उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२४ मे, २०१५

` हरिहर गुरुवर, नाही चिलमी बहाद्दर!`

चिलीम द्यावी भरुन तंबाखूची मजकारण विस्तव वरी ठेवोनिया 
सकाळपून ऐसाच बसलों  चिलीम मुळीं नाहीं प्यालों त्यामुळें हैराण झालों भरा चिलीम मुलांनो।।
गांजा तमाखू पीत बसतो।
चिलीमीवरी प्रेम भारी। ती लागे वरच्या वरी।
कां कीं या गांजावर।  समर्थांचे प्रेम फार 
मर्जी असल्या गांजा आणा 
ह्या  संतकवी श्री दासगणू  महाराज यांनी  श्री गजानन विजय ग्रंथात लिहिलेल्या  श्री गजानन महाराजांच्या चिलीमीबद्दलच्या ओव्या!
      हे वाचल्यावर किंवा श्री  गजानन महाराजांचे  छायाचित्र पाहून  काही अतिहुशार लोकं  जरूर विचारतात की हे तुमचे महाराज म्हणे देवाधिदेव , सत् गुरू, साक्षात परब्रम्ह ! मग असे गांजा, चिलीम ओढणारे कसे ?  आम्ही ही चरस, गांजा ओढला तर काय बिघडले?
          
हे असे प्रश्न  पडतात  ते केवळ देहबुद्धी (देह  म्हणजेच मी ही  गैर समजूत)पहात असलेल्या अज्ञानी  लोकांना. त्यांना  केवळ वरवरचे दिसते. स्वत: महाराजांना देहबुदधी नव्हती.   केवळ देहाने अन्न भक्षिले म्हणून त्या  देहाला पाणी  पाहिजे   हा  व्यवहार  आहे असे श्री गजानन महाराज स्वत: म्हणत.  त्यांचे  शरीर मानवी होते म्हणून  खाणे, पिणे, निजणे हे शरीर धर्म चालत असत.  त्यात सर्व सामान्य नियम असा नव्हता.  ते कधी  सतत खात बसत , तर कधी उपाशी रहात.  कधी अनेक  दिवस हालचाल ही करता निचेष्ठित पडून रहात  तर कधी मनाला वाटेल त्या जागी भटकत रहात.  हे  असे  सामान्य माणसाचे  वागणे नव्हेच.  त्यांची ती असामान्यता  अभ्यासून, पारखून  पहावी आणि मगच त्यांच्या बद्दल कुचेष्टेने बोलावे.
      
वरील ओव्यांवरून श्री गजानन  महाराजांना चिलीम  आवडत असेल, वरचे वर ओढायला लागत असेल असे निश्चित होते. पण ती  त्यांच्या मानवी देहाला.   त्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या  मानवी देहाशी तुलना करायची असेल तर जरूर करा. अगदी चिलीम, गांजा ही  ही ओढा. परंतू  त्याच देहात जी  वेद वेद्येची जाण  होती, विविध रागातून  गाऊन दाखावण्यासारखी   गायन कला होती, योग बलाचे सामर्थ्य होते, कुणाचेही भूत ,भविष्य, वर्तमान काळाचे ज्ञान होते ते  तुमच्या शरीरात हे  सर्व आहे का ते तपासून पहा. नसेल तर तसे सामर्थ्य आणायचा प्रयत्न तरी करा .  श्री गजानन महाराजांप्रमाणे निसर्गावर प्रभुत्व मिळवून कोसळणा-या पर्ज्यन्याला  थांबवायची किमया   करता येईल का तुम्हाला ? द्वाड   प्राण्यांना  कायमचे काबूत आणून  त्यांना सगुणी बनवू शकाल?  यावर तुमचे उत्तर `नाही`  असेल यात  शंका  नाही. त्या चिलीमीचे   उदाहरण देऊन संत शिरोमणी श्री गजानन  महाराजांची  चेष्टा , कुचेष्टा करून  नका .  त्यांच्याशी तुलना करायची आपली  पात्रता आधी पडताळून पहा.
       एका गोसाव्याने  त्याची आठवण नित्य रहावी म्हणून बुटी स्वीकारा अशी नम्र   विनंती  केली.   जसे आई आपल्या लहान  बाळाचे  वेडेवांकुडे हट्ट  पुरवते तसेच  महाराजांनी महाधूर्त अश्या गोसाव्याची विनंती मान्य केली. तेव्हा पासून महाराजांना गांजा अर्पण करण्याची गावात प्रथा पडली.  श्री गजानन महाराजांना चिलीम प्रिय असली तरी त्याविषयी आसक्ती, आकर्षण, व्यसन  असे नव्हते.
 
श्री दासगणू महाराज म्हणतात ," परी व्यसनाधीनता नच आली समर्थांतें पद्मपत्राचियेपरी ते अलिप्त होते निर्धारी।
कमळ आणि त्याचे पान  चिखलात राहूनही त्यांना  चिखल लागत नाही. तसेच   श्री महाराज अश्या पापी, ढोंगी, स्वार्थी, दुर्जनांमधे राहूनही  वाईट प्रवृत्तीने  कधीच बरबटले नाहीत.  म्हणूनच त्यांची सर कुणालाच येऊ शकत नाही. ते खरोखरीच  थोर संत होते.
पोकळ चिलीम मानवी देह किंवा शरीरासारखी आहे.   त्यात भरलेले काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर हे त्या गांजा, तंबाखू सारखे क्षणभर सैलावून विसावा दिल्याचे भासवणारे आहेत.  आणि कालांतराने त्यांच्या अधीन करणारे, त्यांचे सेवक  बनवून स्वत:ची  मनमानी करून  जीवनाला  अधोगतीकडे नेणारे नाश कारकही आहेत.  त्यां षडविकारांंना काबूत आणायचे काम सोपे नाही.  त्यांच्या समोर  उपासानेची, भक्तीची ज्योत पेटवा.  ते दुर्गुण जाळून टाका. तल्लफ पुन्हा पुन्हा येऊ  द्या,  त्या उपासनेची, भक्ती करण्याची!  नशा  चढू द्या  पण  त्या षडरीपूंना  जाळण्याची!   त्या दुर्गुंणांची  राख करून टाका म्हणजे ती देह रूपी चिलीम रिकामी होईल.   त्या देह रूपी चिलीमीची  आसक्ती , लोभ  राहणारच नाही.   देहबुद्धी जळून जाईल  आणि  त्या देहाशी लगटलेले इतर विकार, अविचारही  ही जळून जातील. सरते शेवटी हा पंचमहाभूतांपासून बनलेला देहही चिलिमीप्रमाणेच  जळून जाईल आणि  राहील ती  मुठभर माती, त्या पंचमहाभूतां मध्ये  पुन्हा  विलीन होण्यासाठी!
कुणाला  श्री गजानन महाराज वेडा पिसा, मैंद, चांडाळ, नागवा जोगी,भोंदू साधू वाटत असतील तर तो  त्यांच्या अज्ञानातून किंवा क्षुल्लक  ज्ञानातून  उठलेला  अहंकार आहे. त्यांचे संपूर्ण चरीत्र  माहित करून घेण्याआधी तुटपुंज्या ज्ञानावर उगाचच दूषण  देणा-या दुरात्मा, दूराभिमान्याला  काय म्हणावे? डोळ्यांनी पहात असलेले दृश्य सत्यच मानले पाहिजे. पण त्या क्रीयेमागाचे कार्यकारण भाव समजून घेतले पाहिले.
  श्री  गजानन महाराज म्हणतात,"  "जो माझा असेल | त्याचेच काम होईल | इतरांची ना जरूर मला ||." आपले  द्वैतातील  मागणे   असो  किंवा  अद्वैतातील मोक्षप्राप्तीची ओढ  असो.  आपल्या कुठल्याही  मनोकामना पूर्ण करण्याची ग्वाही   "श्रीगजाननस्वामी चरित्र जो नियमें वाचील सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजाननकृपेनें  |"  या श्री गजानन  ग्रंथातील  ओव्या  आपल्याला   देतात.
 आपल्या सर्वांना माहीतच आहे " जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. "   मीठ आणि साखरेतील फरक नुसते पाहून समजणार नाही तर दोन्ही चाखून पाहावी लगतात. केवळ अनुभवातून चव कळेल.तसेच संत शिरोमणी श्री गजानन  दिव्यत्वाचा अनुभव येण्यासाठी वारांगना अभक्ति  टाकून त्यांच्या निष्ठा ठेवून सेवा , उपासना,   भक्ती करणे आवश्यक आहे.  श्री गजानन महाराजांच्या  चरित्राचे नियमित  वाचन करावे , त्यातील  उपदेश  गजाननपदीं निष्ठा  ठेवून आचरणात आणावेत .   तर्क ,वितर्क , कुतार्काला जरा ही  थारा देता  सुखाचा अनुभव सदा सर्वदा घ्यावा. कारण
या गजाननरुप जमिनींत जें जें कांहीं पेराल सत्य तें तें मिळणार आहे परत बहुत होऊन तुम्हांला॥
जय गजानन


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा