उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१४ नोव्हेंबर, २००८

लुटूपुटूचा खेळ

छंद म्हणजे अक्षरांच्या संख्येचे वृत्त. एका ओळीत किती अक्षरे यावीत याचे नियम बनवून वेगवेगळे छंद निर्माण झाले आहेत. यामध्ये केवळ अक्षरांच्या संख्येला महत्व आहे.
ज्ञानेश्वरांच्या हरिपाठात पहिल्या अभंगाची सुरूवात "देवाचिये द्वारी , उभा क्षणभरी' अशी आहे. त्यामुळे या छंदाला "देवद्वार छंद" असे नाव आहे. हा एक एक अत्यंत सोपा आणि अत्यंत मधुर छंद आहे.
या छंदाच्या रचनेत प्रत्येक चरण म्हणजे ओळ सहा अक्षरांची असते. पहिल्या तीन ओळी सहा अक्षरांच्या आणि चौथी ओळ ही चार अक्षरांची. म्हणजे देवद्वार छंदाचे नोटेशन ६....६.....६.....४ असे असते. दुसर्‍या आणि तिसर्‍या ओळीचा यमक असतो.

लुटूपुटूचा खेळ


काळेभोर मेघ,
दाटले परिघ.
चंदेरी ती रेघ,
कडकडे.

होई का बावरा?
पसरे पिसारा,
नाचे मोर न्यारा,
थुईथुई.

करी मन धुंद,
मातीचा सुगंध,
वाजे थेंब मंद,
टपटप.

अश्या पावसात,
गारवा हवेत,
उठे ही अंगात,
शिरशिरी.

पक्षी फिरे घरी,
निजे झाडावरी,
बंद झाली सारी,
किलबिल.

प्रणयाची वेळ,
आकाशाशी मेळ,
सृष्टीचा हा खेळ,
लुटूपुटू.

जादू अशी करे,
शब्द उरी भरे,
गीत मनी स्फुरे,
झरझर.

1 टिप्पणी: