उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२७ ऑगस्ट, २०११

जिवंत निसर्ग

भरधाव रस्त्याच्या कडेला एक सर्व्हिस व्हॅन सावकाश येऊन थांबली. एक गोरा अमेरिकन माणूस खाली उतरला. अंगातल्या खाकी युनिफॉर्ममधला शर्टाच्या खिशातून डोकावणारे काही घडी केलेले कागद आणि जाडसर पेन आणि हातातील वॉकी टॉकी पाहून तो कुठेतरी काम करणारा सरकारी कामगार असावा असे वाटले. 
मला म्हणाला, “Hello mam,  are you all right ?
मी उत्तर दिले, “Yes. I am fine.
“ Are you sure? Is all okay with you?त्याने पुढे विचारले.
मी डोक्याला आठ्या पाडून चमकून म्हटले, “ Yes. Absolutely.
तो हात उंचावत निघाला. निघताना म्हणाला, “ That`s Great ! Take care. Bye.
सर्व्हिस व्हॅन समोरून निघून गेली. मी पाठमोरी व्हॅन जरा वेळ पाहत राहिले. दिसेनाशी झाल्यावर पुन्हा चालत निघाले, त्याच रस्त्याकडेच्या  साईड वॉक वे वरून...
आश्चर्यातून बाहेर येत भानावर आले. त्याला मी वेडी वटले की काय? असा पुसटसा विचार मनात आला आणि लागलिच मला खात्री झाली.
"त्याला ना मी नक्कीच वेडी वाटले असेन!" मनाशीच(वेड्यासारखं)हसून पुन्हा चालू लागले.
खरं. अगदी खरं! वेडच लागलं होत आज मला. आज मी चक्क चालत  बाहेर निघाले होते. रस्त्याच्या कडेने का होईना पण चालणारी मी एकटीच! आणि वर खाली पाहत, मधेच खाली वाकून पाने, ती सुध्दा कच-यातली सुकलेली पाने उचलणारी मी... मला पाहून कुणालाही मी वेडी नव्हे, ठार वेडी वाटणे स्वाभाविक होते. वेड्यांचा काही भरवसा नसतो. ते आपल्याच धुंदीत एकटेच भरकटलेले असतात. तशीच, अगदी तशीच मी भरकटलेले होते. आपल्याच अनोख्या धुंदीत होते मी आज.
जॉर्जिया. अमेरिकेतला आग्नेय भागाकडले राज्य. उत्तरेकडल्या थंडीच्या तुलनेत इथे थंडी तशी उशीराच सुरू होते आणि कमी ही असते. क्वचीत स्नो फॉल ही होतो. पण तो ही नाममात्रच. या जॉर्जियामधे चार ऋतू स्पष्टपणे दिसतात. थंडी (विंटर)च्या आधी येतो फॉल. समरमधे डवरलेल्या हिरव्या गच्च झाडांवर सप्टेंबर पासून सुरू झालेली इतर रंगाची उधळण नजरेने आधिच टिपली होती. पण जरा अलिकडेच प्रकर्षाने जाणवली, मनाला भावली. म्हणून आज त्या रंगांच्या दुनियेत आपणहून भटकायला बाहेर पडले. एकटीच चालत! दारूड्या जसा आपण होऊन जाणून बूजून दारू पितो आणि बेहोशीची मजा चाखतो ना अगदी तस्सच. धुंद करून टाकलं होतं त्या निसर्गातल्या रंगसंगतीने. वर निळे निरभ्र आभाळ. त्याला स्पर्श कारायला उंचावलेले ते झाडांचे शेंडे. काही हिरवी झाडे तर काही रंगीत ठिपक्यांनी सजलेली.
पिवळ्या लिंबू कलर पासून ते केशारी, लाल, मरून, मातेरी, चॉकलेटी, काळा असे अनेकविध रंग आणि त्यांच्या छटा पाहायला मिळाल्या. त्याही एकाच वेळी ! डोळे हा रंग पाहू तो पाहू असे अधाश्यासारखे इकडे तिकडे फिरत होते. क्षणभर विसावत होते एके जागी. की पुन्हा चाळावल्यासारखे दुसरीकडे सौंदर्य न्याहाळायला वळत होते. माझ्या ताब्यातच नव्हते ते.
खरंतर मनावरचा ताबाच सुटल्यागत पिसाटल्यासारख झालं होतं, त्या रंगांच्या दुनियेत. तिथे डोळ्यांची काय कथा?
"यापेक्षा सौंदर्य असूच शकत नाहीं..... पिऊन घे हवं तेवढं.... संधी सोडू नकोस.... उद्याचं कुणी पहिलंय?" मन डोळ्याला बजावत होतं.....डोळेही आपणहूनच मंत्रमुग्ध झाले होते. त्या जिवंत अप्रतिम सुंदरतेची नजरेनेच दृष्ट काढून टाकली होती.
काही बुंध्यांकडे पसरट झाड तर काही वरपर्यंत उभी, काही तिरकस तर काही सरळसोट वाढलेली. त्यातून अधून मधून डोकावणा-या आणि टोकाकडे बारिक होत जाणा-या काळ्या फांद्या. सर्वात दिलखेचक होते ते त्यांचे रंग. निरनिराळ्या प्रकारची झाडे. त्यामुळे त्यांचे रंग ही अनेक. एकापेक्षा एक सरस. आपापसात स्पर्धा लावलेले. पार भिन्न असून ही एकमेकांना अधिक शोभिवंत करणारे.
प्रत्येक झाडात काही तरी वैशिष्ठ्य. नाविन्य. एकमेकात गुंतलेले असून ही आपले आगळे वेगळे अस्तित्व स्वतंत्रपणे प्रदर्शित करणारे प्रत्येक झाड. त्या रानातही आपले देखणेपण बघणा-यांच्या डोळ्यात ठसवणारे.

काही झाड होती सोनेरी पिवळी,अशी ------


काही फक्त केशरी--




काही झाड होती पिवळी आणि केशरी. ही अशी ------

काही आतून हिरवी आणि टोकाची पाने लाल झालेली. मज्जेशीर!--

काही उभी अर्धी लाल तर अर्धी उभी हिरवी. अर्ध नारीनटेश्वर सारखी.--

काही चक्क्क मातेरी. चॉकलेटी पानांची.--

काही कूंकाच्या रंगाइतकी लाल भडक.--

काही पोपटी. एकदम फ्रेश रंगाची--

याच झाडांवर दिसली आसक्ती आणि अवती भोवती दिसली ती निरासक्ती. जमीनीवर अनेक पानापाचोळा पडलेला होता. हीच पाने काही काळाआधी दिमाखात झाडावर डोलत होती. झाडावर खुलत होती किंवा झाडं त्यांच्यामुळे खुलत होती म्हणा. आता झाडावर असलेली पाने खाली पडून गेलेल्या पानांकडे जाणून बूजून दूर्लक्ष करत होती. तर काहींना आपल भविष्य तिथे दिसत होते. अस्वस्थ मनाने ती स्तब्ध झाली होती. पाळण्यातल बाळ चुळबुळ करायला लागल्यावर त्याची आई त्या पाळण्याला जरासा झोका देते आणि त्या वास्तवतेत शिरणा-या बाळाला पुन्हा हलकेच हस-या स्वप्नात लोटते त्याप्रमाणे वा-याची बारीकशी झुळूक त्या झाडाच्या काळ्या काटक्यांना हलकासा झोका देऊन गेली. काही पाने आनंदाने डोलू लागली. तर काही झाडाची साथ सोडून माझ्या पायाशी पडली.
अगतिकतेने,असहायपणे....
बिचारी पानं!
आसक्ती कडून निरासक्ती कडे जाणं त्या पानांना फार कठिण जात होत. निसर्गाच्या चक्रात येणा-या घडामोडींना सामोरी जाण्याची तयारी झाडात मात्र होती. जगण्याची उमेद होती. जिद्द होती.
गळून पडलेल्या त्या पानांना मी न्याहाळलं. खाली वाकून काहींना उचललं आणि माझ्या ओंजळीत घेतलं. ती पान हसली. खुशीत आली. झाडावरच्या पानांनी ते पाहिलं. त्यांनाही जरा धीर आला आणि क्षणभरातच झाडाला निष्पर्ण करीत माझ्याकडे झेपावली. आजूबाजूला अनेक पानांचा थर जमा झाला.

`टूडेज फॉल इज टूमॉरोज राईज` याची खात्री आता पानांनाही झाली होती.
मी अजून काही पाने ओंजळीत गोळा केली. त्यांना घरी आणल. माझ्या फुलदाणीत नव्हे नव्हे पानदाणीत ठेवली.
ती पाने आता स्वतः सुंदर सजली होती आणि माझं घर ही सजवित होती.
खूप खूप वेळ ती पाने सुखावली होती आणि मला ही सुखावत होती.

(हा लेख ‘लोकसत्ता‘ वृतपत्रातील चतुरंग पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा