उर्मी म्हणजे लाटा (Waves)
माझ्या मनसागरातून उठलेल्या उर्मी....या इथे येऊन विसावल्या....अश्या....

२६ ऑक्टोबर, २०११

अविस्मरणिय दिपावली.

      भारतीय दिवाळी सण येऊन ठेपला असला तरी केवळ घरातील मराठी कॅलेडर मधेच  तो दिसत होता. तिथे घराबाहेर सणाचा मागमूस ही नव्हता. तेव्हा आम्ही चीन मधे रहात होतो. तिथे कसली आली आहे दिवाळी? तिथे ना विविध वस्तूंनी भरलेली दुकाने, ना  गोड धोड फराळाचा घमघमाट. ना  शाळेला सुट्टी आणि  ना कामाला. त्यामुळेच की काय;  घरातही  सणाचा फारसा उत्साह वाटत नव्हता.   त्या  वर्षी दिवाळी घराबाहेरच काढायची असा  आमचा निर्णय पक्का झाला. शनि- रवीला लागून कामावर दोन दिवस सुट्टी टाकली आणि चीन मधील  ग्वांशी (Guanxi) भागातील गुईलिन (Guilin) येथे जायचे ठरवले. लहानसा विमान प्रवास करून  गुईलिन ह्या चीनच्या निसर्ग रम्य अश्या जागी येऊन ही  थडकलोऑक्टोबर महिन्यात तिथे  फारच थंडी पडली होती.  तरीही बाहेर फिरायला जाणे हा शुध्द मूर्खपणा ठरला असता.  आधी ऐकल्याप्रमाणे गुईलिन अतिशय विलोभनिय शहर आहे याची  तिथे पोचल्या पोहल्याच खात्री झाली.
     नदी किनारी डोंगर कड्यांनी वेढलेले गुईलिन शहर अत्यंत अद्यावत असे आहे. विमानतळ, मोठमोठाले रस्ते, लांब-रुंद पुल, उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालये, विकसित रुग्णालये यांनी परिपूर्ण असलेल्या गुइलिन शहराने आपले नैसर्गिक सौंदर्य राखून ठेवले आहे.  चहो बाजूंनी डोंगराचे उंच कडे, त्यामधून वळणे वळणे घेत वाहणारी  ‘लिनदी हेच तिथले मुख्य आकर्षण. गुईलिनमधे  रस्त्यांने कुठूनही कुठेही जा; लि नदी  आपली साथ  कधीच सोडत नाहीम्हणूनच  अनेक प्रवाश्यांचे  भरमसाठ लोंढे तिथे वर्षभरासाठी असतातटूरिझम  हाच  तिथला मुख्य व्यवसाय म्हटला तरी चालेल. तिथे एतिहासिक आणि सांस्कृतिक अश्या काही  प्रेक्षणिय जागा आहेत. परंतुलिचे  सौंदर्य प्रत्येक जागी सर्वातधिक  लक्षवेधी  होते. कधी उथळ भागात उगाचच खळबळून वाहणारी  लि आम्हाला अवखळ बालिश वाटली तर तिचे कधी ऊंच सखोल भूभागावरून आपल्याच नादात धुंदपणे उंडारणे एखाद्या किशोरीसारखे भासले. लाजत, मुरकत नखरेलपणे कमानीय वळणा वळणाने झुळझुळणारी लि तर  थेट स्वप्निय नवयुवतीच. तीच लि अचानक समजुतदार  होऊन मर्यादित पात्रात शांतपणे पसरत जाताना दिसली की आश्चर्य वाटायचे. एखाद्या स्त्रीचे लहानपणापासून प्रौढावस्थेपर्यंत रूप जसे पालटताना दिसते तशीच लि विविध अंगी निरनिराळी दिसली.  ली ची ती सर्व मनोहारी रूपे आमच्या डोळ्यांचे पडदे पार कडून मनाच्या पटलावर कायमची रेखली गेलीअशी ही अनोखी निसर्गाकृती मानवनिर्मित कॅमेरा नामक वस्तूत भरभरून साठवून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. प्रत्येक वळणावळणाला आपली अधिकाधिक दिलखेचक अदा  पेश करणारी लि  तर जणू एखाद्या फोटो शूट सेशन मधली  सिने तारकाच! आम्ही हे दृष्टिसूख उपभोगायची एकही संधी सोडत नव्हतो. आम्ही किना-या किना-यावरून लि ला त्रयस्थपणे न्याहाळले तसेच तिच्या पात्रात उतरून तिच्या अंतर्मुखाचा तळ शोधायचा प्रयत्न केला. आम्ही लि ला पूर्णपणे जाले असे नाही पण तिच्या व्यक्तिमत्वाचा ठ्सा आमच्या हृदयात कायमचा ठसला. लि आहेच तशी. म्हणूनच तिची देखभाल करण्यात तिथल्या सरकारने  कुठलीही कसर सोडलेली नाही.  अनेक कायदे करून तिचे संरक्षण केले जाते. लि मधे कुठेही  गाई, म्हशी डुंबत नव्हत्या. त्यात कुणीही कपडे, भांडी, वाहने धुताना  दिसले नाही. यासाठी काही वेगळी सोय केल्याचे समजले. लि च्या आजूबाजूला फारशी घरे ही दिसली नाहीत. हिरवी गार शेते, लहान मोठी झाडे झुडपे  आणि काळ्या पांढ-यामधील विविध छटा असलेले  डोंगर मात्र किना-यावरून तिचे सौंदर्य अधिक खुलवत होतेत्याच मुळे जगभरातील पाहुणे या  लि ला केवळ पहायला गुईलिन शहरात येतात.  या पाहुण्यांना नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येथे अनेक सोयी ही आहेत. परंतु त्या सर्वच आधुनिक नाहीत. तेथील पूरातन म्हणण्यापेक्षा पारंपारिकपणाचा आनंद लुटायला  हे परदेशी  आसुसलेले दिसतात. बांबूच्या  आडव्या सपाट होडीवर उभे बांबू लावून त्यावर लहानसे छप्पर आणि त्या खाली दोन चार खूर्च्या टाकून  तितक्याच माणसांना सफर करवली जातेलि मधली ही बांबू राफ्टिंग ची सफार करायला सर्वात मजा आलीबांबू राफ्टिंग करताना नदीच्या पाण्याच्या प्रवाहा विरूध्द दिशेने जाताना अर्थातच अधिक काळ लागला. यात काही खडकाळ भूभाग आहेत तर काही सपाट. या बांबू होडीचा  नावाडी बांबूनेच ही होडी पुढे पुढे सरकवत होता.  अर्थाजनाचा  हा मार्ग लि ने आणि तिथल्या सरकारने ही रहवाश्यांना उपलब्ध करून दिला होता. म्हणूनच नावाडी चीनी भाषेतले गाणे  मजेत गुणगुणत प्रेमाने होडी हाकत होता. त्याला ती सपाट बांबू बोट चुबुक, चुबुक आवाज करून साथ देत होती. त्या भर दुपारी ही  प्रखर सूर्य दिसलाच नाही. निळसर आकाशातून निळाई आजूबाजूच्या  डोंगरावर, लि च्या  जलाशयावर उतरली होती. त्यावर पांढ-या तलम धुक्याने आपली जाळीदार ओढणी आंथरली होती. थंडगार वारा ती ओढणी विस्क्टवण्याच्या हेतूने हवेत उगाचच घिरट्या मारत फिरत होता. बारीकसे पक्षी मधूनच पंख फडकावून त्या चेष्टेला साथ देत होते. तिथल्या जलहरींची चूळबूळ, चीनी गाण्याचे सूर तिथल्या शांततातेला भंग करता अधिक निरामय करीत खुलवित होती.
      तिथे  मी पूर्वी पहिलेली अशी एक गंमत पहायला मिळालीलि चे पाणी वाहून वाया जाऊ नये आणि त्याचा वापर योग्य प्रकारे  व्हावा यासाठी सरकाराने काही  ठिकाणी विशेषत: गुइलिन मधे लिच्या पात्रात पाय-या केल्या आहेत. पाण्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्या-या पाय-यांमुळे पाणी तळ्यासारखे साचून राहते. तिथे अधिक होत  जमा  होत  राहत असले तरी पाण्याचा वाहायचा वेग  काहीसा मंदावतो. त्या ठिकाणी बांबू राफ्टिंग  होत नाही असे नाही. वरच्या  पायरीवरून बांबूची सपाट बोट  खालच्या पायरीवर बांबूने ढकलली जाते; तीही त्यावर बसलेल्या प्रवाशांसह!! बोट खालच्या पायरीवर उतरताना जी पाण्याची कारंजी उडतात त्यात भिजायला प्रवासी आवडीने जातात. त्यातील बांबूची बोट उलटून होणा-या अपघाताचा   धोका पत्करायला प्रवासी तयार असतात. अर्थात नदी  फारशी खोल  नसल्यामुळे बुडून मरण्याची भिती नसावी. शिवाय या सफरीसाठी लाईफ जॅकेट ही आवश्यक असते.
याच सफरी मधील अजून एक नमूद करावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे पक्ष्यांनी केलेली मासेमारी- Cormorant Fishing.
      अश्याच लहान बोटींवर बगळ्यांसारखे Cormorant पक्षी घेऊन पारंपारिक मासेमारीचा हा प्रकार दाखवला जातो. खास प्रकारचा सराव दिलेल्या ह्या Cormorant पक्ष्यांच्या  पायाला दोरी लावून  त्यांना पाण्यात सोडले जातात. पाण्यात सूर मारून ते पक्षी मासे चोचीत पकडतात. परंतू त्यांच्या गळ्याला हलक्याने बांधलेल्या  दोरीमुळे मोठे मासे गिळू शकत नाहीत. परंतू लहान मासे मात्र सहजी गिळू शकतात. मोठा मासा चोचीत पकडला की तो पुढे घशात सरकता तिथेच राहतो.  पक्षी बोटीवर परतल्यावर मासेमारी करणारे कोळी पक्ष्याच्या चोचीतून मासे काढून घेतात.   ही क्रूर अशी दिसणारी मासे मारी तिथली पूर्वापार चालत आलेली पध्दती आहे.  हा खेळ बाहेरून आलेल्या प्रवाश्यांचे खास आकर्षण ठरले आहे.
गुईलिन(Guilin)  मधे म्युझिअम, डोंगरातील गुहा,  उंच कडे, त्यावरील बाग, अश्या अजून ही काही प्रेक्षणिय जागा आहेत. परंतु नितळ, स्वच्छ, सुरेख लि सरीता मात्र न विसरण्याजोगी होती.  तिच्यामुळेच आमची  त्या वर्षीची दिवाळी अविस्मरणिय ठरली. लि ला आम्ही डोळ्यात आणि मनात काठोकाठ भरून घरी परतलो.

हा लेख जालरंग  प्रकाशनाच्या ‘दिपज्योती दिवाळी अंक २०११‘   मधे प्रकाशित झाला आहे. 

३ टिप्पण्या: