उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

८ नोव्हेंबर, २००६

चीनची 'ग्रेट' भिंत

मी जेव्हा पर्यटक म्हणून चीनची भिंत बघायला गेले, तेव्हा ती भव्यता पाहून खूप आश्‍चर्य वाटले. आमच्या गाईडने दिलेली माहिती मी ऐकून घेतली. केबलकारने वरपर्यंत गेले, पायी उतरत खाली आले, माहितीपत्रके घेतली, खूप सारे फोटो काढले. बस! यापेक्षा अधिक रस घेण्यासारखे खरोखरच तेव्हा काहीही वाटले नाही. पर्यटक म्हणून कुठे गेल्यावर त्या जागेशी क्वचितच जवळीक वाटते, असे माझे मत आहे.
चीनमध्ये राहायला आल्यानंतर "ती साधी भिंत. त्यात पुन्हा पुन्हा ते काय पाहायचे?" असं म्हणतच अनेकदा त्या भिंतीवर गेले आणि त्या भिंतीशी हळूहळू जवळीक निर्माण झाली. प्रत्येक वेळी गेले की पूर्वी वाचनात आलेली गोष्ट मला आठवायची आणि त्या एवढ्या मोठ्या भिंतीभोवती माझे इवलेसे मन रेंगाळत राहायचे. ही भिंत बांधली तेव्हा एक संरक्षण करणे याव्यतिरिक्त वेगळा हेतू नव्हता. या भिंतीने संरक्षणाचा हेतू साध्य झाला का नाही, हा वेगळा अभ्यास आहे. तिची लांबी- रुंदी यात मला फारसे स्वारस्य वाटले नाही, पण भिंतीमुळे त्या वेळेच्या सामाजिक जीवनात काय काय अडथळे आले, या विषयाकडे मात्र मी आकर्षिले गेले. बरीचशी भाषांतरित पुस्तके वाचली. अधिक माहिती मिळवली आणि आता एक पर्यटन स्थळ असलेल्या या भिंतीचे महत्त्व पटून तिचे `ग्रेट' हे विशेषण अधिकाधिक यथार्थ वाटू लागले. या भिंतीची आखणी झाली ती राजवाड्यांमध्ये, पण बांधणी केली ती थंडी, ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत. यात सामान्य माणसाच्या इच्छेचा प्रश्‍नच नव्हता. प्रत्येक घरातील पुरुषाला या भिंतीच्या बांधणीसाठी जबरदस्ती करण्यात आली. या भिंतीमुळेच अनेक लोकांचे जीवन दुःखीकष्टी झाले. जुलूम, मारहाण करून मजूर कामाला लावले जात. वाईट हवामानात मोठाले दगड डोंगरावर घेऊन जायचे, ते योग्य रीतीने बसवायचे, हे फार फार कष्टप्रद होते, हे वेगळे सांगण्याची आवश्‍यकता नाही. अतिश्रम, उपासमार, शारीरिक छळ, वेदना, मानसिक कुचंबणा, घरच्या लोकांची काळजी यासारख्या कारणांमुळे कित्येक कामगार तिथेच शेवटचा श्वास सोडत. त्यांना जिथे गाडले जाई त्या भिंतीच्या भागाला वॉच टॉवरला, अरुंद रस्त्यांना त्या मजुराचे नाव दिले जाई. तोच प्रकार तिथे काम करणाऱ्या सैनिकाचाही. काही मजूर, सैनिक यांनी तिथून घरी पळून जायचा (अयशस्वी) प्रयत्नही केला. अनेक मजुरांना शस्त्र हातात घेऊन सैनिक बनून, जमत नसूनही युद्ध करावे लागत होते. यात अनेकांचे नाहक बळी जात असत. असाच एक निराश परंतु शहाणा मजूर
आपल्या नवतरुण पत्नीला कळवतो...

विवाह कर नवा,
थांबू नको जरा,
काळजी घे नवीन कुटुंबाची
आणि आठव...
हरवलेल्या या पतीला
कधी एकदा तरी....
घरीही यापेक्षा काही वेगळी स्थिती नव्हती. गरिबी तर पाचवीला पुजलेली! घरचा पुरुष हा त्या भिंतीला जणू वाहिलेला. मग मुला-बाळांची, घरच्या वृद्धांची सर्व जबाबदारी स्त्रीवर. अशा एकाकी महिलेचे दुःख कवितेतून वाचायला मिळाले.
अश्रू पडती फुलणा-या पाकळी,
शरद वारा गातो विरहाचे गाणे.
अनोळखी ती वाट भिंतीची,
तरीही आले होते तिथे मी,
कालच्या स्वप्नी...
सणासुदीला, आजारपणात, आप्तांच्या मृत्युसमयीही न परतलेल्या आपल्या नव-याच्या आठवणीने बेजार झालेली एक महिला लिहिते...
आज माझा सखा,
नाही आला.
तो त्या भिंतीप्रमाणे,
`दगड' `न व्हावा.
अशा अनेक एकट्या स्त्रियांनी आत्महत्या केली. आपल्या कामकरी पतीसाठी स्वेटर विणणारी विरहिणी
म्हणते...

"येईल उद्या पोस्टमन
सकाळच्या प्रहरी
पक्षी उठण्याआधी
हवा तयार रेशमी कोट
बधिर बोटे विणती सुयांनी,
कातरही पकडता येईना,
हा प्रेमाचा कोट
जाई दूर प्रवासी
कोण जाणे केव्हा
मिळेल माझ्या प्रियाला... "


तरुण मुलांना भिंत बांधण्यासाठी नेऊ नये म्हणून काही आया आपल्या मुलांना घराबाहेर पाठवतच नसत. आजारी असल्याची खोटी कारण देऊन टोलवण्याचा प्रयत्न करीत. तरीही जबरदस्तीने कामाला नेलेल्या मुलाची एक आई विचारते
"मला मुलगा झाला,
दिला तिथे कामाला,
परतून आला
तर ओळखेल ना मला?"
एका तरुण स्त्रीच्या प्रियकराला भिंतीवर जबरदस्तीने कामाला नेण्यात आले. लवकरच परतेन, असे आश्‍वासन देऊन तो निघून जातो. बरेच दिवस वाट पाहून त्याची प्रेयसी त्याला शोधायला एकटीच बाहेर पडते. एवढी लांब वाट चालत चालत ती भिंतीपर्यंत पोचते. प्रियकराचे नाव विचारत विचारत शोधत राहते. नंतर कळते, की काही मजुरांचा तांडा दुस-या जागी हलवलेला आहे. दमूनथकून गलितगात्र झालेली ती तरुणी तिथेच गतप्राण होते. भिंतीवर काम करणा-या त्या मजुरांचा जन्म जणू त्या भिंतीसाठीच व मृत्यूही त्या भिंतीसाठीच!
यांना उद्देशून एक लेखक सांगतो, "
"भिंत वाढते आहे मैलो न्‌ मैल,
सोडून विधवा मागे मैलो न्‌ मैल! "
आणि अशा त्यागाच्या, कष्टांच्या एक-एक पायरीमुळेच चीनची भिंत 'ग्रेट' झाली आहे.



(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)

 वरील काव्यपक्ती भाषांतरीत केल्या आहेत.

1 टिप्पणी:

  1. चीनची ही शब्दचित्रे खरे तर मी अनेकदा वाचली आहेत. पुन्हा पुन्हा वाचली तरीही त्यांचा ताजेपणा संपतच नाही. मग असे जर आहे तर मी इथे अजूनही प्रतिसाद कसा नोंदवलेला नाही ह्याचे मलाच आश्चर्य वाटले.

    चिनच्या भिंतीची कविता आणि अनुवादही आवडला. जगातील दोन क्रमांकाची तटबंदी राजस्थानात कुंभलगढला आहे. आम्ही तर तीही पाहिलेली नाही. मात्र महाराणा कुंभकर्ण यांचे अद्भूत चरित्र तुला माझ्या मेवाडच्या प्रवासवर्णनात अवश्य वाचायला मिळू शकेल.

    तुला जग पाहण्याची दृष्टी लाभलेली आहे. असेच जग पाहत राहा. वर्णन त्याचे सजवत राहा. आम्ही जर जाऊ न शकलो तर, त्यातूनच आम्ही तेही पाहू.

    उत्तर द्याहटवा