उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२४ जून, २०१२

अंगणी माझ्या घराच्या-1]Cowbird


ह्या पक्ष्याच्या दुर्गुणांची तर मोठी यादीच करता येईल. काऊबर्ड मादी दुस-या विशेषत: छोट्या पक्ष्यांवर  आणि त्यांच्या घरट्यांवर  बारिक लक्ष ठेवून असते. ते छोटे पक्षी अन्न/ पाण्यासाठी घरट्याबाहेर पडले की ही मादी त्यांच्या घरट्यात  घुसते. तिथे आपली अंडी घालते. म्हणूनच हे पक्षी brood parasite म्हणून कुप्रसिध्द आहेत.  ही मादी  इतकी लबाड आणि स्वार्थी की  ती तिथली आधिची अंडी बाहेर  ढकलून देते. यात दोन हेतू असावेत. एक म्हणजे केवळ तिच्या अंड्यांना  संपूर्णपणे पूरेपूर उष्ण्ता किंवा उब मिळावी आणि  दुसरे म्हणजे त्या घरट्याच्या मालक पक्ष्यांना अधिक झालेल्या अंड्यांची संख्या किंवा त्यांचा फरक समजून येऊ नये. आपली अंडी दुस-यांना उबवण्यासाठी सोडून देउन त्या पालकांकडे काऊबर्ड पुन्हा ढुंकूनही पाहत नाही. आपली अंडी किंवा पिल्लं कोण मोठी करत आहेत याची तिला जरा ही फिकिर नसते.  हा एक बेजबाबदार पालकच म्हणायला हवा.
 इतर काही पक्षी ही नवी अंडी दत्तक घेतात. त्यांना ती अंडी स्वत:ची नसल्याचे लक्षात येत नसावे किंवा ती घरट्यातून काढून टाकताना त्यांच्या स्वत:च्या अंड्यांना असलेली धोका पत्करायला ते तयार नसावेत. ती दूस-याची अंडी  काढून टाकण्यापेक्षा ती उबवणे अधिक सुरक्षित वाटत असावे.
या पक्ष्यांचे मूळ नाव “buffalo birds” असे होते.घनदाट जंगलात रहाण्यापेक्षा मोकळ्या पठारावरच्या कमी उंचीचे गवत खाणा-या गुरांच्या अंगावरचे, गवतातले किडे खाणारे हे  पक्षी. भट्क्या गुरांच्या मागाहून सतत स्थलांतरीत  होणारे हे पक्षी एकाजागी घरटे करून  स्थिर राहू शकत नाही. ते घरटी बांधण्यात वेळ आणि श्रम दवडत नाहीत. ते दुस-यांच्या घरट्यात  आपली पिले सोडून त्या घरट्यांच्या मालकावर आपली पिले वाढवण्यास सोपवून देतात.  आपल्या पिलांची जबाबदारी दुस-यावर टाकून स्वत: मोकळे राहणारे हे  पालक  पंखाना भिंगरी लागल्यासारखे भटके  तर त्यांची पिले ही जन्मत: तेवढीच पक्के आणि पटाईत! एकतर त्यांच्या उबण्याला कालावधी फारच कमी म्हणजे १० ते १२ दिवस असतो. इतर अंड्यांना त्यापेक्षा अधिक दिवस लागतात. त्यामुळे  त्या अंड्यातून जेव्हा ती पिले बाहेर पडतात तेव्हा काऊबर्ड पिले  मोठी असतात.  अर्थात त्यांची दादागिरी अधिक चालते. पालक पक्ष्यांकडून अन्न मिळवण्यासाठी ते अग्रेसर असतात आणि ब-याचदा या बळजोरीत इतर लहान पक्ष्यांचा नाहक बळी जातो.  स्वत:चे जन्मदाते  टाकून सोडून गेल्यामुळे अनाथ नसली तरी  जबरदस्तीने दत्तक दिलेली ही पिले स्वत:चा बचाव  आणि वाढ करण्यासाठी स्वत:च कार्यक्षम असावेत.  जगण्यासाठी काय करायला हवे ते त्या जन्मजात जिवाला अधिपासूनच  ठाऊक असते.
 त्या जगनिर्मात्याची कमाल आहे नाही का?
काऊ बर्डचा आकार चिमणी पेक्षा मोठी पण कावळ्यापेक्षा लहान असतो.
आमच्या अंगणात ब-याचदा Brown-headed  प्रकारचे Cowbird येतात.  हा नर  हा  रंगाने काळा आणि मानेपासून चोची पर्यंत तपकीरी असा दिसतो.


आणि मादी मात्र संपूर्णत: तपकीरी.


     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा