उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१० मार्च, २०११

प्रचितीचे बोल!!

श्री गजानन महाराजांच्या १३३व्या प्रगट दिनाला आलेला अनुभव
माझे वडील कर्करोगाने आजारी आहेत. त्यांना केमोथेरपीच्या उपचारासाठी वेळोवेळी रूग्णालयात दाखल करावे लागते.
एकदा त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. आवश्यक त्या प्राथमिक चाचण्या झाल्या. त्यानंतर रक्ताच्या (आय.व्ही.) शिरेतून औषधोपचार सुरू करण्यासाठी परिचारिकांना शिर सापडेना. त्याचे कारण असे की उपचारा दरम्यान त्यांच्या रक्ताच्या अनेकदा तपासण्या/ चाचण्या कराव्या लागतात. लहान मोठ्या सुया टोचून टोचून आता माझ्या वृध्द बाबांच्या बोटांचीच नव्हे तर दोन्ही हातांची चाळण झाली आहे असे म्हटले तरी ती अतिशयोक्ति होणार नाही. त्यामुळे त्यांच्या हातातली रक्ताची शिर मिळणे नेहमी अवघड होऊन बसते. आताही तसेच झाले. त्या नामांकित अश्या रूग्णालयातील प्रशिक्षित परिचारिका पूर्णपणे अयशस्वी ठरल्या आणि शेवटी (अनेस्थेशिया) भूल विभागातून अतिशिक्षित डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्यांनी ही अत्यंत परिश्रम करून हाताच्या कोप-याजवळील एका शिरेत अत्यंत सूक्ष्म आणि लांब लचक अशी नळी आत पर्यंत घातली. शेवटी एकदाचे शिरेतून औषध सुरू करण्यात आले. ती वेळ तर निभली आणि उपचारानंतर लवकरच रूग्णालयातून बाबांना घरी सोडण्यात आले.
तीन चार दिवस ठिक ठाक गेले. परंतू त्यानंतर केलेल्या रक्त तपासणीत असे दिसून आले की बाबांच्या रक्तातील लाल पेशींच्या संख्येत प्रचंड घट झालेली आहे. ही धोकादायक स्थिती टाळण्यासाठी त्यांना दोन पिशव्या(यूनिट्स) रक्त देणे आवश्यक आहे असे सांगण्यात आले.
आमची धावपळ उडाली. नामांकित असले तरी त्या दूरच्या रूग्णालयात नेण्यापेक्षा जवळच्याच रूग्णालयात बाबांना दाखल करण्याचे आम्ही ठरवले. तेथे पोचल्यावर आवश्यक ते कागदपत्र तयार झाले. डॉक्टरांशी चर्चा झाली. रक्तपेढीतून आवश्यक त्या गटाचे रक्त ही तातडीने आणण्यात आले. आता ते रक्त बाबांना देण्यासाठी त्याच्या हाताची शीर सापडणे म्हणजे किती दिव्य होते ते मला ठाउक होते. मी त्या रूग्णालयातील परिचारिकांना आणि डॉक्टरांना संपूर्ण कल्पना दिली. बाबांच्या हाताची पहाणी करून रक्त वाहिन्यांची चाचपणी करताना त्या सर्वांना माझ्या बोलण्याची खात्री पटली. तरीही त्या हरत-हेने प्रयत्नास लागले. बाबांची नस शोधण्यासाठी तेथे रूग्णालयातील अधिकाधिक अनुभवी परिचारिकांची रांगच लागली. सर्वच प्रयत्न व्यर्थ ठरत होते. ते पाहून उपस्थित डॉक्टर भूल विभागातून दूस-या अतिशिक्षित डॉक्टरांना बोलवण्यास निघाले.
त्या संध्याकाळी तिथून डॉक्टर मिळणे कदाचित कठिण किंवा विलंबित असावे. त्यामुळेच इथे परिचारिका आपले सर्व कसब पणाला लावून ठिकठिकाणी सुया खूपसून योग्य अशी शिर हुडकत होते. ते प्रयत्न बांबाना मात्र अत्यंत क्लेषकारक होते. त्यांचा हाताला सूज येऊ लागली. त्यांचे अकांताने व्हिवळणे मला पहावत नव्हते. माझ्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या आणि अजून कुठल्या कुठल्या प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे याची मी मनात मोजणी करू लागले. मी पूर्ण निराश होऊन श्री गजानन महाराजांना दयेची विनवणी करू लागले. आधी मनामानाशीच चाललेला श्रींचा जयघोष बाबांच्या आकांताबरोबरीने वाढत गेला. आता बांबाना सुया टोचून त्या परिचारिका दमल्या होत्या. तरीही त्या जिद्दीने ‘शेवट‘चा असा प्रयत्न करू लागले. मी ही माझ्या बाबांना आपल्या महाराजांचा धावा करण्यास सुचवले. माझे व्यथित बाबाही वेदनेने ओरडतच महाराजांचा जयजयकार करू लागले. खरे तर आमचे काम अडले होते. तरी ही आम्ही मात्र सद्गुरू श्री गजाननाचा जयजयकार करू लागलो.
"अनंत कोटी ब्रम्हांड नायक,
महाराजाधीराज, योगिराज, परब्रम्ह,
भक्तप्रतिपालक, शेगांव निवासी,
 समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज की जय"

माझ्या बाबांनी फार तर दोन ते तीन वेळा त्या दिनदयाळाचा आठव केला आणि पहातो तर काय? त्या परिचारिकांना यश आले होते. सुई शिरेत पोचली होती आणि लागलीच रक्ताची पिशवी ही जोडण्यात आली होती. बाबांच्याप्रमाणे मी आणि परिचारिकांनी ही सुटकेचा निश्वास टाकला. त्या दिनांक २४ फेब्रुवारी २०११ रोजी तिथी होती माघ वद्य सप्तमी; भक्तप्रतिपालक श्री गजानन महाराजांचा १३३ वा प्रगट दिन. पुढे तो दिवस सहजी पार पडला हे वेगळे सांगायला नको. एक रक्ताची पिशवी संपली. अजून एक पिशवी रक्त काहीश्या अवकाशाने दूस-या दिवशी द्यायचे होते. सुई शिरेतून काढून न टाकता तशीच ठेवल्यामुळे ते फारसे कठिण नव्हते.
दुस-या दिवशी ठरलेल्या वेळी रक्ताची पिशवी जोडण्यात आली. रक्त शरीरात जाऊ लागले. आता चार तासात ती पिशवी संपणार होती आणि मग बाबांना घरी सोडण्यात येणार होते.
पण प्राणघातक संकटांनी आमचा पाठपूरावा करण्याचा मुळी चंगच बांधला होता. दोन तास हळू हळू का होईना पण रक्त जात होते. पण नंतर ती शिर बंद झाली आणि रक्त पुढे सरकेना. अजूनही अर्धी पिशवी शिल्लक असलेले रक्त बाबांच्या शरीरात जाणे आवश्यक होते. आता पुन्हा मागचेच संकट आमच्या समोर ठाकले. नविन शिर शोधून त्यात सुई टोचून रक्त चढवणे हाच पर्याय सोपा होता. दूसरा पर्याय होता तो म्हणजे गळ्यातील शिरेत सुई टोचून रक्त देणे. केवळ अर्धा पिशवी रक्तासाठी हा पर्याय महाग आणि अत्यंत त्रासदायक पर्याय होता. पुन्हा परिचारिकांची बाबांच्या हाताशी झोंबा झोंबी सुरू झाली. पुन्हा तीच ती टोचणी आणि त्याच त्या यातना! पुन्हा तस्साच बाबांचा आकांत आणि व्हिवळणे! आता कालच्या अनुभवाने शहाणी झालेली मी, श्री गजानन महाराजांचा नाम जप करू लागले. बाबांनाही जोडीला घेतले. रूग्णालयातील परिचारिका या वेळीही अयशस्वी होत होताना दिसत होत्या. डॉक्टरही शिर शोधून थकून गेले. माझा धीर खचत चालला होता. तरीही आम्ही "गण गणात बोते" जप चालू ठेवला. तेवढ्यात डॉक्टरांना बाबांच्या दूस-या हाताच्या खालच्या बाजूला एक शिर दिसली. तिथे सुई टोचयचे प्रयत्न सुरू झाले. ती शिर इतकी पातळ होती की त्यात ती सुई जाईच ना. शेवटी लहान बाळांना रक्त देताना जी बोटाच्या पेराएवढी असलेली इवलीशी सुई वापरतात ती आणून टोचून पहाण्यात आली. मी आणि माझे बाबा श्री गजाननाच्या मदतीची याचना करतच होतो. समाधी समयी "आम्ही गेलो ऐसे मानू नका" असे भक्तांना बजावून सांगणा-या श्री गजानन महाराजांनी शतकानंतर ही आपला शब्द पाळला होता. त्यांच्याच कॄपेने ती पिटुकली सुई बाबांच्या हाताच्या शिरेत पोचली, दुस-या रक्ताची पिशवी जोडण्यात आली आणि केवळ दोन तासात पिशवीत उरलेले ते सर्व रक्त बाबांच्या शरीरात पोचले. थोड्या वेळाने संभाव्य बाधा किंवा दोष निर्मांण होण्याचा धोका टळल्यावर आम्ही बाबांना घरी घेऊन आलो.
अति सूक्ष्म अश्या शिरेतून जिवन देऊन भक्ताचे प्रतिपालन करणा-या अनंत कोटी ब्रम्हांडांच्या नायकाचा त्रिवार जयजयकार.

जय गजानन, जय गजानन, जय गजानन.

(हा लेख श्री गजानन आशिष च्या एप्रिलच्या अंकात पृष्ठ क्रमांक ३८ वर प्रकाशित झाला आहे.)

२ टिप्पण्या:

  1. फेसबुक वर हि माहिती पोस्ट करायला मिळेल का ??? म्हणजे परवानगी हवी होती ...

    -शैलेश गांवकर

    उत्तर द्याहटवा
  2. ही माहिती तुम्ही फेसबुक वर प्रकाशित करू शकता. परवानगी विचारण्याचा शिष्टाचार पाळल्याबद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा