एखाद्या देशातील अमुक एका शहरात ऑलिंपिक खेळ आयोजित करण्यासाठी ते ठिकाण काही नियमांनुसार पात्र ठरावे लागते. चीनमधील बीजिंग 北京ऑलिंपिकसाठी पात्र ठरले. आगामी 2008 च्या ऑलिंपिकची तयारी तेथे सुरु झाली असल्याने संवादांच्या माध्यमापासून उद्योग-व्यवसाय, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, वाहतुक या सगळ्याच क्षेत्रात बीजिंग झपाट्याने प्रगती करु लागले आहे. ऑलिंपिकच्या निमित्ताने बदलत चाललेल्या बीजिंगविषयी...
आपणाला माहीत आहे का, की 2008 या वर्षी ऑलिंपिक खेळाच्या स्पर्धा चीनची राजधानी बीजिंग येथे होणार आहेत? चीनमधील बीजिंगची निवड होणे ही अशक्य गोष्ट नसली तरी आश्चर्यकारक निश्चितच आहे. या 2008 च्या ऑलिंपिकसाठी बीजिंग झपाट्याने बदलते आहे. मंत्री, वरिष्ठ अधिकारी मंडळी यांनी एकत्रित बसून सर्वांगाने विचारविनिमय केले. काही योजना ठरविल्या आणि सुरू केली त्यांची अंमलबजावणी. या योजनांना फाटे फुटत नाहीत की कोर्टाच्या स्टे ऑर्डर्सही आड येत नाहीत. एकदा का निर्णय घेतला की, सर्वांसाठी सर्वजण त्या योजना अमलात आणण्याचा सतत प्रयत्न करतात. त्यामुळे सामाजिक, आथिर्क, राजकीय स्तरांवर झपाझप बदल होतात.जगभर मान्य असलेल्या इंग्रजीचा वापर बीजिंगमध्ये तसा कमीच; परंतु आता नवीन पिढीने इंग्रजी भाषा आत्मसात करण्याचा जणू ध्यासच घेतला आहे. ठिकठिकाणी चिनी चित्रलिपीबरोबरच इंग्रजी भाषेतील नावाच्या पाट्या झळकू लागल्या आहेत. ब-याचश्या -शॉपिंग मॉल्समधील विक्रेत्यांना परदेशी गि-हाईकांना तोंड द्यावे लागणार आहे. म्हणून या विक्रेत्यांना इंग्रजी भाषेचे 'फॉर्मल' शिक्षण न देता लाऊड स्पीकर्सवरून खरेदी-विक्री संबंधीची वाक्ये इंग्रजी भाषेत ऐकवली जाऊ लागली आहेत. सतत त्याच-त्याच प्रकारची वाक्ये ऐकून इंग्रजी लिहिता-वाचता आले नाही, तरी संभाषण करणे नक्कीच सोपे जाईल. सार्वजनिक बसेसमध्येही इंग्रजी सूचना, स्टॉप्सची नावे ऐकू येऊ लागली आहेत.
टॅक्सी चालकांना विविध ठिकाणांची इंग्रजी नावे व इंग्रजीचे ज्ञान आवश्यक केले आहे. उदा. बीजिंगमधील एका ठिकाणाचे इंग्रजी नाव लुफ्तान्सा सेन्टर आहे, त्याला चिनी भाषेत 'यांशा' संबोधतात. सध्या तरी सर्व टॅक्सी चालकांना'यांशा'च समजते. पण 2006 च्या शेवटपर्यंत त्यांना लुफ्तान्सा सेन्टर हे इंग्रजी नाव माहीत असणे सक्तीचे होईल.ऑलिंपिकच्या स्वागताची दुसरी तयारी म्हणजे वाहतूक. जलद प्रवास, मग तो माणसांचा असो की मालाचा, श्रम, पैसा, वेळ सर्वच वाचवतो. बीजिंगमध्ये अनेक भुयारी ट्रेन ज्याला तिथे सबवे म्हणतात, अशा मार्गांच्या बांधणीची कामे पूर्ण करण्यात येत आहेत. त्याबरोबरच ठिकठिकाणी सबवे स्टेशनांची व्यवस्था, त्यासाठी लागणारी रस्त्यांची अदलाबदल, मार्गात अडथळा आणणा-या इमारती जमीनदोस्त करणे, आवश्यक तिथे नवीन इमारती बांधणे इत्यादी कामेही सुरू आहेत. सध्या असणा-या सबवेची वाढ आणि नूतनीकरण करणे आणि नवीन सबवे लाइन्सची बांधणी यात विजेचा वापर करताना सुरक्षिततेचे पूर्ण भान ठेवले जाते. सुसज्ज विमानतळापासून थेट शहरातील केंदस्थाना- पर्यंतच्या सबवे लाइन्सची आखणी करून बांधणी तर कधीच सुरू झाली आहे. जुन्या छोट्या कमी दर्जाच्या टॅक्सींच्या परवान्यांचे नूतनीकरण बंद करण्यात आले आहे. नवीन मोठ्या टॅक्सीज् रस्त्यांवर दिमाखात फिरताना दिसू लागल्या आहेत. सध्या बीजिंगला आवश्यकता आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक ज्ञानाची. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून अनेक परदेशी लोक कामानिमित्त बीजिंग येथे राहायला आले आहेत. दिवसेंदिवस परदेशी लोकांची संख्या वाढत आहे व निदान ऑलिंपिक्स पार पडेपर्यंत ती वाढतच राहील, अशी लक्षणे आहेत. या ज्ञान-तंत्रज्ञान देणाऱ्या परदेशी पाहुण्यांना राहण्यासाठी सर्व सुखसोयींनी युक्त अशा सुंदर, सुरक्षित इमारती पाहता पाहता तयार झाल्या आहेत.
आलिशान घरांबरोबरच छोट्या परदेशी पाहुण्यांसाठी आंतरराष्ट्रीय शाळांची संख्या तर इतकी वाढली आहे की त्यांच्यात स्पर्धाच लागली आहे. वर्गातील कंप्युटर्स, टीव्ही सेटस्, सीडी प्लेअर्स या आणि अशा आधुनिक साधनांची रेलचेल सुरू आहे. श्रीमंत शाळाबरोबरच स्थानिक चीनी शाळा तेथिल सोयी, शिक्षण पध्दती यात ही हितावह बदल दिसून येत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय सोय. परदेशी खेळाडू आणि पाहुण्यांसाठी चीनच्या या राजधानीत बांधली जात आहेत तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत हॉस्पिटल्स. जास्त पैसे मोजावे लागत असले तरी डॉक्टर्सची तात्काळत वाट पहाणे, केसपेपर्स तयार करण्यासाठी लागणारा विलंब नसतो. रक्त तपासणी, एक्स-रे यासारखे रिपोर्टस अगदी पाचव्या मिनिटात तुमच्या हातात. चिनी आणि ऍलोपथी औषधांप्रमाणेच इतर देशांमधून आयात होणा-या आयुवेर्दासारख्या उपचारपद्धतींच्या औषधांची दुकाने वाढली आहेत. चिनी डॉक्टर्स, नसेर्स इंग्रजीत संभाषण करण्यात तयार होत आहेत.

अनेक देशांची नानाविध रेस्टाँटस तर इतकी वाढताहेत की, त्यांच्या खास पाककृतींमुळे कुणाचीही जीभ लाडावून जाईल.जगातल्या प्रत्येक देशातील रेस्टाँट इथे थाटली जात आहेत. रेस्टॉरंटस मधील खाद्य पदार्थ दिसायला आकर्षक आणि चवीला रूचाकर असतातच पण तिथले वातावरण, सुशिभिकरण, सेवा हे ही अत्यंत आधुनिक होत आहे. त्यातील अँबिअन्स तर पाहून थक्क व्हायची पाळी येते.रेस्टॉरंटसचे मालक अधिकाधिक खर्च करून आपले रेस्टॉरंटस उत्तमोत्तम करीत आहेत. लोकांना आकर्षित करण्यासाठी त्या खर्चाची जाहिरात ही करताना दिसतात. तेथिल विविध पाककृती चाखायला आमंत्रित करणा-या जाहिराती ही तितक्याच आकर्षक असतात. विविधतेने परिपूर्ण असूनही चिनी थाट कायम राखून ठेवणा-या खाद्यस्थानांची चढाओढ सूरू झाली आहे.काही ठिकाण तर फक्त पोटपूजा करण्यासाठी राखिव करण्यात येत आहेत.
स्त्रियांनी चिनी झगे केव्हाच झुगारून दिले आहेत. अगदी वृद्ध महिलाही पँट-शर्ट/टॉप्स या सुटसुटीत कपड्यांत वावरू लागल्या आहेत. घराचे उंबरठे ओलांडून अर्थाजनाकरिता बाहेर पडलेल्या या स्त्रियांनी सरकारचे एक अपत्य धोरण फार सक्तीचे न वाटून घेता अगदी आनंदाने अवलंबिले आहे. मोहजांग, बुद्धिपट यांसारख्या पारंपरिक खेळांपेक्षा पाश्चिमात्य गोल्फ, सॉकर, स्केटिंग, स्केटबोर्डिंग, स्किईंग या खेळांचे फॅड पसरत चालले आहे.
'अगदी काल-परवा असलेले बीजिंग ते हेच का?' असे म्हणण्याची पाळी या बदलांमुळे येते. बदल ही काळाची गरज; पण या काळाला मागे टाकून झपाट्याने बदलणारे बीजिंग म्हणजे जादूची किमयाच जणू
(हा लेख ‘महाराष्ट्र टाईम्स‘ वृतपत्रात प्रकाशित झाला आहे.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा