अटलांटा येथील मराठी मंडळाने २००८ मधे आयोजित केलेल्या कार्यक्रमांवर एक दृष्टिक्षेप -
मकर संक्रांत -
इंग्रजी कॅलेंडरमधे पहिल्याच महिन्यात येणारा हिंदूंचा हा सण.
संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने अटलांटा मराठी मंडळा तर्फे `जत्रा` हा मराठी चित्रपट दाखवण्यात आला.सिनेमाच्या पडद्यावरील `जत्रा` बघण्यात अटलांटातील मराठी रहिवाश्यांनी जरा कमीच रस दाखवला. त्यामुळे पडद्यासमोर उपस्थिती खूपच कमी होती. तूफान गर्दी उसळलेली होती ती ख-याखु-या जत्रेत. `फन फेअर`मधील `फन` चा आस्वाद घेण्यासाठी आबाल वृध्द्दांनी धाव घेतली. सहाजिकच होते ते! कारण तिथे लहान मुलांपासून ते वयस्कर स्त्री-पुरूषांपर्यंत सर्वांनाच आकर्षक असे बरेच काही होते.
अटलांटामधील मराठी पुस्तकांचा खजिनाच जणू उघडा केला होती तिथे. उपलब्ध मराठी पुस्तकांच्या वाचनालयाबद्दल लोकांना माहिती कळली. पुस्तकांची सहज, सोपी अदलाबदल लक्षात आल्यावर अनेकांनी या स्तुत्य उपक्रमाची वाखाणणी करून रसिक वाचकांनी सभासदत्व स्विकारले.
मराठी मंडळाच्या कार्यक्रमाला लहान किंवा मध्यम वयाची मुल यायच नाकारतात. त्यांना तिथे कंटाळा येतो, मग ते रडतात, दंगा करतात, `घरी चल, घरी चल` असं त्यांच्या पालकांकडे तुंणतुण लावतात. त्यामुळे त्यांचे आईवडिलही मराठी मंडळाच्या चांगल्या कार्यक्रमांना मुकतात. पण येथे फन फेअर आयोजित केल्यामुळे कंटाळ्याची जराही शक्यता नव्हती. होता तो आनंदाचा मेळा. त्यामुळे अनेक कुटूंबे जत्रेत जरूर आली. आज कधी नव्हे त्या इतर मराठी मित्र मैत्रिणींशी गाठीभेटी झाल्या. नविन ओळखी झाल्या.
येथे लहान मुलांसाठी अनेकविध खेळ ठेवण्यात आले होते. बुध्दीबळाचा डाव, डक पाँड, फूट बॉल टॉस यासारख्या खेळांमधे तर बाळगोपाळांनी आनंद लुटला. फेस पेटिंग करून घेऊन बनलेल्या छोट्या मनीमाऊ आणि ससेभाऊंनी धमाल उडवली.
भली मोठी रांग होती ती मेंदी काढून घेण्यासाठी. स्त्रिया, तरूणी, बालिका "आय लऽऽव्ह टॅटू" म्हणून रांगेत न कंटाळता आपल्या टर्नची आतुरतेने वाट पाहत होत्या व आपल्याला हव्या त्या नक्षीचा आग्रह करीत होत्या.
जत्रा म्हटली की फोटो तर हवाच. अनेक कुटुंबियांनी हौसने मस्त पोज देऊन फोटो काढून घेतले.
नेहमी उदासिनता दाखवणा-या मराठी तरूण वर्गाचा उत्साह या दिवशी मात्र ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाच्या तयारीत काहीं टिनेजर्सनी स्वयंस्फूर्तीनी पुढे केलेला मदतीचा हात पाहून त्यांचे आईवडिल ही धन्य झाले. जिमरूम मधे एकत्र जमून या तरूणाईचा मनसोक्त बास्केटबॉल खेळही झाला. मराठी मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमाला जरूर येऊन मराठी मित्रांना भेटण्याचा व देसी फूडवर मस्तपैकी ताव मारण्याचा या तरूणांनी निश्चय केला.
संक्रांतीचा सण म्हणजे गुळाची पोळी. अटलांटच्या मराठी मंडळाच्या कार्यकारी मंडळातील स्त्रियांनी खपून तयार केलेल्या गुळाच्या पोळ्यांवर तूपाची धार सोडून या दिवशी आग्रहाने खाऊ घातल्या गेल्या.
एरवी अशुभ अश्या मानल्या जाणा-या काळ्या रंगाची आज तर खूपच चलती होती. जरीकिनारी, रेशमी, सुती अश्या अनेकविध धाग्याच्या पण काळ्या रंगछाटांच्या साड्यांनी एकमेकात जणू स्पर्धाच लावली होती. पारंपारिक साडी बरोबरीने काळा सलवार कुडता, मॉडर्न पँट टॉप्स ही स्पर्धेत उतरले होते.
काळ्या पेहेरावाने स्वागत केले होते ते सफेद तिळाचे आणि गोड गोड गूळाचे.
या वर्षाची गोड सुरवात झाली ती तिळगूळाची देवघेव करूनच.
गुढी पाडवा --
हा मराठी कालगणनेप्रमाणे वर्षाचा पहिला दिवस. नववर्षारंभ.
अटलांटा मराठी मंडळाने या दिवशी श्री.सुधिर गाडगिळ,श्री.त्यागराज खाडिलकर, सौ.स्मिता तळवलकर, श्री.दिपक देशपांडे यांना आमंत्रित केले होते. गप्पागोष्टींचा `गजरा` हा कार्यक्रम होता मोठ्यांसाठी. पण मंडळाने केलेल्या बेबी सिटरच्या सोयीमुळे कार्यक्रम विना व्यत्यय पार पडला. लहानग्यांच्या आईवडिलांना कार्यक्रमाचा पूर्णपणे आस्वाद घेता आला. मध्यम वयाच्या मुलामुलींसाठी ही काही गेम्स्, ऍक्टिव्हीटी होत्या. त्यामुळे त्यांचाही वेळ मजेत गेला.
श्री.त्यागराज खाडिलकर यांनी आपल्या सुमधुर गाण्यांनी रसिकांचे मने जिंकली. सौ.स्मिता तळवलकर यांनी आपल्या काळ्या पांढ-या दूरदर्शनवरील बातम्यांपासून ते चित्रपटातील अभिनय, निर्मितीपर्यंतच्या वाटचालीतले अनेक किस्से सांगितले. श्री.सुधिर गाडगिळ यांनी काही मजेदार घटना, विनोदी प्रसंग खुलवून सांगून गप्पांचा ओघ वळणदार केला. श्री.दिपक देशपांडे या हास्याच्या महाराजाधीराजाने प्रेक्षकप्रजेला फुसकुली पासून खसखस, बत्तीशी, खोखो आणि थेट खळखळाटापर्यंत नेऊन हास्यरसात बुडवून टाकले.
ह्या चौकडीने अटलांटातील मराठी लोकांच्या नविन वर्षाची सुरवात करून दिली ती अश्या या सुवास मनात कायमचा दरवळत ठेवणा-या रंगारंग गज-याने आणि रसिक जनता घरी परतली ती श्रीखंड पूरीची चव जिभेवर ठेऊनच.
गणेशोत्सव –
महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा सण.लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वातंत्रपूर्व काळात सूरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा आजच्या आधुनिक काळातही पार अमेरिकेतल्या अटलांटात पाळली गेली.
येथील मराठी मंडळाच्या कार्यकारी मंडळातील स्त्रियांच्या पारंपारिक नऊवारी साड्या, त्यांच्या नाकातील नथी,कपाळावरची चंद्रकोर आणि डोक्यावर केसांचा खोपा यांनी भारतातील मराठी परंपरेची आठवण करून दिली.
रंगित फुलांच्या रांगोळी मागील सुंदरश्या मखरातील श्री गणेशाच्या प्रतिमेची साग्रसंगीत पूजा करण्यात आली. भाविकांनी लांबच्या लांब रांग लावून सुखकर्त्याचे दर्शन घेतले. मोठ्या रूचकर पेढयाच्या प्रसादाचा लाभ घेतला. तालासुरात, टाळांच्या गजरात विघ्नहर्त्याची आरती झाली. लयबध्द अथर्वशिर्ष ही म्हणण्यात आले.
नादमय लेझिम वाजवत मुलामुलींनी श्री गजाननाच्या मूर्तीची मिरवणूक काढली .`गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या` असे विनवून मंगलमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या निमीत्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरवात झाली ती अकरा वर्षाच्या कु.मयंक साहू या अंध मुलाच्या `ॐ स्वरूपा सदगुरू समर्था` या गाण्याने. आपल्या शारिरीक कमतरतेची उणिव आपल्या गोङ गळयाने भरून काढणा-या मयंकचे कौतुक करण्यात आले.
शिवनंदन गौरीसूत श्री गजवदन म्हणजे बुध्दी आणि कलेची देवता.त्याचे स्मरण करून सुरू झाली `वुई गॉट टॅलेंट` ही स्पर्धा. अठरा वर्षे वयापासून पार पंचाहत्तरी ओलांडलेल्या अनेकांनी उत्साहाने स्पर्धेत भाग घेतला. विविध कलांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे अनेक गुण प्रकाश झोतीत आले. एकसे बढकर एक कला असलेले कलाकार नक्की आपल्या अटलांटामधलेच आहेत का? असा काहींना प्रश्न पडला. चुरशीच्या स्पर्धेतील कलांना प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांनी प्रतिसाद दिला. कलाकारांचे मनापासून कौतुक केले. नृत्य, नाट्य, अभिनय, कविता वाचन, एकपात्री प्रयोग, कथाकथन, वाद्यवादन, विनोद अश्या विविध रंगाने रंगलेल्या ह्या बहारदार कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षकांनी पुरेपुर लुटला. स्पर्धेतील विजेत्यांचे तसेच चित्रकला, पाककृती स्पर्धांच्या विजेत्यांचे ट्रॉफीज आणि प्रशस्तिपत्रक देऊन अभिनंदन करण्यात आले.
सर्व उपस्थितांसाठी मराठी मंडळाच्या कार्यकारी मंडळाने पुरण पोळीच्या भोजनाचेही आयोजन केले होते. त्याचा सर्वांनी आस्वाद घेतला.
अत्यंत भक्तिभावाने, सुख समाधानाने गणेशोत्सव सोहळा पार पडला.
नवरात्र -
सुरवातीला लहानसा हत्ती मध्यभागी ठेऊन लहान, मोठ्या स्त्रियांनी भोंडल्याच्या गाण्यांवर फेर धरला.
गुजराथमधे नवरात्रीला देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.नऊ दिवस उपास, पूजा, अर्चा, जागरण केले जाते.सर्वात आकर्षण म्हणजे लोकनृत्य गरबा, दांडिया रास.हा नृत्यप्रकार मराठी परंपरा नसूनही अटलांटात मराठी मंडाळाने आयोजित केलेल्या नवरात्रीच्या सोहळ्यात बहुतांश स्त्रिया पारंपारिक गुजराथी वेषात उपस्थित होत्या. मराठी मंडळ, गुजराथी नृत्यप्रकार आणि सोबत दक्षिण भारतीय ईडली, मेदूवडा सांबाराचा बेत. म्हणजे अंतर्देशिय एकोपाच नव्हे काय? अंतर्देशिय एकोपा म्हणा किंवा अमेरिकेत साजरा होणारा भारतीय सण.त्यामुळे आंतराष्ट्रीय एकोपा म्हणा.इथे तर भारतीयच नाही तर इतर देशातील काही तरूणीही हजेरी लावून होत्या.
एकूण काय? एकत्रित आनंदाची लयलूट!
डिजेवर वाजलेल्या गरब्याच्या, दांडियाच्या पारंपारिक तसेच फिल्मी गाण्यांनी तसेच अश्या नृत्यांना साजेश्या अश्या रिमिक्स गाण्यांनी नाचणा-यांच्या शरीरात जास्तच जोम भरून टाकला. संगिताच्या नादावर, टिप-यांच्या तालावर देहभान विसरून होऊन सर्व पावले नाचली. आतला एक आणि बाहेरचा एक असे दोन गोल करून सर्वजण बेहोशीने नाच करत होते. घोळक्या घोळक्यातूनही नाच करण्यात आला. काहींचे हात देत होते टाळ्या तर काहींचे पाय सांभाळत होते दांड्यांचा ठेका. टाळ्या देणा-या हातांच्या बोटांच्या सुंदर मुद्रा, पायांचा पदन्यास, शरीराची लवचिकता आणि चेह-यावरची सुमधुर हास्यछटा यामुळे अनेकांचे नृत्य दिलखेचक दिसत होते. उत्तम गरबा नृत्य करणा-या पती पत्नी जोडीला व पारंपारिक सूंदर वेषातील मुला मुलींना बक्षिसे देण्यात आली.
दुख-या पायांनी खूर्चीत बसून केवळ नृत्य पाहण्यातच आनंद मानणा-या वयोवृध्दांचे मन त्या गाण्यांवर जवान झाले. या नाचगाण्याच्या बेधुंदीने रात्री उशीरापर्यंत थकव्याला पार तडीपार केले होते.
दिवाळी -
अमेरिकेत भारतीय सणांना सुटी नसते.आपले रोजचे कामकाज, मुलांच्या शाळा सांभाळून इथली देसी जनता भारताच्या ` टच ` मधे राहण्याचा प्रयत्न करते. ह्या वर्षी ही जमेल तशी भारतीय घराघरातून नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा, भाऊबिज साजरी करण्यात आली. त्यानंतर सर्वांच्या सोयीनुसार अटलांटा मराठी मंडळाची दिवाळी आयोजित करण्यात आली होती. दिवाळीच्या भेटीगाठीबरोबर आनंद द्विगुणित होतो तो स्थायिक रहिवाश्यांनी पेश केलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमामुळे. यासाठी स्टेज सुशोभित करण्यात आला.
कलेच्या देवतेची,सुखकर्त्याची प्रतिमा स्टेजवर विराजमान झाली होती. `आली शुभदिपावली, उजळूया दिप या समयी ` ह्या स्टेजच्या मागील पडद्यावरच्या अक्षरांना अधिक प्रकाशित करत होत्या त्या झगमगत्या रंगीबेरंगी पणत्यांची मोठी चित्र आणि आकाश कंदिल. त्यामुळे दिवाळीचे आनंदमयी वातावरण तयार झालेले होते. भरजरी, भारी साड्या, दाग दागिने घातलेल्या स्त्रिया आणि पारंपारिक सलवार कुर्ता घालून आलेले पुरूष प्रेक्षकांनी दिवाळीचा माहोल सहजपणे उभा केला.
दिवाळीच्या कार्यक्रमाच्या आयोजनाची चाहूल लागल्यापासूनच सभासदांच्या हौसेला उधाणच आले होते. मराठी माणसांचं साहित्य, संस्कृती, कला, नाट्य यावरचं प्रेम सर्वश्रुत आहेच, त्याचा प्रत्यय इथे आला. लहान मुलापासून प्रौढांपर्यंत सर्वच जण आपली कला दाखवण्यासाठी सरसावले. खूप आधीपासून या कार्यक्रमासाठी तयारी सुरू केली गेली. गाण्याची आवड, नर्तिकांची निवड यांचे ताळतंत्र जमल्यावर सराव सुरू झाला. अनुरूप वेशभूषेसाठी शिंप्याकडे , मॉल्सना भेटी देण्यात आल्या. आपला नाच/नाटक सर्वाधिक चांगला व्हावा यासाठी झटून प्रयत्न सुरू झाले. लहान मुलांना प्रॅक्टिससाठी ने-आण करण्यासाठी त्यांच्या पालकांना कंटाळा मुळी आलाच नाही. खर तर मुलांचा नाचातील सहभाग हा त्यांचाच आग्रह किंवा आवड.
पण नेमक्या वेळी एक बछडीने मोठ्यांदा भोकाड पसरले. नंतर एका अधीर कांगारूने तर आपल्या पिशवीतल्या पिल्लाला घट्ट आवळून उड्या मारत आधीच्या गाण्यालाच स्टेजवर एंट्री मारली. वयानुरूप निरागसतेला समोरच्या चेष्टेखोर हास्याची ना होती कल्पना ना पर्वा. बालिश, अल्लडपणा स्वतःवरच खूश होऊन स्वछंद बागडत होता.
काहींचे अदाकारी नृत्य मात्र त्यांच्यातील कलेची, कष्टाची पदोपदी झलक दाखवत होते.त्यांच्या पालकांच्या प्रोत्साहनाचे, गुरूंच्या शिकवणींचे चीज करत होते. मान मुरडत, खांदे उडवत, कंबर लचकवत, गाण्याच्या ठेक्यावर अचूकपणे मुरकणा-या नखरेदार नर्तिकांना जोरदार शिट्ट्यांची प्रतिक्रिया, टाळ्यांचा कडकडाट आणि `वन्स मोर`मिळाला नसता तरच आश्चर्य होते. ङोक्याला मुंडासे बांधलेले आणि मिश्या रंगवलेले छोटुसे भाजीवाले, सुटाबुटातले चिमुरडे, एकसारख्या झगमगीत परकर पोलक्यातल्या राधिका, त्यांचे छान रंगवलेले चेहरे, आकर्षक केशभूषा यांनी कार्यक्रमाचा दर्जा नक्कीच उंचावला. जूनी फिल्मी, नवीन बॉलिवूड, किंवा रिमिक्स गाण्यांनी तसेच निवडक लोकप्रिय गाण्यांच्या मेडलींनी मात केली होती ती पारंपारिक गाण्यांवर.
आपल्या मुलांबरोबरीने त्यांच्या आई वडिलांनीही नाचात किंवा नाटकात भाग घेतला व दिलखूश प्रेक्षकांनी आपल्या कलाकार मित्र मैत्रिणींचे आणि बाळ गोपाळांचे तोंड भरून कौतुक केले.
अटलांटा मराठी मंडळाचे कार्यकारी मंडळ तर फुल फॉर्म मधे होते. सर्वांनीच वर्षभर केलेल्या श्रमाचा परीहार आज करण्यात आला. स्वयंसेवक नाटक, नृत्य करून आनंद लुटत होते. कार्यकारी मंडळाने केलेले उपरोधिक नाटक त्यांना वर्षभरात आलेल्या अडचणींचा आरसा होता. ते पाहून समोर बसून टाळ्या देणा-या अथवा नुसत्याच टिका करणा-या लोकांना कामकाजाची काहीतरी कल्पना आली असेल अशी आशा आहे. कार्यकारी मंडळातील काहींनी केलेला पपेट डान्स ही सर्वात आगळा वेगळा ठरला. सभासदांच्या मनाच्या रंजने बरोबरच त्यांच्या पोटातल्या भूकेच्या भंजनासाठी कार्यकारी मंडळाने दिवाळीच्या चमचमीत फराळाची आणि जेवणात गाजर हलव्याच्या मेजवानीची सोय केली होती.
पुढल्या वर्षीच्या नवीन कार्यकारी मंडळाचीही ओळख परेड झाली. त्यांनी आतापासूनच कामाला मोठ्या उत्साहात सुरवात केली. पुढल्या वर्षाची फी भरून सभासदत्व स्विकारणा-यांना २००९ चे कालनिर्णय कॅलेंडरही देण्यात आले.
दिपावलीच्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळले कोप-यावर येऊन ठेपलेले नविन वर्ष आणि अटलांटा रहिवासी सज्ज झाले सुख समृध्दी आणि समाधानाचा वर्षाव करणा-या त्या नववर्षाच्या स्वागतासाठी .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा