उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२ एप्रिल, २००५

बीजिंगमधे आम्ही मराठीपण जपतो.

गेल्या अडीच वर्षापूर्वी आम्ही बिजिंग या चीनच्या राजधानी शहरात आलो.

आम्ही आल्यानंतर ओळखी वाढल्या. त्यावेळी बिजिंगमधे मराठी माणसे एका हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच होती. असतील नसतील तवढी हूडकून काढून त्यांच्याकडे येणे जाणे वाढले.हळू हळू मैत्री झाली. त्याचे कारण म्हणजे मराठी भाषा. आपल्या भाषेत बोलण्याचा किती आनंद असतो, हे दुस-याशी सतत फिरंगी भाषेत बओअल्ल्यावरच कळले. मराठी बोलताना शब्द आपुलकीने ओठातून बाहेर पडतात. अगदी न अडखळता. सहजरित्या!
परंतु आता विशेषतः ऑगस्ट २००४ पासून भारतातून बिजिंगमधे येणा-या मराठी माणसांचे प्रमाण निश्चितच वाढलेले आहे. पुणे, मुंबईकडचे लोक तर आहेतच, शिवाय वाई, सातारा, कोल्हापूर, येथील कुटुंबे कामानिमित्त येथे आली आहेत. त्यात इंजिनिअर, प्रोग्रॅमर, तसेच योगविद्देचे धडे देणारे शिक्षकही आहेत. भारताच्या दूतावासात काम करणारे चिनी भाषा शिकणारे काही लोक आहेत. डोंबिवली येठून ऍक्युपंक्चरची अधिक माहिती मिळवण्यासाठी व सराव करण्यासाठी काही मराठी डॉक्टर मंडळी येऊन राहून गेली.
आम्ही मराठी मंडळी आमचे मराठी जपण्यासाठी परोपरीने प्रयत्न करतो. आमच्या सर्वांकडे मराठी मार्गदर्शिका आहेत. भारतातल्या बातम्या मराठीत इ-सकाळमधे वाचायला मिळतात म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो. घरात मराठीत संभाषण होते. आमच्या घराच्या दारावर तोरण आहे. उंबरठ्यावर अगदी पांढरी रांगोळी वापरून केलेली नसली तरी तैलरंगाची रंगीत नक्षी आहे. घरात विघ्नहर्त्या गणेशाची प्रतिमा आहे. त्याचे रोज नित्यनेमाने पूजन होते. संध्याकाळी दिवा, उदबत्ती लावून शुभंकरोती आणि आरती होते. अधे मधे पोथी पारायण होते. गणपती साजरा केला जातो. माझी मैत्रीण मार्गशिर्षातले गुरवारचे उपास करते व सवाष्णींना जेवायला बोलावते. पुरणपोळीचा नैवेद्द करते. आमचे काका तर पहाटे पाचला उठून गूरूचरित्राचे पारायण करतात. काकू संकष्टीला उकडीचे मोदक करतात व सर्वांना प्रमाने खाऊ घालतात. त्याच्याकडे तुळशीचे रोपटेही आहे. सांगायचे यासाठी की बिजिंगमधे काही वस्तू सहज मिळत नाही. उदाहरणार्थः तूरडाळ, चणाडाळ, बेसन, उडीदडाळ, बेसन, मोहरी, रवा, कणिक, नारळ, सुपारी, विडयाची पाने वगैरे. मिळालाच तर एक नारळ ६० रूपयांना मिळतो.
अस असूनही दिवाळीला फराळाची लयलूट होते. कुणी काजू कतली करतं. तर कुणी शंकरपाळे. भारतात बाजारातून विकत आणण्याचा प्रघात वाढल्यामुळे मला तिथे घरी केलेली काजूकतली खाल्लेली आठवतच नाही. इथे बाजारात साधा गूळ मिळत नाही तर भारतीय बर्फी, मिठाई कुठून मिळणार?
इथे पोहे, उपमा, धिरडी हे पदार्थ कधीमधीच होतात. कुणाला चहाला बोलावले तर भाजणीच थालीपिठ, त्यावर दही, लोणी म्हणजे मेजवानीच वाटते. आमचे एक स्नेही नुकतेच मुंबईला जाऊन आले. येताना त्यांनी त्यांच्या सासुबाईंनी केलेली गुळपोळी, सांजो-या आणल्या होत्या. खरतर ते स्नेही हे पदार्थ बरेच दिवस एकटेच खाऊ शकले असते. पण तसे न करता त्यांनी आम्हाला घरी बोलावून प्रेमाने गूळपोळी खायला घालून मकरसंक्रांत साजरी केली.
मराठी भाषा बोलणारी कुटुंबे एकमे़कांशी जास्त संबंध राखून आहेत. भेटीगाठीही ब-याच प्रमाणात होतात. सर्वजण भेटल्यावर मराठीतच बोलतो. मराठी नाटकांच्या, सिनेमांच्या, गाण्यांच्या सीडीज्‌, डीव्हीडीज्‌ एकमेकांना देतो.
अशाच प्रकारे मराठी माणसांचा लोंढा बिजिंगमधे येत राहिला तर लवकरच बँकॉक, अमेरिका, इंग्लंड इथे जशी मराठी मंडळे सुरू झाली आहेत तशी बिजिंगमधेही लवकरच सुरू होतील असे वाटते.


(हा लेख ‘ई- सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
  (छायाचित्रे जालावरून साभार.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा