेबद्दल, वाहतूकीच्या मार्गातील बदलबद्दल माहिती ही वारंवार देण्यात येत होती.  खास त्या दिवशी  उपलब्ध असलेल्या सोयी, सवलतींच्या लयलूटींबद्दल  पुन्हा  पुन्हा  उजळणी करण्यात येत होती.
मोठ्या मॉल/ दुकानांतून  लाल, निळा आणि पांढरा रंग असलेले तिरंगी लहान मोठे झेंडे, तिरंगी माळा, कपडे, रिबिन्स  वगैरे वस्तू दर्शनिय जागी विकण्यास ठेवण्यात आल्या होत्या. गि-हाईकांच्या खरेदीवरून त्यांना वस्तूंच्या दराची पर्वा नव्हती हे स्पष्ट दिसत होते. काही देशप्रेमी रहिवाश्यांनी घराबाहेर  स्वातंत्रदिनाला अनुसरून आधीपासूनच  सुशोभिकरण  सुरू केले होते.  घरांवर तसेच झाडांभोवताली अमेरिकी तिरंगी झेंडे लावण्यात आले होते.   काही पत्रपेट्या ही या तिरंगी रंगांच्या  रिबिनीने सजवल्या गेल्या होत्या. हे सर्व पाहिल्यामुळे इथल्या  स्थनिक  लोकांचा देशप्रेमाबद्दल साशंकता निश्चितच उरली नव्हती. आमच्या विभागातल्या वसाहतींमधील मंडळाने ह्या वर्षी  ४ जुलैला राष्ट्रिय सुट्टीच्या दिवशी देशभक्तिपर परेड आयोजित केली गेली होती.  आम्हाला  त्या देशप्रेमाच्या देखाव्यात रस होता आणि कुतूहल  ही होते. आम्ही तिथे जायचे ठरवले.  
सकाळी ७ वाजता आमच्या विभागातील मोठ्या तलावा शेजारील क्लबबाहेर मोठ्याश्या पार्किंग लॉटमधे जमायचे मंडळाने निश्चित केले गेले होते.  तेव्हा  सर्वांच्या कार पार्किंगची सोय  वेगळ्या ठिकाणी केली गेली होती. ठरलेल्या वेळीआधीच लहान लहान मुलांना घेऊन अनेक उत्साही  पालक क्लबबाहेर पार्किंग लॉटमधे हजर झाले होते. स्वातंत्र दिनानिमित्त शुभेच्छांची हसत मुखाने   देवाण घेवाण  होत होती.
काही वेळातच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धावण्याच्या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे घोषित केले. अनेक मुलामुलींनी नोंदणी केली आणि लगेचच विविध  वयोगटानुसार धावण्याची स्पर्धा घेण्यात आली.
साडे आठच्या सुमारास क्लबबाहेर पार्किंग लॉटमधे देशप्रेमींची संख्या खूपच वाढलेली होती. जमावातील सर्वच कुटुंबे अमेरिकेच्या राष्ट्रध्वजात असलेल्या लाल, निळ्या आणि पांढ-या रंगांचे किंवा अमेरिकेचा नकाशा असलेले कपडे घालून आलेले होते. त्याला साजेश्या टोप्या, हॅट्स, बुट, छत्र्या, पिशव्या त्यांचे देशप्रेम अधोरेखित करत होत्या. एक गोष्ट सहजी ल्क्षात आली की चेहरेपट्टी, भाषा, वेशभूषा असे बाह्यरूपरंग पाहता तेथिल सर्वच जण गोरे अमेरिकन दिसत होते. आमच्या वसाहतीतील  मूळचे अमेरिकन नसलेले परंतु आता अमेरिकी नागरिकत्व स्विकारलेले एकही कुटूंबं तिथे दिसले नाही. या उप-या अमेरिकन लोकांना कुठल्या देशाबद्दल प्रेम वाटत असेल? अमेरिकेबद्दल  की त्यांच्या मूळच्या देशाबद्दल? त्यांच्या अनुपस्थितीने  या प्रश्नाचे खात्रिलायक नसले तरी काहिसे निष्कर्शात्मक उत्तर दिले होते.
काही वेळातच स्वातंत्रदिनानिमित्त पारंपारिक अमेरिकी वेषातील लोकांनी अमेरिकी तिरंगा उंचावून अमेरिकी राष्ट्रगितावर मानवंदना दिली. त्यानंतर मोठ्या बंदूकीने आकाशात  काही फैरी झाडण्यात आल्या. ते आनंदाचे  एक प्रतिक असावे असे वाटते.
त्यानंतर मंडळाने आधीच जाहिर केलेल्या सर्व स्पर्धांची माहिती देण्यात आली. तेव्हा सर्वाधिक देशभक्ति असलेल्या देशप्रेमींच्या कुटूंबांत, स्वातंत्रदिनानुरूप सुशोभित केलेल्या वाहनांमधे तसेच पाळिव प्राण्यांमधे चुरस लागली होती.
स्पर्धांची तसेच बक्षिस समारंभाबद्दल माहिती दिल्यानंतर त्या  क्लब बाहेरील  पार्किंग लॉट पासून जवळच्या  बागेपर्यंतच्या रस्त्यावरून  शिस्तबध्द परेड सुरू करण्यात आली. अशी ही देशप्रेम देखाव्याची परेड पहाण्यासाठी वृध्दांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या पदपथावर खुर्च्या मांडून आपापली सोय करून घेतली होती. तो रस्ता काही काळासाठी वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. परेडच्या मागे आणि पुढे  पोलिस आणि त्यांच्या निळ्या दिव्याच्या गाड्या संरक्षणाची तट  सांभाळत होते.
या  परेड मधे देशप्रेमी नागरिक, वाहने, पाळिव प्राणी यांचा समावेश होता. अनेक लहान तसेच शाळकरी मुलांनी  आपल्या खेळातल्या दुचाकी, तीन चाकी  व इतरही खेळातील वाहने  याच तिरंगी रंगात सजवून आणल्या होत्या. तिरंगी रिबिन्स, बो, झेंडे वगैरेंनी सजवलेल्या या वाहने अतिशय आकर्षक दिसत होती. सर्व जमावातील कुटुंबामधे  सर्वाधिक देशभक्ति असलेल्या (निदान तसे देखावणा-या) देशप्रेमींमधे ही चाढाओढ  लागलेली पाहून आम्हाला गंमत वाटली. या स्पर्धेत उत्साहाने भाग घेणारे आबाल वृध्द स्पर्धकही अनेक होते. त्यापेक्षा ही अफलतून होते ते देशप्रेमी पाळिव  प्राण्यांमधील स्पर्धा. अमेरिकेत कासव, पक्षीसाप, अजगर,   उंदिर, मांजर, ससे, घोडे वगैरे सर्रास पाळत असले तरी यातील तिथल्या परेडमधे कुणीच हजर नव्हते. होते ते फक्त देशप्रेमी कुत्रे.


त्या नंतर तिथल्याच बागेमधे एकत्र जमून सर्व स्पर्धेतील विजेते धाव पटू, सर्वाधिक देशप्रेमी कुटुंबं,  सुशोभित वाहन आणि सुशोभित विजेता  कुत्रा यांची नावे घोशित करून त्यांना बक्षिस देण्यात आले. त्या बागेत खाण्यापिण्याची सोय केली होती. तेव्हा मोफत देण्यात आलेल्या  कलिंगडकॅंडी फ्लॉस, गोळ्या, शुध्द पाण्याच्या थंड बाटल्यावर लहान मुलांनी हल्लाच चढवला होता. देशभक्तिपर गाणी, वाद्य संगित वाजवण्यात येत होते.
हवा भरून मोठमोठाल्या फुगवलेल्या घसरगुंड्या, व इतर खेळण्यांवर मुले मनमुराद आनंद लुटत होती.  त्यांच्या बरोबर त्यांचे नातेवाईक, आई-वडील, आजी आजोबाही खुशीत  दिसत होते.   हळू हळू गरमीने तापत चाललेल्या या दिवसात पाळिव प्राण्यांची तहान शमवण्यासाठी खास पिण्याच्या पाण्याची सोय केले होती. तसेच त्यांचे केसाळ अंग  थंड आणि शांत करण्यासाठी  मोठ्याश्या ट्बामधे ही पाणी भरून लोळण्यासाठी सोय केलेली पाहून आश्चर्य वाटले. देशभक्तिनिमित्त असलेला बक्षिस समारंभ, खेळ, खाणे-पिणे  असा मनोरंजक कार्यक्रम   चार पाच तास रंगला. उन्हं डोक्यावर आल्यावर सर्व देशप्रेमींनी तिथून काढता पाय घेतला.  स्वातंत्र दिनानिमित्त  रात्री फटाक्यांचा  देखावा आयोजित करण्यात आला होता.  ठिकठिकाणी असा देखावा आयिजित केला गेला असला तरी या वर्षी  धूम धडाक्याने पडणा-या पावसाने   देखाव्याला  हजर राहणा-या  देशप्रेमी प्रेक्षकांचे संख्या रोडावून टाकली. काही  उत्साही लोकांनी त्या  पावसात निथळतच  आकाशातल्या चमचमकीची मजा लुटली. तर काहींनी घरात बसून  दूरदर्शनच्या माध्यमातून ते झगमग दृष्टीसूख घेतले.
भारतात जसे शाळांमधून, मुख्यालयात, कार्यालयात स्वातंत्र दिन साजरा केला जातो तसेच  संपूर्ण  अमेरिकेत प्रत्येक राष्ट्रातील, शहरातील मुख्यालयात, कार्यालयात स्वातंत्र दिन साजरा केला गेला. त्याची बितंबातमी दूरदर्शनवर  दिली. पण अमेरिकेत  आमच्या विभागासारख्या लहान लहान वस्त्यां/वसाहतींमधूनही हा ४ जुलै  स्वातंत्र दिन अश्या थाटात साजरा केला याचे आश्चर्य  वाटले. कुठल्याही राजकिय पक्षाचा/ नेत्याचा/ पुढा-याचा सहभाग नसूनही सामान्य नागरिकांचे हे देशप्रेम; निदान तसा मनोरंजनात्मक  देखावा ही वाखाणण्याजोगा वाटला.
मनात विचार आला की भारतात कितीश्या वस्त्यांमधे कुठल्याही राजकिय गटाचा/ पक्षाचा हस्तक्षेप नसून  केवळ नागरिक/ अथवा छोट्या मंडळांनी आयोजित  केलेला स्वातंत्र दिन अथवा प्रजासत्ताक दिन साजरा होता?  आणि त्यात कितीसे भारतिय नागरिक उत्साहाने हजेरी लावतात???

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा