उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१० ऑगस्ट, २००९

गॅरेज सेल

एका शनिवारी आम्ही जराश्या उशीरानेच ऊठलो. कामावर जायचे नव्हते आणि नव्हती शाळा. सुट्टीच्या दिवशी कोण कशाला उठतंय लवकर?
बेडरूम मधून बाहेर आले तर अमेरिकेत आमच्याकडे आलेल्या माझ्या सासूबाई म्हणाल्या, "सकाळपासून खूप मोटारी येत आहेत. शेजा-यांकडे बाहेर काहीतरी वस्तू मांडून ठेवल्या आहेत. त्या पाहून पाहून परत जात आहेत. काय आहे तिकडे?"
"ते ? गॅरेज सेल आहे आज." माझ्या एवढ्या उत्तराने त्यांच शंकानिरसन झाल नाही. खिडकीच्या काचेजवळ उभे राहून त्यांनी बिनधास्त भारतीय स्टाईल बाहेर पाहिले आणि उत्सुकतेने तिथे पाहतच राहिल्या. मी ही त्या दृश्याचा आस्वाद घेत 'गॅरेज सेल' ही टर्म त्यांना समजावत राहिले. अमेरिकेसारख्या श्रीमंत म्हणून समजल्या जाणा-या देशात आपल्याला नको असलेल्या वस्तू कच-यात टाकून न देता अश्या विक्रीसाठी ठेवल्या जातात आणि शानदार मोटारीतून येऊन इतर लोक त्यांची खरेदी ही करतात हे त्यांना धक्कादायक होते. आपल्या घरातल्या वस्तू अश्या आपल्याच गॅरेजमधे विक्रीसाठी मांडण्याची पध्द्त पाहून त्यांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते.
मी दिलेल्या सर्व माहितीने त्यांचे समधान झाले नाही. शेवटी कपडे बदलून आम्ही दोघीही सेल लावलेल्या गॅरेजकडे निघालो.

बंगलेवजा घर आणि त्याला लागूनच दोन कार मावतील असे गॅरेज. त्याचे दरवाजे सताड उघडे टाकलेले होते. गाड्या गॅरेजबाहेर लावून लॉनवर किंवा गॅरेजमधे खूर्च्या टाकून त्या घरची माणसे बसली होती. तिथे गेल्या गेल्या खूर्चीतून उठून " हॅलो" म्हणून हसून आमचे स्वागत झाले. वापरेलेले कपडे, जुने नवे बूट, रोमोट कंट्रोल कार, बाहुल्या, काही हलणारे, डुलणारे टॉईज, खेळातली वाद्य, लहान मोठे सँडल्स, अन्न शिजवायची जाड बुडाची भांडी, नव्या चादरींचा सेट अश्या काही बाही वस्तू गॅरेज मधे आत आणि त्या बाहेर ड्राइव्ह वे वर विक्रीसाठी मांडून ठेवल्या होत्या. त्यावर किंमतींच्या पट्ट्याही चिकटवलेल्या दिसल्या.
इतके दिवस हाय / बाय इतपतच संपर्क असलेल्या शेजारणीशी मी पहिल्यांदाच जास्त बोलत होते.
सासूबाई मात्र गॅरेजभर हिंडून वस्तू पहात होत्या. त्यांना पाहून विक्रेत्या शेजारीणीने मला विचारले "व्हॅट इज शी लूकिंग फॉर? मे आय नो सो दॅट आय कॅन हेल्प हर बेटर" मला माहिती होते की आम्ही विंडो शॉपिंग साठी तिथे पोचलो आहोत. पण हे तिला कसे सांगणार? मी सुचेले तसे म्हटले " त्या भारतात परत जाणार आहेत. म्हणून पहात असतील काही तरी घरात लावायला शोभेसाठी."
ती आत गेली आणि एक मोठ्ठ पेंटींग बाहेर आणले." आय कॅन गिव्ह अवे धिस, इफ शी लाइक्स. आय बॉट थिस इन न्युझिलंड इन वन एक्झीबिशन. व्हेरी ब्युटीफुल! बट इन माय न्यु हाऊस धिस हॅज नो गूड प्लेस." मग ती सासूबाईजवळ गेली आणि म्हणाली "लूक. इंझंट इट नाईस? डू यू लाईक धिस?"
माझ्या सासूबाईना काय कराव तेच कळेना. त्या नुसत्याच हसल्या.माझ्याकडे वळून मला विचारले ," काय म्हणते आहे ती?कसलं चित्र आहे हे ते समजावून देते आहे का?"
त्यांना काहीच उत्तर न देता मी शेजारणीला सांगून टाकले " शी सेज दॅट इट्स नाईस. बट टू बिग फॉर हाउस इन इंडिया."
मी शेजारणीला पुढे बोलूच दिले  नाही."यू नो, इन इंडिया हाउसेस आर स्मॉल इन सिटीज. जस्ट लाईक न्युयॉर्क” मी विषयांतर केले  आणि थोड्याच वेळात आम्ही तिथून पळ काढला. न जाणो आतून लहान पेंटिग आणून आमच्या गळ्यात मारायला पाहिले  तर? अनोळखी असली तरी शेजारीण. "आम्हाला नको" असे ही म्हणता ही आले नसते.
बाहेर पडताना एक लहान मुलगा, शाळकरी मुलगी आणि त्यांचे आईवडिल अस कुटुंब गाडीतून उतरले आणि गॅरेज मधे शिरले. आई त्या मुलीला म्हणाली " स्विटी ,लूक द टॉईज. वुई कॅन बाय वन ऑफ दिज." ती मुलगी आनंदली, उड्या मारत निळ्या डोळ्यांनी भिर भिरी पाहू लागली. वडील मात्र लगेच बाहेर आले आणि आणि गॅरेज सेल मधल्या खरेदी साठी क्रेडिट कार्ड चालले  नसते म्हणून की काय पैशाच्या पाकिटात किती कॅश आहे ते पाहू लागले.
आम्ही पुढच्या गॅरेजला पोचलो. "हॅलो" म्हणून तिथला विक्रेता शेजारी मोबाइल फोन वर बोलत राहिला.आम्हाला बरेच वाटले. अगदी मोकळेपणाने आम्ही तिथे विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू पाहिल्या. लाकडी नक्षीकाम केलेला टीपॉय्,सी.डी. ठेवायचा स्टँड,
गोल्फ गेमचा सेट, गवत कापायचे मशीन त्याच्या धारधार पाती, त्याचे ऑईल, काही स्पॅनिश जाड जाड पुस्तक, पायाखाली घालायचा छोटा गालिचा आणि अश्याच ब-याचश्या वस्तू मांडलेल्या होत्या. तिथे काहीच इंटरेस्टींग वाटले  नाही. तेवढ्यात एका कार मधून एक माणूस उतरला. त्या शेजा-याचा मित्र असावा. त्याने आणि एका बॉक्स मधून काचेच्या डिशेस्, काटे,चमचे यांचा पूर्ण सेट बाहेर काढला. आणि तिथल्या टेबलावर मांडून ठेवल्या. छोटे चमचे अजूनही प्लास्टीक वेष्टनात होते. ते न वापरलेले दिसले. बाकी माल मात्र वापरेला दिसत होता. तो मित्र पुन्हा कार पाशी गेला आणि डिकीतून दोन ड्रॉवरच मेटॅलिक कॅबिनेट घेउन आला अणि विक्रीसाठी त्या गॅरेजमधे ठेवल.त्यावर किंमत चिटकवली $5. आमच्या घरातील फाईल्स ठेवायला मला तसेच कॅबिनेट पाहिजे होते. पण मार्केट मधे ते पस्तीस ते चाळीस डॉलरला होते. शिवाय आवश्यक नव्हते म्हणून इतके दिवस ती खरेदी मी टाळत होते. मी त्या कॅबिनेट्चे ड्रॉवर उघडूनझाप करून पाहिले. बाहेरून एक दोन रंग गेल्याचे ओरखडे सोडले तर बाकी सर्व काही ठिक ठाक होते. विक्रेता आणि त्याचा तो मित्र यांना माझ्या इंटरेस्टची काहीच दखल नव्हती.  मला ते कॅबिनेट आमच्यासाठी एकदम उपयोगी वाटले. पण ते होते वापरलेले. आधी कधीच वापरलेल्या वस्तू विकत घेतलेल्या नव्हत्या. तरीही इतके स्वस्त असल्यामुळे जरासा मोह झाला
"आई, घेऊया का हे स्टडी मधे ठेवायला?" मी सासुबाईंना विचारले.
" नको ग बाई. कशाला वापरलेल्या वस्तू घ्यायच्या? वापरायच्या तर नव्या घेऊन वापरा वस्तू. नाहीतर नका वापरू."उत्तर एकून मी जरा हिरमूसले.
" अग, स्वतःच्या वस्तूत आपल्या वासना असतात. त्याच्या मालकी बरोबर काही भावनाही अडकलेल्या असतात त्यात. "त्या पुढे म्हणाल्या,"कोण जाणे ही वस्तू कुणाची, कुठली? का विकायची पाळी आली त्यांना? अशी वस्तू आपण घेतली तर ती वासना ही येईल घरी बरोबर. कशाला हवीय नवी आपत्ती? पैसे साठव आणि नवच घे कॅबिनेट" समजावणीच्या सुरातले  सासुबाईंच म्हणण मला पटले. `माझं हे, माझं ते `असे आपण नेहमी म्हणतो.वस्तू लबडलेली असते त्या मालकीच्या भावनेत. आपली वस्तू काहीही कारणाने आपल्यापासून दूर करताना यातना होणारच. ती वस्तू नको असली तरीही त्यात दूरव्याचा क्लेष असणारच. मग कशाला हवी अशी वस्तू? मी मोह आवरता घेऊन त्या स्वस्त आणि मस्त अश्या वस्तू तश्याच सोडून बाहेर पडले.
पुढील गॅरेजजवळ जुनकट गाड्या उभ्या होत्या. तिथे काही विद्यार्थी आधीच आलेले होते. विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू वर वर तर कधी निरखून पहात होते. मूव्ही सीडीज, साउंड स्पिकर्स , शूज,एलेक्ट्रीक वायर्स, हलेकेसे डायनिंग टेबल, फोल्डींग खूर्ची अश्या कॉलेज लाईफ साठी उपयुक्त अश्या वस्तू पटापट उचलून कॅश पैसे देऊन ते तरूण टाळक हसत खिदळत बाहेर पडले.
आम्हाला तिथून किंवा इतरत्र कुठल्याच गॅरेज सेल मधून काहीही विकत घ्यायचे  नव्हते. तरीही घरी परतत असताना आमच्या विभागातील इतर सेल असलेल्या गॅरेजचा पत्ता आणि तिथल्या विक्रेच्या वस्तूची यादी आम्ही घ्यायला विसलो नाही.
बोहारीण, डबा बाटली वाला, रद्दीवाला, जुना पुराना सामान वाला अमेरिकेत नाही. मग काय करणार? अश्या प्रकारे `गॅरेज सेल` करून आपल्याला नको असलेल्या वस्तूंपासून सुटका ही होते आणि अगदीच वस्तू कच-यात टाकून वाया ही जात नाही. शिवाय ज्यांची नवीन वस्तू घ्यायची ऐपत नाही त्यांना ती स्वस्त दरात विकत घेऊन वापरता येते. यात चूक असे  काहीच नाही. तरीही सेल साठी गॅरेज मधे ठेवलेल्या त्या वस्तू विकत घेणे  आमच्या भारतीय मनाला रूचले  नाही आणि धाडसही झाले नाही. आतापर्यंत दुस-याने वापरलेल्या वस्तू वापरायची माझ्यावर वेळ न आणल्याबद्दल मी देवाचे आभार मानले आणि पुढे कधीही ती वेळ न येवो म्हणून त्याच देवाकडे प्रार्थना केली.

(हा लेख ‘लोकसत्ता‘ वृतपत्रातील चतुरंग पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)
  (छायाचित्रे जालावरून साभार.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा