उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१३ सप्टेंबर, २०११

काळ्या गांधीलमाश्यांचे पोळं.

आमच्या   घराच्या पुढल्या अंगणात एक झाड   आहे.  त्याच्या एका फांदीवर पानांच्या  गर्दी आड पांढ-या आणि मातकट/ पिवळसर आडव्या रेषांची नक्षी असलेल्या कागदाचा  लांबट गोल भोव-याच्या आकाराचा गुंडाळा आहे. एखादा  पातळसा   कागद   गोल गोल गुंडाळत गेल्यावर एकावर एक पापुद्रे तयार होतील तसा तो गुंडाळा दिसतो. गेली चार पाच महिने मी तो पाहते आहे.  आधी तो लहान होता. त्यात  एक लहानसा पक्षी जाईल असे  छिद्रही आहे.ते पाहून एखाद्या पक्ष्याचे घरटे असेल असे वाटले. पण तिथे कधी ना कुठला पक्षी दिसला  ना कुठचा किटक. 
  त्यामुळे    त्याची फारशी चिंताही वाटली नाही. आता  तो फुट बॉलच्या आकारा इतका मोठा झाला आहे.  त्याची रचना अत्यंत आकर्षक आहे.  एखाद्या  घरात जसा एखादा खांब असतो आणि त्यावर   जसे  छप्पर आधारलेले असते तसेच  या गुंडाळ्यात एक फांदी आहे. ती या गुंडाळ्यातून  आरपार बाहेर पडलेली आहे.  त्याच्या आधारानेच तो गुंडाळा तिथे टिकून  असावा. त्या फांदीचा कुठलाही अडसर  तो गुंडाळा करताना झालेला दिसला नाही.  अचूक वास्तूशास्त्राचे असे  ज्ञान कुठल्या पक्षाला असेल असा प्रश्न पडला. त्या झाडाखालून आश्चर्यकारक कारागीरीचे काही फोटो घेतले.
त्यात   एखादा रंगीत पक्षी, त्याची  अंडी किंवा चिवचिव करणारी छोटुशी पिल्लं असतील असे वाटले.  मी  एका हातात कॅमेरा धरून  उंच शिडी घेऊन  आत  डोकावून पहायचे ठरवले.  वर चढून अगदी समोरून अजून काही फोटो घेतले.  नीटसे दिसत असेल तरी तिथे हात  लावायचा धीर झाला नाही.  कॅमेरासमोर मधे मधे येणारी  बाजूची फांदी ओढून तोडून टाकली. त्यामुळे आजूबाजूच्या  इतर  काही फांद्यांना जरासा झोका मिळाला.  त्यासरशी  गुंडाळ्याच्या त्या छिद्रातून दहा बारा काळ्या माश्या सरसर बाहेर पडल्या आणि माझ्या भोवती  घोंगावायला लागल्या. मी शिडीवरून   जीव बचावत खाली उतरले  आणि पळत घरात शिरले. ते घरटे नसून माश्यांचे पोळं आहे हे तेव्हा समजले.
आंतरजालावर तसल्या   प्रकारच्या पोळ्याबद्दल वाचायला मिळाले.  त्या काळ्या माश्या म्हणजे एक प्रकारच्या गांधील माश्या (Hornet) आहेत. त्या लाकडाचा अर्क शोषून किंवा लाकडाचे बारीक कण आणि  माती चावून चावून चोथा करून त्यात स्वत:ची  लाळ मिसळून  त्यापासून हा कागदासारखा पापुद्रा तयार करतात आणि  त्यापासून  आपलं सुंदरसे घरकुल बनवतात. त्याच्या गोलाकार भिंती पापुद्र्यांच्या असल्या तरी ते पापुद्रे एकावर एक असल्याने त्या आवरणांच्या भिंती चांगल्या  जाडसर, कडक असाव्यात. आणि त्यातूनही कुणी घरात शिरलाच तर त्याला विषारी डंख मारून बेजार करायचे सामर्थ्य त्या घराच्यांमधे होते याचीही खात्री  मला झाली होती.
काही वेळाने पुन्हा बाहेर जाऊन पाहिले. पोळ्याच्या आजूबाजूला शांतता दिसली. पुन्हा शिडीवर चढून  फोटो घेण्याचा प्रयत्न केला.  धाडस करून एक दोन   फोटो घेतले ही. पण माश्यांना त्याचा सुगावा लागला की काय कोण जाणे?   दोघी तिघी बाहेर येउन  घराची राखणदारी करू लागल्या. तर अजून दोन चार जणींनी माझ्या भोवती फेरच धरला.
त्यांचा नाद सोडून देऊन  मी सरळ घरात गेले. कॅमेरातले फोटो डाउनलोड करून  निसर्गाच्या  या कियमेबद्द्ल माहिती लिहिली आणि  ब्लॉगवर टाकली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा