उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१६ सप्टेंबर, २०१२

श्री गणेश २०१२

श्री गणेश मूर्तीच्या मागची आरास:- जास्वंदाच्या कळ्यांचे चक्र
श्री गणेशाला  लाल फुल प्रिय असते. विशेषत: जास्वंदाचे  फुल! आमच्या इथे अनेकांच्या घराबाहेरच्या बागेत जास्वंदाच्या फुलांची झाडे लावली आहेत. जांभळा, पिवळा, आबोली, गुलाबी, पांढरा अश्या अनेक प्रकारची जास्वंदाची फुले  तिथे आलेली दिसतात. काही दाट पाकळ्यांची असतात तर काही फुले विरळ  पाच पाकळ्यांची. तसेच त्यांच्या आकारात लहान मोठेपणा आढळतो. परंतु भारतात पाच लाल पाकळ्यांची, मधुनच उगवलेल्या पिवळ्या तु-यांच्या फुलांनी जशी जास्वंदाची झाडे डवरलेली  दिसतात तशी इथे कुठेच दिसली नाहीत.   झाडावर दिसलीच तर एकट दुकट फुले!  बाजारात विकायला तर अजिबातच नाहीत.  आमच्या बागेत  ही  जास्वंद नाही .  म्हणून हया वर्षी  कागदाची जास्वंदाची फुले करून त्याचे चक्र श्री गणेशाच्या मागे लावून आरास कारायचे ठरवले.
प्रथम लाल क्रेप कागदाच्या २ इंच रुंद पट्यांचे ४ इंच लांबीचे ५ तुकडे कापून घेऊन त्याला वरून जरासा गोलाकार आकार दिला. ते तुकडे एकमेकात काहीसे अंतर ठेवून खालील प्रमाणे एकमेकांवर ठेवले. 
केवळ खालच्या बाजूने चण्याच्या पुडीसारखी गुंडाळी केली असता त्याला कळीचा आकार आला. त्या गुंडाळलेल्या भागाला ४ इंच लांबीचा हिरवा क्रेप कागद गुंडाळला. त्यामु्ळे देठ तयार झाला.  त्यावर कळी लगतचा हिरवा भागही (sepal) करून चिकटवून टाकला.
फुलाचा मधला स्त्री केसर (pistil ) तयार करण्यासाठी अजून एक ६ इंच लांबीचा लाल क्रेप कागदाचा तुकडा गुंडाळून  समईच्या वातीसारखा वळवून घेतला. त्याच्या एका टोकाला पिवळी मूगाची बारीक डाळ चिकटवून  परागकण तयार केले आणि ती लाल वात कळीच्या आत सरकवून चिकटवून टाकली.  आणि अश्याप्रकारे कागदाची जास्वंदाची एक कळी तयार झाली. ती कळी उलगडून फुल तयार  केले. परंतु ते कळी इतके सुरेख दिसले नाही. खरे तर  फुल काय आणि  कळी काय? दोन्ही कागदाचीच! म्हणजे कृत्रिमच!  तरी त्यातल्या त्यात कळीच जरा कमी कृत्रिम दिसत होती. म्हणून तश्याच अधिक कळ्या तयार करून घेतल्या.
  त्यानंतर  जाडसर पुठ्ठ्यावर ८ इंच व्यासाचा  गोल  काढून कापून घेतला. त्यापेक्षा  अर्धा सें.मी. जास्त व्यासाचा अजून एक गोल  सोनेरी कागदावर काढून कापला आणि तो पुठ्ठ्यावर चिकटवून टाकला.   त्या सोनेरी गोलावर  कागदी जास्वंदाच्या कळ्या गोलाकार चिकटवल्या. उरलेला मधोमधचा रिकामा भाग समोर श्रींची मूर्ती आल्यावर दिसणारच नव्हता. तरीही  तिथे उणीव दिसू नये म्हणून   एक कळी उमलवून त्याचे मोठे फूल  तयार केले आणि ते  त्या  गोलाच्या रिकाम्या मध्यावर चिकटवून टाकले.
अश्या  प्रकारे  आमच्या घरच्या श्री गणेश मूर्तीच्या मागे लावायला जास्वंदाच्या कळ्यांचे चक्र तयार केले आहे. 

त्याची कृती  इथे पहा ---



ते चक्र दिसते आहे छानच. पण ,
रंग ले आएँगे,
 रूप ले आएँगे
काग़ज़ के फूल, 
ख़ुशबू कहाँ से लाएँगे?
पण हे जास्वंदाचे फुल असल्यामुळे ख़ुशबू म्हणाल तर  तसेही नाहीच. पण रंग, रूप  मात्र या कागदाला ही आहे.


त्या कलेच्या देवतेला ही आरास पसंतीस उतरेल अशी आशा  आम्हाला वाटते. अर्थात ही कल्पना सुचवणारा, आणि त्यानुसार करून घेणारा तोच. आमचे असे काय?
बाकी तुमचे  कसे काय? तूम्हाला  श्रींनी काही कल्पना सुचवली का?  त्यानुसार तूम्ही  काय काय केलेत?

२ टिप्पण्या:

  1. कसली सही दिसताहेत ही जास्वंदाची फुलं.....अगदी खरी वाटताहेत. त्यातून स्वत: केल्याचं समाधान वेगळंच !! मस्त !!

    बाप्पा मोरया ऽऽ !!

    उत्तर द्याहटवा
  2. खरंच, सुरेख जमली आहे आरास!

    सूर्यकोटीसमप्रभ दिव्यप्रभा निर्माण करण्याचे सामर्थ्य कागदी का होईना पण जपाकुसुमांत निश्चितच आहे!

    उत्तर द्याहटवा