उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

११ फेब्रुवारी, २०१५

श्री गजानन महाराज आणि लहान मुलांच्यातील नाते

माघ वद्य शके १८०० २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी  श्री गजानन महाराज ऐन तारुण्यात शेगांव जि. बुलढाणा येथे देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात असताना प्रथम दृष्टीस पडले त्यांचे असाधारण वागणूक, दिगंबरावस्था काहींना वेडगळ वाटली. त्यांनी श्री  महाराजांची हेटाळणी केली. तर  काहींना त्यांच्या चमत्कारिक लिला आश्चर्यकारक वाटल्याकाहींना त्यांना अवलिया संबोधले. तर काहींनी त्यांना अदभुत साधू  मान्य केलेयात मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलांचा ही समवेश होता. कदाचित  त्यांना महाराजांनी केलेल्या चमत्कारिकांची जादूसारखी  मौज वाटत असावी.  श्री महाराजांना देऊ  केलेल्या पेढा, बर्फी सारख्या गोडाधोडाचा थोडा तरी खाऊ मिळावा या आशेने ही कदाचित ती मुले श्री महारांजांभोवती जमत असतील. लहान मुलांचे आणि  १८ /१९ वर्षाच्या श्री गजाननाचे मैत्रीचे नाते असेच विकसित झाले असावेआता मैत्री आली की दंगा, मस्ती, मजा,खेळ हे आलेच!     
 अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी चिलीम ओढायची महाराजांना इच्छा झाली. महाराजांनी  आपली इच्छा भोवताली असलेल्या बाल गोपाळांना सांगितली.  श्रध्दाळू  मुलांनी  ती आज्ञा मानली आणि आनंदाने तंबाखू चिलीमित भरू लागलेती पेटवण्यासाठी आगीची सोय करण्यासाठी ते गावात फिरू लागले. पण या सकाळच्या वेळी  घराघरात  चुली पेटण्यासाठी अजून अवकाश होता.  मुले जानकीराम नावाच्या सोनाराकडे  अग्नी मागण्यासाठी गेले.  पण   केवळ  बाह्यरूप बघणारा आणि  देहबुद्धी जाणणारा जानकीराम  वर वर वेडेपण धारण केलेल्या  महाराजांचे महान  कर्तृत्व आणि अद्भूत  शक्ती ओळखू शकला नाही. त्यांनी विस्तव देता महाराजांची निंदा नालस्ती  करून  मुलांना हाकलून दिले.  मुले निराश होऊन परत आली.  सोनाराच्या घरी झाली सर्व हकीकत महाराजांनी ऐकली  आणि  हसूनच  चिलीम पेटवायला विस्तवाची जरुरीच नाही असे सांगून  मुलांना  दिलासा दिला.  केवळ चिलीमी समोर  काडी धरून चिलीम पेटवू  असे ही सांगितलेमुलांनी अविश्वास दाखवला आणि दोन  काड्या  एकमेकांवर घासून अग्नी  तयार करण्याचा  विचार  व्यक्त केला.  महाराजांनी  तो विचार नापसंत करून चिलीमी समोर  काडी धरण्याचा आग्रह धरला. मुलांनी तसे करता काडी पेटता अग्नी प्रज्वलित झाला आणि चिलीम पेटली . मुलांना या प्रकारामुळे महाराजांच्या  प्रभावी शक्तीचा प्रत्यय आला. त्या मुलांची श्रध्दा अधिक दृढ झाली असेल यात शंका नाही


एकदा पिंपळगावच्या   जंगलात एका शिवाच्या मंदिरातील गाभा-यात   श्री गजानन महाराज पद्मासन घालून बसले.   काही  गुराख्यांच्या मुलांनी  ते पाहिले.  या पूर्वी  तिथे असे ध्यानस्त बसलेले कुणीच दिसले नव्हते. त्या मुलांना आश्चर्य वाटले आणि हा पुरूष  सामान्य नसून  कुणीतरी अवलिया  आहे हे  अचूक जाणले.  थोडा वेळ  काही हालचाल होते का  याची त्यांनी  वाट पाहिली . त्या  अवलियाने  डोळे ही  उघडले नाहीत .   त्यांनी  भाकर दिली.   इतकेच नाही तर  त्यांना भरवण्यासाठी प्रेमाने तोंडाजवळ ही नेली .  महाराजांना स्पर्श  करून हालवून पाहिले.   निश्चल अश्या अवस्थेतील हा  योगी स्वर्गीचा  देव आहे हे त्यांना  समजले. त्यांनी स्वत: ला धन्य मानले आणि जवळच्या ओठ्यावरून पाणी आणले. महाराजांच्या पावलावर वाहिले. रानातून फुले आणून   त्यांची माळ करून  त्या देवाच्या गळ्यात  घातली. पुन्हा  एकदा  कांदा भाकर  नैवेद्य म्हणून अत्यंत आदराने अर्पण केले आणि नमस्कार केला .   असे  साधेसे तरी भावपूर्ण  पूजन झाल्यावर  काही वेळ आनंदाने  भजन केले.  इतके करून ही महाराज जागचे हलले  नाही.  शेवटी रात्री गावाकडे परत गेले आणि  या साधूची सर्व हकीकत गावक -यांना सांगितली .  दुस-याच दिवशी सर्व गावका-यांनी ध्यानस्त  मूर्तीला  पालखीतून वाजंत्र्याच्या गजरात तुळशी, फुले , गुलाल उधळत भजन करीत गावात नेले. दुस-या दिवशी महाराजांनी ध्यान  सोडले . गावकरी, गुराखी सर्व आनंदित  झाले.   आणि अधिक प्रेमभावाने आणि भक्तीने महाराजांचे  पूजन केले.  रानावनातून गाई गुरांना चरायला घेऊन जाणा-या गुराखी मुलांनी   मंदिरात ध्यानस्त बसलेल्या त्या  सद्गुरू मूर्तीला  योगीजनांचा मुकुटमणी  आणि प्रत्यक्ष देवच आहे हे अचूक जाणले यात  त्या मुलांची चतुराई,  जाणती समज आणि धार्मिक वृत्ती दिसते. 
असे  हे  शहाणपण तेथील  सर्वच  मुलांना होते असे नाही . शेगावच्या पाटलांच्या मुलांना जुमेदारी सत्तेचा उन्मत्तपणा चढला होता.  श्रीमंतीमुळे गर्वाभिमानाचे सावट शहाणपणावर  चढले होते .  स्वत:ला गावाचे राजे समजणा-यांना श्री गजाननाचे  महाराजत्व   दिसत नव्हते. महाराजांना ती मुले  गण्या,गजा  अश्या एकेरी नावाने बोलावित.   हेटाळणी  करून   उर्मटपणे अद्वा तद्वा  बोलीत.  पाटलाची सशक्त  मुले श्री गजानन महाराजांना त्रास देत.  एकदा   श्री गजानन महाराज  मारुती मंदिरात  बसले  असताना कडताजी पाटलाचा  मुलगा-  हरी तिथे आला आणि  महाराजांना  कुस्ती खेळण्यासाठी बोलावले.  "नुसते 'गण गण गणात बोते' काय म्हणत  बसतोस.  तुझे  गावात फार प्रस्थ माजले आहे. चल तालमीत जाऊ. तू  योग योगेश्वर असशील तर त्याचे प्रत्यंतर तिथे तरी  दाखव" असे कुत्सितपणे  म्हणाला .  महाराजांना चीत करायाची हरीला खात्री  वाटत होती. पण महाराजांनी तो निव्वळ भ्रम  ठरविला.    दांड पट्टे, कुस्ती  यात पटाईत असणारा    सशक्त  मस्तवाल  हरी एका जागी बसलेल्या महाराजांना हलवू ही शकला नाही. किडकिडीत दिसणा-या  महाराजांच्या देहात  हत्ती  इतकी प्रचंड शक्ती आहे   हे  हरीला समजून चुकले. त्याने समर्थांचे श्रेष्ठत्व मान्य केले आणि  हरी पाटील  शक्तीचा  माज सोडून देऊन पुण्यपुरूषाचा भक्त बनला.

हरी पाटलाचे इतर भाऊ महाराजांचे  सामर्थ्य जाणत नव्हते. ह्या पाटलाच्या कुळावर संतांची  कृपा होती,  ते  परम भक्त  होते परंतु सत्ता , शक्ती, पैसा या मुळे  धुंदी आली होती. विनम्रता  लोप पावली होती हे  महाराज जाणत होते. म्हणूनच महाराज पाटलांच्या खोड्या हसण्यावारी नेऊन सहन करीत आणि त्याकडे  दुर्लक्ष करीत.  महाराजांनी त्यांना  आपले असे मानले. त्यांच्यावरही कृपेचा वरद हस्त ठेवला. खेळीमेळीत  राहून  त्या मुलांचे   सखा सोबती झाले, त्या मुलांवर   मातेसमान  माया केली, पित्यासारखे वागून  त्या मुलांना कठीण प्रसंगात  पंखाखाली घेतले. आणि कालांतराने ," त्वमेव सर्वं मम देवदेव," म्हणण्याइतकी ती सर्व पाटिल  मंडळी  श्री गजानन  महाराजांचे  परम भक्त झाले. 

(हा लेख मुंबईतील माहिम येथिल श्री गजानन महाराज मंदिराच्या ‘श्री गजानन आशिष दिवाळी अंक २०१४‘ अंकात प्राकाशित झाला आहे.)
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा