उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

११ सप्टेंबर, २०१०

द्येवा हो द्येवा, गनपती द्येवा.

मुनिशिपालिटीच्या पाईप लायनीच्या बाजूच्या ईंदिरा नगरमधल्या झोपडपट्टीतल्या जवान मुलांनी ह्या सालाला तिथल्या मैदानात दिड दिवस गनपती पूजायचा ठरिवला. त्येंनी आसपासच्या बिल्डिंगीतून चंदा मागून बरासा पैका जमा केला. त्यो बीडी, पान- तंबाकू, दारू, मटका, जुगार ह्यात दवडायचा न्हाय अशी सगल्यांनी कसम घेतली. मोट्या रोडवरच्या दुकानामदी जाऊन मुलांनी गोल लोडाला आरामात टेकून बसलेली हातच्या कोपरापर्यंत उंच आसलेली गनपतीची मूर्ती पसंत केली आन थोडं पैसं द्ये ऊन आरडर बी नक्की करून टाकली.
दोन चार दिसानंतर त्यांनी मैदानाच्या मदोमद झाडलोट कराया सुरवात केली. तवा बस्तीतल्या इतर मुलांनी, कामधाम नसलेल्या बाया-मानसांनी लई मदत केली. कच-यातले कागद, पलास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, बारीक गवत, कापडाचे फाटके तुकडे, रबरी टायर, माती-दगडीचे ढिगारे साफ झाल्यावर ती जागा लख दिसाया लागली. गंदगी गेल्यावरती तिथनं कावळी कुत्री बी गुमान दूर चालती झाली. नंतर जवान मुलांनी भाड्याने आनलेले चार लाकडी खांब उभारले. त्येवर ताडपत्री बांधून मंडप तयार केला. त्येला रंगित तिरकोनी कागदी
पताका लावल्या. भाड्याने लाकडी इस्टेज आनून मंडपामदी ठेवला.
कालच्या चतुर्थीला सकाली सकाली पान्याच्या फुटक्या पाईप लायनीच्या जवल बारक्या मुलांनी गलका केला. लगाबगा आंघोली उरकून चिल्ली पिल्ली मैदानात जमा व्हायाला लागली. जवान तर आदी पास्नच कामाला लागले व्हते. त्येंनी लाकडी इस्टेजवर सोलापूरहून बस्तीत नवीनच रहाया आलेल्या परकाश पायंडेकडची चादर हांथरली.त्यावर गोपालकृष्ण मंदिरातून मागून आनलेला चौरंग ठेवला. त्यावर बाजारातून केसरी रंगाचा नवा कपडा आनून घातला आनी गनपती ठेवाया जागा बनिवली. जवलच्या गुरूप्रितसिंग टायर रिपेर शॉप मधून केबल घेतली. अब्दुल चाचांनी समद्या वायरींना रंगीत बलप जोडून दिले अन इस्टेज लाईटीने कसा चकमक चकमक कराया लागला. राड्रिक्स फर्नांडिसने  आपल्या दुकानातून लाऊडी इस्पिकर पाठिवला व्हता.  त्यावर भाड्याने आनलेल्या कॅशेटा लावल्यावर मोट्यांदा मुजीक वाजाया लागलं.
  लई पोरं टोरं जमा झाली. आन तिथं दंगा करू लागली. त्ये ऐकून यादव आजे, सारदा वैनी, कमला दीदी, गुप्तामासी, जुली शिश्टर, फुपीजान, मुमताज चाची, दिपिंदर कौर, मेरी आंटी आशी समदी बाई मानसं बी मैदानात आली आन काही बाही मदत करू लागली. सालूंके भाजी वाल्याने त्याची धंद्याची ढकल गाडी गनपती आनाया दिली. कागदाच्या रंगबिरंगी कागद आन पताका लावून ती ढकल गाडी ब्येस सजिवली. वरच्या बाजूला कमला बेनने दिलेली रेशमी चादर आथंरली. त्यावर मूर्तीसाटी पाट ठेवला.
दोस्ताना बेंजो पार्टीचा बुलबुल तरंग वाजिवनारा आनि ढोल बडिवनारा आल्यावर दोन चार बायां आन धा बारा पोरांसंग समदी जवान गनपती आनाया त्या मोट्या रोडवरच्या दुकाना मदी पोचले. दुकानात मोप गर्दी व्हती. तिथं गनपतीचं उरलेलं पैसं दिल्यावर मूर्ती ताब्यात मिलाली. ती सजिवलेल्या ढकल गाडीवर ठेवली. गनपतीच्या मूर्तीवर मालू आतेने तिची जरतारी शाल पांघरली. बुलबुल तरंग तूणतूणू लागला. ढोल ढमढमू लागला. मुलांनी हवेमदी गुलाल उधळला. सोताला आन दुस-याला फासला. रंगलेली पोट्टी मुजीक वर नाचाया लागली.
वाजत गाजत गनपती मैदानातल्या मंडपात पोचला. त्येला इस्टेज वरच्या चौरंगावर ठेवला. कुनी केळी, तर कुनी नारियल आसली फळं पाठिवली व्हती. ती गनपती समोर ठेवली. खायाची पानं, सुपा-या बी आनून ठेवल्या. गनपतीची पूजा कराया फाटक गुर्जी जराश्या उशिरानेच आले. त्येंनीच गनपतीची मस्त पूजा केली. त्ये काय तरी मंत्र बोलले. दिवा, अगरबत्ती वोवाळली. मिनाक्षी अम्माने आनलेल्या सुगंधी चंदनचा तिलक लावला. मूर्तीला हलदी, पिंजर आन जास्वंदी व्हायली. बस्तीतल्या तुकाराम फुलवाल्यानी गनपतीला हार  दिला व्हता. त्यो बी घातला.
 लाऊडी इस्पिकरवरती फाटक गुर्जींनी सुखकरता, दुखहरताची आरती गायली. पट्टीतल्या पोट्ट्यांना कुटं येत व्हती आरती बोलाया? त्येंनी निसत्या टाळ्या वाजिवल्या. आरती झाल्यावर ब्रिजवासी मिठाई वाल्याकडून आनलेल्या किलो भर पेड्यांचा पुडा उघडला. गनपती समोर एक पेडा ठेवल्याबरोबर सगल्यांनी प्रसादासाठी हाS S गोंधल केला. लायनी मदी बच्चे लोकांनी आपापसात मारामारी करून मागं पुडं करून घेतलं. ग्वाड पेडा एका हातावर पडला तरी त्यांचा दुसरा हात पुडं येत व्हता. काही आया आपल्या पेड्यातला बारीकसा तुकडा खाऊन उरलेला कडेवरच्या बारक्याला भरवित व्हत्या. धाकल्या शेंबुर्ड्या भईनीला कडेवर घेतलेली पोरगी बरी शिरली लाईनीत आनी तिला बी भेटले दोन पेडे. “आरं त्या पोल्योला द्या की पेडा.” कुनीतरी बोलला. तवा कुटं त्या पोलियो झालेल्या लंगड्याला प्रसाद भेटला. पेडा द्यायाला अजून जरा टाईमच झाला त्यो बापू म्हाता-याला. त्यो कापत कापत काठी टेकत येईस्तोवर संपतच आल्ते की पेडे! पन त्येला गनपतीच्या पुढ्यातला शेवटीचा एक पेडा भेटला. समद्यास्नी वाटता वाटता प्रसाद कदी संपला त्येच कळालं न्हाय.
मग लाऊडी इस्पिकरवर जवान मुलं गानी वाजवाया लावली. समदी गानी मराटीच व्हती. आता, मराटी सन हाय हा. मंग नको काय मराटी गानी वाजवाया?
गनराज रंगी नाचतो,
पायी घाग-या, करिती रुनझुन,
आसलीच अजून बी व्हती मराटी गानी वाजित तिथं. जशी की ....
तू सुख करता, तू दूख हरता
विघ्न विनाशक मोरया,
संकटी रक्षी शरन तूला मी
गनपती बाप्पा मोरया.
बस्तीतल्या पोट्ट्य़ांनी आसली द्ये वाची मराटी गानी कसली आलीय आवडाया? ती कंटाळली. गनपती समोरून पोरं पांगली. तरी बी मराटी गानी सुरूच ठेवली व्हती. मंग तिथं फकस्त बुढे बुजूर्ग गानी ऐकत आन गप्पा टप्पा करत बसली व्हती.
दूपारनंतर मात्र पोरांनी “कोंबडी, तंगडी, लंगडी”ची गानी नाय तर हिंदी पिच्चरच मुजीक वाजवाया जिद केली. पुना पुना कशी मागंच लागली! शेवटच्याला कॅशेट बदलली.
द्येवा हो द्येवा ,
गनपती द्येवा,
तूमसे बढकर कौन?
त्याच परमाने अजून बी हिंदी पिच्चर मदली गानी लावली.
जय गनेश, जय गनेश
जय गनेश, जय गनेश द्येवा,
माता जाकी पारवती,
पिता महाद्येवा.
पोट्टी लई खुष झाली बगा! तोंडाने गानी बोलत हिरोवानी नाचाया लागली. आसल्या या नाच गान्यात काळोख पडाया लागला. फाटक गुर्जी पुना आले. त्येंनी घाई घाईत गनपतीची आरती केली आन निघून गेले. हातावर साखरेचे फुटाणे घेऊन पोट्टी आपापल्या झोपड्यात परतली. आज झोपड्या झोपड्यातल्या कलेजात लई आनंद भरला व्हता. पन चार बोट खालंची पोटं मात्र नेहमीसारखीच रिकामी व्हती. झोपड्यात ज्ये काय भेटलं त्ये खाऊन पुना मुलं गनपतीच्या या मंडपात जमली. “आज द्येव आपल्याकडं आलाया. त्येला येकट्यालाच इथं कस्सं काय ठेवायचा?” असं बोलून मुलांनी आज गनपतीच्या समोरच निजायचं ठरिवलं व्ह्तं. तिथं लावलेल्या मोट्या लाईटीमदी त्येंना त्ये जमनार व्हतं की नाय? त्ये त्यो द्येवच जाने. तरी बी त्ये आपापल्या चटया टाकून तिथं एकमेकांच्या संगतीने आडवी झाली.
जरा कुठे निजा निज होत्ये त्योवर बाजूच्या रस्त्याच्या तिकडून येका मोटराच्या हार्न वाजला. आनी ती मोटार तिथंच थांबून हार्न वाजवित राहिली. मुलं चटयावर उठून बसली. कुनीतरी मोटारीतून उतरलं. येक झगामगा कापडं घातलेली बाई तिथं बोलावित व्हती आन काही तरी पिशवीतून दाखवित बी व्हती.
एक जन मागं पुडं करित तिथं गेला. हातात कासली तरी पिशवी घेऊन “आरं, जेवन हाय. जेवन!“ असं म्हनत धावत परतून त्याच्या झोपड्याच्या दिशेनं धावला. सगली लहान मोटी पोरं मोटारीजवल जमा झाली. मोटारीतल्या त्या शेटाणीण बाईनं पट्टीतल्या लोकांस्नी वाटाया पिशव्या पिशव्यातून जेवन भरून आनले व्हत्ये. लई पिशव्या व्हत्या तिच्याकडं. पोरं भेटल ती पिशवी घेऊन परतली आन आपापल्या झोपड्यात शिरली. मोटार निघून गेली. गनपतीचं त्यो लाइटी लावलेला मंडप पुरा ओक बोका झाला. झोपड्यातल्या कुनाला भाजी भेटली तर कुनाला पु-या! कुनाला निस्ताच भात तर कुनाल ग्वाड जिलेबी. ज्येला जमलं त्येनी बाजूच्या झोपड्याला पु-या द्येऊन आपली भाजी वाटून घेतली. कुनी मीट आन मिरची पूड घालून कांद्यासोबत कोरडाच भात खाल्ला. कुनाला ग्वाड जिलेबी खायाला भेटली. मुलांची पोटं अजून जराशी भरली. ती पुना येऊन गनपतीसमोर पसरली आन मोट्या बलबांच्या लाईटीखाली लागलीच झोपी गेली.
चौरंगावरचा हार फुलं घातलेला गनपती मात्र चारही हातानी भरभरून आशिर्वाद द्येत टक्क जागा व्हता.


(छायाचित्रे जालावरून साभार.)

1 टिप्पणी:

  1. उर्मीताय, लई झ्याक लिवलंय बगा. असल्या लहानग्या बाळांमधेच गंपती बाप्पा असतो खरंतर!

    उत्तर द्याहटवा