चिनी संस्कृतीमध्ये अंकांना फार महत्त्व आहे. त्यानुसार आपले नशीब ठरते असाही समज आहे. आठ हा अंक सर्वश्रेष्ठ कारण तो शुभ अंक (लकी नंबर). चिनी भाषेतील "बा' (八)म्हणजे आठ. त्या उच्चाराचा अर्थ प्रगती असाही आहे.
चीन मधे आधुनिक काळातही हे पारंपरिक विचार श्रद्धेने पाळलेले दिसतात. २००८ या साली आठव्या महिन्यात आठ या तारखेला आठ वाजता बीजिंग, चीनमध्ये ऑलिंपिक खेळाचे उद्घाटन होऊन स्पर्धांची सुरवात होणार आहे.

यासाठी तयारी तर कधीपासूनच सुरू झाली आहे. त्यापैकी एक म्हणजे "फुवा'. ऑलिंपिकच्या पाच रंगांच्या पाच वर्तुळांपासूनच नवीन अशा कल्पनेची निर्मिती झाली. चीनमधील ऑलिंपिकच्या त्या (मॅस्कॉट) प्रतीकाचे नाव आहे फुवा.
"फु" म्हणजे सद्भाग्य आणि "वा' म्हणजे खेळकर बालक. फुवा ही सदभाग्य आणणारी खेळकर मुले आहेत. आनंद, प्रगती, आरोग्य, सद्भाग्य आणि प्रेरणा द्विगुणित करणारे फुवा हे बीजिंग ऑर्गनायझिंग कमिटी फॉर द गेम्स २००८ ऑलिंपियाड( BOCOG = The Beijing Organizing Committee for the Games of the 2008 Olympiad.)ने जाहीर केलेले अधिकृत प्रतीक आहे. मैत्री, शांतता, आशीर्वाद अशी सदिच्छा असलेला संदेश जगातील सर्वांना विशेषतः नवीन लहान पिढीला पाठविण्यासाठी या खेळकर फुवा लहान मुलांच्या प्रतिमेच्या कार्टून बाहुल्या (लकी डॉल्स) आकारण्यात आल्या.
या पाच प्रतिमांची नावे आहेत- बैबै, जिंग जिंग, हुआन हुआन, यिंग यिंग, नि नि. दोन समान उच्चाराचे नाव ही लहान मुलांबद्दल प्रेम व्यक्त करायची चिनी परंपरा प्रत्येक नावातील एक एक शब्द घेऊन तयार केलेले वाक्य होते- बीजिंग हुआन यिंग नि/ 北京歡迎妳 याचा अर्थ होता- बीजिंगमध्ये आपले स्वागत. (बीजिंग वेलकम्स यू.)
फुवाचे आद्य कर्तव्य स्वागत होय. जगातील प्रत्येक पुरुष, स्त्री, मुले यांना मानवाच्या ऐक्याच्या भव्य दिव्य अशा समारंभात उत्साहाने सहभागी होण्याची प्रेरणा फुवा ही प्रतीके देतात. या प्रेमळ आमंत्रण प्रदर्शित होणा-या वाक्यातील शब्दांत चीनमधील तीन महत्त्वपूर्ण प्राणी व एक पक्षीही प्रदर्शित होतात.
बैबै आहे मासा, जिंग जिंग आहे चीनचा राष्ट्रीय प्राणी पांडा, हुआन हुआन म्हणजे ऑलिंपिकाची मशाल, तिबेटियन हरीण आहे यिंग यिंग, तर नि नि आहे एक प्रकारचा पक्षी. या फुवांच्या शिरोभूषणामधून नैसर्गिक पंचतत्त्वही प्रदर्शित होतात. बै बै म्हणजे पाणी, जिंग जिंग वृक्ष किंवा जंगल संपत्ती, हुआन हुआन म्हणजे आग, यिंग यिंग म्हणजे माती/ पृथ्वी, नि नि म्हणजे आकाश. चिनी पूर्व संस्कृतीप्रमाणे खाणाखुणांच्या/ प्रतीकांद्वारे सदिच्छा पाठविण्याची पद्धत आहे. फुवाची प्रत्येक बाहुलीरूपी प्रतिमा वेगवेगळी सदिच्छा व्यक्त करते. प्रगती, आनंद, आवड, स्वास्थ्य, आणि सद्भाग्य या सद्भावना ती जगातील मुलांपर्यंत पोचवते तसेच २००८ च्या खेळाचा आनंद लुटण्यासाठी आमंत्रित करते. या खेळाचा विषय (थीम) आहे- एक जग,एक स्वप्न.(वन वर्ल्ड, वन ड्रीम. हा संदेश खेळाच्या माध्यमातून जगापर्यंत पोचावा, अशी चीनची इच्छा आहे.
चिनी वातूशास्रात (फेंग शुई)मधे ही पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे.चीनच्या कला संस्कृतीनुसार मासा, पाणी हे प्रगतीचे प्रतीक आहे. म्हणून बै बै बाहुली प्रगतीचा संदेश देते. निळ्या आकाशी बै बैच्या डोक्यावर पाण्याच्या लाटांची नक्षी आहे. ती पाण्यातील पोहणे, उंचावरून पाण्यातील उडी यासारखे पाण्यातील खेळ (ऍक्वा स्पोर्ट) दर्शवते. बै बै ही ऑलिंपिकच्या पाच रंगांच्या वर्तुळांपैकी निळे वर्तुळ होय.
जिंग जिंग- हा हसवणारा नाचरा बाहुला जिथे जातो तिथे आनंदाचा संदेश घेऊन येतो. जिंग जिंगच्या काळ्या-पांढऱ्या कपड्यांमुळे चिनच्या राष्ट्रीय प्राणी- पांडाची आठवण होते. त्याच्या डोक्यावरील दागिन्यातील कमळाची नक्षी चीनमधील (सन ९६०-१२३४) सुंग राजवटीतील चिनी मातीकामाच्या वरील कमळाच्या नक्षीवरून स्फूर्ती घेऊन केलेली आहे. अशा प्रकारची ऐतिहासिक वस्तूंची अशी आठवण व त्याविषयीचा आदर प्रशंसनीय वाटते. शारीरिक कौशल्य व शक्ती दाखवणारा जिंग जिंग ऑलिंपिकच्या पाच रंगांच्या वर्तुळांपैकी काळे वर्तुळ होय. वृक्ष, जंगले, झाडे-झुडपे प्रतीत करणारा जिंग जिंग मानव व निसर्ग यांच्यातील सुसंबंध दर्शवितो. याच्या निर्मितीमागचे कारण पुढील पिढीच्या कल्याणासाठी नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करण्याचा संदेश देणे हा आहे.
चीनी भाषेत हुआन म्हणजे आग. सर्वांना आकर्षित करणाच्या उद्देशाने हुआन हुआन हा बाहुला या ऑलिंपिक खेळांच्या प्रतीकांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. सर्व बाहुल्यांचा मोठा भाऊ-दादा, म्हणजे ऑलिंपिकची मशाल जणू. हा जगाला आकर्षित करून चिनी लोकांनी केलेले उत्साही आमंत्रण दर्शवतो. त्याच्या डोक्यावरील आकर्षक नक्षी चिनी समाजात सुदैव आणणारी (लकी) समजली जाते. जागतिक खेळातील उत्साहाला मूर्त स्वरूप देणारा हा हुआन हुआन "सतत शक्तिशाली रहा,' असा संदेश देतो. चेंडूंच्या खेळात नैपुण्य असलेला हुआन म्हणजे ऑलिंपिकच्या पाच रंगांच्या वर्तुळांपैकी लाल वर्तुळ होय.
तिबेटमधील पठारावरील शिंग असलेले, जलद धावणारे हरीण लुप्त होत चालले होते. चीनने पहिल्यांदा जाणीवपूर्वक बचावकार्य हाती घेतले, ते या प्राण्याचे. म्हणूनच कौतुकास्पद कार्याची आठवण देतो तो यिंग यिंग हा बाहुला. जगाच्या पृष्ठभागावर असलेली जमीन आक्रंदित करू शकण्याचे शारीरिक सामर्थ्य यात प्रतीत आहे. चीनच्या विस्तीर्णपणाचे प्रतीक असलेला हा धावणारा बाहुला शक्ती आणि आरोग्य दर्शविताना "ग्रीन ऑलिंपिक' या ध्येयाच्या जबाबदारीचीही आठवण करून देतो व लोकांना झाडे लावण्याला व जगवायला उत्तेजना देतो. यिंग यिंग बाहुल्याच्या डोक्यावरील आभूषण तिबेटची संस्कृती व पश्चिम चीनमधील सुशोभीकरणाचा एक प्रकार आहे. धावणे, पळणे यात पारंगत असलेला यिंग यिंग म्हणजे ऑलिंपिकच्या पाच रंगांच्या वर्तुळांपैकी पिवळे वर्तुळ होय.
पतंग उडवणे हा चीनचा पूर्वापार खेळ. यातील पाकोळीसारखा पक्षी म्हणजे तर चीनचा पारंपरिक लोकप्रिय पतंगाचा प्रकार. यापासूनच आकारलेली नि नि ही बाहुली चीनच्या परंपरेचे भान दर्शवते. ती जिथे उडत जाईल तिथे तिचे सोनेरी पंख अमर्याद आभाळातून जणू सद्भाग्याचा वर्षाव करतात. निष्पाप बालकरूपी, मजेशीर नि नि जिमनॅस्टिकमध्ये तरबेज आहे व ही ऑलिंपिकच्या पाच रंगांच्या वर्तुळांपैकी हिरवे वर्तुळ होय.
चिनी सरकारने या फुवाचा कुठलाही गैरवापर होऊ नये म्हणून त्या प्रतिमांचे नियंत्रण केले आहे. तशा प्रकारची खेळणी फक्त ठराविक निर्मातेच तयार करू शकतात. त्या बाहुल्यांच्या नावांचा वापर इतर कुठल्याही वस्तूंसाठी करण्यास बंदी आहे. कायदा न पाळल्यास शिक्षाही होऊ शकते. पुढील वर्षाच्या तयारीसाठी सज्ज असलेल्या या बाहुल्या बाजारात ठराविक ठिकाणी उपलब्ध आहेत. पण बरीचशी दुकाने की-चेन्स, हॅगिंग्ज, चित्र असलेले कपडे यांनी मात्र पुरेपूर भरलेली आहेत व त्यांची विक्रीही उत्साहात होत आहे.तर अशा प्रकारे चीन सज्ज होत ८-८-२००८ ला सुरू होण्या-या ऑलिंपिकसाठी अजून बरोबर एक वर्षानंतर.
(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
(काही चित्रे जालावरून साभार.)
चिनी सरकारने या फुवाचा कुठलाही गैरवापर होऊ नये म्हणून त्या प्रतिमांचे नियंत्रण केले आहे. तशा प्रकारची खेळणी फक्त ठराविक निर्मातेच तयार करू शकतात. त्या बाहुल्यांच्या नावांचा वापर इतर कुठल्याही वस्तूंसाठी करण्यास बंदी आहे. कायदा न पाळल्यास शिक्षाही होऊ शकते. पुढील वर्षाच्या तयारीसाठी सज्ज असलेल्या या बाहुल्या बाजारात ठराविक ठिकाणी उपलब्ध आहेत. पण बरीचशी दुकाने की-चेन्स, हॅगिंग्ज, चित्र असलेले कपडे यांनी मात्र पुरेपूर भरलेली आहेत व त्यांची विक्रीही उत्साहात होत आहे.तर अशा प्रकारे चीन सज्ज होत ८-८-२००८ ला सुरू होण्या-या ऑलिंपिकसाठी अजून बरोबर एक वर्षानंतर.
(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
(काही चित्रे जालावरून साभार.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा