उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२६ सप्टेंबर, २००६

ताजमहाल


मनुष्याने आपले नैपुण्य पणाला लावून कितीतरी गोष्टी शक्य केल्या. त्यातून निर्माण झाली अनेक आश्चर्य! आणि नवीन संकल्पना जन्माला आली जागतिक सात आश्चर्याची. पण सात हाच आकडा का मह्त्त्वाचा असावा? सात समुद्र, स्वर्गातील सात पाय-या, सात जन्म, आठवड्याचे दिवसही सात.या वरून सात आश्चर्याची कल्पना आली असावी. सर्वात पहिली अशी यादी ग्रीक इतिहासकाराने बनवली होती. तेव्हा प्राचीन, पुरातन कालीन वस्तूंचा विचार केला गेला होता. तदनंतर मध्ययगिन कालातही पुन्हा यादी करण्यात आली आणि आता अगदी आधुनिक यादी तयार होते आहे असे ऐकले. वाचनात आले की भारतातील ताजमहाल नवीन सात आश्चर्याच्या यादीतून मागे हटला आहे. वाचून खूप वाईट वाटले. जगात सर्वांना माहित असणारी भारतातील ती एकमेव सुंदर वास्तू आहे. या यादीतून मागे पडण्याचे कारण काय असावे? आणि त्या ऐवजी अमेरिकेचा लिबर्टी पुतळा आणि ऑस्ट्रेलियातील ऑपेरा हाऊसचा विचार करण्यात यावा?
जागतिक सात आश्चर्याच्या वास्तूंचा विचार करताना अनेक निकष लावले जात असतील. यात कलात्मकता, रचना, शिल्पकला, बांधणी वगैरे अनेक बाबीं असतील. पण या सर्व वास्तूत एकतरी आश्चर्य कारक गोष्ट असायला हवी. ताजमहाल मधे नाही का तसे आश्चर्य? जगात अजून कोणी बनवू शकेल का दुसरा ताज? एक तर तो भारतात बनवलेला आहे. म्हणजे तो आम्हाला कोणी बक्षिस दिलेला नाही. अमेरिकेचा लिबर्टी पुतळा अमेरिकन लोकांची निर्मिती नाही. ती त्यांना फ्रान्सकडून मिळालेली भेट आहे.
कदाचित कोणाची निर्मिती आहे, कुठे निर्मिलेली आहे याचा विचार सात आश्चर्याची यादी करताना करत नसतील. दुसरे म्हणजे फक्त मनोवेधक वास्तूंचाच विचार केला जात असेल का या यादीत?
ताजमहाल ही मोहक वास्तू आहे. त्या महालाचे लोभस रूप डोळ्यात साठवण्याजोगे आहे. चीनच्या भिंतीत `सुंदर`असे म्हणण्याजोगे काहीही नाही. ती नक्क्कीच `ग्रेट` आहे. त्यात सुंदरता नाही  तर भव्यता आहे. सांगायचे असे की `सौंदर्य` हाच एक निकष सात आश्चर्याच्या यादीचा नाही.
आश्चर्यांच्या यादी साठी चीनची भिंत, भारताचा ताज, अमेरिकेचा लिबर्टी पुतळा आणि ऑस्ट्रेलियाचे ऑपेरा हाऊस या सर्व वास्तूंचा विचार एकाच वेळी करणे योग्य नाही. कारण त्या वास्तू ज्या काळात बनवल्या गेल्या तो काळ तुलनीय नाही. चीनची भिंत बनवली तो हजारो वर्षापूर्वीचा काळ नि जेमतेम शंभर वर्षापूर्वी केलेला लिबर्टी पुतळा यांची स्पर्धा लावणे योग्य नाही. तसेच साडेतीनशेपेक्षा जास्त वर्षापूर्वी आकारलेल्या ताजमहालला आणि ऑस्ट्रेलिया येथिल सुमारे तीस वर्षापूर्वीच्या ऑपेरा हाऊस एकाच पारड्यात मोजून कोणते जाड आहे ते पहाणे अयोग्य आहे. बिचा-या इतिहासकालिन वास्तूंवर तो अन्याय नाही का?
आश्चर्य हे एक काळानुरूप बदलणारी गोष्ट आहे. उदा: सध्याच्या यंत्रयुगात नसेल तरी मोबाईल फोन्स पन्नास वर्षापूर्वी आश्चर्य होतेच. या जुन्या वास्तूंचा विचार करताना त्या काळाच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. त्याची ज्या काळात रचना, निर्मिती केली गेली तो काळ पाहून त्याचे मूल्य ठरवले पाहिजे. जेवढी जुनी वास्तू, तेवढे ऐतिहासिक तेवढे महत्त्व जास्त! त्या काळात एवढी वाहनांची, दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देणारी तंत्र-यंत्र अस्तित्वात नव्हती. ज्ञानाची देवाण घेवाण करणा-या सोई प्रगत नव्हत्या. अश्या काळात भव्य, दिव्य वास्तू उभारणे हे कठिण काम होते. ते आव्हान स्विकारून पूर्णत्वाला आलेल्या वास्तू म्हणजेच एक आश्चर्य होय.
सात आश्चर्यांची यादी करताना प्राचीन आश्चर्य, मध्ययुगीन आश्चर्य आणि आधुनिक आश्चर्य असा विचार केला तर ते अधिक न्यायदायी होईल. यात फक्त मानव निर्मित वास्तूंचा विचार केला गेला पाहिजे निसर्ग देवतेचे आश्चर्यकारक वरदान लाभलेले आहे असे नाही. त्या भाग्यवंतांची यादी निराळी केली पाहिजे.
प्रत्येकाचे विचार वेगळे, आवड वेगळी. त्यामुळे ही सात आश्चर्याची यादी बनविताना निकष विचारपूर्वक करायला हवेत. यात वस्तुनिष्ठता अधिक व व्यक्तिगत मते कमी असायला हवीत. हे झाले मूळ यादी करतानाचे विचार. आता ते कसोटीचे निकष जर ठरवून झाले असतील तर त्यातून ताजची पिछेहाट का? यादी बनवताना भिन्न काळातील वास्तूंची तुलना केला तर अर्थातच आधुनिक काळातील अननुभूत रचना, मांडणी आधिक ताजी वाटत असावी. ते अर्वाचीन शिल्प अधिक असामान्य दिसत असवे. ताजमहालसारख्या मुघल धाटणीच्या घुमटकारी इमारती मुस्लिम देशात अनेक पहायला मिळतात. आता आधुनिक जगात त्या बांधणीत वैशिष्ठ्यपूर्ण अस काही वाटत नसावे?
नव्या कलाकृतीतील सोई, संरक्षण, बंदोबस्त, इतर तरतुदी, व्यवस्था त्यांचा वरचढपण दर्शवितात. तो पटण्याजोगा आहे. अपुरी माहिती, अव्यवस्था, गोंधळ, गर्दी, विलंब यामुळे प्रत्येक परदेशी  प्रवाश्याला भारतात येणे अत्यंत कठिण वाटते. वाटेवरचे भिकारी, गाईडस यांचा पाठपुरवठा, प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लहान लहान दुकानांच्या रांगा आणि तेथिल विक्रेत्यांची आरडाओरड अतिशय असुरक्षित आणि नकोशी वाटते. धंदेवाईक लोकांची लुटारूगिरी सहज लक्षात येते. वास्तूंचे स्थान, तेथिल स्वच्छता, सजावट, प्रवाशांच्या सुविधा, आजूबाजूचे वातावरण हेही थोडेफार परिणाम करत असतील  त्या यादीच्या निर्णयावर! ताजमहाल पहायला जाताना दिसतात ते खड्डे असलेले अरूंद रस्ते, ट्रॅफिक जॅम करणारे शेळ्या मेंढ्यांचे कळप, अनेक न पेलवणारे दागिने घातलेल्या स्त्रियांचे नमुने, उघडी गटारे आणि नाले, कचराकुंड्या, माश्या घोंघवणारे उघड्यावरचे पदार्थ हे तर किळसवाणे वाटते. ताजच्या शेजारच्या रोडावलेल्या यमुना नदीची कीव करावी तेवढी थोडी. ताजच्या समोरच्या बगीचाची उपेक्षा, पिवळे पडत चाललेले संगमरवर, रंग उडालेल्या भिंती आणि डागडुजी व दुरूस्तीसाठी तिष्ठत असलेले अनेक कोपरे आणि हिरे मणिक यांची फक्त आठवण देणारे रिकामे कोरिव काम यामुळे ती वास्तू एके काळी ` महाल` होती हे आवर्जुन सांगावे लागते. सरकारी मालमत्ता असलेल्या या वास्तूंची स्थिती दयनीय झाली आहे हिच कारण तर नसतील ताजच्या पिछेहाटीला? असे असूनही उत्कृठ कारागिरांनी उभारलेले हे भव्य स्मारक कित्येक कवींना, चित्रकारांना आजही प्रेरणा देते. प्रेमाची निशाणी म्हणून प्रेक्षणिय असलेला हा मुकुट महाल लैला-मजनूंना एक आदर्श आहे. स्त्रीविषयक आदर आणि तिच्यावरचे प्रेम दर्शवणारे हे प्रेमप्रतिक जगप्रसिध्द आहे. अनेक मुस्लिमांचे श्रध्दास्थान आहे. भौमितिक तत्त्व सांभाळून आकारलेला हा महाल वास्त्तुशास्त्राच्या अभ्यासकांना माहितीपूर्ण वाटतो. पौर्णिमेच्या चांदण्यांच्या शितल प्रकाशातली छटा बदलणारी ही आश्चर्यकारक वास्तू आजही अनेकदा इतिहासातील संदर्भ सांगून त्या काळातील घटनांचा आभास देऊन जाते.
मध्ययुगिन काळात का होईना, पण जगाचा सरताज ठरलेला `न भूतो न भविष्यति` असा हा महाल आहे फक्त आपल्या भारतातच.

(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
  (छायाचित्रे जालावरून साभार.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा