उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

३ मार्च, २०१०

काळा सर्प

स्प्रिंग सिझन सुरू झाल्यावर निसर्गातील उफाळून आलेले चैतन्य जणू आमच्यातही  भरून आले. मागच्याच आठवड्यात  फुलं-फळं झाडांच्या नर्सरीत जाऊन छान फुलांची दोन मोठी झाडे आणली. टोमॅटो, बारीक मिरची  आणि काकडीची इवली इवली रोपे आणली. त्यासाठी ज्यात रोगप्रतिकारक औषधे, फर्टीलाझर्स आहेत अशी महागाईची माती आणली. बागकामासाठी लागणारी अवजारे आणली. आणि त्याच विक एंड्ला सकाळापासून मी आणि माझे यजमान कामाला लागलो.
दुपारपर्यंत
खड्डे खणून मोठी झाडे, छोटी रोपटी लावून झाली. दुपारचे जेवण झाल्यावर  पुन्हा कामाला लागलो
आमच्या फ्रंट यार्ड मधले लॉन वाढतच नव्ह्ते कारण मधेच एक मोठे मेपलचे झाड आहे.  थंडीच्या दिवसात काटकुळ्या  झालेल्या या  झाडाला  आता बहर आला आहेफुलं-पानांनी झाड डवरले होते. पण त्याची सावली लॉनवर पडून ते गवत मात्र मृतवत दिसत होतेम्हणून  मेपल ट्रीच्या फाद्या कापणे आवश्यक होते. इलेक्टीक सॉने यजमान मोठाल्या फाद्या कापत होते आणि  हेल्परचे म्हणजे माझे काम होते की त्या फांद्या घरामागच्या खड्ड्यात टाकून देणे. आमच्या घरामागे ओढ्यासारखा लांबच लांब खड्डा आहे. बरीच झाडे आहेत त्यातआमच्या घरातून खूप हिरवेगार दिसते तिथेहरत-हेचे  सुंदर गाणारे  पक्षी, काळी हरणेझुपकेदार खारीगबदूल बेवारस मांजरीछोटुले ससे  हे त्या सौंदर्यात भार घालत असतात. त्यापलिकडे असलेले सॉकर फिल्ड आनि गोल्फ क्लबचा जरासाही त्रास या निसर्गाला होत नाही. कारण एकच तो ओढ्यासारखा लांबच लांब खड्डा!
 त्यात आजूबाजूला असलेल्या झाडाच्या फांद्या, पाने, फुले सतत पडत असतात. ( फक्त निसर्ग करतो तोच कचराकुणीही मानव निर्मित काहीही तिथे टाकत नाही.)
माझं कामं होतं की त्या कापलेल्या मेपल झाडाच्या फांद्या त्या खड्ड्यात टाकणे.
आमच्या घराच्या उजवीकडून  बॅक यार्डला जाण्यासाठी जिना आहे. त्या पलिकडे तो खड्डा. मी एकेक करून तो मोठाल्या  फांद्या जिन्यावरून खाली नेऊन त्या खड्ड्यात फेकत होते. वर येताना घराच्या भिंतीलगत काळसर लांब  साप मला दिसलासाS S ओरडत मी घाबरून यजमानांना बोलावले.
"साप? इथे
कुठे?" असं म्हणत ते आले आणि
"हो हो, सापच तो. मारूया त्याला. काठी आण जा गॅरेज मधून" म्हणून मला सांगितले. मी "कुठची काठी, काय काठी" करत घरात पळाले आणि बाहेर  येताना कॅमेरा घेऊन आलेसापाचा दूरूनच फोटो काढला. साप निश्चल होता. "त्याची काय भिती?" म्हणून जराशी धिटावले. यजमानांच्या हातात  माती उचलायचा फावडा होता. तो त्यांनी त्याच्या जवळ नेला आणि टोकाने ढोसल्यासरखे केले.
माझी तर गाळण उडाली कारण सापाने एकदम हालचाल करून पाहिले. धीर एकवटून मी  अजून फोटो काढला. ते सापाला कळलं की काय कोण जाणे पण पोझ देण्यासाठी त्याने अजूनच मुंडी वर उचलली.
यजमान म्हणाले "नाग आहे वाटतंय. फणा काढतोय. जाऊ देऊ त्याला."
"बापरे. येईल की घरात  कधी तरी." मी म्हणाले
"चल जा. काठी आण मोठीशी, मारू त्याला." यजमान म्हणाले.
माझी भूतदया आडवी आली. "नको नको ९११ ला बोलावते. ते घेऊन जातील त्याला"
"ही काही इमर्जन्सी नाही आहे. ९११ कशाला? जाऊ देत."
तेवढ्यत यू टर्न घेऊन सापाने वळण घेतलं आणि तो जीभ बाहेर काढून आमच्याच दिशेने पाहू लागलाते पाहून मी  भितीने गार पडलेसापाच्या जिभेवरून यजमानांना खात्रीलायक वाटू लागले की तो नाग आहे.
"ह्याला मारला तर नागिण येईल."  पूर्वी भारतात काम करत असताना फॅक्टरीत  शॉप प्लोअरवर एकदा नाग निघाला होता. तो यजमानांनी  मारला होता. आठवड्याभरात दुसरा  नाग निघाला होता म्हणे तिथे. तो कामगारांनी मारला आणि ती नागिण होती याची बातमी माझ्या यजमानांना दिली होती. या अनुभवावरून आमच्या घरी दिसलेल्या सापाला ( नाग असो /नसो) मारण्याचा त्यांचा निर्णय झाला.
मला तो मरावा अशी इच्छा नव्हती. त्याला रक्ताळलेलं मी पाहूही  शकले नसतेच. पण तो दृष्टी आड व्हावा अशी माझी इच्छा होती.  आमचा विचार विनिमय आणि निरीक्षण  सुरूच होतं तेवढ्यात सापाने जिन्याच्या बाजू बाजूने खाली बॅक यार्ड कडे जायला सुरवात केली. मी  घबारलेली असूनही त्याचे फोटो घ्यायची संधी दवडणार नव्हतो. साप पुढे, कॅमेरा हातात घेउन मी आणि  झाडाची फांदी हातात घेऊन यजमान त्याच्या मागे असे मार्गक्रमण सुरू झाले.
साप  बिनधास्त  होता असे नाही. पण घाबरून  सरसर पळत ही सुटला नव्हता. आमच्या सारख्या दुष्ट मानव प्राण्यापासून बचाव त्यालाही हवा होता असे वाटले. तो बॅक यार्डच्या लॉनवरून त्यापुढील खड्ड्यातील झाडात जाईल असे वाटले. तिथे खूप झाडी असल्यामुळे स्वत:चा बचाव शक्य होता.
पण त्याने दिशा बदलली आणि तो आमच्या घराच्या डाव्या बाजूच्या चढावाला लागला. हा चढाव पुन्हा घराच्या पुढे येईन संपतो.
तो आमच्या घराच्या उजवीकडून मागे जाऊन डाव्याबाजूने पुन्हा पुढे येणार अशी चिन्ह दिसू लागली. गॅरेजमधे शिरला तर बाहेर काढणं मुशिक्ल. म्हणून ते पुढे जाऊन बंद  पटकन बंद केले
साप बाजूच्या झाडी खालून पालापाचोळ्यावरून जाताना स्पष्ट दिसत होता
गेल्या वर्षी आम्ही घराची वास्तू शांत केली. वास्तू पुरूष आग्नेय दिशेला पुरला होता. त्या दिशेला तो वळला आणि बाजूच्या झुडपामागे दिसेनासा झाला. तिथे लपायला खरतर काही ही जागाच नाही आहे. ना सापटी, ना कपार
यजमानांनी झाडात फांदी ढोसून ढोसून त्याला बाहेर हुसकवण्याचा प्रयत्न केला. पण छे! तो काही बाहेर आला नाही. संध्याकाळपर्य़ंत आम्ही फ्रंट यार्ड मधे काम करत होतो. त्या झुडपाकडे माझी सक्त नजर होती. पण तो काही दिसला नाही.
साप दॄष्टीआड व्हावा अशी माझी इच्छा होती पण तो कायमचा दॄष्टीआड व्हावा अशी  होती.
ती इच्छा कायम होती. तरीही आता माझी नजर  का कुणास ठाऊक त्यालाच शोधत होती.
मनात काही प्रश्न पुन्हा पुन्हा येत होते. 
] तो कुठल्या प्रकारचा साप? विषारी की बिन विषारी?
] खऱच नाग तर नसेल?
] पुन्हा दिसेल का कुठे? घरातबाहेर?
] तो वास्तूपुरूष पुरून ठेवलेल्या जागीच का जावा?
] तिथून शेवटी कुठे गेला?
 काही जणांकडून कळले की इथे ते बिन विषारी साप खूप आहेत. काही जण पाळतात ही. त्यांच्या पासून धोका नाही.
 सापच तो. बिनविषारी असला म्हणून काय डंख मारायचा राहणार आहे?
 माझ्या डोक्यातून तो साप जाईना. कुणाशीही बोलताना त्याचा विषय मी काढत होते. ज्यांनी त्याच्याबद्दल ऐकले होते  ते आवर्जून त्याची विचारपूस करत होते. पण आम्हाला त्याची कोणतीच खबरबात नव्हती. मी तर बाहेर येता जाता तिथे झाडाकडे  रोखून बघत बसायचे. पण आठवडाभर काही पत्ता लागला नाही.
 पुढच्या विकएंडला  मी फ्रंट यार्ड मधे काही ही काम करायचे संपूर्णपणे नाकारले. असहकार पुकारला. यजमान  एकटेच बागेत बागकाम आणि मी आत घरकाम करत बसले होते.  तेवढ्यात यजमान झाडे कापायच्या कात्रीत अडकलेला तो  काळासर्प घेऊन घरात आले. मी  जोरात किंचाळले. तो कात्रीत अडकलेला साप लटकून वळवळत होता. 
झाले होते असे की माझे यजमान झाडाला त्या मोठ्या कात्रीने आकार देत होते तेव्हा तो त्यातला साप त्यांना दिसलाच नाही. आणि तो पाने, फांद्यांसहित कापला गेला.
त्या कात्रीत अडकलेल्या सापाला ड्राइव्हवे वर तसेच अडकवून  ठेवले. तो अर्धाअधिक कापला  गेला होता. रक्त येत होते. तोंडाकडचा भाग निश्चल होता पण शेपटीकडू्न अजूनही वळवळत होता. त्याची ती तडफड काही वेळातच थांबली. यजमानांनी त्याला कात्रीतूनही मूक्त केले.
आता याचे  पुढे क्रियाकर्म काय करायचे?
याची माहिती काढायला भारतात एक दोन फोन केले. सासूबाईंनी सांगितल्यानुसार मागच्या नाल्यात  खड्डा करून त्याला तिथे पूरून यजमान परतले.
 आम्ही आंघोळी करून देवाला आम्हाला माफ करा. त्याच्या आत्म्यास शांती लाभो‘ म्हणून प्रार्थना केली.   तो गेला नव्हताच. आमच्या  डोक्यात होताच. मला हुश्श झाले असले तरीही त्याची  ती जखम, रक्त, तडफड डोक्यातून जात नव्हती. माझे यजमानही दिवसभर अस्वस्थ आणि अबोल होते. त्याच्या पासून सुटका झाली म्हणून आनंद मानावा की त्याच्या  अश्या म्रुत्यूचे कारण आम्ही ठरलो होते म्हणून खेद आणि दु:ख करावे तेच कळेना.
 दूस-या दिवशी आश्चर्यकारक काही तरी घडले. यजमान ऑफिसमधून घरी आले.  येता येताच त्याच्या पायाला, हाताला खास सुटत होती.   घरी येऊन  पाहिले तर  सर्व  मांड्यांवर, पायावर, हातावर लाली आली होती. कातडी जाड होऊन त्यावर बारीक खवले तयार झाले होते.  असे पूर्वी कधी ही झाले नव्हते.
अ‍ॅंटी अ‍ॅलर्जीची औषधाची गोळी घेतानाही  आमचे मन त्या अ‍ॅलर्जीचा संबंध शरीरावर खवलेदार पॅटर्न असलेल्या सापाशी जोडत होते. यजमानांना धडसे जेवणही गेले नाही. रात्रभर बराच त्रास झाला. कातडीला खाज येत होती, जळजळ होत होती.  अ‍ॅंटी अ‍ॅलर्जीच्या औषधाचा काही ही फायदा झाला नाही. दूस-या दिवशी तातडीने सकाळी डॉक्टरकडे जावेच  लागले. 
यार्ड वर्क केले का? तिथे काही तरी  बारीक किडे चावले असावेत आणि तिथूनच ही स्किन अ‍ॅलर्जी झाली आहे असे निदान केले गेले. त्यावर अ‍ॅंटीबायोटिक औषधे सुरू केली गेली.  त्या दिवशी आणि रात्री ही काही उतार पडला नाही. डॉक्टरांना खात्री होती आणि उद्यापर्यंत बरे वाटायला हवे असे सांगितले. त्याप्रमाणे झाले ही. निसर्गाच्या सान्निध्यात काम केल्यामुळे झालेली (आऊट डोअर) स्किन अ‍ॅलर्जी बरी झाली.
पण  अजूनही आम्हाला मात्र ते  स्किन अ‍ॅलर्जी व्ह्यायचे कारण दूसरेच काही वाटते आहे.
 तूम्हाला काय वाटते?

४ टिप्पण्या: