उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

१७ ऑक्टोबर, २०११

गुरू बंधू भेट

हिंदु संस्कृतीतील  वेदिक धर्मातील बह्मा, विष्णु, महेश यांचे एकत्रित रूप असलेले श्री दतात्रेय हे  पहिले गुरू होय.
तीन शिरे व सहा हात असलेल्या  श्री  गुरूदेवांच्या वरच्या दोन हातात विष्णू सूचक शंख व चक्र, मधल्या दोन हातात शिव सूचक डमरू आणि त्रिशूल अथवा गदा तर खालच्या दोन हातात माला व कमंडलू ही ब्रम्हादेवाची सूचके आहेत. या त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या माथ्यावर जटाभार  तर पायी खडावा आहेत. यांच्या पाठीमागे पृथ्वीचे प्रतिक म्हणून गाय आणि पायाशी चार  वेदांची प्रतिके असलेले श्वान असतात. लोकहितार्थ कार्याच्या उद्देशाने दत्तात्रयांनी भारत भम्रण केले. आपल्या शिष्यामार्फत दीनदलितांची सेवा व समाजातील दु:ख व अज्ञान दूर करण्याचे कार्य चालू ठेवले.
श्री दत्त गुरूंच्या पश्चात  दत्त परंपरा पुढे सुरू ठेवलेले  श्रीपाद श्रीवल्लभ  हे  कलियुगातील  श्री गुरुदत्तांचे पहिले अवतार मानले जातात. आंध्र प्रदेशातील पीठापुरम येथे जन्मलेल्या या दैवी बालकाने बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतच  विविध शास्त्रात विशेषत: वेदात प्रावीण्य मिळविले. नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणाचे कार्य केले.
यांच्या नंतरचे श्री दत्तात्रयाचे उत्तरावतार म्हणजे जन्मतःच '' हा शब्द म्हणू लागलेले श्री नृसिंहसरस्वती. इसवी सन  १४५७ च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली.
इ.स. १८५६ मध्ये तेच  अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ या रूपात प्रकटले असे मानले जाते. श्री दत्त महाराजांच्या या  तिस-या अवतारचा कृपाप्रसाद भक्तजनांना १८७८ पर्यंत लाभला.
 त्याच काळातले श्री साई बाबा (इ.स. १८३७ ते इ.स. १९१८), श्री टेंबे स्वामी महाराज (वासुदेवानंद सरस्वती) (इ.स. १८५४ ते इ.स. १९१४) आणि त्या नंतरचे श्री गजानन महाराज (इ.स. १८७८ ते इ.स. १९१०)  यांना ही श्री दत्तावतार मानले जाते.
                 श्री साई बाबा                                                     श्री टेंबे स्वामी महाराज                                              श्री गजानन महाराज
ह्या सत्पुरुषांची  कार्यस्थळे भिन्न असली तरीही त्यांनी  श्री दत्त संप्रदाय सुरू ठेवून श्री दत्त भक्तीची परंपरा अजून वाढवली. यांचा श्री दत्तभक्ति प्रचार आणि प्रसार कार्य करण्याचा काळ कमी अधिक होता. श्री गजानन महाराज यांचा कार्यकाल तुलनेने सर्वात कमी होता. परंतु याच काळात हे तिन्ही महापुरूष विविध ठिकाणी एकाच वेळी कार्यरत होतेम्हणूनच यांना गुरू बंधु म्हटले जाते.
या कालावधीत या संत पुरूषांची  एकमेकांशी भेट होत असे. समान्य लोकांना  त्या  भेटी अनाकलनीय असत. ते एकमेकांची आठवणही काढत असत.  आपल्या शिष्यांना आपल्या बधुंबद्दल गोष्टी सांगत असत.
 श्री दासगणू महाराजकृत श्री  गजानन विजय ग्रंथात १९व्या अध्यायात श्री गजानन महाराज श्री टेंबे स्वामी  यांच्या प्रत्यक्ष भेटीबद्दलचे वर्णन दिले आहे. माणगावी जन्मलेल्या आणि कृष्ण तटाकी महती असलेल्या श्री टेंबे स्वामी  यांच्या आगमनाबद्दल बाळाभाऊंना  श्री गजानन महाराजांनी आगाऊ सूचना दिल्या,
अरे बाळा उदयिक I माझा बंधु येतो एक I मजलागी भेटण्या देख I त्याचा आदर करावा II
तो  आहे कर्मठ भारी I म्हणून उद्या पथांतरीचिंध्या पडू द्या निर्धारी I अंगण स्वच्छ ठेवा रे II
चिंधी कोठे पडेल जरी I तो कोपेल निर्धारी I जमदग्नीची आहे  दुसरी I प्रतिमा त्या स्वामीची II
तो -हाडा  ब्राम्हण I शुचिर्भूत ज्ञा संपन्नहे त्याचे कर्मठपण I कवचापरी  समजावे II”
त्यानंतर एके दिवशी  श्री गजानन महाराज पलंगावर बसून  हाताच्या बोटांनी चुटक्या वाजावित होते. जेव्हा श्री टेंबे स्वामी मठात आले  तेव्हा   महाराजांनी चुटक्या थांबवल्या.  ते दोघे एकमेकांकडे पाहून आनंदाने  हसले. एकमेकांशी  केवळ दृष्टादृष्ट झाली आणि   श्री टेंबे स्वामींनी  श्री गजानन महाराजांकडे  परत जावयाची आज्ञा मागितली. बरे म्हणून महाराजांनी परवानगी देताच श्री टेंबे स्वामी लगेच निघून गेले. अशी ही  क्षणिक भेट पाहून बाळाभाऊंना प्रश्न पडला की  श्री टेंबे स्वामी यांचा कर्ममार्ग तर महाराजांचा भक्तिमार्ग.  ह्या दोहोंचे मार्ग भिन्न सूनही हे दोघे बंधु कसे?  महाराज उत्तरले की ईश्वराकडे जाण्याचे भक्तिमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे तीन मार्ग आहेत.  ह्यांची बाह्यस्वरूपे भिन्न  दिसत असली तरी हे तिन्ही एकाच ठिकाणी पोचतात. ज्याला जो मार्ग आवडेल त्याचा अवलंब करून ते मोक्षप्राप्ती करू शकतात. त्यांच्यात काहीही फरक उरत नाही. असे संपूर्ण ब्रम्हज्ञा सांगून  महाराजांनी बाळाभाऊंचा हा भ्रम  निवारला.
श्री साई आणि श्री गजानन महाराज यांच्याबद्दल ही  एक अख्यायिका आहे. १९१० साली ऋषीपंचमीला श्री गजानन महाराजांनी देह ठेवला  त्या दिवशी शिरडीचे साई  बाबा दिवसभर गडबडा लोळले आणि माझा मोठा जीव हरपला असे शोकपूर्ण उद्‍गार काढले. यावरून त्यांचे एकमेकांवरील प्रेम दिसते.
श्री साई सच्चरित कथासार ग्रंथातही  श्री टेंबे स्वामींनी शिरडीच्या श्री साईंना पाठवलेल्या भेटीबद्दलची गोष्ट वाचावयास मिळते. एकदा  गोदावारीकाठी वसलेल्या  राजमहेन्द्री शहरात  वासुदेवानंद  सरस्वती आले होते. त्यांच्या  आगमनाची वार्ता कळताच  दूरदूरच्या लोकांनी  त्यांच्या दर्शनास  गर्दी केली.  त्यात नांदेडचे प्रसिध्द वकील पुंडलिकराव ही होते.  त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वतीचे दर्शन घेतले.  भक्तांच्या गोष्टीगोष्टींध्ये  शिरडीच्या साई बाबांचा विषय निघाला. तेव्हा बाबांसाठी  नमस्कार करुन  स्वामींनी पुंडालीकरावांना  श्रीफळ  दिले म्हणाले, माझे बंधु  अतिशय निष्काम आहेत. त्यांच्यावर माझे निस्सीम  प्रेम आहे. तुम्ही ज्यावेळी शिरडीस  जाल तेव्हा  हे श्रीफळ त्यांना द्या आणि त्यांना नमस्कार करून माझ्यावर कृपा दृष्टी ठेवण्यास   सांगा. वासुदेवानंदांची आज्ञा शिरसावंद्य मानून पुंडलिेकराव म्हणालेस्वामीजी सर्व काही आपल्या मनासारखे होईल.” पुढे महिन्याभराच्या आताच पुंडलिकरावांना शिरडीला जाण्याचा योग आला. त्यांनी स्वामीजींनी दिलेला नारळ, फराळाचे  सामान बरोबर घेतले आणि समवेत काही मित्रमंडळी घेऊन शिरडीला निघाले. मनमाडला उतरल्यानंतर  कोपरगावच्या गाडीस आवकाश होता. म्हणून ती सर्व मंडळी फराळ करू लागली. पण फराळासाठी आणलेला चिवडा अतिशय तिखट  होता. तो कुणालाही खाववेना. त्यावर उपाय म्हणून नारळ फोडून चिवड्यात घातला. फराळ झाल्यानंतर सर्व मंडळी कोपरगावला निघाली. तेव्हा पुंडलिेकरावांना स्वामीजींच्या नारळाची आठवण झाली. आणि आपण तोच नारळ फोडून चिवड्यात घातला याचे स्मरण होताच  त्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटला. मनात एका प्रकारची तगमग, तळमळ घेऊनच पुंडलिकराव शिरडीत आले. मशिदीत पोचले तेव्हा ते अतिशय घाबरलेले  होते. ते बाबांच्या दर्शनासाठी पुढे गेले तेव्हा बाबा  त्यांना म्हणाले ,“स्वामींनी माझ्यासाठी दिलेली वस्तू दे. त्यावेळी  पुंडलिकरावांनी बाबांच्या पायाला मिठी मारली आणि क्षमायाचना करत त्यांच्याकडून घडलेल्या त्या कृतीचा सर्व वृतांत  सांगितला. तेव्हा बाबा म्हणाले, अरे, तुला तो नारळ व्यवस्थित सांभाळता येणार नव्हता मग तो हातात तरी कशाला घेतलास? माझ्या बंधुने तुमच्यावर जो विश्वास टाकला त्याचे तुम्ही चांगले काम केलेत! कोणतीही वस्तू त्या फळाची बरोबरी करू शकत नाही. असो. जे घडावयाचे ते घडले; आता वाईट वाटून काय उपयोग? अरे, तुला जो नारळ दिला तो माझाच संकल्प होता  आणि तो माझ्या नावानेच फुटला. मग तू स्वत:ला का अपराधी ठरवीत आहेस ? हे निरहंकर्तुत्व साधले तर तुझ्या सर्व  उपाधींचे  आपोआप निरसन होईल. बाबा रे, तुला माझी  भेट  घडावी असे जेव्हा माझ्या मनात आले तेव्हाच तो नारळ तुझ्या हातात पडला हे पक्के लक्षात ठेव. तुम्ही सर्व माझी मुले आहात. तो नारळ तुमच्या मुखी लागला तेव्हाच मला मिळाला म्हणून जे काही घडले ते सर्व विसरून जा. बाबांचे ते उदगार ऐकून पुंडलिकरावांना हायसे वाटले. थोड्या वेळाने त्यांची उद्विग्ताही नाहीशी झाली आणि ते बाबांच्या सहवासात रमले.
त्या काळासारख्या  गुरू बंधु  भेटी आजच्या युगात घडवायची  आमची ना पात्रता, नाही कुवत. परंतु   दोन गुरूबंधुंची एकाच वेळी सेवा करायचा प्रयत्न आम्ही अमेरिकेतील जॉर्जिया राष्ट्रातील अटलांटा  येथे  केला. येथे श्री  शिरडी साई बाबांचे मोठे मंदिर आहे.  तसेच श्री वासुदेवानंद सरस्वती (श्री टेंबे स्वामी) यांच्या पादुका  असलेले  गुरू प्रतिष्ठानही  आहे. श्री वासुदेवानंद सरस्वतीच्या  विचारांचे, शिकवणुकीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे व्रत घेतलेले प. पू. सदगुरू श्री. भाऊ महाराज करंदीकर यांच्या आशिर्वादाने येथे श्री टेंबे स्वामी यांच्या पादूकांची स्थापना  संपन्न  झाली आणि तेव्हापासून  येथे घरगुती स्वरूपातील गुरू प्रतिष्ठान  कार्यरत आहे. येथे दर गुरुवारी आणि शनिवारी आरती, नामस्मरण, स्तोत्र, ध्यान, चिंतन होऊन श्रीगुरुस्तुति होते. येथे गुरूपौर्णिमा आणि श्री दत्तजयंती ही अत्यंत भक्तिभावाने साजरी होते. श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या उपासनेचे  हे स्थान आज अमेरिकेतले एकमेव स्थान म्हणावे लागेल.  या स्थानातर्फे रविवार, दि १६ ऑक्टोबर २०११ रोजी  श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या पादूकांचे पूजन, अभिषेक, आरती, श्री दत्त नाम साधना श्री  शिरडी साई बाबांच्या मंदिरात करण्यात आली. ही  गुरूसेवा आजच्या युगातील गुरू बंधु भेट म्हटली तरी हरकत नाही.  
या श्रीसेवा समारंभासाठी लहानसे मंडळ नेमण्यात आले होते. गुरू बंधु भेटीच्या सोहळ्याचा दिवस ठरवून श्री साई बाबा मंदिरातील सभागृह राखिव करण्यात आले. तो सुदिन आणि सुस्थळ  निश्चित झाल्यानंतर लगेचच देशभरातील भक्तांना आग्रहाचे आमंत्रण धाडण्यात आले.   मंडळातील  सेवेकर-यांनी कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली. वारंवार भेटून फुलांचे  लहान-मोठे हार,  सर्व भक्तांना  महाप्रसाद, पूजेची तसेच  सजावटीचे सामान, इतर वस्तूंची जमवाजमव  याच्या व्यवस्थेचे निर्णय घेतले आणि सर्वांनी एकजूटींनी तयारी सुरवात केली.
आदल्या दिवशी  सेवेक-यांनी श्री साई बाबा मंदिरातील सभागृह जमून सर्व  जय्यत तयारी केली.   साफसफाई करून सजावट, पूजेची कोरडी तयारी केली. सर्वच भक्तजन  गुरू सेवेची अनोखी संधी मिळाल्यामुळे आनंदित झाले होते. हसत खेळत  केलेल्या या कामात बंधु भेटीच्या सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचत होती.  
 सोहळ्याच्या दिवशी सकाळी काही मंडळी श्री साई बाबा मंदिरात  पोचले. काही भक्तांनी गुरू प्रतिष्ठान येथे हजेरी लावली.  पूजेचे सर्व साहित्य,   इतर लहान सहान वस्तूं  गाडीत चढवल्या. योजिलेले सर्व कार्य  निर्विघ्नपणे सिध्दीस  नेण्याची विनंती करून लहानश्या पालखीत श्री टेंबे स्वामींच्या पादुका घेतल्या.  सोबत श्री दत्तात्रेय,  श्री टेंबे स्वामी, श्री साई बाबा तसेच  श्री भाऊ  करंदिकर  यांची छयाचित्रे घेतली. सोबत केशरी झेंडा आणि  श्री टेंबे स्वामींबरोबर असायची तशी  लाकडी जाडसर दंडाला केशरी  वस्त्र  बांधलेली छाटी ही घेतली.   प्रतिष्ठानाभोवती  प्रदक्षिणा करताना चारी दिश्यांना मंत्र म्हणून  श्री वासुदेवानंद सरस्वतींची स्वारी गाडीत विराजमान  झाली आणि  श्री साई मंदिरात दाखल झाली.  श्रीफळ फोडून झाल्यावर  पारंपारिक वेषातील स्त्रियांनी दूध व पाण्याने श्री स्वामींपादुकांबरोबर आलेल्या सर्व भक्तांचे पादप्रक्षालन केले.  अत्यंत भक्तिभावाने दत्तनाम घेत  श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या पादुका श्री साई बाबांच्या मूर्तीस्थानावर आणण्यात आल्या.  श्री साईंना सर्व भक्तपरिवारा तर्फे सुवासित फुलांचा हार अर्पण करण्यात आला.   दोन्ही सद्‍गुरूंना आम्हा भक्तांची  अल्पशी सेवा मान्य करून घेण्यास विनवून श्री टेंबे स्वामींच्या पादुका  मंदिरातील सभागृहात आणल्या. 
 तेथे आधीच मांडणी करून ठेवलेल्या सर्वात उंच स्थानावरील आसनावर श्री गुरू दत्त यांचे छायाचित्र, त्या खालील  स्थानावरील आसनावर श्री  वासुदेवानंद सरस्वती व श्री साई बाबांची छायाचित्रे, त्या खालील चौरंगावर श्री सद्‍गुरू पादुका  विराजल्या आणि श्री सेवेस आरंभ झाला.


 या शुभसेवेची सुरवात श्री गणपती अथर्वशीर्षाने   झाली. श्री शिवपुत्रपूजनानंतर त्याचे पिता  देवाधिदेव महादेवाचे स्मरण करून महारूद्र म्हणत श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या पादुकांवर दूधाने अभिषेक केला. 
 त्यानंतर मानस पूजा  करताना पादुकांवर परमेश्वर प्रिय अश्या `पयो दधि घृतम् चैव मधुशर्करया युतम्` पंचामृताचा अभिषेक करून झाल्यावर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या श्री दत्त महामंत्राचा सामुहिकरित्या गजर करताना पादुकांना केशर मिश्रित पाण्याने स्नान घातले.
त्यानंतर ‘  नमो भगवते वासुदेवाय‘ मंत्र म्हणून श्री गुरूदेव दत्त, आणि श्री टेंबे स्वामी आणि श्री साई बाबांच्या एकत्रित असलेल्या छायाचित्रांवर तांदूळ वाहून प्रत्येक भक्ताने वैयक्तिकपणे अभिषेक केला.  सर्व देवाधिदेवांच्या आरत्या करून ॐ यज्ञेन यज्ञमयजंत‘  मंत्ररूपी पूष्पांजली अर्पण केली. भक्तांनी दर्शन लाभ घेतला. श्री साईंना आणि श्री स्वामींना नैवेद्य दाखवून भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. त्यात अभिषेक केलेल्या तांदळाच्या भात तसेच स्वादिष्ट भोजनाचा आणि अनेक   मिष्टान्नांचा लाभ झाला.
 त्यानंतर श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्या वाड:मयाचा अभ्यास करून पीएच्‌. डी.   पदवी  मिळवलेल्या डॉ. सुनीता  जोशी यांनी स्वामींबद्दल विशेष माहिती दिली. त्यात त्यांनी श्री टेंबे स्वामी विरचित ‘करूणा त्रिपदी‘ याच्या निर्मिती मागची  अध्यात्मिक गोष्ट सांगितली, श्री टेंबे स्वामींच्या दत्तावताराबद्दल माहिती दिली, काही श्लोकांचा अर्थ समजावून सांगितला. सौ. शलजा मेढेकर यांनी  गुंफलेल्या  गीतरूपी कथेच्या साथीने भक्तांनी सेवा अर्पण केली.  त्या नंतर पुन्हा आदराने श्री टेंबे स्वामींच्या पादुका, छायाचित्रे पुन्हा  गुरू प्रतिष्ठान येथे नेण्यात आली.
           श्री टेंबे स्वामी आणि श्री साई   बाबा या गुरूंच्या संगम सोहळ्याचा पुन:प्रत्ययानंद देणारा हा सुवर्ण कांचन योग  होता.

३ टिप्पण्या:

  1. YA mahite Badal tumche khup lhup aabhar

    Om sairam

    उत्तर द्याहटवा
  2. हि माहिती ..फेसबुक वर पोस्ट करण्याकरिता परवानगी हवी होती .....

    -शैलेश गांवकर

    उत्तर द्याहटवा
  3. ही माहिती तुम्ही फेसबुक वर प्रकाशित करू शकता. परवानगी विचारण्याचा शिष्टाचार पाळल्याबद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा