उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१० नोव्हेंबर, २०१२

“विठू माऊलीचा गजर ...” चक्क येशू ख्रिस्ताच्या दरबारात!

सध्याच्या २०१२ ह्या वर्षी ही अटलांटा महाराष्ट्र मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव सालाबादाप्रमाणे दणक्यात पार पडला. श्री गणेश पूजा, महाआरती, महाप्रसाद, बालकलाकरांनी सादर केलेला मराठी  संगिताचा कार्यक्रम त्यानंतर श्री गणेशाची उत्तर पूजा, मिरवणूक आणि मूर्ती विसर्जन उत्साहात पार पडले.  बहु संख्येने श्री भक्त या उत्सवात सामिल झाले होते. गणपती बाप्पाला पुढल्या वर्षी लवकर येण्याची  विनंती पुन्हा पुन्हा करीत श्री गणेशमूर्ती विसर्जनापूर्वीच्या  मिरवणूकीने मराठी परंपरा साता समुद्रापार अमेरिकेतही  नेमाने सुरू ठेवली.  त्यात लहान मुलांनी सादर केलेले पारंपारिक लेझिम अत्यंत वाखाणण्याजोगे होते.
श्री गणेश पिता श्री महेश हे त्रिमूर्तींपैका एक. श्री विष्णू ही त्यातीलच. या विष्णूचे एक अवतार म्हणजे श्री विठ्ठल. म्हणूनच या वर्षी मिरवणूकीत भगवे झेंडे, टाळ, लेझिम या आमच्या एकत्रित पथकाने विठू माऊलीचा गजर, हरी नामाचा झेंडा रोविला... या गाण्यावर  नृत्य सादर केले. सामुहिक जल्लोशपूर्ण नृत्य आणि गाण्याची निवड यामुळे या मिरवणूकीत  अनुरूप अशी वातावरण निर्मिती झाली. पारंपारिक वेशभूषा, गडद रंगसंगती, झेंडा, लेझिम, टाळ यांचे एकत्र सादरीकरण यावर उपस्थित सुभक्तांकडून पसंतीच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. अभिप्रायांमधे एक होती जवळच्या एका चर्चमधे या श्री सेवेच्या सादरीकरणाचे आमंत्रण.
अटलांटा मधील सेंट पॅट्रिक चर्चमधे शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२ रोजी आंतरराष्ट्रिय महोत्सव  आयोजित करण्यात आला होता आणि त्यात  भारतीय देवाला आळवणा-या ह्या गाण्यावर केलेले महाराष्ट्रिय पारंपारिक नृत्य सादर करण्यासाठी बोलावण्यात आले होते. चक्क येशू ख्रिस्त धर्म मंदिरात आपल्या हिंदू धर्मातील देवाचा गजर करण्याची संधी आम्ही खरे मराठी नक्कीच सोडणार नव्हतो. आम्ही ते आमंत्रण आनंदाने स्विकारले.
 आम्हाला देण्यात आलेली त्या दिवशीची संध्याकाळ आमच्या  पथकातील काहींना  इतर महत्त्वाच्या कामामुळे सोयिस्कर नव्हती. त्यांच्या अनुपस्थितीमुळे आमच्या नृत्यातील जोड्या बदलाव्या लागणार होत्या. काहीसे बदलही आवश्यक होते. त्यामुळे पुन्हा एक दोन वेळा एकत्र जमून  सराव झाला आणि हे  पथक पुन्हा एकदा सामुहिक पारंपारिक नृत्याला तयार झाले.
 त्या दिवशी ठरलेल्या वेळे आधी आम्ही सर्व जण  सर्व तयारीनिशी सेंट पॅट्रिक चर्चमधे पोहोचलो. तेथील आयोजकांची आणि आमची गाठ भेट झाली. थोडक्यात ओळख झाल्यानंतर अमेरिकी पध्दतीने हाय, हॅलो म्हणून आमचे स्वागत झाले. त्यांच्या आमंत्रणाला मान देउन चर्चमधे आम्ही  नृत्य सादर करण्यासाठी आल्याबद्दल आम्हा सर्वांचे आभार मानण्यात आले आणि आम्हाला तेथील सभागृहात नेण्यात आले.
सुशोभित सभागृहात विविध प्रकाराचे संगीत कानावर येत होते.  त्यातच जमावांतील लोकांच्या गप्पा गोष्टींचा गोंगाट भर घालित होता. अनेक जण आपापल्या  मूळ देशातील पारंपारिक वेषात आलेले दिसले. विविध देशातील  कलाकार  आपापल्या देशातील  कला सादर करण्यासाठी उत्सुक होते.  जमलेले प्रेक्षक कुतुहलाने आणि कौतुकाने  त्यांचे निरिक्षण करत होते.  सर्वच जणांना ‘इथे पाहू की  तिथे?‘ असे होऊन गेले होते.
 तिथे अनेक देशातील खाद्यपदार्थांची रेलचेल होती. आमचे डोळे आणि नाक त्या खाद्यपदार्थांच्या खमंग, स्वादिष्ट, कुरकुरीत, झणझणीतपणाची खात्री देत होते. त्या  ननाविध चवी चाखायला काहींना धीर धरवत नव्हता. काहींचे चेहरे त्या पदार्थांवर ताव मारून तृप्त दिसत होते.  काहींनी अर्धवट पोटोबा करून  थोडीशी विश्रांती घेतली होती.
या सर्व गोंधळातही काहीशी शिस्त होती, सुसुत्रता होती. काही अवधीतच कार्यक्रम सुरू होण्याची घोषणा झाली.
वेगवेगळ्या देशातील वाद्यवृंदाचे वादन, गायकांचे गायन अश्या दोन चार  कला सादर झाल्यानंतर आमच्या नृत्याची घोषणा झाली. भारतीय परंपरेची थोडक्यात ओळख करून देण्यात आली.
त्याबरोबर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून आमचे स्वागत केले. आम्ही झेंडा, टाळ, लेझिम सहित आमच्या  नृत्यातील ठरलेल्या जागी येऊन उभे राहिलो.  घोळक्यातील प्रेक्षक पुढे सरसावले. आमची गडद रंगसंगती अमेरिकेतील चर्चमधे नक्कीच विशेष ठरत होती. भारतातील मराठी पारंपारिक वेषभूषाही  ब-याच जणांना अपरिचित असावी. पुरूषांचे लाल कुडते, कपाळावरील  गंध, गळ्यात तुळशी माळा, स्त्रियांनी अंगभर लपेटलेली महाराष्ट्रिय नऊवारी काठापदराची साडी,  डोक्यावर केसांच्या अंबाड्यावरील  फुलांचे गजरे, नाकात हिरा-मोत्याच्या नथी  आणि इतर विविध अलंकार यांचे  अमेरिकेतील प्रेक्षकांना वाटत असलेले आकर्षण त्यांच्या नजरेतून स्पष्ट दिसत होते. अनेकांचे कॅमेरे आमच्यावर स्थिरावले. अतिशय सावकाश आणि हळूवारपणे माऊली, माऊली म्हणत  पुढे जलद होणारे विठूचा गजर... हे गाणे सुरू झाले. आमच्या पथकाने  या संपूर्ण गाण्यावर पुन्हा एकदा नृत्य सादर केले.  नृत्याच्या दरम्यान उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध आणि संमोहित झाल्यासारखे अत्यंत शांत आणि स्तब्ध होते. आमचे संपूर्ण पथकच काय तर सर्व उपस्थित जन जणू पांडुरंगी रंगात रंगले होते.
गाणे आणि त्यावरचे नृत्य थांबल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तो बराच वेळ तो सुरू राहिला.  त्यानंतर आम्ही सभागृहातून बाहेर आल्यावरही आमच्या पथकाचे नृत्य आवडल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या. आमच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
त्यावेळी आमच्या पथकाला झालेला आनंद  एकत्रितपणे सादर केलेल्या नृत्यकलेचा तर होताच पण  त्या पेक्षाही  आपल्या हिंदू आणि विशेषत: मराठी अध्यात्मिक परंपरेची ओळख सातासमुद्रापल्याड  रहाणा-यांना करून देण्याचा होता.  चक्क येशूच्या समोर आपल्या विठूरायाला आळवण्यात आले होते.  ख्रिस्तांच्या  धर्ममंदिरात असा विठूमाउलीचा गजर या भूतलावर पहिल्यांदा झाला असावा. हरीनामाचा झेंडा भिन्न धर्ममंदिरात अश्या प्रकारे रोवण्याचा तो अनुभव आम्हाला वर्णन करण्याजोगा  वाटला. दूस-या धर्माच्या अध्यात्मिक श्र्ध्दा/विचारांचा मोकळेपणाने आणि सन्मानाने स्विकार तसेच त्यांच्या परंपरेचे आणि कलेचे कौतुक करणा-या त्या आयोजक, प्रेक्षक तसेच समस्त जनांना धन्यवाद देऊन त्यांच्या समोर मनापासून नतमस्तक व्हावेसे वाटले.
शेवटी तात्पर्यादाखल सांगायचेच तर असे की ख्रिस्तांचा देव येशू काय आणि हिंदूंचा देव विठू  काय? दोन्ही  ईश शक्ति एकच! या पृथ्वीतलावरील मनुष्य निर्मित धर्मांच्या संकुचित मर्यादा त्या  अनंत ब्रम्हांडाच्या पालक आणि चालक असलेल्या विस्तृत शक्तिला कश्या बरे असणार?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा