उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२० ऑक्टोबर, २००६

सौभाग्यवती

 || श्री  ||
प्रिय स्त्रियांनो,
सा. न.वि.वि.
मैत्रिणींनो, बहिणींनो, नणंदांनो, भावजयांनो, मावश्यांनो, आत्यांनो आणि इतर तमाम स्त्रियांनो,
पत्र लिहिण्यास कारण की मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्यापैकी कितीजणी `सौभाग्यवती अमूक अमूक` असे लिहून मराठी पत्र पूर्ण करता?
काय म्हणालात? फक्त ` सौ.`च लिहिता?
`सौ`-एक शॉर्ट फॉर्म. `सौभाग्यवती` एक लाँग फॉर्म. अर्थ शेवटी सारखाच!
मराठी भाषेत या शब्दाची फोड केली तर सौभाग्यवती म्हणजे जिचे नशीब चांगले आहे अशी भाग्यवान स्त्री. पण मराठीप्रमाणे हे विशेषण प्रत्येक विवाहित आणि ते ही महिलांनाच लागू होते. याचा अर्थ असा की प्रत्येक विवाहित स्त्री ही नशीबवान असतेच. हो की नाही? अक्षता पडल्या पडल्या एक कुमारिका अशी नशीबवान होते म्हणजे विवाहामधे नक्कीच जादू असायला हवी. मग ती जादू फक्त स्त्रीवरच का चालावी?
या पुरूषाने मला पसंत केले हे माझे सुदैव आणि याच मुळे केवळ माझा विवाह झाला आणि म्हणून मी सौभाग्यवती आहे असे किती विवाहित स्त्रियांना वाटते? लग्नानंतर नशीब फळफळलेल्या अनेक स्त्रिया असतीलही. त्या स्वत:ला जरूर सौभग्यवती समजत असतील.पण आपल्या रोजच्या जिवनात आपण अश्या अनेक स्त्रिया पाहतो ज्यांचे जीवन बदलते ते त्यांच्या नव-याच्या मृत्यूनंतर. नरकवास संपून चांगले दिवस येतात ते वैधव्यामुळेच. ते इतर सर्व जण जाणून असतात. मग त्या विधवेनेही स्वतःला सौभाग्यवती म्हणायला हरकत नसावी.
सर्व कलागुणसंपन्न, हुशार, कर्तुत्ववान अश्या बाईचा नवरा तेवढ्याच विरूध्द टोकाचा असेल तर तिने सौभाग्यवती असे लिहिण्यापेक्षा तिच्या नव-यानेच सौभाग्यवती लिहायला हवे की नाही? आपली मराठी भाषा कितीही संपन्न म्हणवली तरी तित `सौभाग्यवंता` हा शब्द नाही. नशीबवान असलेल्या नव-याला म्हणायचे असेल`भाग्यवंत` म्हणायचे. सौभाग्यवती हा स्त्रीलिंगी शब्द आहे तो स्त्रीसाठीच वापरायचा. तो ही विवाह हे तिचे सुदैव असो की दुर्दैव!
शेवटी भाग्य आणि दुर्भाग्य हे मानण्यावर असते. नशीब हे आपल्या जन्माबरोबर आलेले असते असे म्हणतात. मग ते केवळ विवाहामुळेच बदलत नाही. लग्न हे केवळ एक निमित्त असावे. त्यामुळे `सौभाग्यवती` हा शब्द एका विवाहितेसाठी सवाष्ण असे पर्यंत लागू होतो आणि नव-याच्या निधनानंतर त्या शब्दाची योग्यता निदान तिच्यासाठी तरी संपते असे विचार आताच्या काळा तरी बदलूया का? सामाजिक रूढींचे उगाचच आवरण घालून जखडून ठेवलेला हा शब्द केवळ एक आपली भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून वापरायला लागूया का?
शिवाय आपले नाव मराठीत लिहिताना आपल्या जिवनी भाग्य आहे की दुर्भाग्य या उल्लेखाची व देखाव्याची प्रत्येक वेळी आवश्यकता नसते. उदाहरणार्थ एखादी माहिती विचारताना किंवा साधा अर्ज करताना आपल्या नावाआधी `सौ` लिहायची काय जरूरी आहे?
कळावे
आपली,


तुम्ही पत्रोत्तर लिहायला सुरवात करा. तोपर्यंत मी ही हे पत्र पूर्ण करताना विचार करते की इतके दिवस नेहमीच्या सवयीचा शब्द वापरून सौ. मीनल गद्रे लिहू की नवीन विचाराची सुरवात करून देण्यासाठी नुसतंच मीनल गद्रे लिहू?

(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)

1 टिप्पणी:

  1. पटलं.... सुरुवात करायलाच हवी...
    ह्या सारख्या अनेक लहान-सहान गोष्टी रोजच आपल्या समोर घडत असतात.... ज्या आपण केवळ पूर्वापार चालत आल्या आहेत म्हणून मान्य करतो...
    आणि मग "सौ" वरून "नोन- सौ..." झालेल्या स्त्रीच्या भावनांची काय उलाढाल चालू असेल..ती किती अवघडून जात असेल , याकडे आपण मात्र सहज कानाडोळा करतो... जणू काही दिसलंच नाही...

    उत्तर द्याहटवा