उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

६ फेब्रुवारी, २०१०

श्री गजानन महाराजांचा १३२ वा प्रगटदिन

अमेरिका!
जगातल्या अनेक लोकांचे स्वप्न!
माझ्यासाठी आणि माझ्या यजमानांसाठी अमेरिका ही स्वप्न नव्हते. परंतु आमच्या एकुलत्या एक मुलाने अमेरिकन युनिव्हसिटीतून पदवीधर व्हावे ही आमची प्रबळ इच्छा होती. त्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि एकदाची माझ्या यजमानांना हव्या तश्या नोकरीची संधी आली. त्यांनी अर्ज केला आणि दप्तरी कामांनी वेग घेतला. `तिथे अमेरिकेत कुणी भारतीय ओळखीचे आहे का` याची आम्ही शोधाशोध करायला लागलो. इ-मेल ग्रुपमधील अपरिचित अश्या एका- दोघांशी मी संपर्क केला. त्यांनी त्वरित उत्तर दिले. ओळख तर झाली शिवाय त्यांनी मदतीचा हात पुढे केला. काही उपयुक्त सूचना दिल्या. आमच्या शंकांचे निरसन केले. काही प्रश्नांची अचूक उत्तरे मिळण्यासाठी अजून ओळखी करून दिल्या. या दोन तीन महिन्यात आमच्या अमेरिकन व्हिसाचे आणि इतरही कागदी घोडे बेफाम दौडले. तीन किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष प्रयत्न करूनही अमेरिकेला जायला अयशस्वी ठरलेले आपण अनेक पाहिले आहेत. मात्र यजमानांना अमेरिकेतील नोकरीच्या संधीची केवळ कुणकुण लागल्यापासून अवघ्या तीन महिन्यात आमचे तिघांचे कुटुंब अमेरिकेत दाखल देखी झाले. ही सर्व केवळ श्री गजानन महाराजांचीच कृपा. निव्वळ चमत्कार !
इथे पोचलल्यानंतर त्या परिचित तरीही आधी कधीही न भेटलेल्या स्थायिक मराठी लोकांशी अधिक संवाद साधला. आणि काही काळातच कळले की ते श्री दत्तगुरू उपासक आहेत. त्यांची श्री साईबाबा, श्री स्वामी समर्थ, श्री टेंबे स्वामी याप्रमाणे शेगांवचे श्री गजानन महाराजांवरही श्रध्दा आहे. त्यांच्या ओळखीतील इतरही असेच भक्तीमार्गातले आहेत हे कळल्यावर आम्हाला खूप आनंद झाला. काहीही विशेष प्रयत्न न करता आमच्या ओळखी वाढल्या आणि त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मैत्री म्हटली की मिलजुल, खाणे पिणे याबरोबरच एकमेकांना मदत, त्यांच्याशी मोकळेपणाने केलेले हितगुज ओघाने आलेच. पूर्वी इतर मैत्रिणींकडून ऐकिवात आल्याप्रमाणे “ये लो! और एक देसी आ टपका” असे आम्हाला कधीही कुणी ना ऐकवले ना जाणवून दिले. एका परिवारातलेच म्हटल्यावर जो आपलेपणा अपेक्षित असतो त्याचाच आम्हाला इथे प्रत्यय आला. साता समुद्रापलिकडे आपल्याला सामावून घेणारा परिवार भेटणे ही सुध्दा श्री गजानन कृपाच नव्हे काय?
दिवस जात होते. इथल्या मराठी मंडळात, इतर समुहामधे जाणे येणे होत होते. ओळखी वाढत होत्या. तूम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की चार नविन ओळखीतला निदान एक तरी श्री दत्तगुरूपासक होता. त्यांच्याशी अधिक नाते जुळले हे वेगळे सांगण्याची जरूरीच नाही.
हे २०१० साल सुरू होता होताच भारतात शताब्दी वर्षातील श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या उत्सवाच्या हालचालींनी वेग धरल्याचे कळले. विविध ठिकाणीच्या कार्यक्रमाच्या माहित्या आई-बाबांकडून कळत होत्या. जानेवारीतल्या तिस-या आठवड्यापासूनच त्यांचात ही श्री उपासनेच्या उत्साहाचे वारे फिरू लागलेले जाणवले.
त्याच दरम्यान एकदा आईने विचारले “तू प्रकट दिनाला काय करणार आहेस?”
“ काही विशेष नाही. इथे कुठे काय करणार? पोथी वाचेन जमलं तर” असं म्हणून मी विषय दुसरीकडे वळवला.
प्रकटदिनाचा आदल्या आठवड्यातील शुक्रवारी रात्री मधेच जाग आली. पुन्हा झोप लागे ना. शांत शरीराच्या बंद डोळ्यातून माझे मन मात्र विविध विषयात भटकत होत. रात्री असं काही झालं की ब-याचदा मी नामस्मरण करते. मग नकळत कधी तरी झोप लागून जाते. त्या रात्री हे तसेच नामस्मरण सुरू केले आणि एक विचार मनात चमकला. आपल्या घरी या शताब्दी वर्षात श्री गजानन भक्तांना जमवून श्री गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला तर ? सर्व मित्र-मैत्रींणींमधे काही जण व्यक्तिशः श्री गजानन महाराजांचे भक्त नसले तरी बरेचसे श्रध्दाळू साधक आहेच. श्री दत्तगुरूची नेमाने उपासना करणारे आहेत. त्यांना प्रकट दिनाला शुक्रवारी संध्याकाळी घरी बोलावून सामुहिक सेवा करण्याची कल्पना खरतर माझ्या मनालाच फार भावली होती. भक्त मंडळी नक्की येतील असा विश्वास वाटला. श्री गजानन विजय ग्रंथातील २१व्या अध्यायाचे सामुहिक वाचन, नामस्मरण, आरती आणि नंतर महानैवेद्य अशी छोटेखानी सेवेची रूपरेषा मनातल्या मनात तयार केली. पुन्हा नामस्मरण करत करत झोपी गेले. शनिवारी सकाळी यजमानांना माझ्या मनातील सामुहिक सेवेबद्दलचे विचार सांगितले. कामकाजात सतत व्यग्र असणा-या यजमानांकडून मदतीची अपेक्षा नव्हती. परंतु घरातील या उत्सवाला त्यांची अनुमती असण आवश्यक होतीच. त्यांनी ती चुटईसरशी दिली ही.
आमच्या घरी इतर भक्तांना जमवून त्यांच्याकडून अशी सेवा करून घ्यावी आणि त्यांना शुभाशिर्वाद द्यावेत असे तर महाराजांना वाटले नसेल? रात्री मी नामस्मरण करताना आलेल्या सामुहिक सेवेच्या या विचारांची पेरणी माझ्या मनात श्री गजानन महाराजांनीच केली असे मला वाटून गेले.
`आले देवाजीच्या मना । तेथे कोणाचे चालेना । ` हेच खरं!
झालं. योजना साकार झाली. संमती मिळाली. रूपरेषा ही निश्चित झाली.
लगेचच काही भक्तांना फोन करून या शताब्दी वर्षातील श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आखलेल्या उत्सवाची कल्पना सांगितली. त्यांनी अगदी उत्साहाने आमच्या घरी येण्याचे निश्चितच करून टाकले. “काही मदत हवी असेल तर सांग” असे केवळ वरकरणी न सांगता “मी भाक-या आणेन”, “मी मऊ खिचडी आणेन” असे म्हणून मैत्रिणींनी दुजोरा दिला. तर कुणी गोड धोड प्रसाद घेऊन येण्याचे आपणहून आश्वासन दिले. मी ही आनंदाने होकार दिला. आमच्या तर्फे काही मेजवानी ठरवली नव्हती. ह्या सामुहिक सेवेत सर्वांचा हातभार हवाच होता.
दुस-या दिवशीपासून अजून पुढची तयारी सुरू केली. सर्वांना ईमेल द्वारा कार्यक्रमाची संपूर्ण माहिती दिली. त्यांनी श्री सेवेसाठी आमच्या घरी जरूर उपस्थित राहण्याचे ठरवले. भक्त सख्यांनी त्या स्वतः घरी तयार करून घेऊन येणा-या नैवेद्याच्या पदार्थांची यादी केली. जेणे करून विविध पदार्थ श्री महाराजांना अर्पण करता यावेत ही सा-याजणींची इच्छा होती. सर्व कार्यक्रम व्यवस्थित निश्चित झाला.
आता प्रत्यक्ष तयारी आणि नंतर अंमलबजावणी बाकी होते.
५ फेब्रुवारी, २०१०- प्रकट दिनाच्या दोन दिवस आधी सर्व घराची साफसफाई केली. घराच्या मुख्य दाराला रंगित तोरण चढवले. बाहेर जाऊन दुकानातून कृत्रिम फुलाच्या माळा आणल्या. पेपर प्लेट, पेपर ग्लास वगैरे ही सामान आणले. आदल्या दिवशी घरातील लिव्हिंग रूम मधील सामानाची हलवाहलव केली. तिथे अनावश्यक असलेले सामान हटवून जागा पूर्ण मोकळी केली. तसेच कार्पेटवर सतरंज्या पसरवून ठेवल्या आणि संध्याकाळी ताजी फुले, विड्याची पाने, फळे, इतर नैवेद्यासाठी लागणारे सामान जसे की कांदा, मिरच्या वगैरे आणले. श्री गजानन महाराजांच्या नैवेद्यासाठी बेसन लाडूही करून ठेवले. पूजेसाठी टेबल मांडले. त्यावर छानसे टेबल क्लॉथ अंथरले. मागे फुलांच्या माळा सोडून सुशिभित केले.बाजूच्या फुलदाण्या फुलापानांनी सजवल्या. दुस-या दिवशीच्या पूजेसाठी जय्यत तयारी करून ठेवली.
प्रकट दिनाच्या दिवशी शुक्रवारी सकाळी माझ्या यजमानांनी पूजेच्या त्या टेबलावर विडा, पैसा, सुपारी, श्री फळ, तसेच इतर फळे मांडली. समई, निरांजन लावून शंख, घंटा ठेवली. मधोमध श्री दत्त गुरूंचा फोटो ठेवला. त्याखाली श्री गजानन महाराजांचा फोटो व त्याखाली त्यांच्या पादुकांची स्थापना केली. पादुकांची साग्रसंगित पूजा केली फु लांची आरास केली आणि आरती करून ते ऑफिसला निघून गेले. मी ही रोजच्या प्रमाणे श्री गजानन विजय पोथी वाचली. श्री गजानन महाराजांची सहस्त्रनामावली म्हटली. साध वरण, तूप, भात तसेच खिर असा साधासा नैवेद्य दाखवला. त्यानंतर उत्साहाने संध्याकाळच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या तयारी लागले. महानैवेद्यासाठी काही पदार्थ तयार केले. स्वयंपाक घरातली साफसफाई पूर्ण केली. दिवसभर बाहेर पाऊस कोसळत होता. एकत्रितपणे आपलीच सेवा करण्यासाठी जमताना आपल्या भक्तांना त्रास होऊ नये असा महाराजांचा विचार होता की काय कोण जाणे पण चमत्कार असा की संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पावसाने जी दडी मारली ती थेट रात्री उशीरापर्यंत. ती संधी साधून मी दाराबाहेर रांगोळी काढली. त्यात मेणबत्तीचे दिवे लावले.
संध्याकाळ होतहोताना हवेत गारठा मात्र वाढू लागला होता. सातच्या सुमारास एकेक जण जमू लागले. बाहेरच्या थंडीतून आल्या आल्या एका भक्तसखीने आणलेले गरम गरम टोमॅटो सूप प्यायल्यावर सर्वांच्या शरीरात चैतन्य भरून आले. काही वेळातच बरेचसे भक्त गण जमल्यावर श्री सेवा सुरू केली.
व्रक्रतुंड महकाय श्री गणेशाचे स्मरण केले. गुरूब्रम्हा गुरूर्विष्णु गुरूदैवो महेश्वराचे ही स्मरण केले. त्यानंतर श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक वाचन केले. सर्व भक्तांकडे ही पोथी नव्हती. ईंटरनेटवरच्या श्री गजानन विजय पोथीतील २१ व्या अध्यायाचे पान लॅपटॉपमधे उघडले आणि लॅपटॉप टीव्हीला जोडला. यामुळे तिथे जमलेल्या सर्वांना एकत्रपणे हा अध्याय वाचता आला. त्यानंतर `श्री गजानन जय गजानन,' 'पावन पावन नाम राधे श्याम, राधे श्याम. मधुर मधुर नाम सिताराम सिताराम' आणि 'गण गणात बोते` या टाळ्या, टाळ आणि आणि तबल्याच्या ठेक्यावर केलेल्या नामस्मरणात भक्तगण तल्लीन झाले नसते तरच नवल होते. पुढे याच नादात भक्तीभावाने आरत्या केल्या. एरवी आईचे लक्ष सतत आपल्याकडे वेधून घेऊ पाहणारे छोटूसे भक्तही टाळ्या वाजवून यात सामिल झाले. महारांजांना फुले वाहून समोर डोक टेकून `बाप्पाला जय जय` केला. नंतर विद्युत दिवे बंद करून एका भक्ताने केलेल्या ॐ कारा ने सर्व भक्तांच्या मनात भक्ती तरंग उठल्याशिवाय राहिले नाहित.
त्यानंतर श्री महारांजाना नैवेद्यार्पण केले. मी घरी केलेल्या कांद्याचा झुणका, लाल भोपळा भाजी, मटारची उसळ, लाल मिरच्यांचा ठेचा, तळलेल्या हिरव्या मिरच्यां सोबत भाकरी, भोपळी मिरच्यांची भाजी, खिचडी, कढी, पापड, गाजर तसेच फळांचे लोणचे, आणि गोड शिरा, गव्हाचा गूळ घातलेला शिरा यानी चांदीचे ताट सजले. शिवाय अनेक मिठायाही महाराजांसमोर ठेवल्या. सर्व मैत्रींणींनी माझ्या स्वयंपाकघराचा ताबा घेउन अन्न गरम करणे, महाराजांसाठी नैवेद्याचे ताट मांडणे, इतरांसाठी पाण्याची सोय वगैरे कामे केली. या त्यांच्या आपणहून केलेल्या सहकार्यामुळे मी वर कामाला आणि इतर व्यवस्थेला मोकळे होते. बुफे टेबलवर मांडण्यात आलेल्या सर्व पदार्थांचा भक्तांनी चविने आस्वाद घेतला. भक्तिपुर्वक श्री चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन भक्तमंडळी तृप्तीने आणि समाधानाने घरी परतले.
अश्या प्रकारे आमच्या घरी अमेरिकेला सदगुरु श्री गजानन महाराजांचा १३२ वा प्रगटदिन भक्तगणांनी उत्साहाने साजरा केला.
एकट्याने आनंद उपभोगता येतच नाही. भारताबाहेर राहूनही आम्ही श्री गजानन भक्तीचा एकत्रपणे आनंद कसा लुटला ते आपल्या पर्यंत पोचवावे असे वाटले. आणि अजून असे ही सांगावेसे वाटले की अमेरिकन भौतिक जिवन जगताना भारतिय संस्कारात रूजलेली आमची पाळमूळ चार भितींच्या आड भक्तीभाव राखून आहेत आणि त्या श्री श्रध्देवरच जगाच्या पाठीवर कुठल्याही प्रसंगांना सामना करण्याची शक्ती धारण करून आहेत. त्या आधारेच ते कुठल्याही मातीत तग धरून शकतात. इतकेच नाही तर तिथे ही ते फुलतात आणि बहरतात.
हे त्या गजाननाचेच आशिर्वाद.
जय गजानन.

(हा लेख मुंबईतील माहिम येथिल श्री गजानन महाराज मंदिराच्या ‘श्री गजानन आशिष‘ अंकात प्राकाशित झाला आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा