उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१० ऑक्टोबर, २००६

सणाचा चंद्र

मराठी कालगणतीत दिवसाची स्थिती ही चंद्राच्या स्थितीप्रमाणे ठरते. त्यावरच आपल्या अनेक सणांचे दिवसही ठरतात. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे तारीख काहीही असो-ते त्याच तिथीला साजरे करण्यात येतात. गणेशचतुर्थी, दसरा, नरकचतुर्थी, बलिप्रतिपदा हे व इतरही सर्व सणवार चंद्रावरच अवलंबून असून पौर्णिमेच्या चंद्राचे तर फारच महत्त्व आहे. कोजागरीचा चंद्रही अशाच आनंदी साणाचा एक साक्षिदार!
यावर्षी २००६ मधे कोजागरी पौर्णिमा आहे ६ ऑक्टोबर रोजी. आश्विन महिन्यातील शुध्द पक्षातील या तिथीला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. पावसाळ्यानंतर होणारा दाह कमी होतो तो शरदातल्या हलक्याश्या गारव्यामुळे. दसरा झाल्यानंतर दिवाळीच्या तयारीची आठवण करून देणारी ही पौर्णिमा लक्ष्मीपूजनाच्या बरोबर पंधरा दिवस आधी येते. कापणीच्या हंगामानंतर धनदेवता लक्ष्मी याच रात्री सर्वांच्या घरी जाऊन लहान थोरांना सद्‌भाग्य देते, असे मानले जाते. पण रात्री झोपा काढणा-यांना नव्हे! म्हणून जागरण करण्याची प्रथा आहे. महिषासुराबरोबरच्या विजयी होऊन थकून झोपलेल्या दुर्गादेवीला उठवून तिचा थकवा घालवण्यासाठी या रात्री संगीत ढोलकवाद्यावर पालखीही काढण्यात येते. या रात्री पांढरे वस्त्र घालावे असे म्हणतात. काही लोक दिवसा उपास करून रात्री चंद्रदेवाला नैवेद्य अर्पण करून उपास सोडतात.चंद्राची आरती करून आंघोळ करून ओवाळायची ही पध्दत आहे. खिरीचा नैवेद्द दाखवला जातो. नुकत्याच झालेल्या कापणीतला ताजा भात, धान्य देवाला अर्पण केले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरदातल्या या रात्रीतला मंद वारा, संपूर्ण शशिबिंदू आणि लूकलूकणा-या तारका! आपले इतर सण जरी सकाळी साजरे होत असले तरी कोजागरी पौर्णिमेसाठी रात्रच राखून ठेवलेली आहे. कोजागरीला तरी गच्चीत जमून बदाम पिस्ते घातलेले वेलचीयुक्त गोड आटीव दुधाची मजा चाखण्याचीही प्रथा आहे. या दिवशी चंद्राच्या किरणातून अमृताचा वर्षाव होतो असे म्हणतात. म्हणून या आटीव दुधावर चंद्रप्रकाश पडेल अशी काळजी घेतली जाते.
माझ्या लहानपणी कोजागरीला आम्ही आजीकडे एकत्र जमत असू. गच्चीच्या सफसफाईपासून आम्हा मुलांची धावपळ सुरू व्हायची. मग सतरंजी, चटया अंथरणे, त्यावरचा धुडगूस, त्यानंतर खाल्लेली बोलणी .... सारे सारे आठवते. त्यावेळी रात्र कधी होते असे होऊन जायचे. गच्चीत वटाटावड्यावर, भेळीवर ताव मारून मग प्यायलेल्या थंडगार दूधाची चव अजूनही जिभेवर आहे. कोजागरी असतेच तशी.... न विसरण्याजोगी....
चीनमधे आल्यावर कळले की चिन्यांनाही चंद्र महत्त्वाचा वाटतो आणि अगदी याच दिवशी येथेही सण सजरा केला जातो हे ऐकून आश्चर्य वाटले.
चिनी लुनार (चंद्रावर आवलंबित) कालगणतीप्रमाणे त्यांच्या आठव्या महिन्यातील पंधराव्या दिवशी साज-या होणा-या या सणाला चिनी मँडरिन मधे Chug Chiu म्हण्जे मून फेस्टिवल किंवा Zong qiu jie म्हणजे मिड ऑटम फेस्टिव्हल किंवा Yue bing jie म्हणजे मूनकेक फेस्टिव्हल म्हणतात.
चीन हा मुख्यत्वे शेती करणारा देश. पूर्वी चंद्राच्या स्थितीवर शेतक-यांचे लावणी, कापणी वगैरे व्यवहार केले जात असत. काळाचा संदर्भ लागायचा तो चंद्रामुळेच. पूर्ण वर्षाच्या कामानंतर धान्य, फळफळावर, भाजीपाला घेऊन येणारा हा ऑट्म ऋतूमधल्या कापणीनंतरचा सण म्हणजे स्वर्गीय उदार देणगीचे आभार मानायचा सण. आरामाचा. मज्जेचा! तसेच लवकर येणा-या थंडीचे स्वागत करण्याचा.
चिनी लोकांची भावना आहे की आपले सुख-दु:ख, नफा-तोटा, एकीकरण-दुरावा हे चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असते. मिड ऑटम मधे पूर्ण चंद्रमा म्हणजे एकजूट मानली जाते. कुटुंबाला एकत्र करणारा हा दिवस. येथे सणाला जोडून नॅशनल हॉलिडेज येतात. जवळ जवळ एका आठवड्याच्या सुट्टीत कामानिमित्त लांब राहणारे लोक आपापल्या घरी परतात. घरी परतू न शकणारे लोक चंद्राकडे पाहून आपल्या कुटूंबियांची आठवण काढतात. लांबूनच त्यांच्यासाठी शुभेच्छा पाठवतात. दूर राहणारे प्रियकर प्रियसी एकच वेळ ठरवून त्यावेळी आकाशातला मधुचंद्र पाहून जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात.
चीनच्या काही भागात या दिवशी मिड ऑट्म मधली झाडे लावली जातात. गुआंगझो भागात चंद्राची बरोबरी करणारे मोठ्ठे आकाशकंदिल लावले जातात. बागबगीचात आगीच्या ड्रॅगनचा नाच, इतर खेळ,  शोज्‌ होतात. झेंगझिआन प्रोव्हिन्स मधे चिआन थांग नदीकाठी पूरसदृश भरतीच्या लाटा पहायलाही लोकांची गर्दी जमते. कुठेही असले तरी या दिवशी चंद्रदर्शन आवश्यकच! निळ्या काळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर चंदेरी प्रकाशमान चंद्र पाहून सर्वजण उल्हासित होतात. याबरोबर वाईनची लज्जत मूनकेकची मेजवानी महत्त्वाची.
चीनमधला मूनकेक भारतातल्या केकेसारखा नसतो. तीन इंच व्यासाचा, अर्धा इंच जाडीचा गोल मूनकेक एखादा रवा लाडू दाबून बसकट केल्यावर कसा दिसेल? तसा दिसतो. यात खरबुजाच्या, कमळाच्या बिया, बदाम, बीन्स, अक्रोड, खजूर याची पेस्ट किंवा फळे, जॅम, साखर यांचे सारण असते. तसेच केकच्या मध्यावर असलेल्या बदकाच्या अंड्यातील पिवळ्या सोनेरी बलकाचे, माशाच्या तुकडयांचे, संत्र्यापासून केलेल असे वेगेवेगेळ्या स्वादाचे, रंगांचे, आकारांचे शंभराहून अधिक प्रकारचे केक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यावरील तपकिरी/बदामी रंगांच्या पापुद्र्यावर ब-याचदा दिर्घायुष्याची वा एकोप्याची खूण असते. आकर्षक सुंदरश्या ड्ब्यामधील रूचकर मूनकेक एकमेकांना भेट देण्यात येतात.
दिपदैप्य, पूजा अर्चा नसले तरीही चीनी लोकही आपल्याप्रमाणे चंद्राचे श्रेष्ठत्व मान्य करतात.या  लोकांच्यातही या सणाला आधार देणा-या कथा, आख्यायिका आहेत. ऐतिहासिक प्रसंग आहेत.
युआन राजवटीत (१२८०-१३६८) चीनवर मंगोलिअन लोकांचे राज्य होते. त्याआधीच्या सुंग राजवटीतील पुढा-यांना ते पसंत नव्हते. त्यांनी कुणाला लक्षात येणार नाही असे बंड पुकारले. या पुढा-यांनी मिड ऑट्म फेस्टिव्हलसाठी विशिष्ट प्रकारचे केक बनवून घेतले. या भाजलेल्या केकमधे हल्ला करण्याचे बेत पाठवले. त्यानुसार या पौर्णिमेच्या रात्री हल्ला करून विजयी झाले व त्यानंतर चीनी मिंग राजवटीची स्थापना झाली. त्या विजयाची आठवण म्हणून आजही चीनमधे मूनकेक खाल्ले जातात.
एका सशाची पौराणिक गोष्ट ही ऐकण्यात येते. एकदा तीन प-यांनी अतिशय गरीब माणसांची रूपे घेतली. 
कोल्ह्याकडे, माकडाकडे व सश्याकडे त्यांनी अन्नाची भीक मागितली. कोल्ह्याने, माकडाने आपल्याकडील अन्न त्यांना दिले. सश्याकडे देण्यासारखे काहीच नव्हते. म्हणून त्याने आगीत उडी घेऊन स्वतःचे मांस देऊ केले. सश्याचा हा त्याग प-यांच्या ऋदयाला भिडला. त्यांनी त्या सश्याला चंद्रमहालात नेले. मून फेस्टिव्हलला त्या सश्याच्या त्यागाची आठवण केली जाते व त्याला संपूर्ण चंद्रात शोधण्याचा प्रयत्न केला जातो.
अश्या प्रकारे अनेक कथा,कविता आठवत, केकचा आस्वाद घेत कृतज्ञता, आनंद, सदिच्छा व्यक्त करत चीन मधे हा सण साजरा केला जातो.
भारतात काय? चीन मधे काय? किंवा पृथ्वीवर अजून कुठे ही काय?-चंद्र एकच!
या चंद्राच्या सणानिमित्त सर्वांना शुभेच्छा.

(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
  (छायाचित्रे जालावरून साभार.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा