उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

३ डिसेंबर, २०११

अमेरिकेतली आपुलकी

 माझी आई प्रतिमा गोरे हिचे अनुभव आणि विचार  इथे शब्दातीत केले आहेत. 

अमेरिकेतली  आपुलकी

माझी ही अमेरिका भेट आदल्या भेटींपेक्षा वेगळी आहे. पूर्वीचे सर्व प्रवास माझ्या यजमानांबरोबरच झाले.  गेली ४५ वर्षाहून अधिक  काळ सहवास असलेल्या माझ्या यजमानांची साथ आता नुकतीच सुटली. मन रिकामे झाले. सुन्न झालले डोकं आठवणींच्या भोव-यात गटांगळ्या खाऊ लागले. ही परिस्थिती था-यावर येण्यासाठी माझ्या मुलीच्या घरी अमेरिकेत जायचे ठरले.   ठरले म्हणजे मला न विचारताच माझ्या प्रवासाची  आखणी झाली आणि तिकिट ही निघाले.  अशी निश्चिती होऊन ही ‘त्या परदेशात पुन्हा जावे की न  जावे?‘  याचा विचार संपत नव्हता. इथे भारतात आपली माणसे आहेत, परिवार आहे. काही कमी जास्त झाले तर  मदतीचा हात पुढे करणा-या माणसांची  कमी नाही. तिथे त्या परदेशात आपले कोण? फक्त मुलगी आणि तिचे कुटुंब. ‘आपली‘ अशी म्हणण्याजोगी एका हाताच्या बोटांच्या  संख्येपेक्षाही  कमी माणसे. म्हणून सध्या भारतातच रहाण्याचा विचार अधोरेखित होत होता. तरीही ‘इथून बाहेर जाणे‘ हाच दु:खावरचा  तत्काळ इलाज आहे असे सर्वानुमते ठरले. काहिश्या अस्वस्थ आणि उदासिन अवस्थेत थोडे कपडे, औषधे आणि  आठवणींच्या भल्यामोठ्या शिदोरी सोबत अमेरिकेपर्यंतचा लांबलचक प्रवास करून येथे येऊन पोचले.  थकलेल्या  शरिरातील  मन अजून ही तिकडच्या माणसांतच होते. पुढील दोन चार दिवस वारंवार तिथेच फोन होत होते.  ती माणसे अजूनही जवळ आहेत या भावनेने मनाला जरा हायसे वाटत होते.
 त्याच दरम्यान माझ्या मुलीच्या काही मैत्रिणी आणि  त्यांचे कुटुंबिय समाचाराला आले. येण्यापूर्वी फोन केला होता. आधीच्या ट्रिप मधील भेटीगाठींमुळे त्यांच्याशी ओळख होतीच.  ते भेटायला येणार म्हटल्यावर आनंद झाला.  आल्या आल्या काकू कश्या आहात? असे म्हणून सर्वांनी लहानात लहान होऊन वाकून नमस्कार केला. माझे डोळे पाणावले.  ते पाहून मोठ्यात मोठे  होऊन माझ्या पाठीवरून हात फिरवला. खरं तर कुणाच्या मृत्यूनंतर समाचाराला जाणे हा व्यवहार! पण  भेटायला आलेल्या त्या मित्र परिवाराकडे मला कुठलाही व्यवहार किंवा औपचारिकपणा दिसला नाही. दिसली ती माझ्या मानसिक वेदनांची त्यांना झालेली जाणिव.  काही वेळातच  तो दु:खद विषय त्यांनी प्रयत्नपूर्वक टाळून बारीक सारीक हास्य-विदोनाने वातावरण बदलून टाकले.  अजून  वेगळे असे काय हवे होते त्या वेळी मला?
 माझ्या मूलीची दूसरी एक मैत्रिणी आणि तिच्या यजमानांनी ही आमच्या सोयीखातर बाहेर रेस्टोरंटमधे   आमची भेट घेतली. आम्हाला सांत्वनापर शब्द असलेले कार्ड दिले. आमच्या मरगळलेल्या मनाला तजेला आणण्यासाठी  छोटेसे टवटवित  रोपटे  दिले. तिथे रेस्टोरंटमधे  खाण्याकडे कुणाचेच फारसे लक्ष नव्हते. बोलण्यातला विषय माझ्या यजमानांच्या आजारपणाचा, त्यानी भोगलेल्या यातनांचा  आणि आमच्यावरील संकटांचा होता. मनातील दु:ख बोलून  बाहेर काढून टाकण्यासाठी  आपल्याला ब-याचदा श्रोता हवा असतो. तिच भूमिका ती मैत्रिण  आणि तिचे यजमान बजावत होती. मन अधिकाधिक हलके होत होते.
एकदा असाच जरासा दूरून तिन-चार तास प्रवासाच्या अंतरावर राहणा-या एका  परिचितांकडून फोन आला. माझ्या मूलीशी त्यांचा थोडाफार परिचय होता. पण  त्यांच्याशी माझी काही ओळखही नव्हती. त्यांनी वातावरण, विषय बदलासाठी आम्हाला आग्रहाने आमंत्रण दिले. मला तर अतिशय संकोच वाटत होता. पण त्यांच्या आगत्याच्या बोलण्यात इतका आग्रह होता की मी  त्यांची भेट घेणे नाकारू शकले नाही. तिथे गेल्यावर त्या घरी मला अपरिचितपणा अजिबात जाणवला नाही. त्यांनी केलेल्या विविध स्वादिष्ट पदार्थात  त्यांच्या मनातली आत्मियता पूरेपूर उतरली होती.  त्यांच्या मिठास बोलण्याने आमच्या मनातील आठवणींचा कडवटपणा नक्कीच कमी झाला.
अमेरिकेतल्या मिळालेल्या या आपुलकिने आमचे मन झपाट्याने सावरून येत होते. पुढे ही आमची विचारपूस करणारे अनेक फोन येत राहिले. भेटीगाठी होत राहिल्या. ही सर्व माणसे आमचे नातेवाईक नसले सगे-सोयरे म्हणण्याइतकी जवळची वाटायला लागली.  आमच्या दु:खावर मायेने  फुंकर घालणारे हे सर्व जण आमच्या ओळखीचे, माहितीतले होते.   त्यांनी आमच्यावर  केलेले  हे प्रेम  स्वाभाविक असेच होते.   पण अनोळखी लोकांचे काय? त्यांचे  मला  आलेले अनुभव ही  आश्वर्यकारक होते.
माझ्या मनात या अमेरिकेतील लोकांबद्दल  दूरावा आणि त्रयस्थपणा होता. म्हणूनच की  काय, इथल्या विमानतळावर पाऊल टाकताच नाखूष मन बावरले होते.  पासपोर्टवर छप्पा  मारून घेण्यासाठी मी  माझ्या मूलीसोबत त्या गणवेशातील अधिका-यासमोर उभी राहिले.  जवळपास सहा महिने अमेरिकेबाहेर राहिलेल्या माझ्या मूलीला कडक शब्दात प्रश्न विचारले गेले. तिने  वडीलांच्या आजारणापणाबद्दल  सांगितले.  तिच्याकडे एक दृष्टी ही न  टाकता  त्या अधिका-याने विचारले  “How is your father doing now??रडक्या आवाजात तिने निधनाबद्दल सांगितले आणि  आणि भारतातून येताना सोबत आणलेले वैद्यकिय पत्रक समोर केले. अधिका-याने ते  बघितले ही नाही. त्याने त्याच्या हातातले काम थांबवले. आमच्या दोघींच्या पाणावलेल्या डोळ्याकडे बघून “Oh, I am so sorry.” असे म्हणत  माझी थोडीफार चौकशी केली. आमच्या पासपोर्टवर झटकन छप्पा मारला आणि ते  परत करत अतिशय मृदू आवाजात आम्हाला म्हणाला ”Take care. मी अतिशय भारावलेल्या मनाने अमेरिकेत शिरले.  माझा आणि त्या कृष्ण वर्णिय अमेरिकी अधिका-याचा काय संबंध? तो कदाचित त्याचे काम  चोखपणे बजावत असेल. ते ही  त्याच्या नेहमीचेच आणि सरावाचे असेल. पण त्याने  दाखवलेल्या या सहानभूतिने मला परभूमीत स्वागतार्ह निच्छितच वाटले.
पासपोर्टवर छप्पा  मारून बॅग ताब्यात घेतली तेव्हा लक्षात आले की या  भारत ते अमेरिका प्रवासात  माझ्या  सामानाच्या मोठ्या बॅगेचे चाक तुटून तिथल्या मोठ्याश्या भगदाडातून काही सामान बाहेर डोकावत आहे. लागलिच तिथल्या विभागाला कळवले. त्यांनी बॅगेच्या तूटलेल्या चाकाची तक्रार लिहून घेतली. त्याची नुकसान भरपाई होणार नाही असे  सांगितले.  तरीही  विमान कंपनीला फोन करून प्रयत्न   करण्याचा सल्ला मिळाला. आम्हाला काही कागद पत्र तयार करून दिले.   काही दिवसांनी विमान कंपनीला फोन केला. त्यांनी ती  बॅग दूरूस्त करून घेण्यास  सांगितले आणि त्याची भरपाई देण्याचेही सहजी कबूल केले. आम्ही एका ‘लेगेज रिपेअर‘ दूकानात  बॅग  घेऊन गेलो. तिथल्या वयस्कर गौरवर्णिय बाईंनी तूटकी  बॅग तपासली, त्याचा दूरूस्तीचा   खर्च ही लिहून दिला.    हे सर्व करत असताना  त्या माझे निरिक्षण करत होत्या. माझ्या  मनातील दु:खाची सावट माझ्या चेह-यावर त्यांना जाणवली असावी.  त्यांनी माझ्याबद्दल मूलीला विचारले.  मूलीने अगदी थोडक्यात “She is visitor for few days.“  असे सांगितले.  “Is she all right?” म्हणून  त्यांनी अधिकच विचारपूस करण्यास सुरू केली. मग माझ्या इथे येण्याच्या कारणाबद्दल आणि सर्व परिस्थितीबद्दल त्यांना माहिती  पुरवावी लागली.  ते सर्व ऐकताना त्यांचे डोळे माझ्याबद्दल  वाटलेल्या करूणेमुळे  बदलताना मला दिसत होते. ऐकून झाल्यावर त्यांनी बोट उंचावून मूलीला समजावणीच्या स्वरात सल्ला दिला. “You should not leave her alone. Make her stay with you. Don’t let her go back to India.” असे पुन्हा पून्हा बजावले. आठवड्याभराने आम्ही दूरूस्त केलेली बॅग आणायला पुन्हा त्या दुकानात गेलो असता   त्या वयस्कर बाईंनी  माझी आस्थेने पुन्हा विचारपूस केली.  आणि ”She looks better now! म्हणून  हसत शेरा ही मारला.  माझी सुधारलेली मनस्थिती पाहून आनंदित झालेली ‘ती‘ मला  माझ्या अगदी जवळची हितचिंतक वाटली.
माझ्या  यजमानांच्या निधनानंतर माझ्या जावयाच्या ऑफिसमधे त्याच्या सह कर्मचा-यांनी अगदी  छोटीशी बैठक घेतली.  मृतात्म्यास शांती देवो अश्या अर्थाचे  सर्वांनी स्वहस्ते लिहिलेल्या भावनेचे कार्ड जावयांना देउन माझ्या आणि माझ्या मूलीपर्यंत पोचवण्यास सांगितले. ते कार्ड  हाती पडल्यावर मी अश्रूधारा थोपवू शकले नाही.  
 हे सर्व  जण कोण? कुठले?  पण माझ्या दु:खाची त्यांना पर्वा आहे हा विचारच  अत्यंत सुखद वाटत होता. माझ्या  हळव्या झालेल्या मनाला  त्यांचे मायेचे दोन  शब्द आणि त्यांनी केलेली किंचितशी विचारपूसही कदाचित जखमेवर घातलेल्या फुंकरेसारखी अत्यंत सुखकारी वाटत असावी.  शिवाय या सर्वांकडून माझी काडीची ही अपेक्षा नव्हती. अनपेक्षित मिळालेले सुख अधिक आनंददायी असते हे खरेच. अश्या सुखाचा लाभ मला झाला होता आणि तो ही मला  निकड असलेल्या वेळी! म्हणूनच त्याची किंमत मला अधिक वाटत असावी.  
 जगातील कित्येक लोकांचे ‘अमेरिकेत जिवन जगण्याचे‘ स्वप्न प्रत्यक्षात जगत असणारी ही सर्व माणसे.  एक  प्रकारचा माज  किंवा धुंदी चढायला  कितिसा वेळ लागणार? हे माझे विचार.  तरी ही इथे आल्यावर समजले की या  श्रीमंत आणि सुधारित अश्या  समजण्यात येणा-या अमेरिकेत बेफिकीरी असूनही अजून माणूसकीचा ओलावा शिल्लक आहे.  इथे मला बेपर्वा लोक  भेटले नाहितच असे  नाही. पण त्यांच्याकडे विनासायास साफ दूर्लक्ष करण्याची ताकद आता मला मिळाली होती. ज्यांनी आपुलकी दाखवली ती मात्र माझ्या मनाला अतिशय भावली.  आपल्या भारताची  खासियत असलेली आत्मियता, जिव्हाळा इथल्या  काही लोकांतही  आहे हे निदर्शनास आले.  ती मूळच्या भारतीय पण आता अमेरिकी झालेल्या लोकांत अजूनही राखलेली आहे हे पाहूनही आनंद झाला.
सर्वांनी एकमेकांत अशीच  आपुलकी, माया  ठेवा. तिच माणुसकी आहे आणि तिनेच तूम्हा-आम्हा, सर्वांना सतत   बांधून  ठेवो ही सदिच्छा आणि आशिर्वाद.
 आता लवकरच मी मायभूमीत परत जाईन.  पण पुन्हा मी येणार आहे या परभूमीतल्या ‘आपल्या ‘ लोकांत,  अगदी नि:संकोच, निश्चिंत मनाने !
 प्रतिमा गोरे.
शब्दांकन: मीनल गद्रे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा