उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१५ डिसेंबर, २०१०

आमचे कासव- बंडू

आम्ही चीनमधे राहत होतो तेव्हा आमच्या डोक्यात फेंग शुई(चीनी वास्तू शास्त्र) चे भूत स्वार होते. आम्ही बरीच पुस्तके वाचली. आंतरजालावरून ही माहिती गोळा करून अभ्यास केला. तेव्हा ब-याच ठिकाणी असे वाचण्यात आले की नोकरी/ धंदा/ व्यवसायाच्या भरभराठीसाठी घराच्या उत्तरेला पाणी किंवा त्याशी निगडित वस्तू ठेवावी. उदा: छोटे कारंजे, मस्त्यालय, कमळ, वगैरे किंवा त्यांची प्रतिकात्मक चित्रे.
मी बाजारातून एक (फिश टॅंक) काचेची टाकी आणली. छोट्टीशी. मला कुणाच्या ही मदतीविना त्याची निगा राखता येईल अशी. लांबी X रूंदी X खोली पाहता असेल २० X १० X १५ इंच. ती छानश्या टेबलावर ठेवली. फेंग शुईने सांगितल्याप्रमाणे आठ केशरी गोल्ड फिश व एक काळा गोल्ड फिशची खरेदी ही झाली आणि आमच्या घरातल्या टेबलावरच्या त्या काचेच्या पेटीत ते नऊ मासे विहरू लागले.
आमच्या तिघांच्या घरातले ते पहिले वहिले पाळिव प्राणी (पेट) होते. आम्ही सर्व कुटुंबीय एखाद्या खुळ्यासारखे माश्यांच्या हालचाली एकटक पहात बसू लागलो. माश्यांसाठी सुकलेल्या किड्यांचा खाऊ, पाणी निर्जंतुक रहावे म्हणून औषधे, हवेचे बुडबुडे सोडणारे पंप वगैरे लाड पुरवून सुध्दा माश्यांनी आमच्या घरी तग धरला नाही. एकेक जण आम्हाला सोडून गेले. आता फेंग शुई विषय सोडून आम्ही माश्यांची निगा या विषयावर अभ्यास सुरू केला. पुन्हा नव्या जोमाने नवीन नऊ गोल्ड फिशचा समुह घरात शिरला. त्यांना नाजूकपणे संभाळत, जिवापाड काळजी घेऊन ही मी अपयशी ठरले. पुन्हा एका मागून एकांनी आमचा निरोप घेतला. निराश होऊन मी माश्यांचा नाद सोडून पुन्हा मासे न पाळण्याचा निग्रहापर्यंत पोचले.
आता एखादे छोटे कासव आणण्याबद्दल घरात विचार विनिमय झाला आणि तो तत्काळ अंमलात ही आणला गेला. बाजारातल्या दुकानातून सर्वात लटपटे / खेळकर असे दिसणारे तळ हातावर मावेल एवढे इवलुसे कासव निवडून खरेदी झाली आणि त्याचे आमच्या घरात आनंदाने स्वागत झाले.

आता आम्ही आम्हाला कासवाचा नाद लावून घेतला. येता जाता काचेच्या पेटीशी रेंगाळणे, टाकीच्या काचेवर हाताच्या बोटांच्या नखांनी ट्क ट्क करणे, त्याच्या ढालीसारख्या पाठीवरून अलगद बोट फिरवणे वगैरे खोड्या करायला सुरवात केली. पण ते ढिंम! काही प्रतिक्रियाच दाखवायचे नाही. ना फारशी हालचाल, ना खाणे पिणे.
मी त्याला गरम पोळीचा बारीकसा तुकडा, भाताची दोन चार शितं, केळ्याचे/ केकचे कण ही घालून पाहिले. पण सर्व अन्न जिथल्या तिथे रहात होते. त्याची पाठ कडक असली तरी पोट तेवढे कणखर नसेल. त्याला टाकीच्या तळाचे रंगित बारीक दगड टोचतील म्हणून ते काढून टाकले. टाकीतली कृत्रिम झाडे/फुले ही त्याच्या दृष्टिआड केली. पण कासवात काही फरक पडला नाही. ते अजूनही गुमसुम होते. माश्यांसारखे हे कासव ही आपल्याला सोडून जाणार या भितीने मी त्रासले. पुन्हा जाऊन त्या कासव विकत घेतलेल्या दुकानामधे चौकशी केली. त्यांनी काचेची पेटी पाण्याने अर्धी अधिक भरण्याचे सुचवले. कासव विकत घेताना अतिशय कमी पाण्यात त्याला ठेवले होते. त्यामुळे माझी समजुत झाली होती की ह्या प्रकारच्या कासवांना कमी पाण्यात ठेवायचे. घरी आल्या आल्या मी टाकीत चार पाच कप पाणी ओतताच कासव बावरले. अधिक सावध होऊन ही पाण्यावर हलकेच तरंगू लागले. नंतर टाकीच्या तळाशी बुडाले. पाणी वाढवण्याची युक्ति कामी आली नसल्यासारखे वाटले. पण इतक्यातच कासवाने चारी पाय जोरदार झटकले आणि काही वेळातच त्याने टाकीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहायला सुरवात केली. ते कासव हरखून गेले आणि उत्तेजित झाले. टाकीतल्या पाण्यामुळे काचेमधे स्वत:चे प्रतिबिंब पाहून कासवाला आपले सवंगडी भेटल्यासारखेच वाटले असावे. पाय मारून वर-खाली, आजूबाजूला होत आपल्या सवंगड्यांबरोबर ते खेळ करते आहे असे आम्हाला वाटले. त्याची ती चपळ हालचाल पाहून त्याच्या खोड्या काढायला सर्वांना ऊत आला. ते पाण्यावर आले की त्याच्या पाठीला बारीकसा धक्का देऊन त्याला आत ढकल, त्याला पोहू न देता तळाशी अलगदपणे पकडून ठेव असले चाळे ते सहजी सहन करू लागले. इतकच नाही तर ते उलट प्रतिक्रिया ही द्यायला धिटावले. कधी टोकदार नखं असलेले पाय मारायचे तर कधी अंग पुढे-मागे करून दंगा करत सुटून जायचे. टाकी बाहेरील आमच्या बोटाला टाकीच्या आतून चावायचा प्रयत्न निष्फळ ठरला तरी ते कधी कंटाळत नसे. लवकरच असे मनोरंजक कासव आमच्या घरचे आकर्षण बिंदू बनले. माझ्या यजमानांनी लागलीच त्याचे नामकरण केले – 'बंडू'. ते कासव नर की मादी याची आम्हाला पर्वा नव्हती. बंडू हे नराचे नाव आम्ही सर्वानी मान्य केले.
येता जाता आम्ही त्याला “बंडू, बंडू” म्हणून हाका मारू लागलो. त्याला काय कळत होतं, देव जाणे! पण काचेच्या पेटीशी जाताच बंडू मुंडी वर करून डोळे मिचकावत बघत असे. कासवाला ऐकू येते, त्याला त्याचे ‘बंडू‘ नाव कळते आणि आवडते असे आम्ही सोयिस्करपणे स्वत:ला पटवून घेतले. बंडूला साजेसे ’चळवळ्या’ हे विशेषण ही आम्ही कधी कधी वापरत होतो कारण दुकानामधे असतानाचा चळवळा स्वभाव बंडूने आमच्या घरी आल्यावरही सोडला नव्हता. याचा प्रत्यय आम्हाला नेहमी येत होता. त्याचं झालं असं की... कासव उभयचार प्राणी. ते पाण्यात आणि जमिनिवर राह्ते असे मी शाळेत शिकले होते. म्हणून मी एका पसरट प्लास्टिकच्या टबात एका बाजूला पाणी आणि एका बाजूला मध्यम आकाराची सपाट दगडं लावून रचना केली. माझ्या बुध्दीच्या कुवती नुसार ही रचना बंडूला सोयिस्कर आणि उपयुक्त होती, जेणे करून बंडू हवे तेव्हा पाण्यात पोहेल आणि नको तेव्हा पाण्याबाहेर दगडावर विसावेल आणि पुन्हा परतून पाण्यात जाईल. बंडूला पारदर्शक काचेच्या टाकीतून त्या पसरट टबात ठेवण्यात आले. बंडूने डोळे मिचकावले आणि टबातल्या पाण्यात बुडी मारून तो तळाशी गेला.
मी त्याच्यावर बारीक लक्ष ठेउन होते. बंडू आपला जिथल्या तिथे! बंडू जागचा हललाही नाही. शेवटी स्टूलावरची काचेची पेटी बाजूला काढून ठेवली आणि तिथे तो प्लास्टिक टब ठेऊन मी माझ्या कामाला गेले. काम आटपून परतले तेव्हा पाह्ते तर काय? प्लास्टिकच्या टबात बंडू नव्हता. मी इकडे तिकडे पाहिले. बंडू खाली जमिनीवर उताणा पडला होता. बंडोपंतांची ही कामगिरी माझ्या लागलीच लक्षात आली. पाण्यातून बाहेर येऊन टबाच्या कडेला लावलेल्या दगडावरून धाडसी बंडोपंत पुढे चालत राहिले आणि टबाची कडा ओलांडून खाली जमिनिवर आदळले. स्टूलावरच्या उंचीवरून खाली पडल्यावर घाबरगुंडी उडाली असेल किंवा काही दुखापत झाली असेल त्यामुळे सुलट होऊन चालता आले नसेल हे स्वाभाविक होते.
त्याच्या इतकी मी ही घाबरले होते. तरीही काळजीने बंडूवर खेकसले. “कशाला धडपड करतोस इतका? जोरात लागून रक्त आलं असतं म्हणजे मग?”
माझा ओरडा खाताच बंडूने अंग आत चोरून घेतल्याचे मला जाणवले. मला अपराधी वाटू लागले. बंडूच्या दुखापतीला मीच कारणीभूत होते. मलाच धडा मिळाल्यासारखी आता मी शहाणी झाले. प्लास्टिकचा टब काढून टाकला. स्टूलावर ती काचेची टाकी ठेवली. त्यात पाणी घालून बंडूला अगदी हळूवार आत सोडले. माझ्याकडे पाठ करून काहीच न झाल्यासारखे बंडू पाण्यात बुडी मारून चारी पाय गोलाकार फिरवत मजेत पोहू लागला. तो उंचावरून पडूनही धडधाकट असल्याचे पाहून मी हुश्श्य केले. त्यानंतर प्लास्टिक टबाच्या फसलेल्या माझ्या योजनेची किती टिंगल झाली असावी याचा अंदाज तूम्ही करू शकालच. मी मात्र बंडूसाठी काचेच्या पेटीव्यतिरिक्त कुठलीही सुरक्षित जागा नाही याची मनाला गाठ मारली.
माझ्या यजमानांचा मात्र चळवळ्या बंडू अधिकच लाडका झाला. रोज सकाळी देवपूजे नंतर जप, श्लोक म्हणताना ते बंडूला टाकी बाहेर काढून त्याच्या जाडसर पोटावरून बोट फिरवून “बंडू, बंडू” करत बाहेर ठेऊ लागले. तोही त्या वेळी फारशी धावपळ(?) न करता निवांत असायचा. एकदा सुट्टीच्या दिवशी दुपारी काम आटपून मी बंडूला हाका मारायला गेले तर बंडू टाकीत नव्हता. बाहेर टी.व्ही पहात असलेल्या माझ्या यजमानांना विचारले तर ते म्हणाले “बंडूला इथे सोडला होता खेळायला. कुठे गेला काय माहित?”मला हसावं का रडावं ते कळेना. “बंडू म्हणजे काय कुत्रा आहे की कुणी बाळ, खेळायला सोडायला?” हे माझे शब्द मी ओठातच थोपवून बंडूच्या शोधात निघाले. टि.व्ही कॅबिनेट खाली, शोकेस खाली, भिंती लगत सर्व ठिकाणी पाहिले. बंडू दिसलाच नाही. शेवटी गॅलरीच्या काचेच्या बंद दरवाज्याला लावलेल्या घोळदार पडद्याच्या मागे धुळीने बरबटलेला बंडू सापडला. त्या स्वच्छ करण्याशिवाय आता उपायच नव्हता. माझ्या यजमानांनी एवढे काम सुट्टीच्या दिवशी ही अगदी आवडीने स्विकारले.
आमच्या घरात धिटुकल्या बंडूचे अजूनही बरेच लाड चालायचे. एकदा काय झालं की माझ्या मुलाने एक द्राक्ष त्या टाकीत टाकले. बंडूच्या डोक्यापेक्षा ही मोठे असलेले ते पाण्यात तरंगते द्राक्ष खायला बंडूने खूप मेहनत घेतली. पण खाताना बंडूच्या तोंडात द्राक्षाचे साल अडकून बसले. त्याला ते साल काढता येईना. तो स्वत:शीच झटापट करू लागला. शेवटी लटपट्या बंडू यशस्वी झाला, पण तो उरलेल्या द्राक्षाकडे पुन्हा फिरकला नाही. त्यानंतर आम्ही त्याला सोललेले द्राक्ष तारेत अडकवून देऊ लागलो. त्यामुळे ना द्राक्ष पाण्यात तरंगायचे, ना त्याचे साल बंडूच्या तोंडात अडकायचे. मग काय? मेजवानीच की! आमच्या लाडाने स्वारी खुष व्हायची.
बंडूला टाकीत खेळायला खेळणं कुठचं? तर एक कृत्रिम कमळ. बंडू कमळाखालच्या पानाला धरून लोबकळे. कधी कमळ उलट पालट करून टाकी. कधी त्यावर चढून समोरचे अर्ध शरीर पाण्याबाहेर तर लवंगी इतकी इटूकली शेपटी पाण्यात ठेवून बसून राही. बंडूचं कौतुक करायला टाकीपाशी जावं तर तो सश्यागत टूण्णकन उडी मारून टाकीच्या तळाशी जाई. एकदा पाहिलं तर कमळ आणि त्या खालचे पान विलग झालेले दिसले. मी कमळ काढून टाकले आणि पान तसेच राहू दिले. काही वेळाने पाहिले तर बंडू राजे त्या पानावर आरामात बसून मजेत हलकावे खात पाण्यावर झुलत होते. बंडूने पाण्याबाहेर रहायची युक्ती शोधून काढलेली पाहून त्याच्या बुध्दिमत्तेला आम्ही सलाम ठोकला.
बंडू आमचा विरंगूळा असला तरी बंडूच्या विरंगूळ्यासाठी आम्ही एक मासा आणून त्या टाकीत सोडला. बंडूचे काही जमलेच नाही त्याच्याशी. त्याच्या लाडात वाटेकरी झालेल्या माश्याला चावण्यासाठी बंडू सारखा त्यावर हल्ला करायचा. तो मासा बिचारा आपला जिव मुठित धरून टाकीत सैरावैरा पोहायचा. दोघांनाही वेगळाले करण्याशिवाय पर्याय उरला नाही. माश्याला पार ठिकाणी लावायची बंडूची घातक प्रवृत्ती आम्हाला नवीनच होती.
त्यानंतर एकदा एका खेळण्यांच्या दुकानात हलणारा डोलणारा ससा मिळाला. कौतुकाने मी त्याला आणून टाकीत टाकले. ससा पाण्याच्या तळाशी जाऊन डोलत राहिला. बंडूने त्याच्या जवळ जाऊन हुंगून पाहिले. मग मात्र त्याच्याकडे साफ दूर्लक्ष केलेले पाहून आम्ही चकित झालो.
आमच्या बंडूला खूप काही समजते असा आम्हाला वाटायला लागले. नव्हे खात्रीच झाली. त्याच्या बुध्दीच्या चाचण्या घेऊन त्याला अधिकाधिक तेज बनवण्यासाठी आम्ही नवनवीन शक्कल लढवत होतो.
आमच्या हुश्शार बंडूच्या कसरतींची आम्हाला विलक्षण करमणूक होती. त्याला अधिकाधिक करामती करायला आम्ही भाग पाडू लागलो. त्याचे आवडते सुकट किड्यांचे अन्न आम्ही कमळाच्या पानावर टाकले की कितीही परिकाष्ठा करून बंडू ते अन्न मिळवायचा आणि चावून चवी चवीने खायचा. आम्हाला कौतुक वाटायचे.
एकदा आम्ही त्याला त्याच्या ठालीसारख्या पाठीवर ठेवले. बंडू चारी पाय आक्रसून काही वेळ पहूडून राहिला. मग मात्र आक्रताळेपणा करून चारी पाय झाडू लागला. प्रयत्न करून तो एकदाचा सुलट झालेला पाहून आम्ही टाळ्या वाजवल्या. तेव्हा बंडू मात्र एखाद्या परफॉर्मन्स नंतर फोटोला पोज द्यावी तसा स्तब्ध राहिला. आम्हाला त्याच्या ’उलट- सुलट’ चा चाळाच लागला आणि काही काळातच  बंडू त्या कसरतीतही तरबेज झाला.

आम्ही चीन सोडले तेव्हा त्याला आमच्या बरोबर नेणे अशक्य नसले तरी कठिण होते. त्याची कागद पत्रे, परवाने कारायला वेळ नव्हता. मी बंडू आमच्या मोलकरणीला देऊ केला. अस्सा गमत्या बंडूला ती नकारू शकलीच नाही. आम्ही निघायच्या आधी दोन-चार दिवस ती त्याला आपल्या घरी घेऊन गेली. बंडूची अनुपस्थिती आमच्या अतिप्रचंड कामकाजात ही जाणवत होती. “तो बरा आहे का? खाल्लं का? की निजून आहे?” अशी मी मोलकरणीकडे चौकशी केली.
“कासवाला काय कळतंय? ते बरे आहे.” हे तिचे तुटक उत्तर ऐकून मला तिचा खूप राग आला.
“आमच्या चुणचुणीत बंडूला काय कळत नाही?” असा जळजळीत प्रश्न माझ्या ओठावर आला होता. पण मी स्वत:हून बंडूला तिच्या हवाली केले होते. तिच्यावर रागावून चालणारच नव्हते. “त्याला निट सांभाळ, त्याची काळजी घे.” असे बजावून आम्ही चीन सोडले.
आम्ही चीन सोडून आता तीन/चार वर्ष झाली आहेत. पण अजून ही बंडूची आठवण येते. त्याचे ते लुकलककते डोळे, इवलेसे हिरवे शरीर, टणक पाठ, त्यावरची आकर्षक नक्षी, त्याची आत- बाहेर होणारी छोट्टीशी मुंडी आणि त्याची तल्लख बुध्दीमत्ता... सारं सारं आठवतं.
“बंडू कसा असेल आपला?” असे मी एकदा यजमानांना विचारल्यावर ते म्हणाले, “चीनमधे किडा-मुंगी पासून गाय/बैलापर्यंत काहीही खातात. एखादे दिवस मोलकरणीच्या घरी भाजीत घालायला इतर मांस/मासे नसतील तर बंडूचा खिमा करून भाजीबरोबर तिने खाऊन ही टाकले असेल.”
मला गलबलून आलं. मन बचैन झालं.
आज ही तसंच होतंय.
पण इथे बसून बंडूवर लेख लिहण्याव्यतिरिक्त मी करू तरी काय शकते आहे?

(हा लेख `शब्दगाऽऽरवा २०१०` ह्या अंकात प्रकाशित झाला आहे.)

२ टिप्पण्या: