उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२४ फेब्रुवारी, २०१०

अजगर

मला प्राणी खूप आवडतात. पण सर्वच नाहीत. जमिनिवर, भिंतींवर किंवा कुठेही सरपटणारे प्राणी मला आजिबात आवडत नाहीत. किळस वाटते तसेच भितीही. विशेषतः सापांची.
चायनिज कालगणतीप्रमाणे बारा प्राण्यांची नावे बारा वर्षांना दिली आहेत. ज्या वर्षी एखाद्याचा जन्म होतो त्या वर्षीच्या प्राण्याचे गुणधर्म त्या व्यक्तीत आढळतात असे चीनी लोक मानतात. उदा: डॉग ईअरमधे जन्मलेली व्यक्ती प्रामाणिक असते किंवा ऑक्स ईअरमधे जन्मलेली व्यक्ती बैलासारखी कष्टाळू असते.माझा जन्म झाला तेव्हा स्नेक इअर होते. चीनी मतांनुसार मी शांत स्वभावाची, आपापल्या वाटेने जाणारी. पण उगाचच डिवचल्यास मात्र फणा काढून दंश करणारी असायला हवी.
`तशी मी आहेच` असे माझे यजमान म्हणतात. आमच्या दोघांच्या भांडणात तर याचा उल्लेख हमखास होतो.
तर सांगायचा मुद्दा हा की मी स्नेक इअरला जन्मलेले असून सुध्दा मी सापांना भिते.
ही झाली पाश्वभूमी.
आता खरी गोष्ट....
जेव्हा आम्ही अमेरिकेत आमचं स्वतःच घर घेतलं तेव्हाची. सर्व कागदी व्यवहार पूर्ण झाल्यावर घर ताब्यात मिळालं.त्यानंतर समान ने-आण करायला किंवा इतर साफसफाई करून घेण्यासाठी ब-याचदा तिथे जा ये चालली होती. एका संध्याकाळी काही कामासाठी या नवीन घरी गेलो होतो. आता पर्यंत इतकेदा तिथे गेलो-आलो. कुणाला ही याचं सोयर सुतक नव्हतं. तसं तर आमची आधीची मालकिण बरेच वर्ष राहून घर सोडून गेली तरी शेजा-या पाजा-यां ना काही वाटलं असेल असे आम्हाला जाणवलं तरी नाही. तर आम्ही किंवा अजूनही दुसरा कुणी `नविन` म्हणून आल्यावर कुणाला काय त्याचं?
असो. तर आम्ही एकदा तिथे गेलो असता आमच्या घराच्या उजवीकडच्या घरात राहणारा शेजारी बाहेरहून घरी आला. त्याने गाडी त्याच्या गॅरेज मधे पार्क केली आणि काही तरी घेऊन घरात शिरलेलं मी त्याला पाहिलं. नंतर लगेचच रिकाम्या हाताने बाहेर आला तो आमच्याच घराच्या दिशेने.
आम्हाला आमच्या गाडीतल समान घरात नेऊन ठेवायच होत त्यामुळे आम्ही घरापासून गाडी पर्यंत असं आत बाहेर करतच होते. तो हात हलवत “हाय”, “हॅलो” करत जवळ आला.
ते बघून आम्हाला आनंद झाला. आम्ही बाहेरच थांबलो.
“चला! शेजार तरी बरा मिळाला” असं मनातल्या मनात म्हणून जरा सुखावलो.
“टिपिकल अमेरिकन गोरा असला तरी चांगला आहे हो” मी मनातच म्हटलं.
तो पुढे झाला. माझ्या यजमानांना हस्तांदोलन करून आम्हाला `वेलकम` म्हणाला.
स्वतःची ओळख करून दिली. नाव, जॉब बद्दल थोडक्यात सांगितल. आमचीही चौकशी मात्र बरीच केली.
आम्हाला काहीच गैर वाटलं नाही. खरतर अगदी भारतात गेल्या सारख वाटलं. तिथे नाही का शेजारच्या काकू, मामा, अण्णा आपणहून चौकशी करायला येतात. अगदी तस्सच.
कसं बरं वाटलं. गोरा असला तरी कसा आपलाच वाटला.देसी!
बाहेरच बराच वेळ गप्पा मारत उभा होता आमच्याशी.
आम्ही त्याला काही आमच्या घरात बोलावले नाही.
अहो, आमच्या घरात बोलावून काय करणार? बसायला खूर्ची तर हवी ना आमच्या त्या नविन घरात.
आमच्या घरात नव्हती. पण त्याच्या घरात तर असायलाच हवी होती.
इथे अमेरिकेत ना? कस्सच काय?
दोघांनीही एकमेकांना घरात बोलावले नाही.
बाहेरच गप्पा चालू राहिल्या.
बोलता बोलता त्याचा लहान मुलगा “डॅड, डॅड” करत काहीतरी सांगत आला. “धिस इज माय सन.” पुढे काही तरी इंग्रजी नावं ही सांगितलं.
आम्ही हसून त्याच्याकडे पहात त्याला “हाय” केलं. तो डॅड्च्या मागे गेला आणि हात डोळ्यासमोर घेऊन चेहरा लपवू लागला.
“ ही इज बिट शाय.” डॅड मुलाच्या पाठीला थोपटत म्हणाला. आम्ही ही त्याच्या शाळेची चौकशी करायला लागलो. त्यावरूनच त्याच्या वयाचा विषय निघाला.
“टू डे हे बीकेम फाय. ईट्स हिज बर्थ डे टूडे.”
आम्ही आनंदून ( निदान चेह-यावर तसे दर्शवून) “ओह, रिअली? हॅपी बर्थ डे” असं म्हणून त्या छोट्या गो-याला शुभेच्छा दिल्या.
छोट्याने चेह-यावर काहीही प्रतिक्रिया दर्शवली नाही. पण लाजून मागे फिरला आणि धावत घरात पळाला.
मोठा गोरा उत्तरला “ वुई हॅड गॉन टू गेट अ गिफ्ट फॉर हिम. वुई गॉट अ पेट. अ पायथन”
माझा हसरा चेहरा पार उतरला आणि मी विचारला “व्हॉट? अ पायथन?”
या प्रश्नाचं उत्तर होतं “याह. सम थिंग अन युजवल! ही वोंट पू, पी ऑन द कार्पेट. ईट्स अॅन इझी पेट.”
“बट वोंट इट बी डेंजरस फॉर युवर लिटिल किड्स?” माझ्या यजमानानांनी चकित होऊन काळजीच्या स्वरात विचारलं.
“ ईट्स बेबी यट. जस्ट दॅट लाँग” दोन हाताच्या दोन्ही तर्जन्या एक फूट रूंदावत गोरा म्हणाला.
“सम टाईम्स आय मे ब्रिंग हीम आऊट, रॅप्ड अराउंड माय रिस्ट”
माझी वाचाच बंद पडली हे ऐकून.
“ही इ़ज इन केज. डोंट वरी” गो-याला माझी घाबरगुंडी चेह-यावरून दिसली असावी.
फारसं पुढे न बोलता "बाय बाय" करून आम्ही संभाषण बंद केलं आणि आमच्या घरात शिरलो.
झालं! त्या अजगर नावाच्या पेटच गिफ्ट आणलं शेजा-याने. पण हे ऐकून धाब दणाणलं माझं.
अजब तर वाटलंच कारण अजगर हा जंगली प्राणी. अजून पर्यंत प्राणीसंगहालयात पाळतात हे ऐकून आणि पाहून होते.
“इथे अमेरिकेत काय वाट्टेल ते चालत हेच खरं” यजमानांनी अमेरिकेवर कॉमेंट करायची संधी सोडली नाही.
“पण म्हणून जंगली विशालकाय प्राणी का कुणी पाळीव करत? आणि आला म्हणजे सरपटत घराबाहेर?” माझे घाबरे घुबरे प्रश्न!
“ शेजारीच आपलं घर आहे. `या. बसा,`असं म्हण आलाच तर.” यजमानांनी एक कूल उत्तर फेकले.
माझी बोबडीच वळली. आतापर्यंत माझ्याच घरात एक अजगर शिरेल हा विचार मनात डोकावला ही नव्हता.
मला काहीच सुचेना.
या नव्या घरी ये जा करताना त्या गो-याची गोरी बाहेर सिगरेट फूंकत मोबाईलवर बोलत असताना दिसायची. त्यांच्या घरच्या फ्रंट यार्ड मधे लहान सायकल, बास्केट बॉल, हेल्मेट लोळताना मी अनेकदा पाहिले होते. एकदा पावसात ही भिजत पडलेले खेळ दिसले. रात्री-बेरात्री ते तसेच लोळत असतात हे ही माहित होते. ती गोरी फुकाडी फारशी कामसू आणि जबाबदार दिसली नाही.
कधी अजगराशी खेळता खेळता मुलांनी केजच दार उघड टाकलं तर ह्या बयेला कळणार ही नाही? तो अजगर सरपट बाहेर पडेलच आणि थेट आमच्याच घरात येईल अशी आता माझी खात्री झाली.
“अजगर या त्याच्या नावात उकार, रफार किंवा साधी वेलांटी असलेली ही वळणं नाही. मग वाकड्या वळणाने तो इथेच कशावरून येईल? तो कदाचित सुतासारखा ही जाईल की सरळ तिथे पलिकडे.” माझ्या यजमानांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला.
पण माझं मन काही शांत राहिना. त्या रात्री स्वप्नात विविध रंगांचे, जाडीचे, लांबीचे साप मला आजूबाजूला वळवळताना दिसले. अनेकदा मला जाग आली असं म्हणण्यापेक्षा क्वचित झोप लागली असं म्हणणं अधिक वास्तव ठरेल.
मला त्या अजगराच्या विषयाशिवाय दुसरं काही सुचेना.
मी ठाम ठरवलं की त्या शेजा-यांना पेट अजगराच्या पिंज-यासाठी एक कुलूप भेट द्यायचं आणि त्याची एकुलती एक किल्ली आपल्याकडेच ठेऊन घ्यायची.
दुस-या दिवशी घरात मी पुन्हा तो विषय काढला. माझ्या मुलाला आणि यजमानांना मी ही कुलूपाची आयडिया सांगितली तर त्यांनी मला फुल वेड्यात काढलं.
“मग काय कारायचं आता? पोलिस कंप्लेंट करूया का ?” माझं डोक सुपर चाललं.
“त्यांनी लायसन्स घेतलं असेलच. कंप्लेंट करून काय होणार? उगाचच शेजा-याशी वैर.” ईति यजमान.
मी मात्र आता रडकुंडीस यायची बाकी होते. ते पाहून माझ्या घराच्या दोन्ही मर्दांना चेव चढला.
“तू एका मोठ्या काठीला जाड चाकू बांधून ठेव. तो पायथन घरी आलाच तर खचाखच कापून पिसेस कर त्याचे.” मुलाची भन्नाट आयडिया.
“नको नको. सापाचं पालीच्या शेपटीसारखचं असत. जितके तुकडे करशील ते सर्व वळवळत राहतात.” यजमानांनी प्राणीशास्त्रातील अगाध माहिती मला पुरवली.
“पण तू कशाला घाबरतेस? अजगराला खायला दिकाढलं की तो आळश्यासारखा दिवस दिवस झोपून राहतो.” मुलानेही माहितीत भर घातली.
“ आपल्याकडे अजगराला खाऊ घालायला काय मिळणार? घास पत्ती? अजगर तर मांसाहारी प्राणी. आपल्या फ्रिजमधे कोंबडी तर सोडाच पण तिच साधं एक अंड मिळण ही मुश्किल.” माझी असहायता मी व्यक्त केली.
घरात मोठ्ठा हशा पिकला.
“ए मम्मा, पायथन काही फास्टेट रनिंग अॅनिमल नाही. तो सरपटत येई पर्यंत तू पळून जाऊ शकतेस की नाही?” मुलाने तोडगा सुचवायचा प्रयत्न केला.
तो मला पटला नाही हे सांगायल हवं का?
तो अजगर सरपटत सरपटत समोर उभा ठाकला नाही म्हणजे आडवा ठाकला तर मी थिजल्यासारखी होईन. माझ्याच्याने एक पायही पुढे टाकवणार नाही आणि आम्ही दोघे ही एकमेकांकडे आ वासून पाहत राहू हे माझं मलाच ठाऊक होतं.
“घाबरून गाळण उडालेली मी राहेन तिथल्या तिथे आणि तो मात्र झडप घालेल माझ्यावर.” मी होऊ घातलेला प्रसंग वर्णन केला.
“भारतात गेले की नक्की गारूड्याकडे असते तसली एक टोपली आणि पुंगी विकत घेऊया.” असं म्हणून मी भारतातून आणायच्या वस्तूंच्या यादीत अजून एक भर टाकली.
“तू पुंगी वाजलीस तर दूर जायच्या ऐवजी तो पायथन आणि शिवाय आजूबाजूचे अजून साप जमा होतील तूझ्या पुंगीच्या नादावर डोलायला.” यजमानानांनी हाताचा फणा केला आणि तोंडाने फुतकार काढून काढून मला फणा मारू लागले.
मी पुंगी आणायचा विचार माझ्या डोक्यातून हद्द्पार करून टाकला.
पण टोपली आणून ठेवावी असं मनातल्या मनात घोटून ठेवलं.
“अगं किती ते चर्विचरण? तो एवढासा एक फूट भर. तू किती? साडे पाच फूटी. तो तूला करून करून काय करू शकेल?”आता मात्र यजमानांचा पारा चढलेला दिसला.
मी मनातल्या मनातच पुटपुटले, “तो आता आहे फूट भर.पण काही दिवसातच खाऊन पिऊन होईल की अंगापिंडाने तगडा, मजबूत. चांगला दहा बारा फूटी माझ्या दुप्पट.”
मला लगेचच टोपलीचा विचार ही काढून टाकावा लागला. त्याला तर भलं मोठ्ठ पिंप लागेल ठेवायला. तेच बघायला हवं कुठेतरी. असा विचार पक्का केला.
माझ्या मुलाने मला समजवण्याचा प्रयत्न सोङला नाही. “पप्पा तूला टिझ करतोय. पायथनला फणा नाही काढता येत किंवा तो तो फुस्स फुस्स असं ही करत नाही यल्लो कोब्रा स्नेक सारखा.”
यजमानांनी वरती हळूच अजून मसाला भुरकला. “हो. हो. तो बारीकसा दंश नाही करत. तो डायरेक्ट झडप घालतो. चांगला विळघ्यात घेतो आणि बस. मग गट्ट्म!”
शाळेत अभ्यासलेल्या सर्पज्ञानाची आठवण मला पुन्हा करून देण्यात आली.
“अजगर काही विषारी नसतो. पण त्याचा घट्ट पा S Sश... म्हणजे...मृत्यू अ S ट S ळ.”
`अजगर` धड्याची उजळणी गिरवली जात होती.
“नाहीतर तू असं का नाही करत?तू एक बारिक धार धार चाकू सतत जवळ बाळग. अजगराने तूला गिळल तर तू त्याच पोट फाड आणि जिवंत बाहेर ये. मग `माझी शौर्यकथा` नावाचा लेख लिही. अगं, हे नाव पाहून कुणी एकजण तरी वाचेल तूझा लेख.” कुचकट चेष्टेला गंभिर उपदेशाचे वेष्टण होते. अजगर हा विषय जास्तित जास्त चटपटा होत आहे हे माझ्या ध्यानात यायला जरा वेळच लागला.
घरातून काही सहकार्य मिळणार नाही याची आता मला खात्री पटली. आपल्या भितीची इथे कुणालाही ना पर्वा ना गंभिर्य हे ही मला चांगलं कळून चुकलं.
“उगाचच आपल्या फिरक्या घेण्यासाठी विषय कशाला द्या?” असं म्हणून अजगराविरोधी कारवाया करण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा विचार विनिमय करण्यासाठी माझ्या घरातल्या सभासदांबरोबर मीच स्वतःच भरवलेल्या त्या सभेचा मी त्याग केला.
इंटरनेटवरून अजगराविषयी अधिक माहिती गोळा केली.
जवळपासच्या दोन तीन स्नेक कॅचर्सचे फोन नंबर शोधून काढून तोंड पाठ करून ठेवले.
अजगरांना तोंड देऊन यशस्वी ठरलेल्या वीरांच्या अनेक साहस कथा वाचून काढल्या. त्यांनी अवलंबलेल्या सर्व ट्रिक्स पुरत्या समजून घेतल्या. तश्या प्रसंगाला तोंड द्यायचं बळ माझ्या मनात एकवटून ठेवलं.
चुकून पाय पडल्यावर जखमी होऊन वळवळणारे गांडूळ पूर्णपणे मारून टाकण्याच्या प्रयत्नात मी सध्या आहे. लवकरच ते मी शिकेन अशी आशा माझ्या घरच्या मंडळींना वाटते.
यदा कदचित अजगर आमच्या घरी बिन बुलाया आलाच तर त्याची चांगली मेहमान नवाजी करण्यासाठी मी हळूहळू तयार होते आहे.


(हा लेख ‘हास्यगाऽऽरवा‘  अंकात प्रकाशित झाला आहे.)

५ टिप्पण्या:

  1. हा हा.... सहीच गं... खरे आहे... इथे लोकं काहीही पाळत असतात. सरडे, पाली तर अगदी सर्रास... छोटे सापही. आणि कारण हेच की कुत्रे - मांजरी वगैरे सारखी त्यांची उस्तवार करायला नको....
    तुझी तयारी जोरदार आहे... आता इतके स्वागत तू करणार म्हटल्यावर अजगराला मोह व्हायचा हो तुमच्या घरात शिरायचा... :)

    उत्तर द्याहटवा
  2. chhaan lihalay..
    + tumachyaa blog che introduction "उर्मी" faarch chhaan

    उत्तर द्याहटवा
  3. all the best for your fight with python

    उत्तर द्याहटवा
  4. ओह, आत्ता कळलं का अशक्य आहे ते... :)
    पण, साप (किंवा अजगर) काय पाळायची गोष्ट आहे ?? खरच काहीही पाळतात हे अमिरेकन लोक ... बाय द वे, नाव काय ठेवलय त्या गोऱ्या ने त्याच?

    उत्तर द्याहटवा
  5. नाव माहित नाही त्यांच्या त्या अजस्त्र पेट्चं.

    उत्तर द्याहटवा