उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१० सप्टेंबर, २००९

बुजगावणे

सण म्हणजे आनंदोत्सव. यात असते ती खाण्यापिण्याची चंगळ, कपड्या-लत्त्याची मौज-मजा, संगित नृत्याचा आस्वाद. खर तर मानवाने सणाच्या साजरीकरणाचा काळ ठरवला तो निसर्गाच्या बदलांनुसार. पण असे म्हणण्यापेक्षा कधी कधी असे वाटायला लागते की हा निसर्गच मानवाच्या सणासूदीत उत्साहाने शामिल झाला आहे आणि मानवाला त्याच्या विविध रूपात सामवून घेऊन रंगवून टाकतो आहे. निसर्ग मानवाला मुक्त हस्ते भरभरून सुख देऊन तृप्त करत आहे आणि या समाधानातच मानव आनंदोत्स्व साजरा करत आहे.
निसर्गाच्या प्रत्येक बदलाची चाहूल मानवाला काही काळ आधीच लागते आणि मग मानवही सज्ज होतो तो निसर्गाने देऊ केलेल्या त्या सुखासाठी. हा निसर्गातील बदल म्हणजे ऋतूचक्र. या चक्राच्या ढाच्यात मानवाने स्वतःला फिट्ट बसवले आहे. ज्यामुळे तो निसर्गाची ती उधळण वाया दवडू न देता द्वैहस्ते स्विकारू शकतो. आणि ही उधळण असते विविधतेने नटलेली. प्रत्येक जागी काही वेगळी किमया. निराळी जादू. निसर्गच हे जादूमयी रूप बदलले दिसते ते ऋतूचक्रात.
भारतात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळी हे तीनच ऋतू दिसतात. अमेरिकेत काही भागात समर, फॉल, विंटर, स्प्रिंग असे चारही ऋतु व्यवस्थित दिसतात. त्यांच्या काळात थोडाफार फरक असतो. म्हणजे अमेरिकेतल्या उत्तरेकडे विंटर जास्त लांबलेला असतो. तर दक्षिणेकडे समर जास्त मोठा असतो. पण चार ही ऋतू पहायाला आणि सहजी अनुभवायला ही मात्र जरूर मिळतात.
या चार ऋतुंपैकी सध्या सूरू असलेला ऋतू म्हणजे पानगळीचा. फॉल सिझन! आत्ता बरीचशी झाडे आपल्या हिरव्या पल्लवीला विविध रंगांचा नजराणा भेट करून सोडचिठ्ठी देत आहेत. अश्या या रंगपंचमीतील निरोप समारंभ म्हणजेच फॉल फेस्टिव्हल.
 या काळात मानवाला केवळ दृष्टीसुख न मिळता अजून मिळते ते भरघोस धान्याचे उत्पादन. त्याचाच हा सण. हाच काळ काही पिकांची कापणी झाल्यावर धान्य जमा करण्याचा. आताश्या शेतीतील काही पिके तयार झालेली असतात. हारवेस्ट किंवा कापणी करून झाल्यावर धान्य गोळा करून झालेले असते. ते पिक आधी शेतावर गोळा करून ठेवले जाते आणि मग सडणी, धोपटणी वगैरे करून दाणेदार धान्य पोत्यात भरून साठवणीच्या जागी विकण्यासाठी जमा केले जाते. हे पिक तयार होताना तसेच कापणी करून शेतात जमा केलेले असताना अनेक पक्ष्यांचे भक्ष्य होते. काही वेळेला पक्ष्यांचे थवेच्या थवे संपूर्ण शेताचा फन्ना उडवतात. यासाठी शेता-शेतातून राखणी करावी लागते. तिथे उभे राहून गोफण फिरवून या थव्यांना दूर सारावे लागते. प्राणी पक्ष्यांना माणसाच्या अस्तित्वाची जाणिव करून देणासाठी ब-याचदा या शेतात स्केअर क्रोज किंवा बुजगावणी ही उभी केलेली दिसतात.
पूर्वी अमेरिकेच्या अनेक ठिकाणी फॉल ऋतूत जेव्हा हारवेस्ट फिस्टेव्हल साजरा केला जात असे तेव्हा या बुजगावण्यांची स्पर्धा घेतली जात असे. अजूनही अशीच स्पर्धा जॉर्जियातील अटलांटा येथे घेतली जाते. या (स्केअर क्रोज्‍ काँटेस्ट) स्पर्धेत आजूबाजूच्या शाळा सहभागी होतात. या शाळीतील एक वर्गाचे विद्यार्थी आणि शिक्षक हे बुजगावणे तयार करतात आणि शहाराच्या मुख्य रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबापाशी आयोजकांने नेमून दिलेल्या ठिकाणी गवतावरच्या पेंडीवर मांडून ठेवतात. त्यावर त्या बुजगवण्याचे नाव, त्याची थोडक्यात माहिती, शाळेचे नाव, वर्ग आणि शिक्षकाचे नाव इत्यादी माहिती लिहिली जाते. मग एका शनिवारी सकाळी आयोजक, निवड समिती, आणि अर्थातच स्पर्धेत भाग घेतलेल्या शाळेचे शिक्षक त्या रस्त्यावर एकत्र जमतात. शहरातली उत्साही मंडळी आपल्या लेकरा-बाळा सोबत उपस्थित होतात. सर्व स्पर्धक बुजगावण्यांची पाहणी करतात. त्या स्केअर क्रोजचे अगणित फोटो काढले जातात. वाह वाह करतात. आपण एखादे `ध्यान` दिसत नसून एखाद्या सेलिब्रिटीसारख आकर्षक असल्याचे प्रत्येक बुजगावण्याला त्या वेळी वाटत असावे. पाहणी नंतर निवड होऊन `विजेते बुजगावण` घोशित केले जाते आणि बक्षिस समारंभ होतो. साधारण दोन आठवडे ही बुजगावणी त्या दिव्याच्या खांबाशी उभे राहून तो रस्ता माहितीपूर्ण करतात. रस्त्यावरच्या रहदारीला याचे आकर्षण वाचल्यावाचून रहात नाही.









कुठलेही बुजगावणे पाहिले की मला एक गंमत आठवते. एकदा कॉलेजमधे असताना आमची पिकनिक निघाली होती तेव्हाची ! शहर सोडल्यावर लगेचच आमच्या बस मधे काहीतरी बिघाड झाला. आम्हाला सर्वांना खाली उतरावे लागले. त्या रहदारीच्या पण अरूंद रस्त्यावर घोळक्याने उभे राहणे शक्य नव्हते. लगतच एक शेत होते. शेतात लांबवर झोपडीवजा घर होते. तिथून आमच्या आयोजकांनी परवानगी घेतली आणि आम्ही सर्व जण त्या शेतात घुसलो. शेत फार उंच नव्हते. असेल गुडघाभर. त्या शेतात सर्वात आकर्षक काय वाटले असेल तर उभे केलेले बुजगावणे. दोन काठ्यांचा केलेला क्रॉस. आडव्या काठीला घातलेला मळकट, फाटका कुडता. खाली काहीच दिसले नाही म्हणून त्या बुजगावण्याची एवढी टिंगल झाली की एकीने कीव येऊन बिचा-याला खाली बांधायली तिची ओढणी ही देऊ केली. डोक्याच्या जागी एक चौकोनी खोका होता. चेहरा काहीच दिसत नव्हता. पण वर बांधलेल्या फडकेवजा मुंडाश्याने चेह-याचा आभास निर्माण केला होता. आमच्या पर्स मधल्या आयब्रो पेन्सिलने मुलांनी त्याला डोळे, नाक रंगवले. लिपस्टिकने ओठ काढले. आता ते बुजगावणे खूपच हँडसम दिसायला लागले होते. सर्व मुलींनी त्या चिकन्याबरोबर मनसोक्त फोटो काढले. काही वेळाने फरसाण, वेफर्स्, चिवडा, बिस्किट यांची पाकिट बाहेर आली आणि खादाडी सूरू झाली. जवळच हसमुख चिकन्या नुसता उभा राहून आमच्याकडे पहात होता. खाली पडलेला खाऊ खायला मात्र एक कुत्रा, दोन माऊ जमली. त्यांच्याशी खेळ-बिळ झाला. खाणपिणे झाले आणि चिकन्याला बाय बाय करून आम्ही दुरूस्त झालेल्या बसकडे निघालो. सर्व जण शेत सोडून बसमधे बसतो न बसतो तोच कुणाच तरी लक्ष पुन्हा शेताकडे गेले. कुत्रा मांजर काही दिसले नाहीत पण चिकन्याच्या आजूबाजूला कावळे मात्र जरूर दिसले. एक कावळा तर चक्क डोक्यावर बसून खालचे अन्नकण शोधत होता.निश्चल चिकन्या अजूनही हसतमुखाने कुठेतरी एकटक पाहात होता.

(हा लेख ‘ई-सकाळ‘ वृतपत्रातील पैलतीर पुरवणीत प्रकाशित झाला आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा