उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२६ जून, २०१२

अंगणी माझ्या घराच्या-2] Blue Jay


हा ब्लु जे. ह्याच्या शरीरावरच्या बाजूला निळी पिसे आणि पोटाकडचा भाग मात्र पांढरा असतो. पंखावर आणि शेपटीवर  काळे निळे रेषेतले ठिपके असतात. यावर गळ्याभोवतीची  गडद काळी कॉलर  एखाद्या नेकलेस सारखी शोभून दिसते. ही कॉलर वर डोळ्याबाजूला डोक्यापर्यंत वाढलेली असते. चोच,पाय आणि डोळेही काळे असतात. याच्या डोक्यावर कधी कधी उभारलेला  निळा तुरा दिसतो. ब्ल्य जे सुरक्षित असल्यास हा तुरा दिसत नाही. ह्याच्या पिसांतील प्रकाशात बदलणा-या रसायनामुळे याचा निळा रंग विविध छटांत दिसतो. ब्लु जे पक्ष्याच्या नर आणि मादी मधे  फरक सहज दिसून येत नाही. दोघेही  समानच दिसतात.
मोकळ्या आकाशात उडताना ब्लु जे आपली शेपटी शरीराच्या रेषेत ठेवून शांतपणे पंख फडकावतो. हा मंद गतीने उडणारा पक्षी असल्यामुळे  उडताना सहजपणे मोठ्या पक्ष्यांचा भक्ष ठरतो.
हे  पक्षी घरटे बांधण्याच्या जागेबद्दल फारसे चोखंदळ नसतात. अगदी घनदाट जंगलातील झाडापासून ते  मोठ्याश्या न वापरातल्या पत्रपेटीपर्यंत कुठेही ते अंडी घालून राहिलेले आढळतात. इतकेच काय? इतर पक्षी मोठी घरटी सोडून गेले असले  तर तेही ब्ल्यु जे पक्ष्यांना चालते.
 हे पक्षी एक पती/ पत्नी  व्रत पाळणारे असतात. एकदा जोडीदार निवडला की जन्मभर त्याच्या साथीने जगतात. नर आणि मादी  दोघे ही आपले घरटे  बांधतात. नर ब्लु जे घरट्यासाठी लागणारी सामग्री जसे की दो-या, पाने, गोळा करून मादी कडे आणतो आणि मादी ब्लु जे घरटे बांधण्याची तालिम करते. अश्या तालमितील घरटे अर्धवट सोडून  पिलांसाठी योग्य असे घरटे बांधण्यासाठी ही जोडी सुरवात करते. साधारण आठवड्याभरात कच्चे घरटे उभे होते. घरट्याच्या शेवटच्या टप्प्यात मादी स्वत: शोधून हव्या त्या वस्तू गोळा करते. आणि तयार झालेले घरटे मातीने घट्ट केले जाते. ब-याचदा दुस-या पक्ष्यांचे घरटे ही डागडूजी करून हवे तसे बनवून घऊन ही जोडी आपला संसार उभारते.
  मध्य मार्च पासून मादी अंडी  घालू लागते. तेव्हा तिला अन्न भरवायची जबाबदारी नर घेतो आणि  त्यानंतर अंड्यांची आणि पिलांची देखभाल  दोघे ही जोडीने करतात. १५ ते २० दिवसांनी पिले अंड्यातून बाहेर येतात. आणि अजून  १७ ते २० दिवसात उडण्यासाठी तयार होतात.  त्यानंतर हे संपूर्ण कुटुंब पानगळ  किंवा ऑक्टोबरपर्यंत एकत्रच  प्रवास करतात. नंतर  हिवाळ्यतील  अन्नासाठी होणारी संभाव्य  स्पर्धा टाळण्यासाठी तरूण ब्लु जे कुटुंबापासून वेगळे होतात. त्यानंतर जोडीदार शोधून त्यांचे आपापले आयुष्य सुरू होते.
 ब्लु जे कुटुंबवत्सल पक्षी आहे. यात नर मादी जोडी आणि त्यांची तीन ते पाच बछडी असतात. हे कुटुंब ग्रिष्म ऋतु पासून ते  शिशिर ऋतुपर्यंत साधारण पणे एकत्रित  असतात. जिथे  अन्नाचा तुटवडा आणि परिणामी स्पर्धा नसून प्रचंड प्रमाणात अन्न  सहज उपलब्ध असते तिथे दोन चार लहान कुटुंब मिळून मोठ्या गटा्ने /समुहात  राहिल्याचे ही  आढळते.  ही गटजुळणी फेब्रुवारी पासूनच सुरू होते. या गटात एखाद्या मादीच्या वगणूकीचा आदर्श  सर्वांसमोर असतो. ही मादी झाडावर बसली की सर्व समुह  आसपास बसतो किंवा ती उडाली की सर्व समुह  उडतो. जेव्हा हा  समुह एकत्रित उडतो तेव्हा प्रत्येक जण विचित्र आवाज करतो.  जेव्हा झाडावर किंवा जमिनीवर बसतो तेव्हा हा कलकलाट अचानक शांत होतो. मात्र नंतर ब्ल्य जे नर पिसे फुगवून, डोके वर खाली करून बळजोरीचा आवाज करून ही शांतता  मोडून टाकतो. हे प्रकार त्या मुख्य मादीला प्रभावित करण्यासाठीच असावेत. जसजसा हिवाळा  जवळ येतो तसतसा हा समुह फुटून  लहान लहान होत जातो आणि एका नर आणि ती मादी अश्या जोडीपर्यंत  शिल्लक राहतो  आणि मग त्यांचा  स्वत:चा संसार सुरु होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा