Thanks Giving Festival in the USA
अमेरिकेत रोजच्या देवाणघेवाणीत, अगदी पोस्टमनपासून ते दुकानदारापर्यंत सर्वांना "थॅंक यू' म्हणायची पद्धत आहे. लहान मुलांच्या शाळा 'थॅंक्यू, प्लीज, सॉरी' या शब्दांचा विशेष आग्रह धरताना दिसतात. मुलांनाही कळून चुकते की या शब्दांचे व तसे म्हणण्याच्या रितीचे समाजात किती महत्त्व आहे..
इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केले. भारतीयांनी त्यांचे अनुकरण करत ब-याच गोष्टीत बदल केले. वेशभूषा, केशरचना, अन्न (उदा. ब्रेड), औषधे...इतकंच काय पण कित्येकांचे धर्मही बदलले. त्यांची शिक्षण पद्धती आत्मसात केली. इंग्रजी भाषेचा वापर सर्रास सुरू झाला. या इंग्रजी भाषेमध्ये तीन जादूई शब्द आहेत. थॅंक यू, प्लीज आणि सॉरी.
या शब्दांचा मराठी भाषेत वापर तसा कमीच. काही कार्यक्रमांचा, पुस्तकांचा, भेटींचा शेवट आभार प्रदर्शनाने होतो, पण दैनंदिन जीवनात या शब्दांचा वापर होताना कमीच दिसतो. का कुणास ठाऊक? पण मराठीतील "माफ करा', "आभारी आहे', "कृपया', या शब्दात औपचारिकपणाच जास्त वाटतो. थोडा दुरावा जाणवतो. आईवडील, भाऊबहीण, मित्रमैत्रिणी यांच्यात तर असे शब्द कोणी वापरत नाही. काहींना तर हे शिष्टाचाराचे स्तोम वाटते, नाटकी वाटते. बोली भाषेपेक्षा लिखीत वाटते.
अमेरिकेत रोजच्या देवाणघेवाणीत, अगदी पोस्टमनपासून ते दुकानदारापर्यंत सर्वांना "थॅंक यू' म्हणायची पद्धत आहे. लहान मुलांच्य शाळा "थॅंक्यू, प्लीज, सॉरी' या शब्दांचा विशेष आग्रह धरताना दिसतात. मुलांनाही कळून चुकते की या शब्दांचे व तसे म्हणण्याच्या रितीचे समाजात किती महत्त्व आहे.
अमेरिकेत याच शिष्टाचारासंबंधी खास दिवस राखून ठेवला आहे. तो आहे आभारप्रदर्शनासाठी ! या "थॅंक्सगिव्हींग' सणाबरोबरच लागून सुटीही येते. २३ नोव्हेंबरच्या संध्याकाळी-रात्री सर्व मंडळी जेवणासाठी एकत्र जमतात. त्या जेवणात रस्सेदार टर्की, ब्रेड, मॅश पोटॅटो, क्रॅ नबेरी सॉस, पंपकिन पाय, कॉर्न रोल्स, स्विट पोटॅटो, केक, विविध पेये यांचा समावेश असतो.
जेवणाच्या टेबलाभोवती, गोल मांडलेल्या खुर्च्यांवर बसून एकमेकांचे हात हातात घेऊन आपल्याला मिळालेल्या चांगल्या गोष्टींसाठी आभार मानतात. या निमित्तानं त्या चांगल्या गोष्टींना उजाळा मिळतो. त्याचे महत्त्व आणि त्याबद्दलच्या कृतज्ञतेची भावना दर्शवता येते. आपल्यावरच्या ईश्वरी कृपाप्रसादाची आणि आपल्या चुकांना देवाने केलेल्या माफीचे स्मरण होते. सभोवतालच्या समाजाची, माणसांची त्यांनी केलेल्या मदतीची, सोबतीची, आशीर्वादाची आठवण होते. शिवाय या सणामुळे पुन्हा एकदा उजळणी होते, ते व्यवहाराची, रितीची आणि शिष्टाचाराची...वाईट घटनांना आड करून सकारात्मक दृष्टीकोनाने जीवनाकडे पाहण्याची...
शब्दांचा वापर हा तर भावना- विचार व्यक्त करण्यासाठी करतात, पण मुळात भावना असणे महत्त्वाचे. "हिने-त्याने ते केले तर काय झाले? काही मेहरबानी नाही केली" हे वक्तव्य म्हणजे झाली मिजासी, उद्धटपणा आणि कृतघ्नता! ही कुठेच मान्य नाही. कुठल्याही धर्मात अहंकाराला स्थान नाही.
जीवनात जे काही हितावह मिळाले आहे, त्याबद्दलची जाणीव हवी. संपूर्ण भान हवे. आईवडिलांचे मिळालेले प्रेम, नातेवाईकांनी दिलेली भेट, मित्राने चौकशीचा केलेला साधा फोन किंवा ईमेल...सर्व-सर्वांचे आभारी असायलाच हवे. कारण आपल्याला ज्या गोष्टींचा लाभ झाला आहे, ते सुख, गोष्टी अनेकांना मिळत नाहीत. त्या मग आपण आपल्याला भाग्यवानच म्हणायचे की नाही ? त्या भाग्याबद्दलची कृतज्ञता ही हवीच. मग ती व्यक्त करावी की नाही, करायची असल्यास कशी करावी हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अमेरिकेसारखा थॅंक्सगिव्हींग सण साजरा करायलाच हवा असं नाही...
मुद्दा आहे कृतज्ञतेचा, मनातून खरोखर आभारी असण्याचा आणि स्वतःला भाग्यवान समजण्याचा !
(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा