उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२१ सप्टेंबर, २०१३

आमचे गणराया २०१३

गेल्या उन्हाळाच्या सुट्टीत भारत भेट धावती झाली. त्या कमी वेळात ही माहिम बस डेपो जवळ असलेल्या जब्बर भाईंच्या लाकडी कोरीवकामाच्या वस्तूंच्या दुकानातून हा लाकडी देव्हारा बनवून घेतला. ह्या भाद्रपद चतुर्थीला त्याचे उदघाटन करण्याचे ठरवले. मुंबईतल्या दादरच्या किर्तीकर मार्केटमधून मोत्यांच्या माळा आणल्या होत्या. (अविश्वासनीय वाटेल म्हणून आई शपथ घेऊन सांगते- एकूण ६ माळा, प्रत्येकी लांबी ६ ईंच, भारतीय रुपये ३०/- फक्त) प्लास्टिक मोत्यांचा दर्जा अतिनिम्न असला तरी अश्या सजावटीसाठी अतिउत्तम आहे. दादरच्या रानडे रोड येथिल सौभाग्य वस्तू भांडार मधून श्री मूर्तीच्या वर लावायला एक छोटी छत्री आणि नैवेद्याच्या ताटाभोवती लावायला मोत्याच्या दोन महिरपीही घेतल्या होत्या. इथे घरात ही हस्तकलेच्या वापरातले लहान /मोठे आणि शुभ्र पांढ-या ते गडद पिवळ्या रंगाच्या मधल्या विविध छटांचे बरेच मोती होते. ह्या सर्व मोत्यांचा वापर करून सजावट करण्याची कल्पना हाती घेतली. आधी छ्त्रीला धाग्याने मोती शिवून काढले. श्री गणरायांसाठी बारीक मोत्याचे दागिने ही तयार केले. ते काम जरा नाजूक वाटत होते. ते जमल्यावर इतर सर्व मोत्यांचा वापर करून देव्हारा सजवला. त्या समोर मोती लावलेल्या हळद, कुंडाच्या वाट्या ठेवल्या. समई, निरांजन वगैरे इतर मांडणी केली. त्या सजावटीचा फोटो-



आणि हा आहे पूजा, आरती, नैवेद्यार्पण झाल्यानंतरचा फोटो -

खिर,पुरण,चटणी, कोशिंबीर, साधे वरण, भात, दहीभात, आमटी, पोळी, बटाटा भाजी आणि कलाकंद बर्फी (सर्व घरी केलेला) असा नैवेद्य आमच्या बाप्पाला आवडला असेल अशी आशा वाटते. तो सुख कर्ता, दु:ख हर्ता असाच पाठीशी राहो आणि आमची सेवा मान्य करून घेवो ही त्याच्या चरणी प्रार्थना.
मंगलमूर्ती मोरया.

२ टिप्पण्या:

  1. देव्हारा सुंदर आहे. एकसंघ करून आणला की पार्ट्स आणून इथे/जिथे कुठे असेंबल केला?

    उत्तर द्याहटवा