उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१९ सप्टेंबर, २०१०

अटलांटा, जॉर्जिया येथिल गणेशोत्सव २०१०.

अनके मराठी जन भारताबाहेर जगभरात वास्तव्य करून आहेत. अगदी कागदोपत्री ते त्या देशाचे नागरिक बनले असो वा नसो, ते मनातून भारतीय मराठीच आहेत. ते नाही मराठीला सोडत, नाही मराठी त्यांना! म्हणूनच की काय जिथे तिथे अनेक मराठी मंडळे स्थापली गेली आहेत आणि ती नहेमी कार्यरत असतात. या मंडळांतर्फे आनंदाने एकत्रित येऊन आवर्जून हिंदू सण साजरे केले जातात. अमेरिकेत तर इथल्या राष्ट्रांइतकीच किंवा त्याहून अधिक मराठी मंडळे आहेत. ही सर्व मंडळे जनामनातील मराठीपण उजळून अधिक प्रकाशित करीत असतात.
हिंदू धर्मात तेहत्तीस कोटी देव असले तरी श्री गणेश हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यामुळे अमेरिकेतील मराठी घराघरात शिवसुत गौरीनंदनाचे भक्तिभावाने पूजन होते. तसेच भाद्रपदातल्या शुक्ल चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतच्या कालवधीत सोयीनुसार का होईना परंतु एखाद्या शनिवारी सार्वजनिकरित्या गणेशोत्सव हमखास साजरा होता. इथली सर्वच मराठी मंडळे त्या चतुर्हस्त लंबोदराची साग्रसंगित पूजा, टाळ-झांजासहित तालासुरात गायलेल्या आरत्या, गोडाधोडाचा नैवेद्य, मनोरंजनात्मक कार्यक्रम अणि मग यथासांग विसर्जन करून मायभूमीतील मराठी संस्कृतीशी निगडीत असलेली परंपरा ही राखायचा आवर्जून प्रयत्न करतात.
अमेरिकेतल्या लोकांसाठी काही नाविन्यपूर्ण नसेल पण इतरत्र असलेल्या काही भारतीयांना नक्कीच कौतुकास्पद आणि कदाचित आश्वर्यकारकही वाटेल असा गणोशोत्सव अटलांटा, जॉर्जिया येथे सार्वजनिकरित्या साजरा केला गेला. तसा तर गणेशोत्सव दरवर्षीच साजरा केला जातो. ह्यावर्षी अधिक उत्साह होता कारण ह्या वर्षी अमेरिकेसारख्या परभूमीवर ह्या महाराष्ट्र मंडळाने पंचवीस वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केले. या रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करताच श्री. वैभव व सौ. पल्लवी साठे यांच्या अध्यक्षते खाली उत्साही कार्यकारी मंडळाच्या योजना तयार झाल्या आणि त्याच्या अंमलबजावणीचे काम तात्काळ सुरू झाले. जानेवारीत मकर संक्रांत, नंतर गुढी पडवा त्यानंतर भांडवल गुंतवणूकीचा मार्गदर्शनपर (Finance Seminar) अभ्यासवर्ग आणि प्रश्नोत्तर कार्यक्रम, उन्हाळ्यात सहल पार पाडल्यानंतर कार्यकारी मंडळाबरोबरच सर्व सभासदांना वेध लागले ते सूखकर्ता, दु:खहर्ता विघ्नविनाशकाचे.
अटलांटा महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारी समितीला तर या खास मराठमोळ्या उत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचे उधाण आले. काही लहान मोठ्या सभा झाल्या, योजना आखल्या गेल्या. सार्वजनिक गणेशभक्तीसाठी १८ सप्टेंबरचा २०१० चा शनिवार निश्चित करण्यात आला आणि त्यानंतर तर विविध स्वयंसेवी कामामुळे कार्यकारी मंडळाला उसंतच उरली नाही. त्यांनी ह्या रौप्यमहोत्सवी वर्षी दोन फुटी ऊंच असलेली श्री मंगलमूर्ती खास भारतातून आणण्याची व्यवस्था केली. आंतरजालाच्या सोयीचा फायदा घेऊन चुटकीसरशी संपर्क साधले. गणेशोत्सवासाठी आयोजित केलेल्या हास्यनाटिकेत भाग घेण्याबद्दल सभासदांना इ-पत्रे धाडण्यात आली. त्याशिवाय उत्सवाच्या जागेची निवड, पूजेच्या साहित्याची व्यवस्था, कार्यक्रमासाठी ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, श्री गजाननाच्या नैवेद्याची तसेच या सार्वजनिक उत्सवात सामिल होणा-या भक्ताच्या प्रसादिक भोजनाची तयारी ..... कामे तर न संपण्याजोगी होती. ती ही उरकायची होती आपापली नोकरी धंदा संभाळून, फावल्या वेळात, अगदी नि:स्वार्थी सेवाभावाने. पण तो देवाधिदेव आपल्या भक्तांना संभाळून घेतो आणि त्याची सेवा करण्याचे बळ आणि सामर्थ्य देतो हेच खरे!
संपूर्ण कार्यकारी मंडळ सर्व शक्ति एकवटून झपाट्याने कामाचा फडशा पाडत होते. एका शाळेतील जागा या कार्यक्रमासाठी निश्चित केली गेली. श्री. शार्दुल म्हसकर यांनी श्री गणरायाच्या विराजमान व्ह्यावयाच्या जागेच्या सुशोभिकरणाची आणि मखराची कल्पना मांडली. ती निश्चित करून कार्यकारी मंडळाने त्यांना मदत करण्यास सुरवात केली. त्याबरोबरच श्री. श्रीनिवास भणगे लिखित ‘दंतकथा २०१०‘ या हास्य नाटिकेतील पात्रांची श्री. अशिष चौधरी या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली तालिम ही सुरू झाली. श्री. अजय हौदे यांनी मिरवणूकीतील लेझिमच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली. त्यात सहभागी होणा-या प्रौढ पुरूष, महिलांना तसेच तरूण मुलामुलींना पुन्हा पुन्हा न कंटाळता सूचना आणि सराव देण्याचे काम अव्याहत चालू होते. शिवा तुरलापती व इतर काही नृत्य दिग्दर्शकही नर्तकींचा सराव करून घेत होते. श्री सेवेच्या विशेष कार्यक्रमासाठी अनेक जण समांतर रेषेत झटत होते.
म्हणता म्हणता त्या खास शनिवारचा आदला दिवस संध्याकाळकडे झुकला. एकिकडे कार्यकारी मंडळ उत्सवाच्या ठिकाणी व्यवस्था करण्यास हजर झाले. पूर्णपणे हाताने कोरिवकाम, रंगकाम करून तयार झालेल्या मखराची जुळणी आणि मांडणी करण्यात आली. दुसरीकडे हास्य नाटिकेतील पात्रे रंगित तालमीमधे रंगले. इतर सेवा / मदत देणा-यांचेही हात घरोघरी कामात गुंतले. थकून भागून शुक्रवार मावळला आणि तो उत्सवी शनिवार मात्र उजाडला अत्यंत तजेलदार होऊन!
शाळेतील उत्सवाच्या जागेवर कार्यकारी मंडळाची लगबग उडाली. समित्या, उपसमित्यांनी रोषणाई, सजावट, पूजा वगैरेची सर्व जय्यत व्यवस्था करून ठेवली. कार्यकारी मंडळातील स्त्रिया ऊंची वस्त्रालंकारात चमकत होत्या तर पुरूष मंडळी पारंपारिक पोषाखात लुकलुकत होते. लवकरच इतर गणेश भक्तही नटून सजून गोळा होऊ लागले. श्री गणेशाची राजोपचार पूजा आणि नंतर आरती केली गेली. ठरलेल्या वेळेनुसार मनोरंजनाच्या कार्यक्रमाची सुरवात झाली.
प्रथम नर्तकींनी गणेश स्तुतीपर नृत्ये आणि श्री. शशांक होनावर यांनी गायन सादर केले. त्यानंतर ‘दंतकथा २०१०‘ ही हास्य नाटिका सादर करण्यात आली. कलाकारांचा अभिनय, बदलते नेपथ्य, ढोलकीच्या साथीने पारंपारिक पध्दतीने गाऊन केलेले निवेदन यांनी नाटिका रंगतदार केली.
त्यानंतर साधारणत: साडे साहशेच्या वर उपस्थित असलेल्या भक्तांनी एकत्रितपणे श्रींची महाआरती केली. सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी ही काही महिलांच्या मदतीने सौ. लद्दू काकूंनी केलेल्या घरगुती पेढ्यांचा प्रसाद भक्तांना देण्यात आला. आणि गणपती बाप्पाला पुढल्या वर्षी लवकर या असे विनवून विसर्जनासाठी जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूकीत नऊवारी साडी नेसलेल्या लहान बालिका, झेंडे हाती घेतलेली मुले –मुली आणि इतर भक्तगण मंगलमूर्तीचा जयघोष करत होते. मंडळाच्या कार्यकारी समितीने झांजा वाजवत दिंडी नृत्य करून श्री वंदना केली. त्यानंतर ढोल ताशाच्या नादावर लेझिम वाजवत कपाळाला लाल टिळा लावलेल्या एकसमान वेशभूषेतील लेझिम पथकाची पावले ठेक्यात पडू लागली.  ‘देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया‘ या गाण्यावर केलेले सामुहिक पारंपारिक लेझिम नृत्य अप्रतिम झाले. जमलेल्या सर्व भक्तांनी टाळ्या वाजवून ‘गणपती बाप्पा मोरया‘ च्या घोषणा  देऊन त्यांचा जोश अधिकच वाढवला. अनेक जणांचे डोळे स्फूर्तीदायी नृत्यावर, कान ढोलताशाच्या  संगितावर तर  छायाचित्रे आणि चलचित्रे  घेण्यात हात गुंतले होते. काही जणांनी आपापल्या खास पध्दतीने नृत्य सादर केले. पायी हळू हळू चालताना मुखाने गजानना बोलत भारतीय पारंपारिक थाटाने निघालेल्या या मिरवणूकीचा शेवट श्री मूर्तीच्या विसर्जनाने झाला. त्यानंतर भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या सर्व श्री भक्तांनी लोणचे, पापड, मसाला भात, साधा भात, टोमॅटो सार, आम्रखंड, पुरी, मटकी उसळ अश्या खास महाराष्ट्रिय रूचकर पदार्थांचा आस्वाद घेतला. मित्र मैत्रिणींशी गप्पा गोष्टी, हितगूज यांनी तर त्या पदार्थांची चव अधिकच वाढवली आणि बरेचसे भक्तजन तृप्त मनाने घरी परतले.
कार्यकारी मंडळाचे काम अजून ही संपले नव्हते. कार्यक्रमा मागची बरीच आवरा सावर बाकी होती. ती करण्यास काही स्वयंसेवकांनी कार्यकारी मंडळाला मदत केली. राजी खुशी स्विकारलेल्या जबाबदारीपैकी सार्वजनिक गणेशोत्सवाचा महत्त्वाचा कार्यक्रम धुमधडाक्यात तरीही वक्तशिरपणे पार पडून मंडळ समिती परतली ते अल्पावधीत येणा-या नवरात्रीतील गरबा आणि दांडिया नृत्याच्या कार्यक्रमाची आखणी आणि योजना ठरवतच.

(हा लेख ‘ग्लोबल मराठी‘ मधे प्रकाशित झाला आहे.)

२ टिप्पण्या: