माझ्या पहिल्या पदवीच्या फायनल ईअरच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला त्यादिवशी तर माहितच नव्हते की आज आपला निकाल लागणार आहे. मला उन्हाळ्यातली परिक्षेनंतरची मोठी सुट्टी असली तरी एका आधीच्या वर्षात शिकणा-या मैत्रिणीबरोबर तिच्या कामानिमित्त सकाळी लवकरच कॉलेजला पोचले होते.
"आज माझ्या क्लासचे बरेच दिसताहेत" असं म्हणूनही `कसे काय बुवा ?`अशी पुसटशी शंका ही आली नाही मनात.
"ही आहे नं ही अशी, ती आहे नं ती तशी."
"त्या तिकडची बघ. काय आवतार आहे? झोपेतून उठून आली आहे वाटतं."
"ती तशी का धावत सुटली आहे? ओढणी लोळते आहे पाठीमागे"
" आणि त्याचा शर्ट बघ. बटण उलट सुलट लावली आहे."
फिदी फिदी आणि मग खी खी खी हसत खिदळत बिनधास्त आम्ही मेन कॉरिडॉरकडे चालत होतो.
"अग, तूझा नंबर मिळाला का?" एका ओळखीच्याच मुलीने विचारले.
"कसला?" मी अज्ञानाचे तारे तोडले.
"म्हणजे काय ? झोपेत आहेस का? पेपरात आलं आहे आजच्या... आपल्या रिझल्टचं....ते बघ त्या नोटिस बोर्ड्वर आहेत नंबर" माझ्या अज्ञानाची कीव बाजूला ठेवून त्या बिचारीने मला वाट दाखवली.
मी किती उडाले म्हणून सांगू? "काय? रिझल्ट लागला आपला?" मी चाचरत चाचरत विचारलं. उत्तर ऐकायला मी तिथे उभी राहूच शकले नाही. थरथरत्या पावलाने तडक धाव घेतली त्या दिशेने. म्हणजे धावण्याचा प्रयत्न केला.
मला जिथे पोचायचे आहे ते ठिकाण मैलभर लांब आहे... आणि आपल्याला चालताच येत नाही आहे... पाय उचलवतच नाही... उशीर झाला आहे...वेळ कमी आहे... असं स्वप्न मला खूपदा पडायचं. तेच स्वप्न प्रत्यक्षात अनुभवतो आहे की काय असं वाटायला लागलं.
तिथे ही तोबा गर्दी होती माझ्याच क्लासमेट्सची . त्यांना प्रतिस्पर्धी नाही तर पार शत्रूपक्ष समजून बाजीप्रभूच्या थाटात माझ्या हातांचा वापर करत त्या गर्दीशी झुंजले आणि नोटिस बोर्डकडेपर्यंत पोचले. शिवाजी महाराज गडावर पोचले आणि तोफेचे आवाज कानी पडल्यावर बाजीप्रभूंना ही जितका आनंद झाला नसेल तितका मला आनंद झाला.
पण छ्ये!!! कसलं काय? जास्त काळ टिकला तर तो आनंद कसला?
बाजींचा प्राणच गेला त्यावेळी. माझा प्राण मात्र पोटाच्या खोल खड्ड्यातून वर वर चढत पार गळ्याशी येऊन ठेपला.
काचेला नाक लावून नोटिस बोर्डच्या आतले कागद पाहिले. पण सारेच आकडे सारखे दिसायला लागले.
आमचाच निकाल आहे हे शेजारी उभ्या असलेल्या मुलीला विचारून खात्री करून घेतली आणि पुन्हा शोध सूरू केला. काही केल्या मिळेना नंबर पानावर.
मनात माझा नंबर घोकून घोकून पहात होते. त्या पहिल्या पानावर सर्वच आकडे माझ्या नंबरापेक्षा लहान होते ते ब-याच वेळाने ध्यानात आलं.
"तूझा नंबर काय ? मी पण शोधते" बरोबरची मैत्रिण म्हणाली.
“…….” काहीतरी तोंडातल्या तोंडात बडबडले. तिला घाईघाईने ओलांडून पलिकडे गेले आणि माझ्या नजरेने अजून वाढत जाणा-या नंबराचा आधारे पुढल्या पानांवर उडी घेतली.
" ओЅЅЅЅ. हाЅЅ काЅय माझा नंबर.” जिवात जिव आला एकदाचा.“ येस!!!!!!!!!” हाताच्या पंजाची मूठ वळून हात कोप-यात दुमडून, कोपरा झटक्यात खाली केला. पास होणारच होते. पण मिळालेले मार्क/क्लास पानांवर कुठे कळला नाही.
“किती पर्सेंट असतील काय माहित? " मला रडूच कोसळलं. टेंशन असहाय झालं होतं तेव्हा मला.
" रडतेस काय वेडी ? ग्रॅज्युएट झालीस ते तर कळलं. मार्क ही कळतील लवकरच."त्या बरोबरच्या मैत्रिणीने दिलासा दिला. "काही असोत. काय फरक पडतो?" गर्दीतून बाजूला करत तिने प्रश्न केला.
"नाही. तसं नाही ग. पण पास क्लासचा काय उपयोग? मार्क चांगले पाहिजेत ना? म्हणून टेंशन आलंय" मी सारवासारवी केली.
"आता काय मेडिकलला ऍडमिशन मिळवायला जायचं आहे का?" असं विचारत ती मैत्रीण खूदकन हसली. आता मी पण जरा खूशीत आले.
तेवढ्यात आठवलं की अगदी जिवश्च मैत्रीणीचा नंबर पहायचा राहूनच गेला होता. पुन्हा तीच ऐतिहासिक थाटातली झुंज! आता तर काय, गर्दीत घूसून कागदवरचे नंबर हुडकून काढण्यात ही मी तरबेज झाले होते. पुन्हा पुन्हा यादी पाहिली. पण मिळेच ना तिचा नंबर. तेव्हा पास झालेल्यांचेच केवळ नंबर निकालात जाहिर केले गेले होते. मार्क, क्लास वगैरे तपशील मार्कलिस्ट मिळाल्यावरच कळणार होता ते असं आजूबाजूला विचारल्यावर कळलं.
"ती गेली ह्या परिक्षेत." आता तर माझे डोळे पुन्हा भरले.
पुन्हा खात्री केली माझ्या पासाची आणि तिच्या नापासाची आणि संमिश्र भावनेने गर्दीतून वाट काढून घरी जाण्यासाठी सरळ ट्रेन स्टेशन गाठले.
ट्रेन प्रवास करून स्टेशनवर उतरले आणि बस करता न थांबता रिक्षा केली. घरी आईला काही माहितीच नसेल अशी खात्री होती. पण घरी पोचतेच तो काय ? एक शाळेतली जुनी मैत्रीण येऊन बसली होती... आमच्या निकालाची बातमी उगाळत उगाळत... आईची काळजी अधिकाधिक दाट करत !
मी पदवीधर झाले त्याच कौतुक करण्यासारखं काही नव्हतं. तरीही मी पास झाल्याची बातमी ऐकून तीला हुश्श झालं. `चला, एक महत्त्वाचा आणि आवश्यक टप्पा पार पडला` असं वाटलं असावं.
पुढे मी पुढे शिकायलाच हवं अशी माझ्या आई बाबांची इच्छा असली तरी हट्ट नव्हता.
मी?? माझं ही तसच होतं. मूलभूत शिक्षण झालं. आता पुढे काय? नोकरी की अजून शिक्षण?.... कोणती नोकरी?.... कोणतं शिक्षण?....विचारच करायला लागले होते.....
त्या निकालाच्या दिवशी हा निर्णय घ्यायची घाई नव्हती. काहीतरी खाऊन लगेचच त्या नापास मैत्रीणीकडे गेले. तिथे नुसती रडारड ! मला काय करायचं तेच कळेना? तिच्या शेजारी नुसतीच बसून घरी परत आले.
आठवड्याभरात मार्कलिस्ट मिळाली तेव्हा कळलं की ती मैत्रीण ही पास झाली आहे. तिचा नंबर त्या आधीच्या लिस्टमधे टाकायचा राहून गेला होता. प्रिंटींग मिस्टेक असावी. किती ताप, क्लेश झाला त्या कुणाच्या चुकीमुळे?
मार्कलिस्ट मिळाली त्या दिवशी काय धमाल केली आम्ही! धमाल म्हणजे …सिध्दीविनायकाच्या दर्शनाला गेलो, ए.सी. असलेल्या हॉटेलमधे खाल्लं,रस्त्यावरच्या गाडीजवळ उभं राहून गारेगार गुलाबी सरबताचा फालूदा प्यायलो, इंग्रजी पिक्चर पाहिला आणि संध्याकाळी उशीरा म्हणजे साडेसातला घरी गेलो.
काही दिवसातच मी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. शिक्षण सुरू झालं. साधारण महिन्या दोन महिन्यानंतर पदवीदान समारंभासाठी फॉर्म भरायचा होता.
“अहाहा! म्हणजे तो काळा गाऊन, गोंड्याची टोपी, तो ताठ मान करून काढलेला `माझा` ऐटबाज फोटो. तो कौतुकाने भरलेला पदवीदान समारंभ.” मनामनाशीच विचार केला. तबियत एकदम खुश झाली!
पण क्षणात असला राग आला `पदवीदान`या मराठी शब्दाचा! "पदवी चं `दान` कसलं करताय ? काय फुकटात पदवी देताय की काय? अभ्यास करून मिळवली आहे. आणि म्हणे दान!"
पहिली पदवी मिळणं ही माझी काही ग्रेट अचिव्हमेंट नव्हती. ती आताच्या काळात मूलभूत गरज होऊन बसली होती. ते तर करायलाच हवं होतं. त्याचं काय कौतुक करायचं? सोहळा कसला करायचा? त्या काळ्या गाऊनचा, गोंड्याच्या टोपीचा किंवा ऐटीतल्या फोटोचं कशाचंच आकर्षण वाटेनास झालं. आता तर वेध लागलेले पुढील पदवीच्या सर्टीफिकेट्चे.
त्या इंग्रजी फॉर्ममधे `कॉन्व्होकेशन सेरिमनीला उपस्थित राहू शकत नाही. डिग्री सर्टीफिकेट पोस्टाने घरी पाठवून द्यावे` या पर्यायावर टिक मार्क केलं आणि घरचा पत्ता लिहून फॉर्म देऊन टाकला.
माझ्या पहिल्या पदवीचे ते सर्टीफिकेट घरी आल्या आल्या पुन्हा पुन्हा वाचले. डोळे भरून बघितल्यावर प्लास्टिक कव्हरमधे घालून त्याची रवानगी झाली माझ्या`एज्युकेशन` नावाच्या बाइंडरमधे.
त्या बाइंडरमधे अजून कितीतरी कागद मावले असते. कागद अडकवायच्या गोल रिंग्ज खूपच मोकळ्या होत्या. ते बाइंडर ही आसूसलं होतं अधीक पदव्यांच्या सर्टीफिकेटसाठी!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा