उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१४ डिसेंबर, २००५

आमचे शेजारी-सुधिर जोशी

कालच एका मोठ्या कलाकाराचे -श्री. सुधिर जोशी यांचे निधन झाले.
ही बातमी कळली तेव्हा माझ्या मनात आलेले हे विचार---

सुधिर जोशी असतील एक कलाकार, नट म्हणून तुमच्यासाठी.
आम्ही पाहिलंय त्यांना एक सहनिवासी म्हणून..
इमारतीच्या मिटींग्जमधे सहसा हजर न राहून सुध्दा आपल्या सूचना, आपली मते पत्रकावर परकढपणे मांडणारे सुधिर जोशी आमचे शेजारी.
त्यांच्यामुळेच आमच्या सोसायटीला अनेक मान्यवर कलाकार मंडळींचे पाय लागले आणि आम्हाला सुप्रसिध्द लोकांचे सहजतेने दर्शन झाले.
सकाळी शिवाजी पार्कला फेरी मारून येता जाता `हॅलो` करून गालातल्या गालात हसणारे सुधिर जोशी दिसले की त्यांच्या भूमिकांची एक फिल्मच डिळ्यासमोरून झरकन निघून जायची. आणि आमच्याही ओठावर हसू फुलायचे.
माझ्या मॉडर्न हेअर स्टाईलला ब्राम्हणी स्टाईल मधे "बरं आहे!" असे न म्हणत दिलखूलासपणे "मस्त दिसतो आहे हेअर कट" असे सोनाली बरोबरच दाद देणारे सुधिर जोशी `एवढे मोठे नट ते हेच का?` असं वाटत असे.
आमच्या सासुबाईंना तर सुधीर म्हणजे अर्ध्या चड्डीतला शाळकरी पोरगाच आठवतो. तेव्हाच्या त्याच्या शाळेतल्या नाटकाबद्दल त्या अजूनही आठवणी सांगतात. पूर्वी सोसायटीच्या गेट-टूगेदरला बसवलेल्या नाटकाच्या मार्गदर्शनाबद्दलही त्या नेहमी उल्लेख करतात.
जूनी इमारत पाडून नवी व्हायच्या आधी समोरच्या जुन्या इमारतीमधल्या त्यांच्या घराच्या बाल्कनीतून खाली पाहिले की आमची स्वयंपाकघराची खिडकी दिसे. आमच्या खिडकीवर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी लावलेल्या तिरकस पत्र्यामुळे आम्हा मोठ्यांना वरच्या मजल्यावर उभे असलेले सुधीर, सोनाली जोशी दिसत नसत.पण तेव्हा अगदी लहान असलेल्या माझ्या मुलाला वर पाहिले की ते आरामात दिसत.
माझा मुलगा, सुधिर -सोनाली जोडप आणि आमच्या वरच्या ब्लॉक मधे म्हणजे सुधिर -सोनाली च्या बाल्कनीसमोर राहणारी एक मुलगी यांचे छान त्रिकूट जमत असे. बहुदा रविवारी यांच्या आपापल्या घरातून एकमेकांशी गप्पा चालत. गप्पांचे विषय म्हणजे झोप झाली का?, काय स्वप्न बघितलीस? आज काय खाऊ केलाय?तू खाऊ खाल्लास का? शाळेत गेला होतास का?वगैरे.
कधी मधी सोसायटीच्या बाळ गोपाळ त्यांच्या घरी जमत.हातावर ठेवलेल्या बिस्किट्, गोळ्यांपेक्षा सुधिर काकाने सांगितलेल्या गोष्टी मुलांच्या लक्षात अधिक राहत असत. माझ्या मुलाने अंड्याचे आम्लेट पहिल्यांदा खाल्ले ते सुधिर काका कडेच.
शाळेने देणगी गोळाकरून आणायला सांगितली की हमखास १०० रुपये मिळायचे सुधिर काकाकडून.
नाटकात, सिनेमात, टि.ही.वर सहजतेने वावरणारा सुधिर जोशी पाहिला की म्हणजे मुलांना मजाच वाटायची. टि.व्ही वर पाहिलेला तो खोटा आणि आपला तो खरा असं मुलांचा साधसुध समिकरण!
वरच्या खिडकीत उभे राहून चहा घेताना खाली अंगणात मुलांना हाका मारून `धाव ,पळ, पळ` असे प्रोत्साहन देताना तर कधी खाली अंगणात लपाछापी खेळताना लपून बरलेल्या मुलांचा ठावठिकाणी हातवारे करून गुपचूप सांगणारा सुधिर काका म्हणजे मुलांचा मित्रच.
आपल्या कामात व्यग्र असूनही अंगणात मुलांबरोबर क्रिकेट खेळायला सुधिर काका आला की मुलांची मजाच.
आधीच सुरू झालेल्या खेळात घूसून फक्त बॅटींग करणारा, उगाचच आरड ओरडा करून धाऊन रन्स काढणारा, आणि बॉल जोरात मारून लांब उडवून देणारा सुधिरकाका मुलांना चालत ही असे.
मग खेळ बंद पडला तरी मुलांची रागवा रूसवी नसायची. शिवाय सुधिर काका मात्र राहायचा नॉट ऑट!
तेव्हा सततच नाबाद राहिलेला हा गडी, एकदम क्लिन बोल्ड होऊन गेम सोडून कसा काय गेला ?

(हा लेख ‘ई- सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा