उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१५ ऑगस्ट, २०१२

लक्षार्चना

 श्री नारदमुनींनी बाल ध्रुवला  त्याच्या दु:ख मुक्तिसाठी व अलौकिक सुख प्राप्तिसाठी  ` नमो भगवते वासुदेवाय'  हा द्वादशाक्षरी विष्णु मंत्र  दिला होता. बाल ध्रुवने यमुना नदीच्या काठावर या महामंत्राचा जप करून कठोर तपस्या केली. अल्पकाळातच  भगवान नारायण प्रसन्न होऊन त्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिले आणि  तूझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशिर्वाद दिला.
तेव्हापासूनच  '  नमो भगवते वासुदेवाय '  ह्या महामंत्राची महती  सर्व जगाला माहित झाली.
 असे म्हणतात की,
 II ॐ नमो भगवते वासुदेवाय II
हा मंत्र जपताचि दुरित तिमिर भंगते.
जेथ ना हिनता, मलिनता ना जिथे,
दिव्य लोकी अशा अढळपद लाभते.

 म्हणूनच आमच्या घरी ह्या महामंत्राचा  सामुहिकरित्या एक लाख वेळा जप करून श्री विष्णुनारायणाचे अवतार श्री कृष्ण  यांना  अर्पण करायचे आम्ही योजिले. अमेरिकेतील भारतीयांमधे अश्या अनेक अध्यात्मिक सेवा सतत  आयोजित केल्या जातात.  मूळचे भारतीय किंवा भारतीय संस्कारित अनेक जण त्यात श्रध्देने सामिल  होतात.  आमच्या घरी त्या तमाम जनतेला बोलावणे शक्य नव्हते. म्हणूनच आमच्या मित्र परिवारातील भक्तांना इ-मेल करून सहभागी व्हायची विनंती केली. आमचा मित्र परिवार ही अध्यात्मिक सेवेची आवड असल्याने त्यांनी लागलीच तयारी दाखवली. एका भेटीत सर्वांचा विचार विनिमय झाला. एक लाख वेळा जप सामुहिकरित्या करायला लागणारे दिवस, प्रत्येक दिवसाच्या जपाची संख्या, त्यासाठीचा वेळ वगैरेचा हिशोब मांडणे गरजेचे होते. दोन तासात एकत्रितपणे किती माळा होतील, पुढे किती जण अश्या सलग जपासाठी उपस्थित राहू शकतील असे प्रश्न समोर आले. त्याची निश्चित अशी  उत्तरे  कुणाकडेच नव्हती. म्हणूनच एक लाख संख्येच्या जपासाठी अधिक कालावधी ठेवावा असे सर्वानुमते ठरले. आणि हा मंत्र ज दि.२४ जून,२०१२ ला सुरू करून ही सेवा पुढील दर शनिवार आणि रविवारी आमच्या घरी सुरू ठेवावी आणि गोकुळाष्टमीच्या  नंतर लगेचच येणा-या शनिवारी श्री कृष्णाची पूजा करून लक्षार्चनाची सांगता करावी असे निश्चित झाले.
 आमच्या घरी या श्री सेवेच्या तयारीला उधाणच आले. संपूर्ण घराची साफ सफाई न कंटाळता पूर्ण झाली.  घराच्या  मोठ्या  खोलीतील खूर्च्या, टेबल, सोफा, कपाट बगैरेची निराळी मांडणी करून अधिक लोकांना खाली बसायला जागा मोकळी केली.  माझ्या मैत्रिणीकडून धातूची ओठावर बासरी असलेली श्री मुकुंदाची साजरी मूर्ती आणली. ती मध्यम उंचीच्या टेबलावरील कापडी आसनावर ठेवून त्या मागे  गोलाकार मोरपिसे लावून छानशी आरास केली.  त्या मागे फिकट पिवळसर पडदे सोडले. निर्गुण निराकार अश्या त्या सर्वोच्च शक्तीच्या समोर बसून त्यांच्याच मंत्राची सेवा अर्पण करताना ती शक्ती अशी समूर्त समोर पाहताना आम्हाला निश्चितच नेत्र सुख  देणार होती.  तो आनंद उपभोगायला आम्ही घरातील सर्व जण आतूर झाले होतो.

 सलग दोन तास एकच जप आमच्यापैकी पूर्वी कुणीच केला नव्हता. तरीही ते करायचे म्हणजे ना कठिण आव्हान वाटले, ना शंका! शिवाय तेवढा वेळ  एकत्र बसायचेच असे निश्चित झाले होते.  तरीही पहिल्या दिवशीच्या अनुभवावरून  पुढील सर्व जपाची निश्चिती होणार होती. ठरल्या नुसार  रविवार दि.२४ जून,२०१२ रोजी सकाळी १० वाजता  आम्ही  सर्व जण आमच्या घरी जपासाठी जमले.  सकाळी लवकरच घरातील देवांची पूजा झाली होती. त्या मुरलीधराच्या धातूच्या उंच मूर्तीसमोर घरातील देव्हा-यातील  बाळकृष्णाची  छोटी मूर्ती  पूजा करून रंगीत कापडी आसनावर ठेवली होती.  त्यावरील सुवासिक फुले,  समोर सुगंधी अगरबत्ती, दोन्ही बाजूला समईतील शुभ्र वातींमधून उजळलेल्या प्रकाशमान ज्योती या मुळे घरचे वातावरण मंगलमयी झाले होते. 

प्रथमत: सर्व कार्य  निर्विघ्नपणे  सिध्दीस नेणा-या श्री गणेशाची  प्रार्थना केली आणि जरासा ही अवधी न दवडता जपासाठी सुरवात झाली. एका भक्ताने पुढाकार घेऊन '  नमो भगवते वासुदेवाय '  हा मंत्र म्हणून त्या मागोमाग सर्वांनी जप पुन्हा म्हटला. वेगवेगळ्यांच्या पुढाकाराने जप सुरवात करून इतरांनी एकत्रित पुन्हा म्हणत सलग दोन तास एकूण आठ माळा झाल्या. त्यानंतर आरती, नैवेद्य करून आम्ही प्रसादाचा लाभ घेतला.
त्या नंतरच्या प्रत्येक  शनिवारी आणि रविवारी आम्ही भेटलो.  ज्यांना जेव्हा शक्य होते तेव्हा तेव्हा भक्त मंडळी हजर होती. जपाची पध्दत आता अंगवळणी पडली आणि सहज घडू लागली. पुढाकार घेतलेल्या भक्ताच्या जपात विविधता होती.  कुणी हळूवार तर कुणी मोठ्याने जप म्हणत होते. कुणी जलद तर कुणी सावकाश म्हणत होते.  कधी कुणाच्या  जपाच्या माळेचे मणी कमी मोजले जात होते तर कुणी न थांबता बंद डोळ्याने पुढे ही म्हणत राहिले. जपाच्या शब्दोच्चारात ही  विविधता होती. कुणाचा ‘ॐ‘ दिर्घ तर कुणाचा वासुदेवाय शब्दातला दुसरा ‘वा‘ दीर्घ तर कुणाचा ‘य‘ दिर्घ असायचा. सलगपणे एकच मंत्र म्हणताना मनाची एकाग्रता ही जरूरी होती.  ब-याचदा कुणी जप करताना त्यांचा नित्याच्या जपाचा मंत्र  सुरू करायचे तर  कधी मधेच तो मंत्र नकळत म्हटला जायचा. मागून पुन्हा म्हणणा-यांना मात्र बिचकळ्यात पडल्यासारखे व्हायचे.   असे विनोद किंवा चूका  वगळता सर्व जप  व्यवस्थित होत होता. ही सर्व सेवा आमच्याकडून घडवून णणारा तो श्री हरीच!
 दर दिवशी झालेल्या  जपाची मोजणी आणि हिशोब होत होता. जपानंतरच्या साध्याश्या जेवणाची मजा काही औरच होती. प्रत्येक दिवशी कुणी एक जण भाजी आणि दोन चार  जणी  पोळ्या आणत होते.   ह्या बरोबरच गोडाधोडाचा नैवेद्य गोविंदार्पण करून त्याची अंगत पंगत व्हायची. त्या  रूचकर प्रसादला चेष्टा मस्करी, गप्पा- टप्पा यांचा स्वादही रंगत आणायचा. पुढल्या दिवशी कुणी काय पदार्थ आणायचा याची ही  ठरवा ठरवी आणि उजळणी  व्यायची.  आमच्या घरी होणा-या या अध्यात्मिक सेवेबरोबरच या सर्व भक्तांचा सहवास आम्हाला खूप सुखावत होता.  ते दिवस कसे  गेले ते कळलेच नाही. प्रत्येक  दिवशी जप झाला की  पुढील दिवसाच्या जपाची ओढ लागत होती. संपूर्ण गोकुळावर मोहिनी घालणा-या त्या कुंजबिहारीच्या लीलांची  पुन:प्रचिती आम्हाला अमेरिकेत ही येत होती. श्यामसुंदर मनमोहनाचा नाद  आम्हाला लागला सता तरच नवल होते.
साधारण अर्ध्यापेक्षा अधिक  मंत्रजप झाल्यावर आम्ही आठवड्यातून एकदा शनिवारी भेटायचे ठरवले आणि जप अखंड सुरू ठेवला. ठरवल्याप्रमाणे गोकुळाष्टमीच्या आधीच्या शनिवारी आमचा एक लाख वेळा मंत्रजप पूर्ण झाला.  जन्माष्टमीनंतर लगेचच येणा-या शनिवारी जापाची  सांगता करायची होती. त्या दिवशी श्री कृष्ण पूजा, दहिहंडी, रासलिला, गोडाधोडाचा महानैवेद्य असा अध्यात्मिक तरीही मनोरंजक असा कार्यक्रम ठरवला होता.  त्यामुळे आता सर्वांना  त्या दिवशीची ओढ लागली.  त्या दिवशी  किती वाजता जमायचे, कुणी कुठला पदार्थ आणायचा,  जपाची अध्यात्मिक प्रकारे सांगता कशी करायची  तिथंपासून ते  त्या दिवशी कुठला पोषाख  घालायचा, रासलिलेला कुठली गाणी लावायची, टिपरीच्या तालावर फेर धरून  किती वेळ नाचायचे  याचा विचार झाला.
ठरल्यानुसार श्री कृष्ण जन्माष्टमी नंतरच्या  शनिवारी दि. ११ ऑगस्ट, २०१२ रोजी सर्वजण  सकाळी १० वाजता आम्ही आमच्या घरी भेटलो. आमच्या  अमेरिकेतल्या घरी जणु गोकुळ अवतरले होते.   काही स्त्रिया गोपिके सारख्या  चनिया चोली वेषात, अथवा भरजरी साडी नेसून नटून आल्या होत्या. पुरूषही पारंपारिक झब्बा, लेंगा अथवा चुडिदार मधे चमकत होते. बच्चे कंपनी  राधा कृष्ण वेषात सुंदर दिसत होते
आमची नविनच ओळख झालेले एक भक्त त्यादिवशी  आले. त्यांनी पारंपारिक भटजीच्या वेषात येऊन आम्हाला चकितच केले. त्यांना पौरहित्य येत होते हे आम्हाला तेव्हाच समजले. खुद्द श्री कृष्णाने स्वत:ची पूजा व्यवस्थितपणे  करवून घेण्यासाठीच आमचा नविन परिचय करून दिला आणि त्यांना आमच्या घरी धाडले आहे अशी  आमची खात्री झाली. त्यांनी  पूजाविधी उत्तम प्रकारे सांगून श्री कृष्णाची षडोपचारे पूजा  करवून घेतली. पूजेनंतर पुन्हा एकदा १०८ वेळा  मंत्रजप  झाल्यावर श्री विष्णु सहस्त्रानामाचा एक पाठ  आरती केली त्या नंतर महानैवेद्य अर्पण करून आणि प्रत्येकाने श्री कृष्णावर तूशीपत्र वाहून आपला मंत्र जप  समर्पित केला.
 त्यानंतर आमच्या घराच्या मागच्या अंगणात जाऊन दांडिया हातात घेऊन तसेच  टाळ्यांच्या तालात  श्री कृष्णाच्या वेषेतील लहान मुलाच्या भोवताली फेर धरून  सर्वांनी गोविंदाच्या  संगितावर गोपगोपिका प्रिय रासलिला केली. त्यानंतर  काही पुरूष मंडळींनी एकत्रितपणे त्या बाल कृष्णाला खांद्यावर घेऊन उंच उचलले. त्याचा दहिहंडीला हात जेमतेम पोचतच होतो तर त्याच्यावर सूचनांचा भडिमार होऊ लागला. एकच गोंधळ उडाला. काहीशी गडबड होऊन त्याच्या हातातून दहिहंडी निसटली आणि दोरीवरच गोलाकार हेलकावे घेऊ लागली. हास्याचे फवारे उडाले आणि खेळ अधिक रंगात आला. काही प्रयत्नानंतर आमच्या बालकृष्णाने हंडीवरचा नारळ काढला आणि ती दही हंडी  फोडली. फुटलेल्या हंडीतून गळलेल्या दही दूधाने माखलेल्या त्या बालकृष्णाचे सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.  अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढत असलेल्या त्या छोट्याने  हा दहिहंडी प्रकार कधीच पाहिला नव्हता. त्याच्या आईने सांगितलेल्या गोष्टींतून त्या्ने केवळ ऐकले होते. तरीही हा काहिसा ‘रिस्की‘  वाटणारा ‘गेम’ तो कृष्णाच्या वेषात  खेळला होता आणि त्यामुळेच आमच्या दहिहंडीला शोभा आली होती. त्या बालकृष्णाला शाबासकी बरोबरच छानशी भेटही मिळाली.  
रासलिला, दहिहंडी झाल्यानंतर सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतला.  सर्व उत्सव निर्विघ्न पणे आनंदात पार पडला. आमच्या घरी अशी प्रदीर्घ आणि सामुहिक प्रकारची सेवा आयोजित करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आमचे भाग्यच होते. हे सेवा कार्य सिध्दीस नेण्यास श्री हरी समर्थ होतेच. तरी ही आमच्या मित्र मैत्रिणींशिवाय ते  पूर्ण होणे काय तर एक दिवशी ही घडून येणे केवळ अशक्य होते.  काहींनी तर ही आपलीच जबाबदारी आहे असे समजून आपली महत्त्वाची कामे पुढे ढकलली आणि जपासाठी नियमित हजेरी लावली. त्यांना धन्यवाद देण्यात आम्ही मागे राहिलो नाही.
सर्वांनाच एकत्रित सेवाच्या परिपूर्तीचा आनंद मिळाला. ही लक्षार्चना पूर्ण झाली असली तरी इथे आमच्या ईश्वरी सेवेला पूर्ण विराम कुणालाच नको होता. लगेचच अश्याच प्रकारची अधिक सेवा करण्याच्या नविन कल्पना समोर आल्या. काहींनी आपले बेत ही ऐकवले. सध्या स्वल्प विरामाच्या काळात असलेली सेवा लवकरच पुढे सुरू राहिल याची खात्री आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा