उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२१ जानेवारी, २००६

चीनी बौध्द मंदिरे

भारतातून उगम पाऊन मुख्यत्वे उत्तर दिशेने प्रसार होत होत बौध्द धर्म चीन मधे येऊन पोचला. यामुळे चीनच्या उत्तरे पेक्षा दक्षिणेकडे बौध्द धर्मिय लोक जास्त आढळतात. दक्षिण चीनमधील बौध्द मंदिरे आणि आराधना बरीचशी भारतीय प्रकारची आहे. पण उत्तरेकडील बौध्द मंदिरात भारतीय छटा पहायला मिळाली तरीही त्यात बरीचशी भिन्नता दिसली.
चीन मधील चीनीमातीच्या कौलांचे उतरते छप्पर असलेली मंदिरे अत्यंत स्वच्छ, नेटेकी असतात. देवालयाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला आपल्याकडे जसे जय-विजय असतात तसेच इथेही रक्षकांच्या मूर्ती अथवा फोटो असतात. बहुतेक ठिकाणी तिकिटे विकत घेऊन मंदिरात प्रवेश मिळतो.
मुख्य मंदिराच्या बाहेर आवारात लाकडाच्या कमानीला मोठी धातूची घंटा असते. वाजवायला जड आणि कठिण असलेल्या या घंटेवर चीनी भाषेत धार्मिक प्रवचन किंवा शिकवण असे खूप काही लिहिलेले असते.
आवारात एखाद दुकान असते. त्यात बुध्दाचे फोटो, लॉकेट्स, बौध्द धर्माची पुस्तके, कॅसेट, व्हिडिओ-ऑडिओ सीडीज्, जपमाळा, कमळाची कृत्रिम फुले, इलेक्ट्रीकचे आकर्षक दिवे विक्रीसाठी ठेवलेले असतात. विक्रेते माल खपवण्यासाठी आरडा ओरड करत नाहीत. बोलावत मागे लागत नाही. मंदिराच्या बागेची निगराणी केली जाते. झाडांच्या भोवताली गोल चौथरे बांधलेले असतात. मुख्य म्हणजे जवळपास एकही भिकारी पहायला मिळत नाही.
मंदिरात शांत स्वरात नामस्मरणाची कॅसेट लावलेली असते. भटजींची घाई, लगबग ही दिसत नाही. केसांचे मुंडण केलेले लाल भगव्या वेशातील बौध्द साधू किंवा प्रसारक जरूर पहायला मिळतात. पण ते आपापल्या कामात, नामस्मरणात व्यग्र असतात. अभिषेक करायचा आहे का? पूजा कधी करणार वगैरे विचारणा करत बसत नाहीत. भक्तांवर `पुढे चला`, ` व्हा पुढे ` असे त्यांना ओरडावेही लागत नाही. चीनमध्ये धार्मिक लोक कमीच. त्यामुळे मंदिरात लांबच्या लांब रांगा दिसत नाहीत. दर्शनासाठी ढकलाढकली नसते. सर्व व्यवहार शांतपणे चालतात. काही मंदिरातून संपूर्ण शाकाहारी प्रसाद मिळतो. पण तो विकत घ्यावा लागतो.
प्रमुख देवालय व आजूबाजूला रांगेत प्रसारक किंवा देवाचे प्रतिनिधी यांची देवालये असतात. भारतात जशी गणपतीची रूपे असलेली अनेक मंदिरे आहेत तशी इथेही बुध्दाची अनेक रूपे असलेली मंदिरे आहेत.
लांब कान, अर्धवट बंद असलेले लांबट व मोठे डोळे आणि ओठांवर स्मित हास्य असलेली व हातांची ठराविक मुद्रा असलेली बुध्दाची तेजस्वी प्रतिमा नेहमीच मनोवेधक दिसते. कधी प्रवचन देणारा तर कधी आशिर्वादाचा हात उचललेला बुध्द. काही ठिकाणी पहुडलेली तर कुठे ध्यानस्त मूर्ती. बसलेली तर कधी उभी मूर्ती. कुठे मातीची तर कुठे धातूची. अनेकविध शांत मुद्रेच्या मूर्ती. एका ठिकाणी उंच डोंगरावर शंभर हात असलेली विष्णूसारखी भासणारी मोठ्ठी मूर्ती पहायला मिळाली. बुध्दाप्रमाणेच त्यांच्या अनेक शिष्यांच्या ही मूर्त्या पाहायला मिळाल्या. त्यांचे उपदेश, मंत्र यांचे ही दाखले भिंतीवर आढळले. त्यांचे वाचन, आचरण चीनी भक्तगण अतिशय भक्तीने करताना दिसतात.
चप्पल बूट घालून मंदिरातील गाभा-यात प्रवेश करता येतो. गाभारा मोठा व व्यवस्थित प्रकाशित असतो. उंचावर मोठ्या मूर्ती असतात. त्यावर भरजरी शाल वस्र पांघरतात. मूर्तीजवळ रंगीत कृत्रिम फुले, मेणबत्ती, इलेक्ट्रीकचे दिवे, नैवेद्यासाठी फळे, काढ्यासारखा दिसणारा चीनी  चहा  ठेवलेला असतो. पण ख-या फुलांचे हार, हळद-कूंकवाचा सडा, नारळ, फुटाणे, चिकट झालेले पेढे, बर्फीचा प्रसाद त्याजवळ रेंगाळणा-या माश्या मात्र दिसत नाहीत. पंचामृताने किंवा साध्या पाण्याने सुध्दा देवाच्या मूर्तीचे स्नान, पूजा होत नाही. मोठमोठ्याने आरत्या होत नाहीत.
मूर्तीसमोर खाली जमिनीवर चौरंगाच्या उंचीची लाकडी बैठक असते. त्यावर उशी ठेवतात. त्या उशीवर गुडघे ठेऊन हात जोडून तीन वेळा कमरेत वाकून नमस्कार करायचा असतो.
उदबत्ती ओवाळायची पध्दत भारतीयांपेक्षा वेगळी असते. दोन्ही बोटांच्या आंगठा, तर्जनी व मधले बोट यामधे तीन न पेटवलेल्या उदबत्त्या धरायच्या. डोक्याच्या वर न्यायच्या व पुन्हा कपाळापर्यंत आणायच्या. असे तीन वेळा करून झाल्यावर वाकून नमस्कार करायचा व त्या उदबत्या बाहेरील मोठ्या होमकुंडात टाकून द्यायच्या. यात अनेक इतर उदबत्त्या जळत असतातच. आपल्याही उदबत्त्या त्यात जळून जातात. येथील चीनी उदबत्त्यांना वास नसतो. जळताना धूर मात्र बराच होतो.चीनी उदबत्त्यांमधे विविधता दिसते. काही फारच जाड तर काही खूप लांब असतात.लाल रंगाच्या पारदर्शक वेष्टणातील या उदबत्या तीनच्या पटीत विकायला ठेवलेल्या दिसतात.
भारतातील काही उदबत्त्यांचे प्रकार इथे विकायला ठेवलेले असतात. चीनी लोक आवडीने त्या विकत घेतात आणि श्रध्देने बुध्दाला अर्पण करतात. परंतु कपाळाला विभूती /भस्म वगैरे लावण्याची प्रथा नाही.
भारतात जपमाळेला तर्जनी वापरत नाही. पण इथे मात्र तर्जनी व आंगठा यात माळेचा मणी धरून गोल फिरवतात व तोंडाने नाम घेत एक- एक माणी हळूच पुढे ढकलतात.
हिंदू धर्मातून उगम पावलेल्या बौध्द धर्माचा हा चीनी अवलंब पाहून कुतूहल तसेच आश्चर्य वाटले.


(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा