चीनच्या बीजिंग या राजधानी शहरात भारतीय तसे कमीच. फार तर दीडशे-दोनशे कुटूंबे. त्यात महाराष्ट्रातून आलेले तुरळक आणि त्यातही मराठी म्हणजे नगण्यच! असतील वीस-पंचवीस जण. आम्ही त्यातलेच! संपूर्ण बीजिंगमध्ये गणेशोत्सव साजरा करणारे आम्हाला माहीत असल्याप्रमाणे फक्त आमचं एकमेव कुटुंब.
चीन भारताच्या पूर्वेला. सूर्य चीनमध्ये आधी उगवतो. सॉरी हं! चीन देश सूर्याच्या समोर भारताच्या आधी येतो. त्यामुळे चीनची वेळ भारताच्या अडीच तास आधीची आहे. म्हणजे भारतात सकाळचे सहा वाजलेले असतात तेव्हा चीनमध्ये सकाळचेच साडेआठ वाजलेले असतात. गणेश चतुर्थीला आम्ही कुटुंबीय (इनमीन तीन माणसं) सकाळी नेहमीपेक्षा आधी उठतो व जमेल तेवढ्या लवकर पूजा करतो, जेणेकरून निदान दीड दिवस म्हणजे २४+१२ = ३६ तास तरी तो सुखकर्ता आणि दुःखहर्ता आमच्या घरी राहावा. भारतापेक्षा आमच्या चीनच्या घरी गणेशपूजा खूप आधी होते. त्यामुळे गणपती बाप्पाला आमच्या घरी यायला तसं लवकर उठावं लागत असेल ना? भारताच्या वेळेवर झोप उघडली, तर तोपर्यंत आमच्याकडील पूजा आटोपलेली असणार. चीनमधल्या आमच्या घंटानादामुळे सकाळी-सकाळी झोपेचं खोबरं!
आता आमच्याकडं पाहुणे म्हणून यायचं तर ड्रेसअप तर व्हायला पाहिजेच. रेशमी पीतांबर, कंठी, माळा, हिरेजडित मुकुट, पायात नूपुरे या दागदागिन्यांबरोबर पोटाला बांधायला नाग हवा
आणि इथं यायला वाहन म्हणून उंदीरमामाही हवेत. आता मला सांगा, चीनसारख्या साप, उंदीर खाणा-या देशात त्यांनी यायचं म्हणजे जरा रिस्कच नाही का? इथं त्या मुक्या जनावरांच्या जिवाला निश्चितच धोका. ते बिचारे घाबरत दबकत आले असतील विघ्नविनाशकाबरोबर; पण पूजा आटोपल्या-आटोपल्या जीव मुठीत घेऊन धूम ठोकली असेल चीनमधून.

इथं लॅड झाल्यावर चिनी माणसांची बसकट, चपटी नाकं व स्वतःचं सोंडेचं लांबलचक नाक यांची तुलना करून त्या विश्वनिर्माता विष्णूच्या वैविध्य कारागिरीची वक्रतुंडाला साहजिकच कमाल वाटली असावी. या टोकाच्या भिन्नतेमागचं कारण काय असावं? असा प्रश्न गजवदनाच्या मनात डोकावला असेल, यात शंका नाही.
तसंच चिनी सडपातळ तरुण पिढीकडे पाहून तुंदील तनूच्या लंबोदराला फिगर कॉशियसनेस आला असेल. इथं `जितके हाडकुळे, तितके सुंदर' अशी सौंदर्याची व्याख्या आहे. त्यानुसार भारतात जाऊन हेल्थ क्लब/ जिमबरोबरच कडक डाएटिंग करण्याचा निश्चय त्या महाकायनं केला असेल, असं वाटतं.
चिन्यांचा "बावज' हा पदार्थ त्यांच्या रोजच्या जेवणातला. दिसताना दिसतो अगदी मोदक; पण तो गोड खोब-याचं गोड सारण भरलेला नसून भाज्या, मांस-मासे भरून उकडलेला तिखट-मिठाचा असतो. बाजारातल्या आकर्षक बावजांना मोदक म्हणून त्या गजाननानं तोंडात घातला असेल, तर मात्र संपूर्णपणे अपेक्षाभंग!
त्यापेक्षा मी घरी केलेले मोडलेले `मोडक' बरे म्हणायची वेळ त्यांच्यावर आली असेल.चिन्यांचा "बावज' हा पदार्थ त्यांच्या रोजच्या जेवणातला. दिसताना दिसतो अगदी मोदक; पण तो गोड खोब-याचं गोड सारण भरलेला नसून भाज्या, मांस-मासे भरून उकडलेला तिखट-मिठाचा असतो. बाजारातल्या आकर्षक बावजांना मोदक म्हणून त्या गजाननानं तोंडात घातला असेल, तर मात्र संपूर्णपणे अपेक्षाभंग!

शिवाय इथं काही खायचं ते चॉप्स्टिक्सनं. लहान-लहान चिनी मुलांनाही ही कला उत्तम अवगत असते. अगदी पोटभर खातात ते काड्यांनी! रोजच्या पंचपक्वान्नावर वीस बोटांनी ताव मारणा-या या चतुर्भुजाला त्या लाकडी बारीक काड्यांनी खाणं आव्हान वाटलं असेल, की त्या कलेच्या ईश्वराला ही हातचलाखी एका चुटकीसरशी अंगवळणी पडली असेल?
चीनमध्ये धर्म-जात याला फारसं महत्त्व नाही. काही जण तर धर्मच मानत नाहीत.
असले तर बहुतांशी बौद्ध, थोडे फार ख्रिश्चन किंवा मुस्लिम. हिंदू नावालाही नाहीत. आपल्या तेहतीस कोटी देवांपैकी इथं एकही परिचित नाही. भारतात इतके फेमस; पण इथं नामोनिशाणही नसलेल्या त्या सद्बुद्धी व ज्ञान दात्याने चीनमधला पाहुणचार घेऊन परत जाताना इथे हिंदू धर्मविषयक नवीन प्रोजेक्ट करण्याचा प्लॅन केला असेल व भारत गाठला असेल तो मार्केटिंगसाठी लवकरात लवकर माणसे पाठवायचा निर्णय घेऊनच!
अशी ही गंमत.
मंगलमूर्ती मोरया.(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
(छायाचित्रे जालावरून साभार.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा