उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२१ जानेवारी, २००६

चीनी आभाळातला पतंग

पतंग उडवणे हा चीनी लोकांचा प्रिय खेळ. देवदेवता स्वर्गात राहतात व तो स्वर्ग उंच
आकाशात आहे अशी भारतीयांप्रमाणेच चीनी लोकांचीही भावना आहे. आपल्या प्रार्थना, इच्छा त्या देवापर्यंत पतंगाद्वारे पोचवता येतात असा चीनी लोकांचा समज आहे. म्हणूनच पूर्वी श्रध्दा म्हणून हा खेळ सूरू झाला. आता तो चीनमधे एक परंपरा म्हणूनही जपला जातो. पतंगांचे नानाविध प्रकार चीनमधे पहायला मिळतात.
गरुडच्या रंग-रूपाचा पंख पसरलेला पतंग आकाशात उडताना दिसला की खरोखरच गरूड आपल्या हातातल्या दोरीत अडकला आहे असे वाटते.
काळे वटवाघूळ, कधी रंगेबेरंगी पंख असलेले गरगर डोळे फिरवणारे फुलपाखरू पाहून मन हरखून जाते. तोंड उघडून मोठे दात व लांब जीभ दाखवणारा ड्रॅगनचा पतंग म्हणजे शक्तिचे प्रतिक. वा-यावर लांब शेपूटी हलवून हा ड्रॅगन गुड्लक आणतो असे चीनी लोक मानतात.
हॅलोविनसाठी काळ्याभूताचा तर ख्रिसमस मधे सँटाच्या आकाराचे पतंगही चीनमधे उडवतात.
पतंगाचा रंग, आकार, नक्षीकाम, नाविन्य यावर त्याची किंमत अवलंबून असते. रंग-रुपात भिन्नता असली तरी बांबू तासून बारीक केलेल्या काड्या व त्याला लावलेला मांजा याचे तंत्र भारताप्रमाणेच. काचांची किंवा दगडाची बारिक पूड चिकटवून धारदार केलेल्या मांजाच्या व पतंगाच्या चढाओढीला अर्थातच विशेष महत्व.
पतंगाच्या आकारमानानुसार बारीक किंवा जाड मांजाची निवड केली जाते. चीनमधली फिरकी मात्र भारतातल्या फिरकीपेक्षा वेगळी असते. चीनमधे सिनेमाचे रीळ गुंडाळातात तशी तबकडी फिरकी म्हणून वापरली जाते. त्याचे हँडल क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज फिरवले की मांजा सैल होतो किंवा गुंडाळला जातो. ही फिरकी वाटते तितकी सोपी नाही. वापरायचा उत्तम सराव नसेल तर मांजा त्या हँडललाच गुंडाळला जातो व न सोडवता येणारा गुंता होऊन बसतो.
भारतात पातळ कागदाचे किंवा फारतर झगझगीत व जरा जाडसर कागदाचे पतंग बनवले जातात. जे चटकन फाटतात. चीनमधे अश्या कागदाचे पतंग मिळतातच पण पातळ (छत्रीच्या) कापडापासून बनवलेले पतंगही मिळतात. त्यामुळे बारीक पावसातही थोडा काळ हा पतंग उडू शकतो व तो सुकल्यावर पुन्हा उडवता येतो.
दिवस दिवस उन्हातान्हात, इमारतींच्या गच्चीवर, झाडांच्या फांद्यांवर ऊंडारताना पतंग उडवणारी लहान शाळकरी पोरं भारतात पाहिली आहेत. पण चीनमधे डोक्यावर स्पोर्टस कॅप, डोळ्यावर गॉगल्स, हातात पतंग व मांजाची तबकडी घेतलेली वृध्द मंडळीही जवान झालेली पहायला मिळतात. कदाचित ते वृध्द पहात असतील उंच आकाशाकडे आशेने. मागत असतील तिथे राहणा-या देवाकडे अधिक आयुष्य अथवा पाठवत असतील निरोप पतंगाद्वारे की ," पुरे झालं आता. उचल या पतंगासारखे अलगद.!"

(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
  (छायाचित्रे जालावरून साभार.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा