उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१० जून, २००८

काक कथन


काव! काव! काव!
काय म्हणायचं या माणसांना?
कधी असं तर कधी तसं.
काहीही गोष्टी रचता तुम्ही माणसं.
अगदी अवास्तविक कहाण्या असतात. बिनबुडाच्या.... कल्पनारम्य....
आता हे पहा--
ती .... ती... चिऊ काऊची गोष्ट..
एक होती चिऊ, एक होती काऊ.
चिऊचं घर होतं मेणाचं, कावळ्याचं होतं शेणाचं!
माझं? माझं घर काय शेणाचं?
का? का म्हणून? पावसात वाहून जायला?
छॅ छॅ!
चिवचिवाट करणा-या चिवडीच्या मेणाच्या घरी जातय कोण?
ते ही ती तिच्या बाळाला जेऊ-खाऊ घालून निजवे पर्यंत वाट पहात रहायला?
काय तरी ती गोष्ट?
बाळाला समजो, न समजो.
सुरवात मात्र नेहमी अशीच--चिऊचं घर मेणाचं आणि कावळ्याचं शेणाचं! छोट्याला घास भरवाताना हाच काऊ कावळेदादा होऊन जातो लगेच!
बाळने खाऊ खाल्ला पाहिजे ना! मग एक घास चिऊचा आणि दुसरा मात्र काऊचा !
काऊ. काळा काऊ!!!
काळा रंग आम्हाला खूप खूप आवडतो. खूप खूप आवडतो.
आणि काळ्या रंगाचे तुम्हालाही काही वावगे नाही.
त्या कोकिळाच पहा. आमच्यासारखीच काळी कुळीकुळीत.
पण तरीही तुम्हाला आवडतेच की ती मंजुळा.
ती काय गान सम्राज्ञी. गोड मंजुळ आवाज असलेली.
आम्ही बापुडे कर्कश ओरडणारे, कलकलाट करणारे.
काय कोकिळेच्या गळ्याची जादू आहे? काही कळत नाही!
बायका तर `कोकिळा`नावाच व्रत करतात.
खर तर ती महालबाड !
आपली अंडी आमच्या घरट्यात खुशाल सोडून आमराईत ताना मारत, आलाप घेत भटकत राहते. आम्ही मात्र तिची अंडी उबवतो. आपले पिल्लू `काव काव` न करता मंजुळ आवाजात `कुऽऽऽ हू कुऽऽऽहू` करू लागलं तरी चुपचाप कानाडोळा करून किडा मुंगी भरवतो. लहानाची मोठे करतो.
हा आमचा प्रेमळपणा चांगला ठाऊक आहे माणसाला. खरं तर सर्व बायाकांनी विशेषतः सर्व मातांनी कोकिळा व्रत न करता कावळीव्रतच करायला हवं.
`दुस-याचं पोर आपलं.` म्हणाणा-या आम्हा कावळ्यांचा तेवढा तरी मान राखावा म्हणतो आम्ही.
अहो,बरं वाटतं जरा आपलं कौतुक ऐकलं की.
कौतुकाचं म्हणाल तर संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या आठवा.
त्यांना फार आपुलकी आमची. आणि कौतुकही आमच्या काव कावचं. आम्ही विठू माऊलीच्या आगमनाची आगाऊ वर्दी देणारे. म्हणूनच आमचे कोकलणे त्यांना शुभशकुनाचे वाटते. आम्हाला तर दही-भात भरवण्याचे, आमचे बाहू सोन्याने मढवण्याचे आश्वासन देतात.
आठवा आठवा ते जुने दिवस.
आणि तुमची आताची गाणी. 
म्हणे-----
झूट बोले कव्वा काटे,
काले कव्वे से डरियो.

व्वारे व्वा!
आमचा काय खोटं बोलण्याशी संबंध? कधी, कुठे, कशाला बोललो खोटं आम्ही? आणि या काळ्या बावळट ध्यानाला कोण डरणार?
आम्ही दारं, खिडक्यावर बसलो तर अपशकुनी समजता तुम्ही आजकाल.
घरची बाई लगेच वैतागते."आज कोण येतोय पाहुणा? नको रे देवा! अरे हट्. फुट!" असं म्हणून आम्हाला डरवता आणि हाकलून देता तुम्ही.
आणि म्हणता --"काले कव्वे से डरियो--"
काय ढोंगीपणा हो माणसांचा?
अजून एक आमच्यावरची हिंदी कविता--
कव्वा चले हंसकी चाल,
लंगडाकर थोडा थोडा.
काही तरीच तुमचं!
त्या शुभ्र हंसाची स्टाईल मारायची काय जरूरी आम्हाला? त्याला तर धड उडताही येत नाही. आम्ही कशाला लंगडत चालू जमिनीवर? उलट उडत जाउन बसू उंचच्या उंच फांदीवर. दिमाखात पाहू खालच्या जमिनीवरची गंमत.
आणि हो!आम्ही बसल्यावर फांदी वगैरे काही तुटत नाही हं.
असले योगायोग आमच्या बाबतीत तरी घडत नाहीत कधी.
आम्हा कावळ्यांना त्या योगायोगाच्या गुंत्यात अडकायचं नसतं कधी.
नाही म्हणायला जन्ममरणाच्या चक्रात आमची समस्त कावळा जात अडकलेली आहेच की.
तो गुंता सोडवायला आम्हालाच पाचारण केलं जातं.
माणसाच्या मृत्युनंतर तो प्राण दहा दिवस परिभ्रमण करत असतो. अकराव्या दिवशी सपिंडी श्राध्द केले जाते. आणि आम्ही त्या पिंडीला स्पर्श केला तरच आत्मा पुढे सरकू शकतो.
नाही तर त्या आत्म्याला पुढे गती मिळत नाही. या अश्या मृत्युपश्चात वाटचालीची जिवंत असलेल्या कुटुंबीय, नातेवाईकांना पूर्ण जाणिव असते. आणि म्हणूनच एरवी शूक-शूक, हट-फूट करणारी ही माणस डोळ्यात प्राण आणून आमच्या आगमनाची वाट पाहतात. कधी एकदा कावळा येतो आणि पिंडाच्या भाताच्या गोळ्याला शिवतो असं होऊन जातं त्यांना. एकदा का आम्ही पिंडाला शिवलो की सुटतात मुलं बाळं आणि तो शरीर सोडून गेलेला जीवही. जन्ममृतूच्या चक्रात वाट मोकळी करून द्यायला हा काळा कावळाच लागतो मानवाला.
पण आमच्या पोटात कावळे कोकलत असले तरी `दिसला भात, मारला डल्ला, आणि जोवलो यथेच्छ!` असं होत नाही.
कारण आम्हालाही नियम असतात.
माणसं नसतील पाळत. पण आम्हाला बंधने पाळावी लागतात.
जाऊ द्या.....
तुम्हा माणसांना ते नियम माणि बंधन सांगून काय उपयोग ?
`XXX पुढे वाचली गीता`.
मुद्दामच फुल्या वापरल्या. त्या बिचा-या कष्टकरी प्राण्याचा अपमान नको.
तर....
तुमच्या पुढे ज्ञान पाजळून काय उपयोग?
तुम्ही माणसं म्हणजे ......
जाऊ द्या झालं.....
उगाचच आमचा वेळ कशाला दवडू आम्ही?
पोटापाण्यासाठी काही मिळतं का ते शोधायला हवं. तेही एकाच डोळ्याने.
आम्ही थोडीच साठवण करतो तुमच्यासारखी?
जातो आम्ही...
पण एक लक्षात ठेवा ---
रंग माझा कुट्ट काळा,
दिसे जरी मी जरा बावळा,
नसे माझा गोड गळा,
असे जरी मज एकच डोळा,
मनाने मी भोळा, भाबडा,
नाव ठेविले माझे कावळा,
असाच मी जगा वेगळा.


(हा लेख २००८ च्या ‘मेळ ग्रहांचा‘ या दिवाळी अंकात प्रकाशित झाला आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा