"अरे देवा, १ जानेवारीला निदान २०-२५ तरी ई मेल आल्या आणि तेवढेच फोन".
सर्वांनी एकच म्हटले होते -"हॅपी न्यु ईअर".
"काय कुणास ठाऊक मनापासून इच्छिले की नुसतेच वरवर म्हटले"?
नाही, उगाचच शंका दाटून आली आहे मनात.
१० -१५ दिवस होतात न होतात तर या वर्षी ही आली की संक्रांत...नेहमी सारखी...
१० -१५ दिवस होतात न होतात तर या वर्षी ही आली की संक्रांत...नेहमी सारखी...
काळी संक्रांत. काळ्या रंगाचा सण.
संक्रांत, संक्रमण, आक्रमण अशा शब्दांची जरा भीतीच वाटते.
"आता कुठचं संकट मांडून ठेवलंय पुढ्यात"असं वाटतंय.
पण पुढे दिसताहेत ते तिळाचे लाडू. मऊसूत वड्या. गुळाच्या पोळ्या. गोड गट्ट पांढरा शुभ्र हलवा.
अय्या!!
काळी असली तरी आहे पांढ-या तिळाची. पांढ-या हलव्याची!
अगदी गोड गूळाची.
कोणी मुर्खाने अश्या गोड संक्रांतीचा `तो` अर्थ लावला कोण जाणे?
`त्या` अर्थाचं खरंतर काहीच नाही.
कदाचित ..असेल विरोधाभास...
निटसं पाहिलं तर किती काही सांगितलं आहे पहा...
नाव संक्रांत म्हणजे संक्रमण. त्यातच बदल दर्शवणारी. बदल हा तर निसर्गाचा अविभाज्य भाग.तोच दाखवणारी. थंडीपासून उष्म्याकडील बदलाचे संक्रमण.
मनातला राग, लोभ आपापसातली कटू भांडण विसरून गोडपणे एकत्रित व्हायचा सण. म्हणजे पुन्हा बदल!
हळदी कूंकू, वाण यांच्या निमित्ताने भेटीघाटीचा सण. एकमेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जात असते ते याच सणात.
काळ्या साडीवर पांढरी चमकी असलेल्या चंद्रकळा साडी नेसायचा सण.
एरवी काळा रंग नकोसा. निषिद्ध, अशुभ, दुर्लक्षित. पण या सणात त्याचेच महत्व. कपडे घलावेत तर काळेच.
गोड गुळाच्या पोळीच्या सहाय्याने जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने साजरा करायचा हा सण.
आकाश उंच असलं तरी जमिनीवरून पतंगाच्या द्वारे त्याला गवसणी घालून त्याला काबिज कारायचं ते आताच.
स्निग्धता तिळाची, गोडी गुळाची
त्याच मजा काटेरी हलव्याची.
सर्वानी मिळून गलका केला
"तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला...."
काळी असली तरी गोडधोडाची संक्रांत.
तुमच्या जिवनात ही गोड गोड संक्रांत पुन्हा पुन्हा येवो हीच सदिच्छा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा