|| श्री ||
भारत.
दि./ म./ वर्ष.
चि. अमेरिकेस,अनेक आशिर्वाद.
आज मुद्दामच पत्र लिहिण्यास घेतले. कारण मी इथे तर तू तिथे सातासमुद्रापलिकडे. तुझी माझी भेट होणे या जन्मात तरी शक्य नाही. मी निजते तेव्हा तुझी सकाळ झालेली असते आणि मी कामाला लागते तेव्हा तू दमून झोपायच्या बेतात असतेस. सूर्य-चंद्राने ठरवूनच टाकलेले आहे मुळी की एकदा तळ्यात आणि एकदा मळ्यात करायचे.
लहान बहिणीला करतात तसे तुला मी "अगं,तूगं" करते आहे कारण तू तशी खूपच लहान आहेस माझ्यापेक्षा. तुझ्या ब-याच आधी माझा जन्म झाला आहे. म्हणूनच तुला आशीर्वाद द्यायचा हक्क मला मिळाला आहे.
तू लहान असलीस तरी आज माझे मन मला तुझ्याकडे मोकळे करायचे आहे. म्हणून हा पत्र प्रपंच.
माझी काही लेकरे तुझ्याकडे आली आहेत. त्यांना मी नाही गं धाडले. ते ही भूमी सोडून निघत होते तेव्हा प्रत्येक वेळी माझ्याच पायाखालची जमीन सरकली असे वाटत होते मला.
माझ्या विस्तृत कुटुंबाचा पसाराच अवाढव्य. तो दिवसेंदिवस वाढतच गेला आणि मलाच आवरेनासा झाला. माझ्याच मुलांच्या गरजा आणि सुख देण्यास मी कमी पडू लागले. माझ्या सा-या मुलांमध्ये भाऊबंदकी सुरू झाली. ते एकमेकात सौजन्याने वागणे विसरून गेले. माझ्या या कुटुंबाचे स्वास्थ, सुरक्षितता टिकवण्यास मी अकार्यक्षम होऊ लागले.
तू आधुनिक, श्रीमंत. तुझे आकर्षण वाटणे स्वाभाविक होते. मी जी सुखं देऊ शकणार नाही ती तुझ्याकडे आल्यावर सहजी मिळतात हे ठाऊक होते त्यांना. तुझ्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता त्यांच्या अंगी यावी म्हणून त्यांनी इथे असल्यापासूनच प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या काही गुरुजनांनी आणि वडीलधा-या माणसांनीही हिच शिकवण आणि उदाहरणे पुढील पिढीला घालून दिली. मुलांच्या पालकांनी त्यासाठी प्रयत्न आणि साहाय्य केले आणि अनेक जण मला सोडून तुझ्याकडे झेपावले. ती तिथेच रुळली. तुझीच झाली. जणू दत्तकच गेले तुला!
तिथे दत्तक विधानासाठी त्यांनी प्रतिज्ञा घेतली हे मी पण जाणून आहे. पण अमेरिके, ती मुले इथे होती ना तेव्हा त्यांनी "भारत माझा देश आहे" अशी अनेकदा प्रतिज्ञा घेतली होती. बालभारती, शास्त्र, गणित हे आणि इतर कुठल्याही विषयाच्या पाठ्य पुस्तकाच्या पहिल्या पानावर आजही असलेली ही प्रतिज्ञा तेव्हाही होती. ह्याच मुलांनी ती शाळेत रोज म्हटली होती. तोंड पाठ केली होती.
तुझ्याकडची प्रतिज्ञा घेताना त्यांनी त्यांच्या बालपणापासून समजावून आणि समजून घेऊन तोंडपाठ केलेली प्रतिज्ञा मोडून पडावी हे त्यांचे करंटेपण म्हणू की माझ्या संस्कारांतली उणीव?
आज तू चांगली वाटलीस म्हणून तुझ्याशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा करणारे उद्या अजून कोणी उत्तम वाटले म्हणून तुझ्याबद्दलची प्रतिज्ञा सोयिस्करपणे विसरून त्या उत्तमाशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा करणार नाहीत असे खात्रीलायक नाही सांगता येणार. माझी मुले हे कुठून शिकली? असा प्रश्न पडतो मला.
तुझ्याकडे आलेल्या माझ्या मुलांना माझ्याकडे जे नाही ते देऊन तू सुखी केलेस. तू त्यांना आपले मानलेस त्याबद्दल तुझे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तू तुझ्या पोटच्या पोरांसारखी त्यांची व्यवस्थित काळजी घेत असशील या बद्दल शंका नाही.
माझी मुले सदैव आनंदी, सुखी राहावीत असेच मला वाटणार. माझ्या सदिच्छा, प्रेम आणि आशीर्वाद सतत त्यांच्या पाठीशी आहेत.
फक्त ती माझ्या कुशीत नाहीत हीच खंत आहे मनाला. तीच मोकळी करायची होती तुझ्याकडे. आता पत्र संपवते.
आपला लोभ आहेच तो असाच राहावा ही देवाच्या चरणी प्रार्थना.
कळावे,
तूझी
तूझी
भारती ताई.
********************************************************************************
|| श्री ||
अमेरिका
म./दि./वर्ष.
प्रिय भारती ताईस,
सा. न. वि. वि.
तुझे पत्र मिळाले, त्याचे उत्तर पाठवत आहे.
तुझे मन माझ्याकडे मोकळे करावेसे वाटले याचा आनंद आहे.
खरे आहे की तुझी काही लेकरे माझ्याकडे आली आणि इथेच रुळली. तुझी मुले अत्यंत गुणवंत आणि बुद्धिवान आहेत. मलाही त्यांची जरूर आहे हे जगजाहीर सत्य आहे. मी ते नाकारून त्यांना दूर लोटू शकत नाही. पण ती पूर्णपणे माझी झाली असेही मी म्हणू शकत नाही. माझ्याकडची प्रतिज्ञा घेताना आणि घेतल्यानंतरही मी त्यांच्यात डोकावून पाहिले, की माझे कल्याण आणि माझी समृद्धी ह्यांतच त्यांचे खरोखर सौख्य सामावले आहे का? की स्वत:च्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या वैयक्तिक समृद्धीतच त्यांचे सुख आहे?
त्यांचे जीवनमान, रोजचे अन्न, बोली भाषा जाणून घेण्यासाठी त्यांच्या घराघरातही डोकावून पाहिले.
त्यांनी इथे घेतलेली प्रतिज्ञा म्हणजे नुसता देखावा वाटतो गं, देखावा! त्या जनांच्या मनात तूच आहेस. कारण त्यांचा खरा देश भारत आहे. तुझ्यावरच त्या सर्वांचे प्रेम आहे. इथे राहून तुझ्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरा सांभाळण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. कारण त्याचा त्यांना अभिमान आहे. इतकेच नाही तर भारतीय भाषा, संगीत, नृत्य, धर्म यांचे धडे देऊन आपल्या मुलाबाळांच्याही अंगी तुझ्या त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता यावी म्हणून ते सदैव प्रयत्न करीत असतात. आपल्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधा-या माणसांचा मान ठेवण्याचे संस्कार ते आपल्या मुलांवर सतत बिंबवत असतात. तुझी मुले तुझ्याशी आणि भारत देशबांधवांशी निष्ठा राखून आहेत असे नेहमी दिसून येते.
तुझी मुले हुशार आणि व्यवहारी आहेत. केवळ इथली सुखे उपभोगण्यासाठी त्यांनी माझ्याकडची प्रतिज्ञा घेतली असल्यासारखे वाटते. पण उद्या वेळ आलीच तर ते तुझ्याच बाजूने उभे राहतील याबद्दल मला शंका नाही.
’भारत की अमेरिका? कुणीतरी एक सांगा’ हा प्रश्न त्यांच्यासमोर टाकून मला त्यांना पेचात टाकायचे नाही. पण मी तुला हे खात्री लायक सांगते की ते स्वत:ला सुजलाम् सुफलाम् अश्या भारतमातेचेच पुत्र मानतात. तू त्यांना कदाचित सुखदां वाटत नसशील पण तूच त्यांची वरदां माता आहेस म्हणून ते तुला वंदन करून तुझेच “जय हे” गातात.
माझ्या या पत्रोत्तरातून तुझी खंत थोडी तरी कमी झाली असेल अशी आशा करून माझे पत्र संपवते.
आपला लोभ वृद्धिंगत व्हावा हीच देवाच्या चरणी प्रार्थना.
कळावे,
तुझीच
अमेरिका.
********************************************************************************
(हे लेखन इ सकाळच्या पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाले आहे.)
(छायाचित्रे जालावरून साभार.)
(छायाचित्रे जालावरून साभार.)
ही कौटुंबीक नाती भारतीय संस्कृतीत आहेत म्हणून आम्ही तसा वीचार करतो. पण ही सामाजीक नाती भारता शिवाय कुठे पाळली जातात? हिन्दी चीनी भाई - भाई आम्ही म्हटले त्यांनी त्याचा फायदा घेतला व घेत आहेत. आम्ही गाफील होतो, आहोत, असेच राहणार.
उत्तर द्याहटवाभारती ताई वयाने मोठी त्यामूळे सगळ्यांना सामावून घेण्यात गाफील होती. वयोपरत्वे होते असे. आपल्या मुलांना मोठेपणा मोजण्याचे ज्ञान देण्यात गाफील राहीली. त्याचा फायदा परकियांनी घेतला. घेत आहेत. आपल्या घराचे घरपण कशात आहे हे समजवू शकली नाही. ह्या स्थितीचा फायदा काही मोजक्या चालाख, स्वकेंद्रीत स्वकीय मंडळींनी घेतला. प्रकरण चिघळले. मातृभूमी ही कल्पनाच चुकीची आहे हे "विश्वची माझे घर" असे संस्कृत सुभाषितांचे सोयीस्कर अर्थ कट-पेस्ट तंत्राने आमच्या मनावर ठसवण्याचे पयत्न झाले, होत आहेत.
आहे ते गोड माना, काय??? नाहीतर शहिदांच्या यादी तुमचे नाव चढव्हायला मंडळी तयार आहेत. (टोकाची कल्पना वाटली??? शहिद असेच घडले, घडतात)
bhaarati tai vayane mothi kashi kay? India got independance in 1947.
उत्तर द्याहटवाहा लेख वाचल्याबद्द्ल धन्यवाद.
उत्तर द्याहटवाइथे वयाचा विचार करताना ‘देशाचे स्वातंत्र्य‘ हा मुद्दा न घेता ‘मानवाच्या आद्य वसाहती‘ हा मुद्दा लक्षात घेतला आहे.
भारत अमेरिकेपेक्षा अधिक प्राचिन किंवा पुरातन आहे.
लेख छान आहे. ब्लॉगची थिमही आवडली.
उत्तर द्याहटवासुंदर आहेत पत्र. पत्रातील प्रत्येक शब्दातून तुमची देशाविषयीची बांधिलकी अधोरेखित होते.
उत्तर द्याहटवाअभिवादन तुमच्या देशाप्रती बांधिलकीला.
लेख पूर्वीच बघितला होता पण पऊर्ण वाचला नवहता . कल्पना आवडली.
उत्तर द्याहटवाअमेरिकेतल्या भारतीयांची मनोदशा खरोखर समजलीय तुला.